सुयोग मुळातच हुशार... त्यामुळे पहिल्या चार फेऱ्या इतर दोन उमेदवारांसोबत त्याने सहजच पार केल्या. आता ही शेवटची निर्णायक फेरी.... ह्यात समूह मुलाखत घेतली जाणार होती.
समूह मुलाखतीच्या वेळी प्रत्येक उमेदवाराला स्वतःबद्दल माहिती सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या... तिघांनीही आपापली बलस्थानं उत्कटतेनं मांडली. तीनही उमेदवार उच्चशिक्षित आणि समान क्षमतेचे!
"आता शेवटचा प्रश्न... ही नोकरी कुणाला मिळावी असं वाटतं तुम्हाला ?" मुलाखतकाराच्या प्रश्नाने सुयोग अंतर्मुख झाला. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या सोबतचे दोनही उमेदवार आले.
"मीनल" - एका मुलावर प्रेम जडलं... पळून जाऊन लग्न केलं पण तो मुलगा तिच्यासाठी योग्य नव्हताच... आता त्याला सोडून माहेरी परतलेली....पदरात आलेली एक तान्ही मुलगी... दोघींच्या भवितव्यासाठी नोकरी मिळणं आवश्यक!
"रोहन"- वडिलांच्या दारूच्या व्यसनाने सगळं घर कर्जबाजारी झालं... त्यात घरात रोजची भांडणं... नशेत वडील आईला देत असलेल्या घाणेरड्या शिव्या आणि रोजची मारहाण .. त्याची नोकरी करून आईला ह्या नरकातून बाहेर काढण्याची धडपड!
सुयोगचं डोकं गरगरू लागलं... विचारशक्ती कुंठीत झाली.... अतिशय प्रामाणिक आणि समजूतदार मुलगा तो.... आता तर हा उत्तम नोकरीचा हातातोंडाशी आलेला घास....तिघेही उमेदवार बरोबरीच्या क्षमतेचे.... तिघांमध्ये तगडी स्पर्धा!
मीनल आणि रोहनने आपल्यालाच ही नोकरी मिळावी, आपणच त्यासाठी सर्वात पात्र उमेदवार आहोत हे अगदी छान पटवून सांगितलं.
आता सुयोगची वेळ होती... तो स्वतः ह्या नोकरीसाठी पात्र तर होताचा शिवाय नोकरीची निकड त्यालाही होतीच ना!
"हं... तर मिस्टर सुयोग.... व्हॉट डू यू थिंक ? हू शुड गेट धिस जॉब?"
"सांगू का माझं स्वतःचं नांव? नोकरीची वणवण थांबेल... आयुष्य सेट होईल...पण ही दोघं!!! मला माझ्या कुटुंबाचा भक्कम पाठिंबा आहे... आणि आजीचा आशीर्वाद! मी अजून मेहनत करेन...ही ससेहोलपट एखाददोन महिने अजून ..पण मिळवेन मी एखादी नोकरी... कदाचित कमी पगाराची असेल ... करेन थोडीबहुत अड्जस्टमेन्ट... पण आज ह्या दोघांपैकी कुणाला नोकरी मिळाली तर ह्यांना जगण्याचा मार्ग सापडेल... ह्यांच्या आयुष्यातला अंधार कमी होईल.....
आजी म्हणतेच ना "खोटं कधी बोलू नये"- मग मलाच ही नोकरी मिळावी, मलाच सर्वात जास्त गरज आहे असं खोटं कसं बोलू?
बाबा म्हणतात ना आपलं बरंवाईट कर्म आपल्याकडे पुन्हा येतं..."Law of Redumption!" मी आज स्वार्थीपणा केला तर पुढे मला भोगावी लागतील का त्याची फळं!"
तो स्वतःच्या मनाशी बेईमानी करूच शकला नाही.... त्याने मुलाखतकर्त्यांच्या उत्तरादाखल कुणाचं नांव सांगितलं हे त्यालादेखील कळलं नाही. खिन्न मनाने तो तिथून बाहेर पडला.
******************************************
अशीच दोन वर्ष निघून गेलीत... आज त्या कंपनीत त्यांचे "गुणवत्ता निरीक्षक" येणार आहेत.
कंपनीत उत्पादनाची गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन आणि संशोधन करण्यासाठी त्यांच्या नियामक मंडळाकडून एका सक्षम अधिकाऱ्याची निवड झालीये.
आणि त्यांच्याच स्वागताची जंगी तयारी ह्या कंपनीत सुरु आहे.
"मीट अवर डायनॅमिक लीडर मिस्टर सुयोग" कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरने कंपनीच्या प्रॉडक्ट मॅनेजर रोहनशी ओळख करून दिली....
रोहनने मात्र सुयोगचा शेकहॅन्डसाठी पुढे आलेला हात स्वतःच्या कपाळाला लावला अन् पुढे येऊन त्याला एक सॅल्यूट ठोकला.
"हमारी जिंदगी भी हमारी फिल्मोकी तरह होती है... अन्तमे सब कुछ ठीक हो जाता है... अगर नहीं... तो वो दी एन्ड नही... पिक्चर अभी बाकी है.... मेरे दोस्त!"
दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हणतात पण ह्यावेळी सुयोगच्या कर्मानेच त्याला आयुष्यभराचं सुख, समाधान आणि ऐश्वर्य दिलंय.
आता सुयोगचा "त्या" शक्तीवर विश्वास बसला होता... आणि "The Law of Redumption" पुन्हा एकदा सिद्ध झाला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा