अनोखी गाठ ५६ ( अंतिम ) # मराठी _ कादंबरी
© आरती पाटील
( मागच्या भागात आपण पाहिलं की, सर्वजण गेल्यावर कावेरी आजी समीराच्या रूममध्ये जाऊन तिला खोटं का ? बोलल्याचे विचारते. समीराला कळून चुकत की आजीला कळालं आहे की जखम चुकून लागलेली नाही. समीरा रडत सर्व खरं ( अगदी सुरवातीपासून ते जखम लागेपर्यंत ) कावेरी आजीला सांगते. आता पुढे................)
समीरा काकुळतीला येऊन विचारते," आजी बोल ना, करशील ना मला मदत ? मला लांब ठेवशील ना या सर्व विधींपासून ? मला त्रास होईल गं खूप. प्लिज आजी...." समीरा हुंदके देत म्हणते.
कावेरी आजी तटस्थ चेहऱ्याने समीराकडे पाहत म्हणते," शक्य नाही ते समीरा. "
समीरा चमकून कावेरी आजीकडे पाहते. आजी पुढे म्हणते," तू समोर असल्याशिवाय तो लग्न करणारच नाही. तसं त्याने मला आधीच सांगितलं आहे. तुला काय वाटत तो स्वतः तुला न्यायला अमेरिकेला का आला ? तू यावंसं ही माझी ही इच्छा होतीच पण तू असल्याशिवाय तो लग्न करणार नाही असा त्याचा हट्ट होता. आज तुझ्या पायाला लागलंय म्हणून तो गेला. नाहीतर तू समोर असल्याशिवाय कार्यक्रम केलाच नसता त्याने. मघाशी खूप समजावून पाठवलं मी त्याला. तो तर आजचा 'टिळा ' पण पुढे करायचं म्हणतं होता."
समीरा हे सर्व ऐकून चकित होते. ती पुढे म्हणते," असं का करतोय तो आजी ?"
कावेरी आजी," तू तडकाफडकी अमेरिकेला परत का गेलीस ? हे तू त्याला सांगितलं होतंस ? मग तो असं का वागतोय हे तो का सांगेल ?"
समीरा, " आजी , बहुतेक मी त्या त्रास दिला म्हणून तो असं वागतोय." समीरा डोळे पुसत म्हणाली.
कावेरी आजी, " नाही बाळा, तू त्याला त्रास दिलास म्हणून तो असा नाही वागत आहे. तो असं वागतोय कारण तू असल्याशिवाय तो लग्न नाही करणार."
समीरा," आजी मी तेच बोलतेय की मला त्रास व्हावा म्हणून माझ्या डोळ्यांदेखत त्याला लग्न करायचं आहे. "
कावेरी आजी," परत चुकतेस तू समीरा, परत एकदा सांगते 'तू असल्याशिवाय तो लग्न नाही करणार.' असं म्हणून कावेरी आजी अभिषेकाची लग्नपत्रिका तिच्या हातावर ठेवते.
समीराला काही कळत नाही. ती आजीकडे काही न कळल्यासारखी पाहत असते. कावेरी आजी इशाऱ्यानेच पत्रिका उघडून पाहायला सांगते. समीरा पत्रिका उघडते आणि वाचते. समीराच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव असतात. ती आजीला म्हणते," आजी , अगं यात तर माझं नाव आहे. " समीरा डोळे मोठे करून म्हणते.
एवढ्यात दरवाज्याचा आवाज येतो. समीराचं लक्ष दरवाज्याकडे जातं, समोरून वसुधा आत्या येते आणि म्हणते," आता तुझंच लग्न होणार आहे तर नाव ही तुझंच असणार ना ?
समीरा खूप गोंधळते आणि म्हणते," म....माझं लग्न ?"
त्यावर कावेरी आजी आणि वसुधा आत्या जोराने हसतात आणि त्याबरोबर दरवाज्यातून सर्व घरातले आत येतात. झालेल्या प्रकाराने समीरा पुरती गोंधळते. ती अबोध भावाने सर्वांकडे पाहत असते आणि तिला तसं पाहून सर्वांना अजून हसू येतं होतं. अभिषेक तिच्या दुसऱ्या बाजूला येऊन बसतो आणि म्हणतो, " हो , लग्न. तुझं ... माझ्यासोबत."
समीरा अभिषेककडे पाहते मग बाकी घरच्यांकडे पाहते. तिला तसं गोंधळल पाहून वसुधा आत्या म्हणते," हो, चांगली बैठक घेऊन ठरवलं आहे लग्न. तुझ्या डॅडकडून तसा 'हुंडा' सुद्धा कबूल करून घेतलाय मी बैठकीत."
समीराला अजूनही काही कळत नाही. वसुधा आत्या पुढे म्हणते," हे बघ समीरा, इकडे भारतात मुलांचे आई- वडीलच लग्न ठरवतात. त्यामुळे आम्ही ठरवून मोकळे झालो." वसुधा आत्या भालचंद्रकडे पाहत म्हणते," हे बघ भालचंद्र शेवटी तुमची मुलीची बाजू आहे, तेव्हा लग्न धुमधडाक्यात लावून द्यायच. जेवण असं हवं की , जेवणारा बोट चाखत राहिला पाहिजे. मान- पान अगदी तोलामोलाचा हवा आणि आम्ही इथे आहोत म्हणून आमच्याकडूनच लग्नाची तयारी करून घेऊ नकोस." भालचंद्र नाटकी नाराजी चेहऱ्यावर आणत ," हो , व्याहीनबाई ." म्हणतो.
समीरा त्यांच्याकडे पाहत होती. नक्की काय सुरु आहे तिला अजूनही कळत नव्हतं. मग कावेरी आजीने समीराच्या हनुवटीला धरून तिची मान स्वतःकडे केली आणि म्हणाली," समीरा घरात सर्वांना माहित आहे की तुमचं एकमेकांवर प्रेम आहे." समीरा हे ऐकून अगदी स्तब्ध होते. कावेरी आजी पुढे म्हणते," तुझं असं तडकाफडकी अमेरिकेला जाणं पटत नव्हतं मनाला. कारण तुझ्या डोळ्यात मी अभिषेकासाठी प्रेम पाहिलं होतं. मग असं नक्की काय झालं ? याचा विचार मी करत होते. अभिषेक सुद्धा तुला एअरपोर्टला सोडून आल्यावर माझ्या कुशीत खूप रडला. तो म्हणाला,'तिने जाताना मला एकदाही मागे वळून पाहिलं नाही.' तेव्हा माझ्या लक्षात आलं की तू हे अगदी ठरवून करतेस पण का ? हे कळत नव्हतं. दोन दिवसांनी वसुधाने माझ्याजवळ 'शर्वरीचा' विषय काढला.
त्यावेळी माझ्या लक्षात आलं की यामुळेच तू परत गेली असावीस. मी वसुधाला विचारलं सुद्धा की समीराजवळ तू शर्वरीबद्दल बोललीस का ? पण वसुधा नाही म्हणाली. मग मी वसुधा आणि बाकी घरच्यांना तुमच्या प्रेमाविषयी सर्व सांगितलं. मग पुन्हा मी वसुधाला विचारलं," अभिषेकला न विचारता लग्न कसं ठरवलंस ? त्यावर ती म्हणाली की, ' मी आधी त्याला विचारलं होतं , कोणी आवडत असेल तर सांग पण त्याच्या आयुष्यात कोणी नव्हतं. म्हणून मग मी मुलगी शोधली. मला काय माहित होतं तो स्वतः बघेल म्हणून ?'
