Login

अनोखी गाठ भाग १५     मराठी कादंबरी

----------

अनोखी गाठ भाग १५     #मराठी _ कादंबरी


© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की, कावेरी आजी आपल्या लग्नाची अनोखी गोष्ट आपल्या पतवांडणं सांगतेय. ठरलेल्या लग्नात जे घडलं त्यामुळे, ज्या घरात नशिबाने सून म्हणून पाठवलं तिथे अहवेलना मिळाली. पाचपरतावणीसाठी माहेरी आल्यावर सासरी मिळालेली वागणूक कावेरीने लपविली होती. सासरी आल्यावर रखमा बाईंकडून वाड्यात सत्यनारायण पूजा असल्याचे कावेरीला समजते आणि सत्यनारायणाच्या निमित्ताने का होईना घरात प्रवेश मिळेल याची आस छोट्या कावेरीला होती. संध्याकाळ झाली तरी पूजेसाठी कोणी बोलवायला आलं नाही. रखमा बाई जेवणाची थाळ घेऊन आल्या तेव्हा त्यांच्याकडून कळतं की कावेरीने घरात पाय ठेवू नये म्हणून कावेरीच्या नवऱ्याशेजारी सुपारी ठेवून पूजा पूर्ण करायला लावली. हे ऐकून कावेरी दरवाजा बंद करून रडत असताना दारावर टकटक आवाज झाला.... आता पुढे.....)

आजी पुढे बोलते, " त्यावेळी दुःख इतकं होतं की, आपण या दुःखाच्या सागरात बुडून जाऊ आणि पुन्हा कधी वर निघणारच नाही असं वाटतं होतं. डोळ्यात अश्रू थांबत नव्हते. सासरच्या घरात जाण्याच्या सर्व आशा फोल ठरत होत्या. तिथे माझं असं कोणीच नव्हतं. त्या लहान वयात दुःख जास्त वाटतं होतं. आपण कायम एकटे राहू अशी भीती मनात घर करत होती. तेवढ्यात माझ्या खोलीच्या दरवाज्यावर कोणीतरी ठोठावलं. टकटक झालं आणि माझ्या अखंड दुःखाच्या सागरात कोणीतरी दगड मारून तरंग उठवल्याचा भास मला झाला. मी या घरी आपल्यापासून रखमा बाई सोडल्यास कोणी माझ्या खोलीकडे फिरकलं नव्हतं. त्यामुळे यावेळी कोण आलं असेल? असा प्रश्न मला पडला होता.

मी माझे अश्रू पुसत दरवाजा उघडला. समोर सावळ - सुंदर, मनोहर रूप अलवनात दिसलं. मी क्षणभर त्या सुंदर सावळ्या मूर्तिकडे पहाताच राहीले. माझ्याकडून हसून पाहत मला विचारलं, " माझ्याकडे अशीच पाहत राहणार आहेस का? मला दरवाज्यात उभी करून? " त्या प्रश्नाने मी भानावर आले आणि मी त्यांना मागे सरकून आत यायला जागा दिली. २३ ते २४ वयाच्या आसपास असतील. त्या आत आल्या माझी खोली पाहत म्हणाल्या , " सुरेख लावली आहेस हो खोली. " हे ऐकून मी त्यांच्याकडे पाहत एक स्मित हास्य केले. 'त्या' नक्की कोण ? मला माहित नव्हतं. पण त्यांच्याकडे पाहून खूप शांत वाटत होतं. त्यांना माझ्या चेहऱ्यावरचा प्रश्न कळला होता बहुतेक. त्या स्वतः माझ्या जवळ येऊन डोक्यावरून हात फिरवून म्हणाल्या," मी कोण हाच प्रश्न तुला पडला असेल ना ? " मी होकारार्थी मान हलवली. त्यांच्या स्पर्शाने मला खूप छान वाटत होतं. या वाडयात मला मिळालेला पहिला मायेचा स्पर्श होता तो." 

त्या पुढे बोलू लागल्या," माझं नाव ' सरस्वती '. मी तुझी थोरली जाऊ." 

हे ऐकून मला क्षणभर कळत नव्हतं की , आपण नक्की स्वप्न बघतोय की खरंच या आता असं म्हणाल्या की त्या माझ्या जाऊ आहेत ? त्यांनी माझ्या डोळ्यासमोर हात फिरवला आणि मी पटकन उठून त्यांना नमस्कार केला. ते पाहून त्या म्हणाल्या ," असू दे गं , तसही जेवढे आपण मोठे होतो , तेवढे त्रास आणि कष्ट वाढतात आपले. " मी त्यांना म्हणाले," ताई साहेब , माफ करा मला, मला माहित नव्हतं की तुम्ही माझ्या थोरल्या जाऊबाई आहात. म्हणजे या घराणाच्या थोरल्या सुनबाई म्हणजे , सोन्याची जर असलेलं लुगडं, गळाभर दागिने, पाटल्या, वाक्या, तोडे, महाराणीसारखा रुबाब असं चित्र माझ्यासमोर होतं. कारण सासूबाई मला भेटून गेल्या तेव्हा त्यांचा दरारा अनुभवला आहे मी. पण तुम्ही........" असं म्हणून मी थांबले. त्या म्हणाल्या, " होता. माझ्याही रुबाब तू म्हणतेस तसाच काहीसा होता. " 

 मी त्यांच्याकडे पाहात होते. त्यांची नजर माझ्या थाळाकडे गेली त्यांनी मला विचारलं, " अजून जेवली नाहीस तू? " मी मानेनेच नकार दिला. त्यांनी माझ्याकडे पाहत विचारलं, " थाळ बाजूला ठेवून रडत होतीस? बाळा, काहीही झालं तरी अन्नाचा अपमान होईल असं कधीही वागू नये. वाढलेलं थाळ असंच ठेवणं म्हणजे पण अन्नाचा अपमान असतो. पटकन जेवून घे बरं. " त्या थाळ माझ्याकडे देत म्हणाल्या. मी त्यांना म्हणाले, " तुम्ही पण जेवा ना माझ्यासोबत. " त्यावर त्या म्हणाल्या, " मी दिवसातून फक्त एकदा जेवते, तेही सूर्यास्तापूर्वी. नियम आहे तसा. " असं म्हणून त्यांनी थाळ उचलून एक घास उचलला आणि माझ्यासमोर धरला. मला थोड्या वेळासाठी माझ्या मोठ्या बहिणीची आठवण आली. ती सुद्धा कधी माहेरी आली असताना मी रुसलेली किंवा रागावलेली असेल तर मला स्वतः असंच भरवायची.

त्यांनी मला जेवण भरवायला सुरुवात केली आणि मी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्या दिवशी त्या वाड्यात मला पाहिलं नातं सापडलं'बहिणीचं '. मी त्या विचारलं, " ताई तुम्ही अशा का राहात? "

" अशी म्हणजे कशी? " ताईंनी मलाच प्रश्न केला.

" म्हणजे ही लाल वस्त्रे, एक वेळ जेवण वगैरे. " मी म्हणाले.

त्यावर त्या म्हणाल्या, " जेव्हा मी लग्न करून या घरात आले, त्यावेळी माझं वय जेमतेम ८ वर्षे होतं. माझे वडील मोठे जमीनदार आहेत. या घरात माझा धूमधडक्यात गृहप्रवेश झाला. दागिने अक्षरशः लादले होते असं म्हणशील तरी चालेल. सासूबाई सुद्धा खूप छान वागायच्या. जसं तू पाहतेयस तिथे कामाला नोकरांची कमी नाहीये. मला सुद्धा काही कमी नव्हती. सुंदर आयुष्य सुरु होतं माझं. तू म्हणालीस ना ' महाराणी ' अगदी तसंच आयुष्य होतं माझं. तसाच रुबाब होता. पंच पकवन्न असायचे पंगतीला. नेहमी सोन्याची फुलेच लागायची मला केसात मळायला. लग्नानंतर लाडकोड तर झालंच पण जेव्हा मी गरोदर आहे हे कळलं तेव्हा मला फक्त डोक्यावर घेऊन नाचायचं बाकी ठेवलं होतं. त्यावेळी माझं वय १४ वर्षे जवळपास असेल. सर्व खूप आनंदित होते. माझी सर्वजण खूप काळजी घेत होते. सर्व छान आणि सुरळीत सुरु असताना दैव फिरलं. मला सातवा महिना सुरु होता. डोहाळ जेवणाचा कार्यक्रम कसा करायचा? कुठे करायचा? कोणा - कोणाला आमंत्रणे पाठवायची? असं सर्व सकाळी मी सासूबाईसोबत बसून बोलले होते आणि दिवशी संध्याकाळच्या वेळी मला पेरू खायची खूप इच्छा झाली आणि मी ती माझ्या यजमानांना बोलून दाखवली. त्यांना म्हणाले मी, " कोणालातरी बागेत पाठवून पेरू आणायला सांगा. " पण ते म्हणाले की, " मीच जावून आणतो माझ्या लाडक्या बायकोसाठी. " असं म्हणून ते माझ्या उत्तराची वाट न पाहता गेले सुद्धा. मला खूप छान वाटतं होतं. मी त्यांची वाट पाहत बसले होते. खूप वेळ झाला तरी ते आले नाहीत. मला अस्वस्थ वाटतं होतं.

बराच वेळ झाला तरी ते येत नाहीत हे पाहून मी एका सालगड्याला त्यांना पाहून ये असे सांगितले. तेवढयात वाडयात ओरडओरडा झाला. मी लगबगीने काय झालं पहायला झारोख्यात आले. वाडयात सर्वत्र धावपळ सुरु होती. नक्की काय झालंय कळतं नव्हतं. माझ्या मनाची घालमेल वाढली. शेवंता बाई, माझ्या देखरेखसाठी ठेवलेल्या बाई आल्या आणि मला म्हणाल्या, " मालकीणबाई, तुम्ही आत चला, तुम्हाला आरामाची गरज आहे. " मी तिला विचारलं की नक्की काय झालंय. पण तिने सांगितलं की तिला सुद्धा काही माहित नाही. पण तुम्ही आत आराम करा. माझ्या मनाची अवस्था तेव्हा फक्त मला माहित होती. मी माझ्या खोलीत येवून बसले पण मन चलबिचल करत होते. मी खोलीतच फेऱ्या मारत होते. काही वेळाने शेवंता बाई पुन्हा आल्या पण यावेळी त्यांचा आवाज कतार होता. मी त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यांना मध्ये रडत - रडत म्हणाल्या, " मालकीण बाई, तुमचे यजमान, आमचे मालक गेले. " त्यावेळी वीज कोसळावी असा भास झाला. मी मटकन खाली बसले. शेवंता बाई सांगू लागल्या," मालक बागेत गेले होते. बहुतेक त्यांना पेरू हवे होते. बागेत तण खूप वाढलंय त्यामुळे त्यांना अंदाज नाही आला आणि त्यांचा पाय नागावर पडला. नागाने त्यांना दंश केला. बागेत त्यावेळी कोणी नसल्यामुळे कोणाच्या लक्षात आलं नाही.  पांडबा तिथून जात असताना त्यांना हालचाल जाणवली. जवळ जाऊन पाहिलं तर मालक होते. ते मघाशी मालकांना घेऊन आले होते, म्हणून वाडयात गोंधळ होता. वैद्यांना लगोलग बोलावणं पाठवलं होतं पण वैद्य येईपर्यँत मालक गेले. " 

सरस्वती ताई बोलत होत्या," कावेरी , त्यावेळी मी पूर्णपणे खचले गं. त्यात त्यांना पेरू आणायला मीच सांगितलं होतं. सासूबाईंना ही गोष्ट कळली. त्या माझ्यावर खूप चिडल्या. माझ्यामुळे त्यांचा मुलगा गेला असं त्या म्हणू लागल्या. त्यात आजूबाजूच्या बायका सासूबाईंच्या मनात नको नको ते भरवत होत्या. माझं केशापण केलं , त्या केसांवर ह्यांचा जीव होता , ते गेल्यावर त्यांनाच सर्वात आधी माझ्यापासून वेगळा केला. सोन्याच्या जरीची वस्त्रे नसणारी मी . या लाल वस्त्रांमध्ये गुंडाळून राहिले. माझी रवागनी तुझ्या बाजूच्या खोलीत करण्यात आली. मी या वाड्यात होते कारण माझ्या पोटात त्यांच्या घराण्याचा वंश होता. सारखं टाकून बोलणं, मनाला लागलेली टोचणी की मी ह्यांना पाठवलं नसतं तर असं काही झालंच नसत, मनावरचा ताण  आणि कोवळं वय त्यामुळे माझं बाळ दगावलं. त्याची दोषी सुद्धा मीच ठरले. एकेकाळी महाराणी सारखी जगले आणि त्यानंतर माझी अवस्था सुद्धा कोणी पहिली नाही. सासरी जी वागणूक मिळत होती, असं वाटत होतं की धावत- धावत आता बाबांच्या कुशीत जाऊन शिरावं. आपलं दुःख बाबांना न सांगता कळेल. त्यांच्या कुशीत मी माझी अर्धी दुःखे विसरून जाईन. बाबासाठी मी त्यांची लक्ष्मी होते. मला जे हवं ते माझ्यासमोर हजर करत होते ते.  

एक बाबा आल्याचं कळलं. मला इतका आनंद झाला म्हणून सांगू. बाकी काही नाही तर किमान मला मन मोकळं करून रडता तरी येईल. बराच वेळ बाबा आले नाहीत म्हणून मी एका गड्याला त्यांना बोलवायला पाठविले. थोडयावेळाने त्याने येऊन सांगितले की तुमचे बाबासाहेब येत आहेत. हे ऐकून माझ्या डोळ्यात आभाळ साठलं होतं. दरवाजाकडे डोळे लागले होते. माझ्या जखमांवर खूप दिवसांनी गार फुंकर घातली जाणार होती. थोड्या वेळाने बाबा आले. खोलीत आले परंतू उंबऱ्याजवळच उभे होते. मी धावत त्यांच्या जवळ गेले. त्यांच्या कुशीत मी शिरणार तोच बाबांनी हातानेच मला थांबण्याचा इशारा केला आणि म्हणाले, " मला इथून पुढे शुभ कामासाठी जायचे आहे. तेव्हा स्पर्श नको करुस. जे बोलायचे आहे ते तिथूनच बोल." त्यावेळी माझ्या आत्म्याला किती यातना झाल्या असतील , त्याबद्दल न बोललेलंच बरं. मला त्यानंतर काही बोलताच आलं नाही. मी काही बोलत नाही हे पाहून बाबा तिथून निघून गेले. मी मात्र या जगात एकटी पडले कायमची." 

आजीची गोष्ट ऐकताना , त्यात सरस्वती आजीची झालेली फरफट ऐकून स्वाती, जानकी, समीरासह अभिषेकच्या डोळ्यातही पाणी उभं राहीलं. 

क्रमश ......... 

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109

अनोखी गाठ ७  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145

अनोखी गाठ ८   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221


अनोखी गाठ ९     # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331

अनोखी गाठ   भाग १०

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468


अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943


अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-12---marathi--kadambari_6979

अनोखी गाठ  १३  # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-13---marathi--kadambari_7010

अनोखी गाठ भाग १४    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-14---marathi--kadambari_7049

0

🎭 Series Post

View all