Login

आणि कर्मही देतं! (भाग -2)

Success Story Of A Sincere Boy


इंजिनअरिंग केलेला सुयोग नोकरीच्या मुलाखतीसाठी कंपनीच्या ऑफिसमध्ये बसलाय.

इतक्यात दोन डोळे आपल्याकडे चोरट्या नजरेने बघतायत हे जाणवलं त्याला... त्या रोखाने बघितलं तर एक परिचित चेहरा समोर दिसला....त्याचा बालपणीचा मित्र नंदन....!

दोघांनाही एकमेकांची ओळख पटली अन् चेहऱ्यावर हसू पसरलं. एकमेकांशी बोलताना ओघाओघानेच कळलं की नंदनचे वडील त्याच्या लहानपणीच वारले. त्याच्या आईने घरगुती खाणावळ चालवून त्याचा आणि पाठच्या दोन भावंडांचा सांभाळ केला. त्या भरवश्यावर नंदनने कसंबसं बी एस्सी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं अन् आता नोकरीच्या शोधात आहे. नंदनची अवस्था पाहून सुयोगचं मन गलबललं पण क्षणभरच! नंदनला शुभेच्छा देऊन त्याने निरोप घेतला.


खरं तर नोकरीची गरज तर सुयोगला पण होतीच ना! त्याची आई बँकेत अधिकारी आणि वडील कॉलेजमध्ये प्राचार्य... स्वतःची दोन घरं... पाच एकर शेत, घरी चारचाकी गाडी आणि बँकेत पुरेशी शिल्लक.... म्हणायला सुखवस्तू असं त्याचं कुटुंब! पण म्हणून त्यानं नोकरी न करता घरी बसावं असं कसं चालणार होतं?


आई-वडिलांना पगार भरपूर असला तरी तो त्यांचाच! सुयोगचच्या सधन सुखवस्तू कौटुंबिक पार्श्वभूमीचा त्याच्या भवितव्यासाठी शून्य उपयोग होता.

बरं एखादा व्यवसाय उभारावा म्हटलं तर नुसतं भांडवल असून थोडीच भागतं! त्यासाठी व्यावसायिक दृष्टी असावी लागते ती ह्या कुटुंबाकडे अभावानेच होती.त्यात सुयोगचा शांत, साधा सरळ, पापभीरू आणि अती प्रामाणिक स्वभाव... व्यवसाय करण्यासाठी लागणारे चातुर्य त्याच्याकडे नव्हते... आणि म्हणूनच नोकरी स्वीकारण्याशिवाय अन्य पर्यायही नव्हता.

नोकरीकरिता तो ढीगाने इंटरव्हयू देत असे. पण कुठेही मुलाखतीसाठी गेलं तर कधी त्याची पात्रता आडवी येई तर कधी त्याचं शिक्षण!

कधी समान गुण असलेल्या उमेदवारांमध्ये ज्याला आर्थिक गरज जास्त आहे त्याला प्राधान्य दिले जात असावे! त्यामुळे आपले सुयोगकुमार वयाच्या सव्वीस वर्षांपर्यंत अक्षरशः बेरोजगार होते आणि हताश आणि निराशही!

त्यात नातेवाईक आणि परिचितांचे टोमणे! ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून त्याचा नास्तिक स्वभाव अजूनच कोरडा होत गेला.


ह्या खेपेसही तेच झालं. पात्रतेसाठी आर्थिक निकष वरचढ ठरल्याने बाकी बाबतीत सुयोग बरोबरीत असूनही नंदनला नोकरी मिळाली! सुयोगला हसावे की रडावे तेच कळेना!


"नियती इतरांचे भले करता करता माझ्यावर रुष्ट का होते प्रत्येक वेळी?" त्याचा टाहो त्याच्या चेहऱ्यावर उमटला"


अरे, असं नाराज नको होऊस.... त्या परमेश्वराकडे तुझ्यासाठी नक्कीच याहून चांगली योजना आहे... धीर धर बाळा... "आजीचा सुरकुतलेला हात त्याच्या पाठीवरून फिरला तसा त्याच्या अश्रुंचा बांध फुटला.


"पण असं माझ्याच नशिबी का गं?माझे आईबाबा पैसे कमावतात हा माझा दोष आहे का? मला का नाही मिळाली ही नोकरी? मी काही करूच नये का? की कायम बापाच्या जीवावर जगावं त्या *******नी म्हटलं तसं?" भूतकाळातला एक जिव्हारी लागलेला टोमणा त्याला सतत डिवचत राही. त्याचं मन आक्रंदत होतं.


"खरं तर नंदनला नोकरी मिळाली हे चांगलंच झालं. त्याला निकड आहे कमाईची. आणि होतकरू आणि गरजू मुलांना रोजगार मिळतोय ही देखील समाधानाची बाब आहे, पण आपला मुलगाही लागावा आता पोटापाण्याला " बाबा रात्री आईशी बोलत होते.


"हो ना! त्याकाळी आम्ही मुलींनी नोकरी केली तर म्हणायचेत मुलांच्या जागा अडवताय..मुलींपेक्षा मुलांना जास्त गरज असते नोकरीची... पण माझ्या नोकरीमुळे कितीतरी सुकर झालं ना आपलं आयुष्य! नाहीतर त्याकाळी शिक्षकांना पगार तो किती! त्यात जया -माया वन्सची लग्न, बाळंतपणं, दादांचं कँसरचं आजारपण, माझ्या भावाचं शिक्षण, सुयोगचं संगोपन कसं निभावलं असतं! आईनेदेखील आपली बाजू मांडली.


नोकरीतून निवृत्ती मिळाल्यानंतर मिळालेल्या पैशातून एखादं दुकान घ्यायचा विचार करतोय.व्यवसाय करणं काही आपल्या रक्तात नाही. त्यामुळे सुयोगला आता व्यवसायात घालावं तर त्याचा जम बसेपर्यंत त्याची उमेदीची वर्षे निघून जातील.त्याला नोकरी शोधू देत त्याच्या खर्चाला हातभार लागावा म्हणून.... पण सोबतीला हे दुकान असलं तर सुयोगला पुढे आधार होईल. आणि तो पुढे हे वाढवू शकला तर त्याच्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी बॅग्राऊंड तयार असेल रोजगाराचं....


इथे आपल्या नोकरीची /पदाची पुण्याई आपल्या लेकराच्या कामी नाही येऊ शकत पण एक छोटा व्यावसायिक आपल्या मुलाबाळांसाठी नक्कीच एक रोजगाराचं साधन उपलब्ध करुन देतो."

हे आधीच करायला हवं होतं... पण..... आईनं सुस्कारा सोडला.

*****************************

मिळेल का सुयोगला नोकरी ?

अंतिम भाग जरूर वाचा
0

🎭 Series Post

View all