Login

आणि तिने लढाई जिंकली - भाग चार

अस्मिता स्वतःच्या पायावर उभे राहते, ताई सुद्धा तिची वहिनी तिला घालून पाडून बोलते
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद कथालेखन स्पर्धा

शीर्षक आणि तिने लढाई जिंकली - भाग चार


आणि तिने लढाई जिंकली -भाग चार

मागील भागात आपण पाहिलं कि, अस्मितासोबत समीरशी सुद्धा कोण नीट बोलत नसे, आता पाहूया पुढे;


समीर तीन वर्षाचा झाल्यानंतर अस्मिताने शिवणकाम, भरतकाम व आरी वर्क शिकून घेतलं. कष्टानं कमावलेला घास नेहमी गोड लागतो. काही महिन्यांतच तिच्या हाताला सराव आला. शेजारच्या बायकांनी कपडे द्यायला सुरुवात केली. शिवणकामाचं छोटंसं काम हळूहळू वाढू लागलं.

पहिल्यांदा तिने कमावलेले पाचशे रुपये हातात आले तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती रक्कम तिने समीरच्या खेळण्यासाठी पहिल्यांदा खर्च केली.

तिचं शिवणकाम दिवसेंदिवस चांगलं होत गेलं. सुरुवातीला शेजारच्या बायकांची ब्लाउजची कामं मिळाली, मग गावभर तिच्या नावाचा बोलबाला व्हायला लागला.


“अस्मिताने शिवलेले कपडे अगदी फिट बसतात,आपण तिच्याकडेच काम देऊया” शेजारच्या बायका म्हणू लागल्या.

घरात सतत मशीनचा आवाज घुमत होता. प्रत्येक टाक्यागणिक ती आपलं नवं आयुष्य शिवत होती. तिच्या हाताला कष्ट होते, पण मनात समाधान होतं

“आता मी माझ्या मेहनतीनं कमावते आहे.”
आईवडीलही आता तिच्याकडे अभिमानाने बघू लागले होते. आधी वहिनी टोमणे मारायची,

“शिवणकाम करून कायं मोठं होणार आहे?” पण जेव्हा रोज घरात पैसे येऊ लागले, समीरच्या शाळेच्या फीपासून घरखर्चात हातभार लागू लागला, तेव्हा तिच्या तोंडूनही शब्द निघाले नाहीत.

समीर शाळेत गेला की तिला मशीनसमोर बसायला वेळ मिळायचा. संध्याकाळी तो घरी आल्यावर धावत तिच्या कुशीत शिरायचा.


“आई, आज मी निबंध स्पर्धेत पहिला आलो!”
“आई, गुरुजींनी माझं कौतुक केलं.”

त्याचे चमकणारे डोळे आणि गोड हसू तिचं सगळा थकवा निघून जायचा.

एकदा शाळेतला निकाल लागला. समीर वर्गात पहिला आला होता. हातात सर्टिफिकेट घेऊन तो आईसमोर उभा राहिला.

“आई, बघ! मी पहिला आलो.”

ती अश्रूंनी ओलसर झालेल्या डोळ्यांनी त्याला मिठी मारली.


“समीर, तुझं यश हेच माझ्या आयुष्याची कमाई आहे. तुझ्या यशामुळे मला जगासमोर वावरता येतं.”
आता तर गावातले लोकही म्हणू लागले होते,


“ज्या मुलीला घराबाहेर काढलं, जिला समाजाने नाकारलं… तीच आज आपल्या मेहनतीमुळे टिकून आहे.”


तिचं आयुष्य जरी नव्याने आकार घेत होतं, तरी घरातलं वातावरण मात्र बदलल नव्हत.

सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती सतत धावत असायची. शिवणकामासोबतच घरातली भांडी, झाडलोट, पाणी भरायचं काम सगळं तिच्याच अंगावर यायचं. ती दमून भागून बसली तरी वहिनीचे शब्द कानावर आदळायचे.

“आयतं गिळतेस… आमच्या घरात राहतेस, आमचं खातेस… एवढं काम तर केलं पाहिजे. फुकटच कोण राहायला देणार? "

तिचे ते शब्द तिच्या हृदयावर वार करायचे, पण समीरकडे पाहून ती स्वतःला सावरायची. “आज नाही तर उद्या, मी या परिस्थितीतून बाहेर पडणारच.”


काय मार्ग काढेल अस्मिता?