आता आम्हांला काही गोष्टी क्लिअर करायच्या होत्या ते म्हणजे तू नक्की का गेलीस ? तुझं खरंच प्रेम नाही का अभिषेकवर ? मग मी भालचंद्रला सांगून तुला फोन करायला लावला आणि फक्त अभिषेकचं लग्न ठरल्याची माहिती द्यायला सांगितली. मला पाहायचं होतं की तुझी प्रतिक्रिया काय आहे. आठवड्याभरात तू वॉच सेट ( मनगटी घड्याळ ) गिफ्ट म्हणून पाठ्वलेस आणि त्यावर तू ' फॉर अभिषेक अँड शर्वरी' असं लिहिलंस. भालचंद्रने तुला फोन केला तेव्हा मी तिथेच होते. त्याने तुला फक्त लग्न ठरल्याचं सांगितलं होतं. मग तुला त्या मुलीचं नाव कसं माहित ? मग मी वसुधाला पुन्हा विचारलं की नक्की तू समीराशी शर्वरी विषयी नाही बोललीस ? त्यावर ती नाहीच म्हणाली. तुम्ही काशीवरून आल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी तू परत जाण्याविषयी बोललीस म्हणून मी तिला विचारलं,' नीट आठवून बघ, तू शर्वरीचा विषय त्यादिवशी काढला होतास का ? ' त्यावर तिने तिच्या यजमानांशी याविषयी बोलल्याचे सांगितले. त्यावर स्वाती म्हणाली,' असं असू शकत की समीराने तुमचं बोलणं ऐकलं असेल पाणी द्यायला आली तेव्हा.' त्यावर वसुधा म्हणाली ,' पाणी द्यायला जानकी आली होती.' जानकी म्हणाली,' मला समीराने तिच्या हातातला पाण्याचा गडवा आत्याला देऊन यायला सांगितलं होतं.'
आता सर्व आरश्यासारखं स्वच्छ होतं. फक्त आता तुझ्याकडून खरं काय ते वदवून घ्यायचं होतं. तू माझ्या लेकराला त्रास दिलास ना ? म्हणून मग तुला पण थोडा त्रास द्यायचं ठरवलं. काही समस्या असेल तर सगळं गाव माझ्याकडे येतं आणि तू मला काही न सांगता निघून गेलीस ? एकदा माझ्याशी बोलून बघायचंस. तसं ही मी स्वतःच वसुधाशी तुमच्या लग्नाविषयी बोलणार होते."
समीरा कावेरी आजीच्या बोलण्यावर मान खाली घालते. मग वसुधा आत्या म्हणते," अगं समीरा, मी शर्वरीच्या घरी बोलली खरं पण मी त्यांना हे ही म्हणाले होते की शर्वरी आणि अभिषेकाचा होकार असेल तरच आपण या विषयी पुढे जाऊ. मी लगेच सर्व ठरवून आले नव्हते." वसुधा श्रावणीकडे पाहत म्हणते," श्रावणी, तू शांत आणि समंजस आहेस, कोणत्याही गोष्टीवर विचार करून निर्णय घेणारी, त्यामुळे मला चिंता नव्हती पण तुझी लेक मला फार त्रास देणार असं वाटतंय. तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळी. लग्नानंतर सुद्धा असं सारखं - सारखं रुसून- फुगून माहेर निघून गेली म्हणजे ? सारखी अमेरिकेची वारी परवडणार नाही बरं का ?" वसुधा आत्याच्या बोलण्यावर सर्वजण हसतात. वसुधा," म्हणून तुझ्या डॅड कडून 'हुंडा' म्हणून दर वर्षी १५ दिवस ईकडे येण्याच कबुल करून घेतलं आहे मी."
समीरा हळू आवाजात विचारते," आत्या मग आता शर्वरी ?"
