अनोखी गाठ ४२ # मराठी _ कादंबरी
© आरती पाटील
( मागच्या भागात आपण पाहिलं की, कावेरीच्या सासूबाई सर्व गोष्टी विसरू लागल्या होत्या. घरातून त्या निघून गेल्या होत्या. खूप शोधाशोध केल्यावर त्या सापडल्या. कसंबस खोटनाट सांगून कावेरी त्यांना डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन गेली. डॉक्टरांनी त्यांना विसरायचा आजार झाल्याचे सांगितले. हा आजार किती पसरला आहे किंवा किती लेवल पर्यंत आहे हे तपासणी करावी लागणार होती. महादेव आणि कावेरीची परीक्षा सुरु झाली होती. आता पुढे. ...... )
" आजी मग तुइझा सासूबाई बऱ्या झाल्या की नाही ? की देवाने कर्माचं फळ दिलं ? " जानकीने नाक उडवत विचारलं.
" असं बोलू नये गं जानू ... " आजी पुढे बोलू लागल्या.
आजी," सासूबाईंना तपासण्यांसाठी डॉक्टरांकडे कसं न्यायचं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. 'हे' रात्री पुन्हा बाबांजवळ राहायला गेले. मला दुसऱ्यादिवशी सासूबाईंना डॉक्टरांकडे कसंही करून न्यायचं होतं. त्यामुळे मी स्वयंपाक करताना सासूबाईंना डॉक्टरांकडे कसं न्यायचं ? यावर विचार करत होते. त्याबरोबरच सासूबाईंवर २- ३ वर्षांच्या मुलावर ठेवतात तसं लक्षही ठेवत होते. मला एक बहाणा सुचला.
जेवताना मी सासूबाईंना म्हणाले," सासूबाई 'ह्यांचा ' जे डॉक्टर मित्र आहे ना, ज्यांना आपण आज भेटायला गेलो होतो. त्यांनी आपल्याला एक मदत मागितली आहे."
सासूबाई, " कसली मदत ?"
मी म्हणाले," त्यांच्याकडे एक रुग्ण आला आहे, त्याची २ दिवसांनी शस्त्रक्रिया आहे. त्याला रक्त हवं आहे आणि सध्या त्याच्यासोबत जास्त कोणी नाही. तेव्हा डॉक्टर म्हणाले की आपल्यापैकी कोणाचं रक्तगट त्याच्याशी जुळत असेल तर रक्त द्याल का ?"
सासूबाई थोडावेळ शांत बसल्या आणि मग म्हणाल्या," बरं , एखाद्याचा जीव वाचणार असेल तर ठीक आहे."
काय गंमत आहे ना ? एके काळी सरस्वती ताईंच्या जीवावर उठलेल्या सासूबाई एखाद्याचा जीव वाचावा म्हणून रक्त द्यायला सुद्धा तयार झाल्या होत्या. सासूबाईंच्या या बोलण्यावर मी उसासा सोडला. चला किमान सासूबाई तयार झाल्या. रात्री मी सासूबाई झोपल्याशिवाय झोपत नव्हते. त्या झोपल्या की मी त्यांच्या पदराची माझ्या पदराशी गाठ बांधायचे आणि मग झोपायचे. म्हणजे त्या उठून जाऊ लागल्या तर पदर खेचला जाईल आणि मला जाग येईल.
सकाळी मी लवकर उठून सर्व आवरलं. 'ह्यांच्यासाठी' आणि आमच्यासाठी सुद्धा जेवण घेतला. सासूबाई माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या," कावेरी माझी न्याहरी ?" मी त्यांना म्हणाले," सासूबाई रक्त तपासायचा आधी जेवायचं नाही असं सांगितलंय डॉक्टरांनी."
सासूबाई," कोणाचं रक्त तपासायचं ? कश्यासाठी ?"
माझ्या लक्षात आलं, सासूबाई विसरल्या आहेत. मी त्यांना परत सगळं सांगितलं. त्यावर सासूबाईंनी माझ्यासोबत हॉस्पिटल मध्ये येण्यासाठी नकार दिला. " मी कशाला कोणाला रक्त देऊ ?" असं बोलून न येण्यावर हटूनच बसल्या. शेवटी मी त्यांना सांगितलं," 'हे' सकाळीच गेले आहेत. आपण येणार असं सुद्धा त्यांनी तिथे सांगितलं आहे. आता आपण नाही गेलो तर त्यांचा शब्द चारचौघात मोडल्यासारखा होईल. " माझ्या या बोलण्यावर त्या हॉस्पिटलमध्ये यायला तयार झाल्या.
