Login

अन्नदाताच उपाशी. | भाग १

आज कालच्या जगात जगाला अन्न पुरविणारा अन्नदाताच उपाशी राहिला...!
अन्नदाताच उपाशी.

भाग १

" आवं साहेब, गरिबावर दया करा की, तीन रुपयाने नाय व परवडत . ह्याच्या धा पटीनं तर खर्च होतूया. कसं जमायचं व्हय हे? थोरलीच लगीन बारक्याच शाळेचं पैसं भरायचं हायत. ह्यात कसं व भागायचं?"
रामभाऊ बाजारातल्या होलसेल विक्रेत्याला म्हणाला.

आता नुकतेच आलेल्या कांद्याचे पिक विकायला म्हणून रामभाऊ गावातील इतर साथीदारांसोबत बाजारात आला होता. तिथे असलेल्या माणसाच्या सांगण्यावरून त्यांनी सगळा माल तिथे उतरवला. माल उतरवून झाल्यावर ते सगळे हिशोबासाठी तिथे असलेल्या संबंधित माणसाकडे गेला. त्याने त्यांना प्रति किलो मागे तीन रुपये द्यायचे ठरवले. ते ऐकून सगळेच उदास झाले. त्यांनी त्या बद्दल बोलायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांना तो माल परत घेऊन जाण्यास सांगण्यात आले. त्यांच्या जवळ काहीच पर्याय शिल्लक उरला नाही. त्यांचं म्हणणं तिथे कोणीच ऐकलं नाही. ते तो माल जास्त दिवस ठेवू देखील शकत नव्हते. म्हणून त्यांना तो सौदा मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता.

" दादा, आम्ही तरी काय करायचं? बाहेर बाजारात भावच मिळत नाही. तुम्हाला चांगलंच माहीत आहे की, ह्याचे भाव आपल्या हातात नसतात. आता हे ठरलेत तर आम्ही तरी काय करणार? पण, तुम्ही काळजी करू नका. पुढच्या वेळेस मी साहेबांशी बोलून जास्त भाव मिळवून देतो ज्याने तुमचे सगळे खर्च भागातील. चला आता मी निघतो, हा सगळा माल दुसऱ्या मार्केटमध्ये पोहोचवायचा आहे. आम्हाला बघा बसायला फुरसत नसते. चला भेटू पुढच्या वेळी."
इतकं बोलून स्मित करत त्यांचा निरोप घेऊन तो माणूस तिथून निघून गेला.

त्याच्या शब्दांनी रामभाऊ आणि त्याच्या इतर साथीदारांना थोडा धीर आला. ' पुढच्या वेळेस तरी आपल्याला मालाला चांगला भाव मिळेल. ही भाबडी अशा घेऊन ते तिथे आपल्या घरी जाण्यासाठी निघाले.

जाताना वाटेत काही घरच्या सामानाची खरेदी करण्यासाठी ते सगळे एका मार्केटमध्ये थांबले. तिथे फिरत असताना रामभाऊच्या कानावर काही शब्द पडले.
" कांदा, तीस रुपये किलो..."
ते ऐकून रामभाऊ वळून त्या दिशेला पाहू लागला. तिथे एक विक्रेता अगदी खालच्या दर्जाचे कांदे तीस रुपये किलोने विकत होता.

" दादा, दहाने द्या की, कांदे."
रामभाऊ त्याच्या जवळ जाऊन सहज म्हणाला.

" काय गरीबाची मस्करी करता दादा. इतकं परवडतंय व्हय? इतकी तर आमची खरेदी पण नाही."
तो माणूस हसत रामभाऊला म्हणाला.

ते ऐकून रामभाऊ थक्क झाला. तो न काही बोलताच तिथून निघून गेला. तो त्याबद्दल कोणालाच काही बोलला नाही. पण, बाजारात होत असलेल्या भावाच्या फसवे गिरीमुळे तो मनातून अगदी खचून गेला. पण, तरी पुढच्या वेळेस तरी चांगला भाव मिळे अशी त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि तिथून निघून तो आपल्या गावाला पोहोचला.

गावात पोहोचून तो पुन्हा जोमाने शेती करायला लागला. नेहमी प्रमाणेच देवाने त्याच्या मेहनतीला यश दिले छान पिक येऊ लागले होते. त्या पिकाच्या स्वरूपात त्याला त्याचे त्याच्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण होताना दिसू लागले.

पुढच्या काही दिवसात पिके पूर्ण होणार होती आणि ती काढली जाणार होती. आज संध्याकाळी बांधावर उभा राहून रामभाऊ आनंदाने सगळीकडे नजर टाकून त्याची शेती बघू लागला. मग रात्री होत गेल्यावर तो तिथून निघून घरी पोहोचला. आणि घरच्यांसोबत छान जेवण करून दिवसभराचा थकलेला तो शांत झोपी गेला.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
0

🎭 Series Post

View all