वसुधा आत्या," अगं मी सांगितलं त्यांना जे खरं आहे ते. ते ही काही म्हणाले नाहीत. तुला १० % सुद्धा काम येत नाही म्हणालीस ना ? हरकत नाही. ते मी तुला वर्ष - २ वर्षात शिकवून तयार करेन पण माझा शब्द खाली पडेल म्हणून सर्व सोडून जाणारी सून मला दुसरी मिळेल का ? तू अमेरिकेत वाढलीस म्हणून तू भारतीय नाहीस असं तुला वाटतंय पण माझ्या दृष्टीने बघ, एखादी अमेरिकन असा स्वतःच्या सुखाचा त्याग करून गेली असती का ? तुझ्या रक्तात भारतीय मूल्ये आहेत. बाकी सर्व शिकता येत गं, त्याग नाही. माझ्या अभी ची निवड सर्वोत्तमच असणार. मग आता सांग तुझ्याशिवाय लग्न कसं करणार अभिषेक ? तू असशील तरच लग्न लागेल ना ? मग करायची का लग्नाची तयारी ?" वसुधा आत्या समीराला डोळा मारत विचारते आणि समीरा लाजून मान खाली घालते.
८ दिवसांनी................
वाडयात सनई- चौघड्यांचे सूर , पूर्ण वाडा फुलांनी आणि लाईटने सजलेला, नातेवाईक, स्नेही, पाहुणे- रावळे यांची वर्दळ, भारतीय मिठाईचा घमघमाट या सर्व गोष्टी कावेरी आजी आणि सरस्वती आजी एका ठिकाणी बसून पाहत होत्या. कावेरी आजी आणि सरस्वती आजी आज समाधानी होत्या. आजचा क्षण खूप सुखाचा होता. दोघीही आनंदाने देवाचे आभार मानत होत्या. तेवढ्यात भालचंद्र आजीला शोधत येतो आणि म्हणतो, " आजी दोघीही चला, तिकडे लग्न लागायची वेळ झाली, चला लवकर......"
सरस्वती आजी आणि कावेरी आजी लग्न मंडपाजवळ जातात. समीरा गुलाबी रंगाच्या नववारीत सुंदर दिसत होती. वसुधाने घेतलेले सर्व दागिने तिने परिधान केले होते. हातावरची गडद मेहंदी आणि त्यावर हिरवागार चुडा तिचं रूप अजून खुलवत होता. आजीने पटकन पुढे जाऊन समीराला काजळाची ' तीट ' लावली. भालचंद्र आणि श्रावणी आज खूप आनंदी होते. आपली मुलगी योग्य घरात पडली याचा आनंद तर लेक सासरी जाणार यामुळे डोळ्यात अश्रू.
मंगलाष्टका सुरु झाल्या होत्या. अंतरपाट दूर होताच अभिषेक आणि समीराची नजरानजर झाली. अभिषेकने हाताच्या इशाऱ्यानेच 'सुंदर दिसतेस' असं सांगितलं. भटजीने लग्नगाठ बांधायला सांगितली. समीराने कावेरी आजी आणि सरस्वती आजीला आवाज दिला. समीरा म्हणाली," कावेरी आजी- सरस्वती आजी आमची लग्नगाठ तुम्ही बांधायची." त्यावर आजी म्हणते," बाळा, हे सुवासिनीच काम, मी नाही करू शकत." त्यावर अभिषेक आणि समीरा म्हणतात," आजी हे लग्न तुमच्यामुळे होतंय आणि तुमच्या एवढं शुभ या जगात आमच्यासाठी काहीही नाही." घरातल्या सगळ्याचा आग्रह झाला आणि जिची अनोखी गाठ नियतीने बांधली होती, तिच्या आणि सरस्वती आजीच्या हाताने अभिषेक आणि समीराची अनोखी गाठ बांधली जात होती.
सप्तपदीसाठी उठताना समीराचा पाय दुखत होता. तिला होणारी वेदना अभिषेकला तिच्या डोळ्यातुन कळली आणि त्याने तिला उचलून सप्तपदीला सुरुवात केली........ आणि बॅकग्राऊंडला गाणं सुरु होतं....
ही अनोखी गाठ कोणी बांधली,
एक झाली ऊन आणि सावली..........
समाप्त...............
