चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद कथालेखन स्पर्धा
जलद कथालेखन स्पर्धा
शीर्षक :-आणि तिने लढाई जिंकली - भाग 3
आणि तिने लढाई जिंकली -भाग तीन
मागील भागात आपण पाहिलं कि, अस्मिता माहेरी येऊन राहिली. काही दिवसातच समजलं कि ती गरोदर आहे. तिचे आईवडील काळजीत असतात. आता पाहूया पुढे;
"आता ही कायमची माहेरी राहिली तर? आम्हीच पोटापाण्याची सोय करायची का? उद्या बाळ झालं की त्याचंही ओझं आमच्यावर येईल.”वहिनीच्या शब्दांनी वातावरण आणखी तणावग्रस्त झालं. आईवडील एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.
“ही चं आणि तिच्या मुलाचं पुढे काय होईल?” हा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात घोंगावत होता.
ती मात्र शांत बसून सगळं ऐकत होती. डोळ्यातून अश्रू गळत होते, पण आपल्या पोटाला स्पर्श करत तिने ठाम निर्धार केला.
“जग काहीही बोलू दे, माहेरात कितीही त्रास असू दे… या बाळासाठी मी उभी राहीन. आईवडिलांचं ओझं न होता, माझं आणि माझ्या लेकराचं आयुष्य मी स्वतः घडवीन.”पण गरोदर असल्याची बातमी समजल्यावर तिने एक आशा मनात धरली होती,
“माझा नवरा आता मला स्वीकारेल. मुलासाठी का होईना, तो माझ्यापाठी उभा राहील.”धडधडत्या मनाने तिने त्याला ही गोष्ट फोनवर सांगितली.
“आपल्याला बाळ होणार आहे… कृपा करून मला आणि या येणाऱ्या जीवाला नाकारू नका.”पण समोरून तिच्या नवऱ्याने दिलेले उत्तर चाकू सारखं तिला टोचलं,
“आता माझं तुझ्याशी काहीही नातं उरलेलं नाही. तू मला आणि माझ्या घराला फसवलंस. यापुढे मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं नाही.”
ती स्तब्ध झाली, ती काही बोलणार तेवढ्यात त्याचे शब्द तिच्या कानात लाव्हा सारखे बरसले.
“मी लवकरच दुसरं लग्न करतोय. तू आणि तुझ ते बाळ माझा काहीच संबंध नाही. घटस्फोटाच्या कागदावर सहया कर.. न मला मोकळ कर. "त्या क्षणी तिला तिचं आयुष्य संपल्यासारखं वाटल. लग्न, घर, सासर सगळं आधीच हिरावलं गेलं होतं, आता उरलेला आधारही गेला. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले, पण पोटावर हात ठेवत तिने मनाशी ठरवलं.
“आता कुणाच्याही आधाराशिवायही मी उभी राहीन. या जीवासाठी, स्वतःसाठी. त्यांनी नाकारलं म्हणून मी ह्या जीवाला नाकारणार नाही.”पण तिचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. माहेरी दिवस तर जात होते,पण घरातलं वातावरण मात्र तिला सतत आठवण करून द्यायचं. ती आणि तिचं मूल हे जणू ओझं आहे. दिवस सरले तस तिने एका गोड मुलाला जन्म दिला पण त्याच कौतुक कुणालाच नव्हतं.
मोठी बहीण अधूनमधून माहेरी यायची. ती आली की घरात उत्सवाच वातावरण पसरायचं. आई-वडील तिच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करत.
“आपली मुलगी किती सुखात आहे बघा. तिचा नवरा किती चांगला, मुलं किती छान शिकतायतं.”
घरात तिच्या मुलांना खेळणी, गोडधोड, कौतुक सगळं मिळायचं. सगळे त्यांच्याभोवती फिरत.
ती मात्र कोपऱ्यात उभी राहून ते बघायची. तिच्या कुशीत असलेल्या तिच्या मुलाकडे समीरकडे कुणाची नजर वळत नसे.
एकदा असंच झालं, मोठ्या बहिणीची मुलं खेळायला बाहेर गेली होती. सगळे अंगणात त्यांच्याकडे बघत टाळ्या वाजवत होते. समीरनेही हळूच चेंडू उचलून खेळात शिरायचा प्रयत्न केला. पण त्याला कुणी खेळायला देखील घेतलं नाही.
आईने बहिणीच्या मुलाकडे बघत कौतुक केलं,
“किती हुशार आहे गं तुझा मुलगा! शाळेत पहिल्या नंबरला येतो म्हणे.”त्याच क्षणी समीर तिच्या साडीचा पदर धरून विचारल.
“आई, मला6का नाही घेत गं खेळायला? "त्या निरागस प्रश्नाने तिचं हृदय तुटून गेलं. डोळ्यांत पाणी दाटलं, पण ओठांवर हसू आणत तिने त्याला कुशीत घेतलं.त्या क्षणी तिला ठाम वाटलं,
“या मुलाला मी एकटीनं उभं करेन. कुणी नाकारलं तरी मी नाही. समीरला आयुष्य द्यायचं, त्याचं भविष्य घडवायचं, हीच माझी खरी लढाई आहे. खूप झालं आता मला माझ्या पायावर उभ राहायला लागेल. "
अस्मिता तिच्या पायावर उभी राहील का??
क्रमश:-
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा