Login

अंकू

Anku

©®विवेक चंद्रकांत

ऑफिसला निघालो होतो. गावाबाहेर असलेल्या महादेवाच्या मंदिरात गेलो होतो. सध्या आयुष्यात काहीच ठीक चालले नव्हते. अशावेळी बरोबर देवाची आठवण येते. दुसऱ्या रस्त्याने गावात आलो तर रस्त्याच्या एका बाजूने बायकांची भली मोठी रांग. अगदी अर्धा किलोमीटर तरी असेल. आधी लक्षातच आले नाही ही कसली रांग? मग समजले सरकारतर्फे गरीब कष्टकरी महिलांना मोफत भांडेवाटप होते त्याची ती रांग होती.एकदम एक ओळखीचा पंजाबी ड्रेस दिसला. पुन्हा वळून पाहिले पण एवढ्या गर्दीत काही दिसेना, मोटरसायकल वळवून पुन्हा 100 150 फूट गेलो. पुन्हा तोच ड्रेस दिसला. ड्रेस घातलेली तरुणी माझ्यापासून चेहरा लपवत होती. मी मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला लावली. आणि शांतपणे तिच्याकडे गेलो. रांगेतील बाया काहींश्या आश्चर्याने माझ्याकडे पाहत होत्या.

"अंकिता? तू इथे रांगेत?"

ती दोन क्षण काहीच बोलली नाही. मला वाटले ती मला उडवून लावेल किंवा रागाने म्हणेल "तुझा काय संबंध?"

पण ती कसनूसं हसून म्हणाली.
"वहिनीचे नाव आहे, मी नंबर लावून उभी आहे. वहिनी येतेय मागून."

"येतेय माझ्याबरोबर? चहा घेऊ"

"नको, नंबर जाईल माझा, पहाटेची येऊन उभी आहे."

"पहाटेची?" माझ्या ह्रदयात कालवाकालवं झाली.

तेव्हड्यात शेजारच्या बायांची कुजबुज ऐकली.
" कोण शे व माय हौ? "

"तिना नवरा शे ना व? पण राहतंस नै संगे?"

"नवरा शे त जाऊन यू दे तिले. आपण सांभाळसू जागा "

"अंकु, जाऊन ये तू. आम्ही तुझी जागा ठेवू." तिच्या मागची बाई बोलली.दोन मिनिटे मागेपुढे करत अंकिता माझ्याबरोबर यायला तयार झाली.

अंकिता माझी बायको, आमचा प्रेमाविवाह. तिची आर्थिक परिस्थिती बेतास बात तर मी खाऊनपिऊन सुखी दोघांचेही वडील वारलेले..दोघांच्याही घरून विरोध. पण कॉलेज संपल्या संपल्या मला सरकारी नौकरी मिळाली आणि अंकिताच्या घरच्यांचा विरोध मावळला. पण आईचा कायम होता. पण मी अंकिताशीच लग्न करेल यावर ठाम राहिल्याने आईचा नाईलाज झाला. पण नंतर तिने अंकिताला कधी धड राहू दिले नाही. सतत कामात चुका काढणे, घालुनपाडून बोलणे चालू केले. आता नवीन आलेली मुलगी सर्वगुणसंपन्न कशी असेल? सुरुवातीला सासूला घाबरून राहणारी अंकिता मग उलट उत्तर देऊ लागली मग आईने तर राईचा पर्वतच केला. दुर्दैवाने मीही फारशी शहानिशा न करता आईचीच बाजू घेऊ लागलो. शेवटी कंटाळून अंकिता माहेरी निघून गेली. आईही आमच्या गावी आता दोन महिण्यापुर्वी गेली. तिथे काही प्रॉपर्टीचे हिस्से करायचे होते. त्यांनंतर मला एकेक गोष्टी कळू लागल्या. आईला तिच्या एका नातेवाईकाची मुलगी सून म्हणून आणायची होती पण तसे न झाल्याने तिने तो राग अंकितावर काढला. आमच्या गावाकडच्या काकाकडून अनेक गोष्टी कळ्याल्या. आईचा स्वभाव पहिल्यापासून एककल्ली, हेकट. पण माझ्या लक्षात आले नाही. वडील गेल्यावर आईनेच मोठे केल्याने आई म्हणेल ते खरं असे वाटायचे. काही सारासार विचार करायचो नाही. तेवढं वय नव्हते, परिपक्वता नव्हती. आता घर खायला उठले होते. अंकितावर अन्याय केला हे समजत होते पण तरीही तिनेच माफी मागून यावे अशी पुरुषी मानसिकता होतीच. पण आज तिला पाहताच तो गर्व, अहंकार गळून पडला.

मोटरसायकल वर माझ्यामागे पुरेसे अंतर ठेवून ती बसली. मी पाच मिनिटाच्या आंतरावर असलेल्या सत्यदीप हॉटेलकडे गाडी घेतली. एका कोपऱ्यात बसलो. फरशी गर्दी नव्हतीच.
मी अंकिताकडे नजर टाकली. ज्या ड्रेसमुळे मी तिला ओळखले तो अगदी जुनाट झाला होता. लग्ना अगोदर मीच तिला घेऊन दिला होता. एकेकाळी प्रफुल्लित असलेला चेहरा कोमेजलेला होता. उन्हात फिरून रापलेली, कृष झालेली अंकिता हीच का हा मला प्रश्न पडला. माझ्या घशात अवंढा आला.

"कशी आहेस?" मी म्हणालो,

" तुझ्यासमोर आहे. "

"खूप खराब झालीस."

"आठ महिने झालेत माहेरी आहे"

"पण म्हणून?...."

"तुला काय कळणार नवऱ्याने सोडलेल्या बाईचे दुःख."

" पण तू एवढे ताणून का धरले? "

"ताणून? माझे मामा दोनदा जाऊन आले. पण सासूबाईंनी अक्षरशः हाकलून लावले. कसा फोन करणार?"

"मला माहीतच नाही. कमीतकमी मला कॉन्टॅक्ट करायचा."

"तू तर आमच्यकडचे कोणी दिसलं तर तोंड फिरवून घ्यायचा "

" सॉरी अंकु, खरंच माझ्याकडून चूक झाली."

"तूझ्या आणि सासूबाईंच्या अश्या वागण्यामुळे तू मला घटस्फोट देणार असेच वाटू लागले होते आम्हाला."

"आणि अंकू एकदम भांड्याच्या लायनीत वगैरे."

"नवऱ्याला सोडून माहेरी आलेली मुलगी सगळ्यांना जड होते. आईच माझ्याबाजूने होती. भाऊ वहिनींना ही कायमची माहेरी राहते का ही चिंता... त्यात आमच्या गल्लीत तर सगळेच लोक मलाच दोष द्यायचे. माझी परिस्थिती तर..." तिने घाईघाईने रुमालाने डोळे पुसले. मला एकदम भरून आले मी तिचा हात हातात घेतला. माझ्यासोबत असतांना मऊ, मुलायम असलेला तिचा हात खरखरीत झाला होता. मी तिचा हात धरून म्हणालो

"अंकू? येते घरी?"

"कशाला? पुन्हा सासूबाईंकडून हाकलून द्यायला.?"

' ती गेलीय गावाकडे. दोनचार महिने येणार नाही अजून. दहा मिनिटे बस.तूझ्या हातून चहा पाज पुन्हा. प्रॉमिस करतो.. वेडेवाकडे काहीच करणार नाही. "

"चल" अंकिता नाही म्हणेल, आढेवेढे घेईल असे वाटले पण ती लगेच तयार झाली.

मी घरी पोहचलो. कुलूप उघडून आत गेलो. दरवाजा लावला आणि अंकिताशी काही बोलणार तोच तिने मला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. बऱ्याच वेळ ती रडत होती, मी तिच्या पाठीवरून हात फिरवीत तिला शांत करत होतो. रडण्याचा जोर ओसरल्यावर मी तिला सोफावर बसवले तिला फ्रिजमधून पाण्याची बाटली आणून दिली.

"माहेरी माझी परिस्थिती विचित्र आहे, आई सांभाळून घेते पण वहिनी सतत काम सांगत राहते. बोलताही येतं नाही. इथल्यापेक्षा दुप्पट काम. पण काय करणार? परतीचे रस्ते मीच बंद केले. मीच सुरुवातीला भांडून घर सोडून गेले.,"

"नाही अंकू, तू घर सोडून गेली नाही, तुला भाग पाडले माझ्या आईने, सतत बोलून बोलून तुझा अपमान करून."

