अनोखे नाते (भाग 1)

सून सासऱ्याच्या अनोख्या नात्याची गोड कहाणी
अनोखे नाते

अनोखे नाते भाग 1:

सुहास आणि मंजिरी अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा. एकमेकांशी अनुरूप. एकमेकांना समजून घेणारे आदर्श जोडपे. सुहास एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. सहा आकडी पगार, स्वतःचे घर, दारात एक चारचाकी , दुचाकी, बँक बॅलन्स सर्व काही सुखे अगदी पायाशी पायाशी लोळण घेत होती. मुक्ता आणि ज्ञानेश ही गुणी, हुशार संतती म्हणजे तर दुधात साखरच!

सुहासचे आई वडील म्हणजे गोविंद राव आणि मैनाबाई. म्हणजेच सर्वांचे लाडके, आदराचे आणि आधाराचे स्थान "माई आणि आबा...."


आबा शिक्षक होते. गावाकडे त्यांच्या शब्दाला मोठा मान होता. गावात काही मोठा निर्णय असो, कोणाचे लग्नकार्य कि भांडण तंटा गोविंद गुरुजीच्या सल्ल्याखेरीज कोणतीही गोष्ट पुढे जात नसे.

खादीचे पांढरेशुभ्र, कडक इस्त्री केलेले कपडे, पायात लखानीं चे कापडी शूज, डोळ्यावर चष्मा, आणि चेहऱ्यावर करारी परंतु शांत सोज्वळ आश्वासक भाव. नेहमी सर्वांना मदत करण्यासाठी तत्पर. यामुळे गुरुजींबद्दल पंचक्रोशीत सर्वांना आदर वाटायचा.

निवृत्तीनंतर गुरुजींनी त्यांच्या मूळ गावी तालखेड येथे जुन्या वाड्यात राहण्याचे ठरविले. शेती हा गुरुजींचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. इतक्या वर्षे केलेल्या ज्ञानदानाच्या कार्यानंतर गुरुजींनी स्वतःला या काळात धरित्रीची सेवा करण्यात वाहून घेतले होते.


मैनाबाईंचे देखील शिक्षण झालेले होते. परंतु मुलावर संस्कार करणे या गोष्टीला त्यांनी नोकरी करण्यापेक्षा जास्त महत्त्व दिले आणि गोविंद गुरुजींचा संसार मोठ्या कलात्मकतेने सांभाळला. आदर्श जोडीदार,, आदर्श माता, आदर्श सून ही नाती त्यांनी लिलया जपली.


राधिका, शिल्पा आणि तिच्या पाठीवर पाय देऊन आलेला सुहास यांना मैनाबाईंनी घडविले. सासू-सासरे, ननंद जावा पै पाहुणे आणि गुरुजींचा स्वतःचा गोतावळा या सर्वांची सरबराई मैनाबाईने मनापासून केली.


मैनाबाई म्हणजे गुरुजींचा मानसन्मान त्यांचा ताठर कणाच!


त्यांच्या चांगुलपणाचे फळ म्हणून नियतीने या दोघांना भरभरून दिले. तीनही मुले उच्चशिक्षित, जावई सुना हे देखील सुसंस्कारी होते. दोन्ही मुली आणि जावई परदेशात उच्च पदस्थ नोकरीवर तर मुलगा सुहास आणि सून मंजिरीने मात्र भारतातच राहणे ठरविले होते. स्वतःचे शिक्षण झालेले असताना सुद्धा मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी मंजिरीने आपल्या सासूच्या पावलावर पाऊल टाकत स्वतःच्या करिअरचा त्याग केला होता. ज्ञानेश इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होता तर मुक्ताने मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करून जिल्हाधिकारी बनण्याचे ठरविले होते. गोड गळ्याची मुक्ता एका नावाजलेल्या पंडितजींकडे गायनाचे धडे घेत होती.


गोविंद गुरुजी म्हणजे आबांचे हे कुटुंब सुखाच्या झोपळ्यावर हिंदोळत होते. दरवर्षी आबा माईकडे जाणे म्हणजे सर्व नातवंडांसाठी पर्वणीच असायची. वर्षातून एक आठवडा मुली, सून, मुलगा, जावई, नातवंडे या सर्वांनी आबांचा वाडा भरून जायचा. हास्य विनोद,चेष्टा मस्करी, नवनवीन तयार होणारे खाद्यपदार्थ, भेटण्यासाठी येणारी मित्रमंडळी पाहुणेराऊळे यामुळे ती वास्तू देखील चैतन्याने, आनंदाने,उत्साहाने उजळून निघत असे.


हे उत्साहाचे चैतन्याचे दिवस फार लवकर संपून जात. निघायची वेळ आली की मात्र माईच्या डोळ्याला सारखा पदर लागलेला दिसत असे. आबा ही सर्वांच्या नकळत आपले हे 'सौभाग्य ' डोळ्यात साठवत बोलावलेल्या पापण्यांच्या कडा हाताने हळूच टिपत असत.


निघताना मात्र ठरवूनही माईंच्या गंगा जमुना वाहत असत आणि मग सर्वांनाच माई आबाला सोडून निघणे अवघड होई.

आजही माईने सुहास मंजिरीला देण्याच्या सामानाची बांधा बांध केली. यावेळी शिल्पा आणि राधिका गावी येऊ शकल्या नव्हत्या. सुहासने त्यांच्यासाठी दिवाळी फराळ,भाऊबीज ओवाळणी पाठवून दिले होते.


बहिण भावंडातील हे प्रेम ही माया पाहून माईला आभाळा एवढे समाधान वाटत असे. यावर्षी सुहासने आपला मुक्काम दोन-तीन दिवस जास्त वाढवला होता. दोघी बहिणी नसल्यामुळे माई आबांचे मन नाराज होऊ न देण्याची जबाबदारी सुहासचीच होती ना! त्याने मंजिरीने आणि मुलांनी आबा माईंना दोघींची कमतरता जाणवू दिली नाही. तरीही आज निघताना मात्र कोणाचाच पाय निघत नव्हता.

देवघरातील देवांना नमस्कार करून सुहास मंजिरी आणि मुलांनी आई-बाबांच्या पायावर डोके ठेवले. " सुखी रहा आणि लवकर या", म्हणताना आबांच्या आवाजातील थरथर चौघेही अनुभवत होते. माईच्या तर तोंडातून शब्दही निघत नव्हता. अंबाबाईने दिलेले हे "कैवल्याचे चांदणे" किती नजरेत भरून ठेवू असे त्यांना झाले होते.

" माई, तुम्ही आणि आबा चला ना आमच्या सोबत., " भरलेल्या आवाजात मंजिरी माईंसोबत बोलत होती .

, " माई, अहो ही दगदग, नाही झेपत नाही आता तुम्हाला. सगळे सोबत राहू तिकडे. तुम्ही दोघे तिकडे आले तर मुलांनाही तुमचा जास्त सहवास मिळेल. आणि आम्हा दोघांनाही आधार होईल. "


"हो ना आबा, चला ना आमच्यासोबत. " मुक्ताने तर उत्साहाने माई आबांना घेऊन गोल गोल फिरायला सुरुवात केली.

" हो ग चिमणे येणारच आहोत आम्ही दोघे. पण सध्या नको खूप कामे आहेत." आबांना मुक्ताचे मन मोडवत नव्हते परंतु हे सगळं सवयीचा आयुष्य सोडून तिथे 'आजचा दिवस संपण्याची' वाट पाहत जगणं आबांना नकोसं वाटे.

" पुढच्या खेपेला नक्की येऊ बर का आम्ही. आता सुरू केलेला गावातील मुलांचा संस्कार वर्ग शेतीची कामे हळूहळू कमी करतो आणि मग निवांत येऊन थांबतो तिकडे आम्ही दोघे " आबांनी मुक्ताला आणि मंजिरीला समजावले .

मंजिरी म्हणजे फक्त आबांची म्हणण्यापूरती सून! शिल्पा आणि राधिका पेक्षाही आबांचा मंजिरीवरच काकणभर जास्त जीव! वडील नसलेल्या मंजिरीला आबा स्वतःच्या लेखी पेक्षा जास्त जपत होते.

का कोण जाणे यावेळी निरोप घेणे सर्वांनाच जड होत होते. काहीतरी सुटते आहे, दूर जाते आहे याची हुरहुर सर्वांनाच वाटत होती.


'निरोपाचा क्षण जास्त वेळ लांब होऊ नये ' असे म्हणतात. डोळे ओलावण्याच्या आतच निरोप दिला पाहिजे. म्हणजे जाणाऱ्याला हुरहुर वाटत नाही आणि निरोप देणारही जास्त बेचैन होत नाही.


या क्षणाला मात्र वेळच थांबला होता बहुतेक. सुहासचाही पाय निघत नव्हता आणि माईलाही " लवकर या,सावकाश जा, काळजी घ्या "असे म्हणावे वाटत नव्हते.


वातावरणातील ताण कमी करण्यासाठी आबांनी ज्ञानेश ला आवाज दिला, " ज्ञानोबा माऊली बघा बघा गायी कशा पाण्यावर आल्या आहेत ते!"

याचा शब्दशः अर्थ घेत ज्ञानेशने मात्र वाड्याबाहेर पाहिले आणि म्हणाला, " आबा कुठे आहेत गाई? मला तर नाही दिसत?" त्याचा हा प्रश्न ऐकून मात्र माईच्या पाण्यावर आलेल्या गाई देखील वापस गेल्या आणि सुहास,मंजिरी मुले, गाडीत बसून निघाले.


आबा कितीतरी वेळ गाडीमुळे उडालेल्या धुळीकडे पहात तसेच उभे होते. 'यावेळी जाणवणारे हे रिते पण भविष्यातील काही घटनांची नांदी तर नाही ना......'

असा विचार करत आबा ग्रामदेवतेच्या मंदिरात दर्शनासाठी निघाले........


क्रमश :.........

गीतांजली सचिन

🎭 Series Post

View all