अन्न हे पूर्णब्रह्म...

Importance Of Food
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे

सहज हवन होते नाम घेता फुकाचे

जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

।।जय जय रघुवीर समर्थ।।

हा श्लोक तुमच्या आमच्यापैकी बहुतेकांनी संतांघरीचे अन्नग्रहण करताना ऐकला असणारच आहे. कधी प्रश्न पडलाय की अन्नसेवन करण्याआधी हा श्लोक म्हणण्याचं कारण काय म्हणून? मला पडला. आणि प्रश्न पडला की मी त्याचं उत्तर शोधून काढतेच. याही प्रश्नाचा जमेल तसा माग काढत गेले मी. मग एक एक करत पंक्ती उलगडायला लागल्या मला.

संस्कृत ही तर देवभाषा. तिच्यामध्ये तर दानाची वा अन्नदानाची महती सांगणार्‍या श्लोकांची वा सुभाषितांची वानवा जशी काही नाहीच. 

आता हेच पहा ना!

अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम्। अन्नेन क्षणिका तृप्तीर्यावज्जीवं च विद्यया।।

अन्नदान हे परम दान आहे पण विद्यादान हे त्याहून थोर आहे कारण अन्नाने काही काळापरती तृप्ती होते तर विद्येने मनुष्य सर्वकाल तृप्त होतो. किंवा तुम्ही त्याचा असाही अर्थ घेऊ शकता की तुम्ही एकदा अन्नदान करण्यापेक्षा त्या अन्नाचा उगम शोधण्याच्या विद्येचं दान केलंत तर तो मृत्यूपर्यंत स्वतःची न् इतरांच्या क्षुधेची पूर्ती करु शकेल आणि हेच महादान आहे. 

अशी अन्नदानाची महती सांगणारं हे सुभाषित जाता जाता विद्यादान सर्वश्रेष्ठ असल्याचं सांगून जातं. तसा दान हा आपल्या या लेखाचा विषय नाही. विषय आहे अन्न हे पूर्णब्रह्म कसं हा.

म्हटलं बघूया प्रयत्न करुन आपल्याला येतंय का हे कोडं सोडवता ते!

धांडोळा करता करता असं लक्षात आलं की अन्न पूर्णब्रह्मापर्यंत पोचण्याआधी शरीरापासून सुरुवात केली पाहिजे. 

काशीमध्ये माता अन्नपूर्णेचं मंदिर आहे; जिची मूर्ती हातात पळी घेतलेल्या अवस्थेत आहे. सनातन धर्माचं वैशिष्ठ्य हे आहे की त्याने कुणाला देव मानावं आणि कुणाला मानू नये असा कुठला भेदच शिल्लक ठेवला नाही. आमच्याकडे पालीचं मंदिर आहे, उंदराचं मंदिर आहे, मांजराचं मंदिर आहे, सर्प, सिंह, व्याघ्र,गज यासोबतच  नक्र, गृध, उलूक सारख्या दुर्लक्षितांनाही देववाहनाचं सौभाग्य दिलेलं दिसून येतं. आता तुम्ही म्हणाल की अन्न पूर्णब्रह्म लिहिताना मध्येच हे प्राणी पुराण कसे चालू केलेत तर तेही सगळे भक्ष्याभक्ष आहेतच की! म्हणून नाममात्र उल्लेख.

हे अन्नपूर्णेचं मंदिर काशीमध्ये कसं निर्माण झालं त्याची एक छान कथा पुराणात आहे.

असं म्हणतात की एकदा सारीपाट खेळत असताना शिवपार्वतीचा वाद झाला. शिवजी अभौतिकतेचा पुढाकार करत होते. बोलता बोलता शिवजी म्हणाले, ''सगळी सृष्टी मायावी आहे. मनुष्यही माया आणि मनुष्याची क्षुधाही माया.'' या त्यांच्या बोलण्यावर भौतिकाची जबाबदारी पार पाडणारी माता पार्वती कृध्द झाली . ती म्हणाली, ''मायाच जर सत्य आहे तर माझ्या असण्याला अर्थच नाही.'' एवढं बोलून ती तिथून अदृश्य झाली. तेव्हापासून पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आणि अन्नप्रलय झाला. अन्नावाचून लोकांची अवस्था त्राही मांम झाली तेव्हा त्यांनी त्रिदेवांची आराधना केली. फलस्वरुप माता पार्वतीनं देवी अन्नपूर्णाचं रुप घेऊन दिवोदासाच्या प्राचीन देव नगरी काशीत भैरव रुपातल्या शंकरांना अन्नाची भिक्षा घातली जी नंतर पृथ्वीवासियांना वाटून भगवान शिवांनी अन्नप्रलय समाप्त केला होता. तेव्हापासून हे मंदिर इथे आहे. 

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे। ज्ञान वैराग्य सिध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती।। 

अशी भिक्षा मागितल्यावर माता अन्नपूर्णेनं प्रसन्न मनानं शिवांना अन्न भिक्षादान दिलं आणि तिच या विश्वाची भरणपोषिणी असल्याची जाणीव तिनं शिवांना करुन दिली. शेवटी मायाही तिच आहे आणि मायेचं निरसन करणारीही तिच तर आहे. 

तर आपण बोलत होतो अन्न हे पूर्णब्रह्म का आहे त्याविषयी. विषय तसा खूप खोल आहे. पण, फार खोलात न जाता आपण त्यात एक डुबकी तर मारुच शकतो.

विश्वाच्या निर्मितीपासून ते आजवर अगणित संतसज्जनांचा या धरातलावर वास झाला आहे; होतो आहे. युगपरत्वे भक्तीचं माध्यम बदलंत असलं तरी भूक ही सार्वकालीक सत्य आहे. स्वतः शंकराचार्य, स्वामी विवेकानंद अशा थोर विभूती सांगून गेल्या आहेत की पोटातली भूक शमली नाही तर मनुष्य ज्ञान अर्जित करु शकत नाही. 

आता हे असं का आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या जगन्नियंत्याचा खेळ थोडाफार समजून घ्यावा लागणार आहे. सुरुवात पंच तत्वांपासून करु. पृथ्वी, जल, अग्नि, वायू न् आकाश ही आहेत सर्वांना माहीत असणारी आपली पंचतत्वं. मृत्तिका अर्थात पृथ्वी म्हणजे मातीपासून बनलेल्या आपल्या शरीरात पंचाहत्तर टक्के यंत्रणा ही जलावर आधारित आहे. त्यानंतर येतं अग्नितत्व हे तुमच्या उदराकाशात अर्थात उदर पोकळीत जठराग्नीच्या रुपात राहतं आणि आकाशात मोठ्या प्रमाणावर असणारं वायूतत्वंही इथंच राहतं जरी ते सर्व शरीराचा भाता चालवण्यासाठी उरपोकळीत विशेषत्वानं विराजमान असलं तरी. तर हे मातीचं शरीर चालवण्यासाठी जी काही उर्जाशक्ती लागते ती निर्माण करण्याचं काम हे अन्नाकडे दिलेलं आहे. अन्नाच्या पचनासाठी जल, अग्नि, वायू एकत्रितपणे काम करतात त्यातून निर्माण होणारी उर्जा मनुष्याला जिवित ठेवते. 

आजच्या काळात जरी आपण सांडपाणी, मलमूत्र यांचा योग्य वापर करत नसलो तरी निसर्ग मात्र असं करत नाही. त्याच्या पुस्तकात जे जिथून निर्माण होतं ते तिथंच विलय पावतं असा साधा नियम आहे. मनुष्य, वनस्पती, प्राणी वा इतर सजीवनिर्जीव जीवसृष्टी; सर्वांसाठी त्याचा नियम एकच आहे.  

जिथून उगवलं आहे तिथे पोचून यात्रापूर्ती करायची. या यात्रापुर्तीचं नाव आहे स्व चा शोध. हा स्व चा शोध घ्यायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे अंगिकार. पण कशाचा? तर आभार मानण्याचा ज्याला आज भगिनी शिवानी ग्रॅटिट्यूड असं म्हणते. पण आभार मानणं याचा अर्थ असा आहे  का की धन्यवाद म्हटलं आणि विषय संपला? तर नाही. धन्यवाद हा शब्दातून देण्याची गोष्ट नसून ती कृतीतून करण्याची गोष्ट आहे असं आपली सनातन वैदिक संस्कृती मानते. म्हणून आजही अनेक ठिकाणचे शेतकरी आलेल्या धान्याचा चौथा हिस्सा हा पक्षीप्राणी आणि जीवजंतूंसाठी शेतात मागे ठेवून जातात. पण आपण तर धान्य पिकवत नाही मग हे आभार कसे मानायचे? तर तुम्ही जे अन्न सेवन कराल ते भगवंताचा प्रसाद म्हणून सेवन करा, आपण प्रसाद ताटात शिल्लक न ठेवता संपूर्णपणे संपवतो ना! अगदी तसंच अन्न स्वतःच्या गरजेपुरतं वाढून घ्या, ते पूर्णपणे संपवून ताट स्वच्छ करा हाही एक आभार मानण्याचा प्रकारच आहे. सिध्दारुढ महाराज हे रोज पाच बोटांच्या चिमटीत जेवढं अन्न येतं तेवढंच भक्षण करुन  राहत असत. 

आपल्या शरीरात सप्तचक्र आहेत असं योगवाशिष्ठ या ग्रंथात श्रीरामांचे गुरु ऋषी वशिष्ठांनी नमूद करुन ठेवलंय. याचा आणि अन्नाच्या पूर्णब्रह्म असण्याचा काय संबंध असं तुमच्या मनात नक्कीच आलं असणार. सांगते. मी मघाशी जे म्हणाले की अन्नातून निर्माण होणारी उर्जा ही मनुष्याला जिवित ठेवते तर ते सूत्र इथे लागू पडतं. निर्मात्यानं मनुष्याला शरीर दिलं, ते चालवण्यासाठी अन्न निर्माण केलं आणि त्याच शरीरात सप्तचक्रांची निर्मिती करुन त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गही निश्चित केला. जसं पुर्वकालात ऋषीमुनी यज्ञ-याग करत होते. त्यात दिलेल्या आहुती त्या त्या देवतांपर्यंत पोहोचत होत्या. तसंच शरीर हे एक यज्ञकुंड आहे. यामध्ये तुम्ही देत असलेल्या भोजनाहुती ही त्या त्या देवतेपर्यंत पोहोचते सूक्ष्म रुपात. जठराग्नी हा शरीराच्या बरोबर मध्यावर येतो जिथं मणिपूर चक्र असून त्याच्या वर चार चक्र आणि खाली दोन चक्र आहेत. सामान्य माणसाका मुलाधारपर्यंत जाण्यासाठी मणिपूर हाच आधार आहे. तर संत, विभूती न् सज्जनांसाठी हे मार्ग वेगवेगळे आहेत. मात्र अन्न ही सर्व जीवजंतूंची सार्वाकालिक गरज आहे. 

हे तर सगळं झालं योगाधारे विश्लेषण. जर प्रायोगिक दृष्टीतून आपण पाहिलं तर इतर जीव आजारातून बरे होण्यासाठी जिथं अन्नत्याग करतात तिथं मनुष्य मात्र त्यासाठी पोषक आहाराचा स्विकार करतो. आयुर्वेद असो वा पाश्चात्य आरोग्यविज्ञान दोघेही विकारातून बाहेर पडण्यासाठी अन्नालाच आधार बनवतात हे तर सर्वश्रुत आहे. सामाजिक शास्त्राचा अभ्यास करणार्‍यांच्या मते भूक ही गुन्हा घडण्याची सगळ्यात पहिली पायरी आहे. तशी ती भूक कोणतीही असली तरी जगात सर्वात जास्त गुन्हे हे अन्नाच्या संदर्भात (जे मुखातून पोटात जातं.) होतात. शंका असल्यास स्वतः या वस्तुस्थितीचा शोध घेऊ शकता. शेतातल्या धान्याची चोरी करणं, त्याची नासधूस करणं, बांध तोडणं, वीज चोरी करणं, विज चोरणं इथंपासून ते अगदी मोठाल्या युध्दांचा मागोवा काढायला गेलो तर लक्षात येईल की या सगळ्याच्या मागचं सर्वात मोठं कारण हे भूक हेच आहे मग ती कोणतीही असली तरी किमान साठ- सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त गुन्ह्यांचा पाया ही पोटाची भूक आहे. 

पूर्वी असणारी बारा बलुतेदारीची पध्दत बदलून ती कालमानाप्रमाणे धनकेंद्रित झाली आणि एकंदरीत गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली. कलियुगात मनुष्यप्राणी मन:शांतीसाठी ठिकठिकाणी गुरु आणि शांतीकेंद्र शोधत फिरतो. त्याऐवजी त्याने ती अन्नामध्ये शोधली तर त्याला शांतीसाठी दुसरे प्रयत्न करावे लागणार नाहीत. भविष्यपुराणात असं सांगितलं आहे की कलि हा पुरुष असून त्याच्या एका हातात मनुष्याची जिव्हा तर दुसर्‍या हातात लिंग आहे. लिंग हे वासनेचं प्रतिक आहे. जिव्हा दोन प्रकारे मनुष्याची हानी करते एक बोलून आणि दुसरी अति खाण्याने म्हणून बुध्दांनी त्यांच्या अनुयायांना सम्यकतेची शिकवण दिली ज्यात गरजेपुरत वापरण्याची सवय करणं क्रमप्राप्त होतं. आज कुठल्याही प्रकारचं खाद्यकेंद्र चालू केलं की ते सहसा बुडीत जात नाही कारण आज कलीच्या हातातल्या जिव्हेनं माणसाच्या मनावर आणि विचारावर ताबा मिळवला आहे. निसर्गाच्या सगळ्या नियमांचं माणसानं केव्हाच उल्लंघन केलंय. त्याच्या बुध्दीचा भ्रंश झाला आहे. त्याला सकारत्मक उर्जा आणि नकारात्मक उर्जा यातला फरक कळेनासा झालाय. त्याला हे कळत नाहीए की हव्यासापोटी तो जे अन्न वाया घालवतो, सडवतो, कुजवतो त्यातून एक प्रकारची नकारात्मक उर्जा निर्माण होते आणि ती त्याच्या बुध्दीला ग्रहण लावते. अन्नाची नासाडी करणारा मनुष्य स्वत:बरोबर वंशाचाही नाश घडवून आणतो. यामागे एक फार मोठं सूक्ष्म विज्ञान कार्यरत आहे ज्याचा अभ्यास करण्यासाठी परमात्मस्वरुप गुरुला शरण जावं लागतं. गुरु म्हणजे काही कुठली अज्ञात शक्ती नाही तर ती तीच परमात्म शक्ती आहे जीनं तुम्हांला जन्माला घातलं.  सद्गुरुशरणं भवभय हरणंम। हे ज्याला ज्ञात झालं तो अन्नाला सद्गुरुंइतकंच महत्व देतो आणि स्वतः तर अन्नपातकातून दोषमुक्त होतोच शिवाय त्याच्या घरचं अन्न खाऊन इतरांचीही क्लेशमुक्ती होते. कलियुग असो वा अन्य कोणतंही युग असो अन्नाची महती ही केवळ उदरभरणापुरतीच नाहीए तर ती मनुष्याला मोक्षमार्गावर नेणारी दृश्य शक्ती आहे. तिचा अनादर वा अपमान म्हणजे सृष्टिकर्त्याचाच अपमान आहे. शेवटी जन्मदात्री वा जन्मदाता तुमच्या सगळ्याच चुकांना माफ करत नाहीत तर काहींची भयंकरातिभयंकर शिक्षादेखील देतात. आता अन्नाला पूर्णब्रह्म मानून त्याचा योग्य वापर करायचा की नाही हे प्रत्येक मनुष्याचं स्वतःचं क्रियाकर्म आहे परंतु जर तुम्हांला शेतकर्‍याच्या कष्टाची पर्वा आहे, जर तुम्हांला भर दुपारी भुकेनं आतडी कळवळणं काय असतं माहीत आहे, जर तुम्ही हे मान्य करता की जगात काहीही निर्माण करायचं असेल तर त्याचा मार्ग हा अन्नाच्या माध्यमाखेरीज इतर कशातूनही जात नाही तर तुम्हांला नक्कीच कळेल की अन्न हे पूर्णब्रह्म का आहे ते!

धन्यवाद....

स्वरा...

🎭 Series Post

View all