आम्ही तिथे गेलो. डॉक्टरांनी सासूबाईंसमोर नर्सला सगळ्यांच्या एक - एक करून तपासणी करा असं सांगितलं. एक- एक जण आत जात होतं आणि बाकी बाहेर बसले होते. आम्ही आत जाऊन थोड्यावेळ बसलो आणि बाहेर आलो. सासूबाईंच्या याप्रकारे सर्व तपासण्या झाल्या. रिपोर्ट यायला दोन दिवसांचा अवधी लागणार होता. थोडा वेळ 'हे' सासूबाईंजवळ थांबले. तोपर्यंत मी बाबांना भेटून आले. बाबांच्या तब्बेतीमध्ये आधीपेक्षा खूप फरक पडला होता. बाबांना नीट बोलता येत होतं, उठून बसता येत होतं. ८ दिवसात त्यांना घरी सोडण्याविषयी डॉक्टर बोलत होते. व्यवस्थित चालता येण्यासाठी वेळ जाणार होता. बाबांची चौकशी करून मी सासूबाईंना घेऊन निघाले.
दोन दिवस मला अनेक वर्षांसारखे भासत होते. सासूबाईंच्या विसराळूपणामध्ये दिवसेनदिवस वाढ होत होती. दोन दिवसांनी सासूबाईंचे रिपोर्ट्स आले. सासूबाईंचा आजार खूप जास्त वाढला होता. डॉक्टरांनी सांगितलं की, काही औषधं आयुष्यभर सुरु ठेवावी लागतील. हा आजार वाढू नये म्हणून ही औषधे होती. सासूबाईंची काळजी लहान मुलासारखी घ्यावी लागत होती. डॉक्टरांशी सासूबाई आणि बाबांच्या तब्बेतीबाबत सल्ला - मसलत करून आम्ही परत गावी आलो. गावाचे डॉक्टर आमच्या सोबतच होते म्हणून त्यांना सर्व माहित होतं. आता सासूबाई आणि बाबांच्या उपचारांच ते बघणार होते.
आम्ही सासूबाई आणि बाबांना घेऊन वाड्यात आलो. मी घराचा ताबा घेतला. कारण आता ते करणं गरजेचं होतं. सासूबाईंच्या विसरण्याच्या आजारामुळे बाबांची जबाबदारी सासूबाईंवर टाकता येत नव्हती. मी सालगड्याला शेतावरच्या घरी पाठवून सर्वांना वाड्यावर बोलावून घेतले. ज्या घरात पदोपदी अपमान झाला, तेच घर आता मला सांभाळायचं होतं. सासूबाईंच्या सेवेसाठी असणाऱ्या बाईंना काही सक्तीच्या गोष्टी सांगितल्या. घरात आता मी बोलेन ते होत होतं. सासूबाईं मात्र लहान मुलांप्रमाणे हट्ट करत असायच्या. शेती, घर, बाहेरची कामे सर्व पाहायचं होतं. दमछाक होत होती पण नेटाने मी सर्व करत होते. बाबा आता हळूहळू चालू लागले होते. सासूबाई कधी - कधी माझ्याच हाताने जेवणनार म्हणून हट्ट करायच्या. सासूबाई, ज्यांचं रुबाबदार रूप मी पाहिलं होत. आता त्यांना असं पाहून डोळ्यात पाणी यायचं.
त्यावेळेत इंग्रज परत आपल्या देशी निघाले होते. जाताना त्यांनी देशाचे दोन तुकडे केलेच. त्यानंतर गांधीजींची हत्या झाल्यामुळे सर्वत्र जाळपोळ सुरु होती. याचा फायदा सुद्धा बराच घेतला जात होता. घरात घुसून लूटमार कर, धान्य पळवं एक ना अनेक गोष्टी सुरु होत्या. सर्वांची काळजी असायची. त्यात आपलं घर धनाढय म्हणून प्रसिद्ध होतंच. एक दिवस ज्याची भीती होती तेच झालं. आपल्या गावात रात्रीच्या वेळी जाळपोळ सुरु झाली. 'ह्यांनी' गड्यांना वाड्याचे सर्व दरवाजे बंद करायला सांगितले. 'ह्यांनी' मला सर्वांवर लक्ष ठेवायला सांगितले. सासूबाईंना मी झोपेची गोळी दिली आणि बाबांना , मुलांना सासूबाईंसह एक गुप्त खोलीत नेलं. जी खोली फक्त काही लोकांनाच माहिती होती. सर्वाना आत ठेवून मी 'ह्यांना' पाहायला आले.
बाहेर येऊन पाहते तर वाड्याच्या एक बाजूला आग लागली होती. सगळीकडे आरडाओरडा सुरु होता. बायकांचे आणि मुलांचे रडण्याचे आवाज, आक्रोश काळीज भेदणारं होतं. 'हे' आणि काही गडी आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखत होते. मारामारी सुरु होती. त्यावेळी नवऱ्या समोर संकट पाहून मला काय झालं माहित नाही पण एकाएकी माझ्यात वीज संचारली. मी खुंटीवरचा कोयता काढला आणि 'ह्यांच्या' बाजूने लढायला सुरुवात केली. काही वेळाने पोलीस आले, तसे लूटमार करायला आलेले लोक पळू लागले. त्या भयाण रात्री एका बाजूने जाळणारा वाडा, अस्थाव्यस्त वाडा, पाहून जोरजोरात रडावसं वाटत होतं. गडी विहिरीवरून पाणी आणून आग विझवत होते. माझ्या अंगावर काही ठिकाणी लागलं होतं. मी 'ह्यांना' शोधू लागले. घरच्या पडवीत 'ते' मला रक्ताच्या थारोळ्यात दिसले.
माझं जग ३६० अशांत पूर्ण फिरलं. मी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांचं डोकं मांडीवर घेतलं. माझ्या आरडाओरड्यामुळे गडी धावत आले. 'ह्यांना' उचलून आत नेलं. एकाने तातडीने वैद्यांना बोलावून आणलं. 'ह्यांच्या' पोटात डाव्या बाजूला कोणीतरी वार केला होता. वैद्य आले, उपचार सुरु झाले. एवढ्या रात्री डॉक्टरांना बोलावणं शक्य नव्हतं. गावात जे सुरु होत त्यात तर नाहीच नाही. वैद्यांनी मला खोली बाहेर थांबायला सांगितलं. कदाचित हे रक्त आणि त्यांच्या वेदना मला सहन झाल्या नसत्या म्हणून. मी खोलीच्या बाहेर फेऱ्या मारत होते. डोळ्यातले अश्रू थांबायचं नावंच घेत नव्हते. माझ्या आयुष्याचा सर्व काळ माझ्या डोळ्यासमोरून सरकत होता.
माझं ठरलेलं लग्न, नवरदेवाचा मृत्यू, मला दिले गेलेली दूषणे, 'ह्यांच्या सोबत लग्न, सासरी आल्यावर मिळालेली तुच्छ वागणूक, ती खोली, सरस्वती ताई, माझं पाहिलं न्हान, सासूबाईंनी केलेला जाच, 'ह्यांनी दिलेलं शिक्षण, घर सोडण्याचा प्रसंग, गायीचा गोठा, सरस्वती ताईंची साथ, 'ह्यांनी घेतलेली माझी बाजू, माझी दिलेली साथ, शेतातलं घर, 'ह्यांनी' मी सुद्धा खूप काही करू शकते हा दिलेला आत्मविश्वास, गर्भावस्था, हल्ला, सरस्वती ताईचं जाणं..... एक ना अनेक प्रसंग हातात हात घालून फेर धरत होते. मी तशीच खोलीच्या भिंतीला टेकून रडत होते...."
आजीची गोष्ट ऐकता - ऐकता स्वाती, जानकी, समीरा आणि अभिषेकच्या डोळ्यात सुद्धा पाणी तरळलं होतं. आजीने काय - काय सहन केलं हे ऐकून अंगावर काटा उभा राहिला होता सर्वांच्या.
क्रमश...............
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा