एनिवर्सरी -एक वेगळा विचार
उद्या सुमेधा च्या लग्नाचा वीसावा वाढदिवस होता. नेहमीप्रमाणे तिच्या नवऱ्याने उद्याचा बेत काय कर असे तिला सांगून झाले होते. त्यामुळेच ती उद्याच्या विचारात मग्न होती. सगळे हॉलमध्ये हसत -खेळत, गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात सुमेधा च्या सासुबाई हॉलमध्ये आल्या आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाल्या उद्या सुमेधा आणि मी बाहेर जाणार आहोत पूर्ण दिवस. तर, तुमचा चहा, नाष्टा, जेवण सर काही तुमचे तुम्ही बघा. सुमेधा उद्या सकाळी सहा वाजता तयार होऊन आपण दोघी जाणार आहोतमॉर्निंग वॉक ला जाणार आहोत तसेही रोज मी जातेच मॉर्निंग वॉकला पण उद्या तुलाही घेऊन जाणार आहे आणि हो तो सलवार-कुर्ता किंवा सरळ जॉगिंग सुटच घाल उद्या.
आता सासूबाईंच्या मनात हे नवीन काय आलय या विचारानेच सुमेधाला रात्रभर झोप लागली नाही. पहाटे लवकर उठून सुमेधा ड्रेस घालून तयार झाली. नंतर सासूबाई आणि ती मॉर्निंग वॉकला गेल्या. सुमेधा असं कित्येक वर्षांनी पहाटेच्या छान वातावरणात बाहेर पडत होती. यापूर्वी जबाबदाऱ्यांमुळे तिला कुठे जाताही येत नव्हते. सासूबाईंचा ग्रुप सुमेधा ची आणि सासूबाईंची वाटच बघत होता. सासूबाईंनी त्यांच्या मैत्रिणींना आज जरा लवकरच व्यायाम करून जाणार असल्याचे सांगितले. थोडाफार व्यायाम झाल्यावर दोघीही पार्क मधून बाहेर आल्या. सासूबाईंनी तिला घेऊन सरळ चहाची टपरी गाठली आणि दोघींनी मिळून हसत खेळत मस्त चहा प्यायला.
त्यानंतर दोघीही घरी आल्या तेव्हा सासूबाईंनी सुमेधाला मस्त आवरून तयार व्हायला सांगितले आणि आपण दोघीही नाष्टा आणि जेवायला बाहेर जाणार आहोत असे सांगितले. त्यावेळी सासरे, नवरा, मुले सगळ्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आज त्यांची फारच त्रेधा उडत होती. दोघीही मस्त तयार होऊन बाहेर निघाल्या. सासूबाई आणि सुमेधा दोघींनी हॉटेलमध्ये जाऊन नाष्टा केला. नंतर त्या दोघी सिनेमाला गेल्या. सिनेमा झाल्यावर परत दोघी बाहेरच जेवल्या एवढ्या वर्षात हॉटेलमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःच्या आवडीचं कधीच काहीच मागवलं नव्हतं पण आज त्या दोघीही ही त्यांच्या आवडीचं करणार होत्या. शेवटी दोघींनी मस्तपैकी शॉपिंग केलं. शॉपिंग करताना सासूबाईंनी सुमेधाला मुद्दाम दोन ड्रेस, जीन्स आणि बरच काही घ्यायला लावलं.
घरी आल्यावर घरातल्यांचे चेहरे बघून ऊन दोघींनाही हसू आवरले नाही. फ्रेश झाल्यावर सासूबाईंनी सगळ्यांना एकत्र बोलावले व म्हणाल्या एवढ्या वर्षात मलाही कधी कळले नाही तुम्हाला कोणालाही कळले नाही की लग्न करून एक मुलगी आपल्या घरात येते तेव्हा तिच्याही काही अपेक्षा असतात. पण आपण त्याचा कधी विचारच करत नाही व तिला प्रत्येक वेळी गृहीत धरतो. जे माझ्या बाबतीत झालं तेच मी सुने च्या बाबतीत करत होते. पण पण आता मला जाणवले आहे की की हे सारं चुकीच आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतला. सुमेधा च लग्न जरी शेखर सोबत झालं असलं तरी ती आपल्याशी जोडली गेली आहे. आजचा लग्नाचा वाढदिवस जरी दोघांचा असला तरीही तो सुमेधा आणि माझ्या सासू आणि सून या नात्याचाही वाढदिवस आहे. म्हणूनच हा दिवस, एनिवर्सरी आम्ही दोघींनी मिळून साजरी केली आणि हो उद्यापासून सुमेधा ही तिच्या मैत्रिणींबरोबर व्यायामाला आणि फिरायला जाणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी आपली कामे वाटून घ्यायचे आहेत. चला आता आम्ही खूप कंटाळलो आहोत विश्रांती घेऊ या.
प्रिती महाबळेश्वरकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा