Login

अनोखी गाठ १    मराठी कादंबरी

---------

अनोखी गाठ १    # मराठी _ कादंबरी

ही कथा एका विजोड जोड्याची आहे. विसंगत असली तरी एकमेकांना पूरक, नात्याची परिभाषा सांगणारी, विरोधाच्या वणव्यात भक्कम साथ देणारी, नव्या पिढीला नात्याची खोली दाखवणारी... अनोखी गाठ...

..….............

" मॉम - डॅड, मी डेव्हिडसोबत लिवइन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. " समीरा.

"काय?" समीराचे आई -बाबा आश्चर्याने एकत्र बोलतात.

" हो, मला तो आवडतो आणि त्याला मी. सो आम्ही हा निर्णय घेतला. काही कामानिमित्त तो बाहेर जातोय. तो महिन्याभराने आला की आम्ही दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊ. " एवढं बोलून समीरा आपल्या रूममध्ये निघून जाते. तिचे आई -बाबा हताशपणे तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असतात.

'भालचंद्र इनामदार ' अमेरिकेतील व्यापार जगतातलं एक प्रसिद्धी नाव. २० वर्षे अमेरिकेतील वास्तव्य. कोल्हापूर मध्ये गडगंज संपत्ती, इनामदार घराणं. त्यामुळे त्यांना गाव सोडून मुंबईला जाण्याची परवानगी कोणीची देत नव्हतं. पण जिद्दीला पेटलेल्या भालचंद्राने महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये एका छोटाश्या  गावातून प्राथमिक शिक्षण घेऊन, हट्टाने मुंबई गाठली. शिक्षण आणि काम करत प्रगती केली. यश मिळवण्यासाठी झापटलेल्या भालचंद्राने व्यापारात हात घातला आणि यश खेचून आणले. मोठी स्वप्ने त्यांना झोपू देत नव्हती. त्यामुळे यश आणि पैसा मिळव्यासाठी अमेरिका गाठली. प्रचंड मेहनत, चिकाटी आणि बुद्धिमत्ताच्या जोरावर यश मिळवलं. आज अमेरिकेत ३ फॅक्टरीज्, २ एकर मध्ये आलिशान बंगला. सुद्गुणी पत्नी,दोन मुली समीरा आणि जानकी. सर्व होतं. आईच्या पसंतीने लग्न केल्यामुळे भारतीय संस्कृती आणि संस्कार, मूल्ये जपली जातं होती. पण जन्मापासून अमेरिकेतील वातावरणात वाढलेल्या मुलींना भारतीय संस्कार आणि मूल्यांशी आत्मीयता नव्हती. त्यामुळे समीराची सॅम आणि जानकीची तिथे जेनी होती. लिवइन संस्कृती त्याठिकाणी नवीन नव्हती, पण आपली मुलगी असे वागेल असं भालचंद्र इनामदारांना वाटलं नव्हतं.

भालचंद्र यांना आपल्या पत्नीचे ( श्रावणी ) आधीचे बोल आठवत होते. त्या नेहमी सांगायच्या मुलींना फक्त मराठी शिकवण पुरेसं नाहीये, त्यांना अधूनमधून भारतात आपल्या मातीत जाऊ द्या, त्यांना स्वतःला त्या मातीशी आणि माणसांशी जोडू द्या. भावना मनाला कळल्याशिवाय संस्कार रुजत नाहीत, त्यासाठी मूळ मातीची मशागत करावी लागते. कामामुळे वेळ मिळत नाही असं कारण नेहमी पुढे असायचं. आज मात्र त्यांना आपण काहीतरी मूल्यवान गमावतोय असं वाटू लागलं. पत्नीकडे ओशाळभूत नजरेने ते पाहत होते. श्रावणी सुद्धा आपल्या मुलीच्या बोलण्याने दुखावल्या होत्या.

अमेरिकेतील व्यक्ती स्वातंत्रमुळे त्यांना तिला काही बोलताही येत नव्हतं. रागवून आणि चिडून काही करता येणार नव्हतं. समीराचे वडील आता स्वतःला दोषी समजू लागले. पैश्याच्यामागे आपण बाकी कुठे लक्षच दिलं नाही असं वाटू लागलं त्यांना. मनावर आघात झाल्याने ते बेशुद्ध पडले. श्रावणीने लगेच डॉक्टरांना फोन करून बोलावले. डॉक्टरांनी चेकअप करून औषधं दिली आणि आराम करायला सांगून निघून गेले. शुद्धीत आल्यावर भालचंद्र श्रावणीसमोर अपराध्यासारखी मान खाली घालून माफी मागू लागतात. श्रावणीच न ऐकल्याबद्दल तिला माफ कर असं म्हणतात. श्रावणीला भालचंद्राची अवस्था पाहून खूप वाईट वाटत होतं. ती त्यांना शांत करते आणि औषधं देऊन, झोपवून किचन मध्ये येवून कॉफी बनवत असते. उकळत्या कॉफीच्या सुगंधाबरोबर तिचं मन भूतकाळात जातं.

......................

मोगरा, गुलाब, अनंत, कन्हेरे अशी नाना रंगी फुलांचा हार आणि गजरे बनवून ती विठ्ठल मंदिरात आली आणि पांडुरंगाचा पुष्पशृंगार करू लागली. आपल्या धुंदीत असलेल्या श्रावणीला मागून कोणीतरी आवाज दिला. मागे वळून पाहिलं तर समोर ५५- ६० वर्षाच्या आजी तिला स्वतःकडे बोलावत होत्या. श्रावणीने लगबगीने पुढे जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. " पांडुरंगाचा शृंगार फार छान केलंयस पोरी " म्हणून कौतुक केलं. श्रावणीला त्यांच्यात एक प्रकारचं तेज दिसलं. त्यांच्याशी झालेल्या थोड्याश्या बोलण्यातूनही तिला त्यांच्यातला सोज्वळपणा जाणवला आणि भावला.

माहित नाही का पण श्रावणीच्या मनात त्यांच्यासाठी एक आपुलकी जाणवली होती. त्या काही कामानिमित्त त्यांच्या गावात आल्या होत्या. अजून ३-४ दिवस राहणार होत्या. त्यामुळे असंच उद्या मंदिरात भेट असं बोलून त्या गेल्या. श्रावणीला मात्र त्यांना पुन्हा भेटण्याची ओढ लागली होती, त्यामुळे दुसऱ्या दिवशी ती वेळेवर हजर होती. त्यासुद्धा आल्या, दोघींमध्ये छान गप्पा झाल्या. ३- ४ दिवस जोपर्यंत त्या होत्या तोपर्यंत त्यांची मंदिरात भेट होतं राहिली. यात त्यांना कळलं की श्रावणीने पदवीपर्यंतचे शिक्षण केले आहे. तिला सजावटीची आवड आहे वगैरे.
त्यांनी उद्या जाणार असं सांगितल्यावर तिला वाईट वाटलं.  पुन्हा भेटू असं म्हणून त्यांनी श्रावणीचा निरोप घेतला.

काही दिवसांनी श्रावणीच्या घरी एक निरोप आला की,' इनामदारांच्या घरून श्रावणीला लग्नाची मागणी आली आहे.' हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटत. एवढ्या मोठ्या घरातून श्रावणीसाठी मागणं आलं यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. इनामदार घराच नाव संपूर्ण पंचक्रोशीत अदबीने घेत. १५० - २०० एकर जमीन, २०- २५ माणसांचा राबता असलेलं मोठं घर, ६०-७० गुरं, अनेक व्यापार,संपत्तीची मोजदाद नव्हती. अश्या घरातून मागणं म्हणल्यावर थोडं दडपण सर्वांवरच आलं.

श्रावणीला पाहण्याचा कार्यक्रम ठरला आणि तो दिवस हा हा म्हणता उद्यावर येवून ठेपला देखील. घरातील वडीलधाऱ्या स्त्रिया तिला काही सूचना देत होत्या. बोलावल्यावरच बाहेर ये, जास्त बोलू नकोस, पदर डोक्यावरून खाली पडू देवू नकोस, सर्वांना नीट वाकून नमस्कार कर, त्यांच्यासमोर बसू नकोस, खूप मोठं स्थळ आहे चालण्या बोलण्याच्या पद्धतीवरून सुद्धा माणसाचं वळण ठरवतात वगैरे वगैरे... श्रावणीला उद्याच दडपण आलं होतं. 'पांडुरंगा सर्व सांभाळ रे बाबा' म्हणून ती झोपायचा प्रयत्न करत होती पण झोप आज तिच्यापासून वैर असल्याप्रमाणे दूर होती.

…......................

दुसऱ्या दिवशी स्वयंपाक घरात वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल होती तर सर्व कुटुंबीय इतर व्यवस्था पाहत होते, तर कोणी पाहुण्यांना आणायला जाण्यासाठी तजवीज करत होते. श्रावणी अबोली रंगाची, बारीक काठाची सुंदर साडी नेसली होती. छोटीशी टिकली, डोळ्यातलं काजळ आणि केसातला मोगरा तिचं सौंदर्य खुलवत होतं. श्रावणीच्या घरातल्यांना तर हे स्थळ स्वप्नासारखं असतं. त्यामुळे ही सोयरीक व्हावी म्हणून सर्व जण देवाकडे प्रार्थना करत असतात. आपली मुलगी सुयोग्य स्थळी पडावी अशी म्हणून कोणालाही काही बोलायला जागा ठेवत नव्हते. आपल्या परीने होता होई ते योग्य पद्धतीने करत होते.


कोणीतरी आत सांगत आलं,' पाहुणे आले.' सर्व जण आत येतात. चहा आणि कोरडा फराळ पाहुण्यांना दिला जातो. इकडे श्रावणीच्या मनात घालमेल सुरु होते. तिकडे पाहुण्यांचा अतिथी सत्कार सुरु असतो. बहिणी लपून छपून नवरा मुलगा नक्की कोणता? याचा अंदाज घेत होत्या. तर कोणी श्रावणीला आलेल्या पाहुण्यांचा थाट सांगत होतं. श्रावणीच्या मनावरच दडपण अजून वाढलं होतं.

मोठी आई ( थोरली काकी / चुलती )आत आली आणि बाहेर चल म्हणाल्या आणि श्रावणीची धातीच दडपली. समोर कोण असेल? काय प्रश्न विचारतील? आपल्याला नीट बोलायला जमेल ना? एक ना अनेक विचार तिच्या डोक्यात थैमान घालू लागले. बाहेर पाहुण्यासमोर जाताना सुद्धा मोठ्या आईने थोडक्यात सूचना दिल्याच होत्या.  मोठ्या आईबरोबर श्रावणी बाहेर गेली खरी पण नजर मात्र जमिनीलाच खिळलेली होती.

श्रावणीला समोरून काही प्रश्न विचारली जातं होती. ज्यांची मोजकीच उत्तरे ती वर न बघताच देत होती. बावरलेल्या श्रावणीच्या कानावर चितपरिचित आवाज पडला आणि श्रावणीने पटकन वर पाहिलं, तर समोर त्याच आजी होत्या ज्या काही दिवसांपूर्वी तिला मंदिरात भेटल्या होत्या. त्या श्रावणीकडे पाहुन प्रेमळ हसल्या. त्यांना पाहुन श्रावणीला धीर आला आणि आश्चर्य ही वाटले.

भालचंद्र इनामदार या आपल्या नातवासाठी मुलगी पहायला कावेरी बाई इनामदार स्वतः आल्या होत्या. भालचंद्र यश मिळवण्याच्या ध्येयाने पेटून उठला होता. घरातून, आई - वडिलकडून विरोध झाल्यावर सर्व विरोध झूगारून मुंबईला जाऊन जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं आणि व्यापारात जम बसवला होता. या हट्टाने आपल्या मनाप्रमाणे बायको आणू नये म्हणून घरचे त्याच्या लग्नाच्या मागे लागले होते. पण त्यावेळी ही मला शिकलेलीच बायको हवी म्हणून अडून बसला. कावेरी बाईंनी जेव्हा श्रावणीबद्दल सांगितलं तेव्हा सुद्धा मला शिकलेली बायको पाहिजे आणि खेडवळ नको असं तो आजीला सांगू लागला. त्यावर आजी म्हणजेच कावेरी बाई त्याला म्हणाल्या, " मुलगी शिकलेलीच आहे. पदवी झाली आहे तिची. पण आपल्यात अजून तरी कामाला स्त्रियांना बाहेर पाठवत नाहीत. राहात राहिला प्रश्न खेडवळ असण्याचा तर ते मुलीला भेट आणि ठरवं. तू नाही म्हणालास तर नाही असं कळवू मुलीकडच्यांना आपण. "

येतानाच नकार द्यायचा असं ठरवून आलेला भालचंद्र मात्र श्रावणीला पाहिल्यावर पहाताच राहिला. तिची अबोली साडी, नाजूक टिकली, मुळात सुंदर असलेल्या डोळ्यांना अधोरेखित करणारं काजळ आणि वातावरण धुंद करणारा तिच्या केसात मळलेला मोगरा. तिचं सोज्वळ रूप भालचंद्रला भावलं आणि श्रावणी - भालचंद्रच लग्न ठरलं.

