Login

अन्नदाताच उपाशी. | भाग २ ( अंतिम)

आज कालच्या जगात जगाला अन्न पुरविणारा अन्नदाताच उपाशी राहिला...!
अन्नदाताच उपाशी.

भाग २ ( अंतिम )

रात्री अचानक कसल्या तरी भयानक आवाजाने त्याला जाग आली. तो आणि त्याच्या घरचे दचकून घाबरून उठून बसले. तो वीज कडाडण्याचा आवाज होता. सोबतच जोराचा पाऊस देखील कोसळू लागला होता. पावसाचे मोठमोठे थेंब त्यांच्या घरावर पडल्याचा आवाज होऊ लागला.

ते सगळं बघून रामभाऊच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तो धावत दरवाजा उघडून बाहेर जाणार इतक्यात त्याच्या घरच्यांनी त्याला अडवले. बाहेर पडण्यासारखी परिस्थिती नव्हती. पावसाने रौद्र रूप धारण केले. होते. रामभाऊ तसाच डोक्याला हात लाऊन खाली जमिनीवर बसला.

सकाळचा पावसाचा जोर थोडा कमी झाल्याचं कळताच रामभाऊ घरातून धावतच निघून शेतावर पोहोचला. तिकडेच दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काल पर्यंत जे शेत बघून त्याला आनंद होत होता ते आता पूर्णपणे वाहून गेले होते. मागे बघायला देखील काहीच शिल्लक राहिले नव्हते. तो तिथेच मोठमोठ्याने धाईमोकाळून रडू लागला.

त्याच्यासोबत इतर शेतकऱ्यांची देखील तीच परिस्थिती होती. पण, रामभाऊच्या नशिबातली संकटे इथेच थांबली नव्हती.

ते सगळं नुकसान पचवून त्याला घरी घेऊन आले. त्याच्या घरात त्या दुःखामुळे काहीच अन्न शिजले नाही. तो आणि त्याचे संपूर्ण कुटुंब घरच्या ओटीवर दुखी होऊन बसले असताना त्यांच्या दारात दोन माणसे आली.

" नमस्कार, आम्ही बँकेतून आलो आहोत.
तुम्ही घेतलेल्या कर्जाचे मागचे दोन हफ्ते थकले आहेत. पुढच्या आठवड्यात हा हफ्ता पकडून पुढचे तिची हफ्ते भरले नाहीत तर तुमच्या जागेवर आणि घरावर जप्ती आणण्यात येईल."
दरवाजात उभा असलेला माणूस म्हणाला. ते ऐकून रामभाऊच्या काळजात चर्र... झालं.

" साहेब, कोठून देणार व आमी पैसं? तोडी मुदत वाडवून द्यावा की, शेत पार पाण्याखाली गेलाय. आता खायचं काय तो मोठा सवाल आहे."
रामभाऊ डोळ्यात अश्रू आणून त्याला म्हणाला.

" ते आम्हाला काही माहीत नाही ओ, आम्ही फक्त ही नोटीस घेऊन आलो आहोत. ह्यावर सही करा आणि लवकरात लवकर हफ्ते भरून टाका."
इतकं बोलून त्या माणसाने एक कागदावर रामभाऊची सही घेऊन त्याला नोटीस देऊन, ते दोघे तिथून निघून गेले.

रामभाऊ पूर्णपणे दुःखात हरवून गेला. काय करावे काय बोलावे त्याला समजेना झालं. घरच्यांसमोर त्याला रडत रहायचे नव्हते म्हणून तो शेतातून एक फेरी मारून येतो म्हणून घरी सांगून निघाला. पाऊस बऱ्यापैकी कमी झाला होता. दुपारसरून हळू हळू सध्यकाळ झाली होती. सूर्य मावळतीच्या दिशेने निघाला होता. शेतावर जाताना वाटेत एका घरातून त्याला रेडिओचा आवाज आला, " कर्ज फेडायला सक्षम नसल्यामुळे बँकेने केले एका मोठ्या उद्योगपतीचे दिडशे कोटींचे कर्ज माफ." ती बातमी ऐकून तो मनातून अजून खचून गेला.

पुढच्या तासाभराने रामभाऊची बायको आणि दोन्ही मुले शेतावर पोहोचली. समोरचे दृश्य पाहून त्याचं पाय जागीच थिजले. समोर त्यांना त्यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या मोठ्या झाडावर रामभाऊचा निष्प्राण देह लटकताना दिसत होता.

गावकऱ्यांनी मिळून त्याला खाली उतरवले. त्याला तसा निष्प्राण जमिनीवर पडलेला बघून त्याची बायको आणि मुलं आक्रोश करू लागले. जोरजोरात रडू लागले. तेव्हा त्यातील एका गावकऱ्याच त्याच्या खिशाकडे लक्ष गेलं त्यातून एक कागद बाहेर डोकावत होता. त्याने तो बाहेर काढला. ते रामभाऊने लिहिलेले शेवटचे पत्र होते.

" पोरांनो मला माफ करा. मी तुमचा गुन्हेगार आहे. तुमच्यासाठी मी काहीच करू शकलो नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा कधीच शेती करू नका आणि केलीच तर माझ्या सारखी करू नका. बाहेर हे जग खूप वाईट आहे. कलियुग आलं म्हणतात ते खरच आहे. इथे राक्षसाला वेगळा जन्म घ्यायची गरज नाही कारण इथे माणसांमध्ये राक्षस वसलेला आहे जो दुसऱ्याच्या मेहनितीवर मज्जा मारतो आहे. आपल्या सारख्यांच्या जीवावर हे भाडे जगत आहेत आपल्या जिवावर हे खात आहेत आपल्या मेहनतीवर पैसे कमवत आहेत आणि आपल्यालाच खद्यात ढकलत आहेत. इथे आता अन्न पुरवणाऱ्यालाच आज उपाशी राहावं लागतंय आणि त्याची दखल घ्यायला इथे कोणालाच रस नाही. मी हे सगळं नाही सहन करू शकत किमान माझ्या गेल्याने तुम्हाला मदत म्हणून तरी काही मिळेल त्याचा उपयोगच होईल. मला खरच माफ करा. आईची आणि स्वतःची काळजी घ्या....

तुमचा बाबा."

त्यातील प्रत्येक शब्द ऐकून तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये पाणी दाटून आले. तेव्हा रामभाऊच्या मुलाचे झाडाखाली ठेवलेल्या वहीकडे लक्ष गेले. आणि तेव्हा त्याला समजले की निघताना बाबांनी त्याच्याकडून वही आणि पेन कोणता हिशोब करायला मागून घेतली होती ते...!

समाप्त .

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
0

🎭 Series Post

View all