"म्हणजे... तुला."

"हो मला सगळे समजले आहे. माझीही चूक होती की मी तुला काही विचारले नाही. दुसरी बाजू विचारत घेतली नाही."

"जाऊदे, आता काय उपयोग? "

"उपयोग कसा नाही? आजपासून आत्तापासून तू ह्या घरात राहायचे. मालकीण म्हणून, माझी अर्धांगिनी म्हणून. तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर..."

"विश्वास नसता तर एवढे जीव तोडून प्रेम केले असते का? पण तू असा मला रांगेतून घेऊन आला. वहिनीला काय वाटेल? आईला काय वाटेल? पुढे काही झाले तर माहेरचं दारही कायमसाठी बंद होईल."

", बरे... तू चहा ठेव मी आलो पाच मिनिटात."

पाच मिनिटात मी आलो तेव्हा माझ्याबरोबर आणखीही काही लोक होते.
"अंकू.. हे बघ कोण आलेत, तू सगळ्यांना ओळखते. हे शेजारचे देशपांडेकाका, हे पाटिलकाका आणि काकू, ह्या संत मॅडम, ह्या महाजनमावशी.. ह्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो अंकू की तुला फुलासारखे जपेन, कुठलाही त्रास होऊ देणार नाही.आजपासून आपला नवीन संसार सुरु झाला असे समज."

"ते सगळे कबूल पण सासूबाईंचे काय? माझ्या वाहिनीचे काय,?"

मी फोन हातात घेतला. तिच्या वहिनीला फोन लावला.
"हॅलो, ताई, मी बोलत आहे सक्षम. मी अंकिताला माझ्या घरी घेऊन आलो आहे कायमसाठी. आता आम्ही दोघे आणि शेजारचे चारपाच लोक उपनगर पोलीस स्टेशन ला जात आहोत तिथे मी सगळयांसमोर स्टॅम्प पेपरवर लिहून देणार आहे की अंकिताला सासरी कोणताही त्रास झाल्यास त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर राहील. तर तुम्ही, आई आणि अंकिताचा दादा तिथे सगळे या सह्या करा आणि एक कॉपी तुमच्याजवळ ठेवा. काय म्हणता? चालेल चालेल."

", अरे एकदम पोलीस स्टेशन कशाला? तू किंवा आईंनी मला कधी मारठोक केली नाही. पोलीस स्टेशन मध्ये आम्ही काही केस केली नाही तुझ्याविरुद्ध."

"अग ते सांगण्यासाठी. मी पोलिसांचे नाव सांगितले नसते तर तूझ्या वाहिनीने कदाचित थयथयाट केला असता. चल आता सगळ्यांसाठी गोड चहा बनव आणि त्यांचे तोंड गोड कर."

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी येऊन घरीच स्टॅम्प पेपर बनवून त्यावर सह्या करायचे कबूल केले ते माझ्या आईला घाबरवण्यासाठी.

आम्ही सगळ्यांच्या पाया पडलो. सगळे गेल्यावर मी अंकिताला म्हणालो.
"चल तयार हो. अशीही ऑफिसला दांडी झालीच आहे, तुझ्यासाठी नवीन ड्रेस आणि साड्या घेऊन येऊ."

"अरे, आहेत ना? माहेरी पडलेत कपडे. सुटकेसही आणावी लागेल."

"सोड ते जुने कपडे. नवीन कपडे घेऊ आणि नव्याने संसार सुरु करू. आणि एक भांड्यांचा सेटही घेऊ."

"भांड्यांचा सेट कशाला? घरी भरपूर भांडे आहेत."

" तूझ्या वहिनीला द्यायला नको. तू भांड्यांची रांग सोडून माझ्यासोबत पळून आली म्हणून.. "

"पळून नाही आली.. तू गोड बोलून माझे अपहरण केले." माझ्या खांद्यावर लटकी चापट मारत अंकिता म्हणाली.

अंकिता आणि मी बाहेर निघालो तेव्हा तळपते उन असूनही मला चांदणे पडल्यासारखे वाटतं होते आणि माझी मोटरसायकल रस्त्याच्या सहा इंच वरती चालत ( उडत) होती.

©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.