श्रावणी आणि भालचंद्रच लग्न ठरलं आणि घरात आनंदच वातावरण निर्माण झालं. जो तो पोरीने नशीब काढलं असं म्हणत होता. पण श्रावणीच्या घरच्यांना एक चिंता मात्र लागली होती. 'एवढ्या मोठ्या घरात मुलगी देतोय पण तेवढा मोठा मानपान आणि तेवढं मोठं लग्न, त्याचा खर्च जमणार आहे का? शिवाय वर पक्षाकडून काही मागणी असेल तर? मोठा वर पक्ष म्हणजे मागणी सुद्धा मोठीच असणार. आपल्याला जमेल का? धकधकत्या मनाने लग्नाची बैठक ठरवली.

लग्नाची बैठक बसली आणि बोलणी सुरु झाली. श्रावणीच्या घरचे फार सांभाळून बोलत होते. स्थळ सुयोग्य आणि श्रीमंत होतं. मुलगी अश्या स्थळी पडावी अशी इच्छा तर सर्वांची होती पण मोठया स्थळाप्रमाणे अवाजवी मागण्या असल्या तर ? मागण्या पूर्ण करू शकलो नाही म्हणून असं स्थळ हातच गेलं असत. लग्नाच्या बैठकीत भालचंद्राची आजी म्हणजेच कावेरी बाई सुद्धा आल्या होत्या. श्रावणीच्या घरच्याना वाटलं होतं तसं मात्र काहीही झालं नाही. मुलांकडच्यांकडून अगदी माफक अपेक्षा होत्या. तसेच लग्नाचा सर्व खर्चसुद्धा मुलाकडे करणार होते. श्रावणीच्या नशीबावर सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. त्याचबरोबर सर्वजण देवाचे आभारही मानत होते. श्रावणीसुद्धा असं सासर मिळाल्यामुळे खुश होती. शिवाय मुलगा शिकलेला आणि उद्योगी होता. लग्नाची बैठक पार पडली आणि लग्नाचा मुहूर्त ठरला गुढीपाडव्याचा. 

......................................

लग्नाची तयारी दोन्ही घरात जोरदार सुरु झाली. बस्ता, दागिने , आमंत्रण पत्रिका सर्व आनंदसोहळा सुरु होता. मेहंदी लागल्यावर , मेहंदीच्या सुगंधाने संसार स्वप्नात श्रावणी हरवली होती. मस्करी करणाऱ्या मैत्रीणी, डोळ्यातलं पाणी लपवणारे मोठे बाबा , मोठी आई , आई- बाबा , आजी- आजोबा , आत्या , मावश्या , काका. एकीकडे नवीन जीवनाची चाहूल तर दुसरीकडे घरच्यांपासून दूर जाण्याची हुरहूर. आज असलेली मनाची अवस्था ती पहिल्यांदा अनुभवत होती. घरातील सर्व तिला सासरी गेल्यावर कसं वागायचं यावर सूचना देत होते. दुसऱ्या दिवशी नवऱ्यामुलाकडून हळद आली. श्रावणीला हळद लागली आणि आई व मोठ्या आईच्या आसवांचा बांध फुटला. श्रावणीच्याही डोळ्यात पाणी होतं. रात्री झोपताना मोठ्या आईने आणि आईने आपल्या कुशीत घेतलं तिला. आज श्रावणीला ती कुशी जगात सर्वात मौल्यवान वाटत होती. सर्व प्रेम, ममता, जिव्हाळा ती आपल्यात शोषून घेत होती. मोठी आई तिला समजावत आज तुला हळद लागली, तू आता सासरच्या रंगात असंच रंगायचं हे यातून सांगितलं जातं. श्रावणीला लगबलून आलं. ती रात्र तिने ममतेच्या झऱ्याखाली घालवली. 

केशरी रंगाच्या शालूमध्ये श्रावणी खूपच सुंदर दिसत होती. मोजकेच पण नाजूक दागिने तिचे सौंदर्य खुलवत होते. मंगलमयी सनई - चौघडयाच्या सुरांनी आणि आंब्यांच्या पानांनी मांडव सजला होता. वरात आली ,तश्या करवल्या श्रावणीच्या खोलीत जाऊन कुजबुजून हसू लागल्या. त्या शुभ मुहूर्तावर फुल पाकळ्यांच्या आणि रंगीत तांदळाच्या अक्षता  भालचंद्र आणि श्रावणीच्या डोक्यावर पडल्या आणि चि. सौं. का . श्रावणी आता सौं. श्रावणी भालचंद्र इनामदार झाली. 

....................................