Login

आणि चूक उमगली अंतिम भाग

चुकीची जाणीव झाली
मागील भागात आपण पाहिलं कि, अस्मिताला बरं नसताना शोभा तिला कामे सांगत राहते, जे अमोलला पाहवत नाही आणि तो तिच्या बाजूने बोलतो, जे शोभा ताईंना आवडत नाही आणि त्या घर सोडून जायची गोष्ट करतात. आता पाहूया पुढे,



आई, तुझंच म्हणणं मान्य करून तुला अक्षयकडे सोडतोय. पण एकच सांगतो, मनात राग ठेऊ नकोस. आम्हाला तू हवी आहेस, काही दिवस तिकडे राहून परत इकडे ये.आम्हाला तुझी आठवण येईल. "


अमोल शांत पण थोड्या दुखऱ्या स्वरात म्हणाला.

शोभा ताईंनी साडीची घडी नीट करत उत्तर दिलं,

"आता काही मी परत येणार नाही, तूपण घ्यायला येऊ नकोस."

अमोल हताशपणे गाडी सुरू करतो. अस्मिता दरवाजापाशी उभी असते. ती काही न बोलता फक्त हात हलवते. पण शोभाताईंनी तिच्याकडे बघण सुद्धा टाळलं.

शोभाताईचे सुरुवातीचे काही दिवस खूप चांगले गेले त्या खूप खुश होत्या. मोठा फ्लॅट, गादीवरची झोप, एसी खोलीत राहणं.मानसी गरोदर असूनही हसतमुखपणे उठायची, चहा करायची, त्यांच्या आवडीनिवड लक्षात ठेवून त्यांचं करायची. तस त्यांच्याकडे मदतनीस बाई होती पण तिच्या हातच काही केल्या शोभा ताईंना आवडेना. त्या तिच्या कामात सुद्धा सवयी प्रमाणे चुका काढू लागल्या. त्यामुळे ती मदतनीस बाई न सांगता काम सोडून गेली. इकडे मानसीला आराम करायला सांगितला होता, त्यात तिला काहीही काम येत नव्हतं, त्यामुळे आपसूक ही जबाबदारी शोभाताईवर येऊन पडली. एवढे वर्ष कामाची थोडीही सवय नसल्यामुळे त्यांना सुद्धा काम करणे जीवावर येऊ लागलं. पहिल्यांदा पोळ्या… मग झाडलोट… नंतर मानसीच्या औषधांची आठवण… सगळं त्या करत राहिल्या. पण त्यांना चुकून वेळ झाला तर मानसी आणि अक्षय पटकन अंगावर यायचे.
पण स्वतःहून आल्यामुळे त्यांचा अहंकार मध्ये येऊन त्या अमोलसोबत कॉल वर सुद्धा बोलत नसायच्या.

एका संध्याकाळी शोभाताई थोड्या दमल्या होत्या. औषध घेतल्यानंतर झोप लागावी म्हणून चहा हवा होता.

म्हणून त्या म्हणाल्या,

"मानसी, मला एक कप चहा करशील का ग?"

त्यावर मोबाईल बघत असलेली मानसी थोडं तिरसटपणे त्यांना म्हणाली,

"आई, आता इतकं दमलेय मी. तुमचं तुम्ही करून प्या ना.... आणि मलापण दूध गरम करून द्या."

शोभाताईंनी काही न बोलता स्वतःच उठून चहा केला स्वतःला चहा घेतला आणि तिला दूध नेऊन देत असतानाच त्यांच्या कानावर मानसी कुणाशी तरी फोनवर बोलत होती te शब्द पडले,


"काय माहित ग.., अजून किती दिवस इथे राहणार आहेत."

शोभाताईंनी हे ऐकलं... पण काही बोलल्या नाहीत. फक्त त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू कसेतरी त्यांनी अडवले.


दुसऱ्याच दिवशी अक्षयच्या ऑफिसचे काही सहकारी त्यांच्या घरी येणार होते. शोभाताई सुद्धा सकाळ पासून मानसी सोबत राबत होत्या, पण जस पाहुणे यायची वेळ झाली तस लगेच अक्षय त्यांना म्हणाला,

"आई, तू काही वेळ मंदिरात जाना.. ते काय आहे ना, माझे फ्रेंड्स येणार आहेत.. त्यांना तुझ्यासमोर वेगळंच वाटायला नको म्हणून.."


"अरे पण मी काही नाही बोलणार इथे शांत बसून राहीन ना.."

शोभाताईना नवल वाटुन त्या म्हणाल्या.


" आई प्लीज, वाद नको... मी सोडतो तुला. "

असं म्हणून बळेबळेच त्याने त्यांना बाहेर काढलं. शोभा ताईंना आता अस्मिता आणि अमोलची खूप आठवण यायला लागली होती. त्यांना त्या दोघांची किंमत कळून चुकली होती. पण माफी मागण्या एवढा मोठेपणा अजून त्यांच्याकडे आला नव्हता. त्या मनात विचार करत होत्या, “अमोल कधीच अशा शब्दांत बोलला नाही माझ्याशी आणि अस्मिता? तिने एकदाही मला दुसऱ्यांसमोर लाजवलेलं नाही कि माझा शब्द खाली पडून दिला नाही.
तरी सुद्धा अक्षयच त्यांचा लाडका होता.

असेच काही दिवस गेले, मानसीचे सुद्धा दिवस भरत आले होते. पण शोभाताई काही केल्या जायचं नाव घेत नव्हत्या. म्हणून मानसीने त्याच्यापाठी त्यांना पाठवून देण्यासाठी भुंगा लावला होता. अक्षयने देखील काहीही विचार न करता शोभाताईना न सांगता अमोलला बोलावून घेतलं. दुसऱ्याच दिवशी अमोल अस्मिता आणि मुलं त्यांच्याकडे येऊन पोहचली, आणि ते सगळे दारातच असताना त्यांच्या कानावर शब्द पडले,


"आई, आमचं खरंच खूप छोटं घर आहे. तुला कायमच इथे राहणं कठीण जाईल.त्यात मानसीची आई पण येणार आहे आता इकडेच कायमच राहायला. तुम्हा दोघींचा खर्च आणि सगळी जबाबदारी मला झेपणार नाही. तू दादाकडेच परत जा. तिथंच सगळं सोयीस्कर होईल.शिवाय शहरामधलं हवामान काही केल्या तुला मानवणार नाही... शिवाय माझ्यावर आता बाळाची देखील जबाबदारी आहे..."

हे शब्द अक्षयनं स्पष्ट पण थोड्या उपकाराच्या सुरात उच्चारले. शोभा ताई काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिल्या. त्यांच्या डोळ्यांत प्रश्नही होते, आणि थोडी आशा पण. पण अक्षयच्या चेहऱ्यावर कुठेच माया, ओढ, की अपराधी भाव दिसत नव्हता. ते ऐकून शोभाताईना खूपच रडू कोसळले आणि आपल्या आईचा स्वभाव माहित असलेला अमोल पटकन पुढे झाला.


"आई, तू आलीस आणि इकडचीच झालीस... मला, अस्मिताला आणि मुलांना तुझी किती आठवण येत होती. अक्षय तुझा पाहुणचार खूप झाला, आता मी आईला परत घेऊन जातोय. "

तेवढ्यात चिन्मय-शर्वरी त्यांना बिलगली आणि अस्मिताने पुढे होऊन त्यांना नमस्कार केला. आता मात्र न राहवून शोभाताईनी लगेच बॅग उचलली आणि अमोल सोबत गावी गेल्या. त्यांना त्यांची चूक उमगली होती, पण त्यांनी माफी न मागता आपल्या वागण्यात सुधारणा केली. अस्मिताला अमोलपेक्षा जास्त जीव लावला, आता मात्र त्यांना अक्षयची आठवण कधी नाही. त्यांना समजलं होत, आपल्या जवळ असेल त्याची किंमत करावी.