अनोखी गाठ ४४ # मराठी _ कादंबरी
© आरती पाटील
( मागच्या भागात आपण पाहिलं की, महादेवरावांच्या पोटात डाव्या बाजूला वार झाल्यामुळे खूप रक्तस्त्राव होतो. कावेरीच्या डोळ्यासमोर आतापर्यँतचं आयुष्य तरळून जातं. सकाळी वैद्य काका कावेरीला महादेवरावांना डाव्या बाजूला लकवा मारल्याचे सांगतात. एक आधार होता , तो सुद्धा आता अंथरूणावर असणार या विचाराने कावेरीला असहाय्य होतं. देवघरात देवासमोर असहाय्य कावेरीच्या पाठीवर सासूबाई हात ठेवतात आणि तिच्याकडे जेवायला मागतात. सासूबाईंची अवस्था , त्यांचा आजार, बाबांची तब्बेत आणि आता महादेवराव याचा विचार करून कावेरी खंबीर बनते. महादेवरावांना भेटून , त्यांना धीर देऊन कावेरी गावाच्या सभेत जाते. चर्चेनंतर कावेरी स्त्रियांनी सुद्धा स्वरक्षणासाठी शिक्षा घ्यावी असे सांगते, परंतु उपस्थित स्त्रियांपैकी कोणीही पुढे येत नाही. यावर कावेरी कोणी येवो न येवो मी येणार असे म्हणून जाते. आता पुढे.........)
जानकी आजीकडे एकटक पाहत होती म्हणून आजीने तिला प्रश्न केला," जानू , असं एकटक काय बघतेयस गं ?"
जानकी," आजी त्यावेळी तू किती लोनली फील करत असशील ना ? मला तर विचार करूनच रडू येतंय. "
कावेरी आजी," हो बाळा, एकटं तर वाटत होत पण काय करणार ? समोर असलेल्या संकटाला तोंड देण्याशिवाय पर्याय नव्हता."
समीरा," आजी ज्या बायकांसाठी तू एवढं केलंस, ज्यांच्या मन- सन्मानासाठी केलं त्यांनी मोक्याच्या वेळी पाठ दाखवली ? "
कावेरी आजी ," तुझं बरोबर आहे पण एकदा त्यांच्या बाजूने विचार करून बघ. ज्यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रत्येक क्षणाला झगडावं लागत होतं. जिथे आता कुठे त्यांना मान मिळत होता,( दाखवण्यापुरताच ) तेव्हा अचानक, एकदम घरी कोणाला न विचारता परस्पर तयार होणे त्यांना खरंच जमणार होतं का ? 'थोडी मोकळीक दिली तर लगेच स्वतःचे निर्णय घ्यायला लागली .' असं म्हणून थोडी फार असलेली मोकळीक परत काढून घेतली तर ? सर्व विचार करावा लागत होता. "
स्वाती," आजी मग पुढे काय झालं ?"
" हिची आपली मुद्द्याशी गाठ ." असं म्हणून आजी हसली आणि पुढे सांगू लागली," मी घरी गेले आणि देवघरात जाऊन शांत बसले. त्यावेळी मला सरस्वती ताईंची खूप आठवण येत होती. मुंबईहून आम्ही परत आल्यावर काही दिवसांनी जुली सुद्धा तिच्या मायदेशी परत गेली होती. डोळे लावून बसलेच होते की सासूबाई आल्या आणि म्हणाल्या," कावेरी तू घरी नसताना आपल्या घरात काही माणसे आली होती, वाड्याची तुरुस्ती करणार आहेत असं म्हणत होते. कावेरी आपल्या वाड्याला काय झालंय ?" मला सासूबाईंचा बोलणं ऐकून त्यांच्यावर आता द्या येत होती. त्यांना काल औषधे देऊन 'त्या' खोलीत झोपवलं होतं. त्यामुळे त्यांना काही माहित नव्हतं. माहिती असतं तरी आज किती लक्षात राहिलं असतं माहित नाही म्हणून मी त्यांना सांगितलं," सासूबाई पावसाळा जवळ येणार आहे ना, म्हणून त्यापूर्वी वाड्याची थोडी डागडुजी करून घेते. पावसाळ्यात कुठे गळायला नको. पावसाळा तोंडावर असताना सगळ्यांनाच डागडुजी करून घ्यायची असते. तेव्हा काम करायला माणसे नाही भेटत म्हणून थोडं लवकर करून घेतेय इतकंच." माझ्या बोलण्याने त्यांचं समाधान झालं.
मी स्वतःला सावरून मी तयार झाले. संध्याकाळच्या स्वयंपाकाचे स्वयंपाकीण बाईंना सांगून , मुलांना अभ्यासाला बसवून मी 'ह्यांना' भेटायला त्यांच्या खोलीत गेले. मला पाहून 'ह्यांचे' डोळे भरून आले. मलाही डोळ्यातलं पाणी अडवता नाही आलं. मी त्यांचा हात हातात घेऊन खूप रडले. शांत झाल्यानंतर मी त्यांना म्हणाले," तुम्ही माझी ऊर्जा आहात. तुम्ही आयुष्यभर माझ्यासोबत राहा बस मला अजून काहीही नको. तुम्ही काळजी करू नका. मी सर्व नीट सांभाळीन. सासूबाई - बाबा आणि मुलांची काळजी सुद्धा उत्तम घेईन , चिंता नसावी. फक्त रोज मला तुमच्या स्पर्शातून ऊर्जा देत राहा. मी सगळं निभावून नेईन. त्यांनी त्यांचा उजवा हात थरथरत माझ्या डोक्यावर ठेवला. "
मी बोलेन तो शब्द वाड्यात अंतिम झाला होता. स्वयंपाक , डागडुजी, सासूबाई- बाबांची तब्बेत यासाठी बाया आणि सालगडी नेमून दिले मी. 'ह्यांच्या' साठी कायमस्वरूपी एक माणूस नेमला. घरातलं सगळं बघताना २४ तास 'ह्यांच्या' जवळ मला बसता येणार नाही माहित होतं मला. पोलीस पहाऱ्यावर आले, रात्रीची गस्त सुरु झाली. दुसऱ्या दिवशी मी स्वरक्षणाचे धडे घेण्यासाठी आले. तिथे 'हरी तात्यां' व्यतिरिक्त काही किशोर वयीन मुले होती. मला कोणी येईन म्हणून वाट पाहण्याची गरज वाटली नाही. तात्यांनी मला सुरुवातीला साधे- साधे प्रकार शिकवले. तिथे असलेल्या किशोर वयीन मुलांबरोबर मी सराव करू लागले. त्या वेळ मला समाजापेक्षा माझं घर, माझी माणसे आणि माझं अस्तित्व जास्त महत्वाचं होतं. बाकी मला कोणाची पर्वा करायची गरज वाटत नव्हती.
आता मी रोज ठराविक वेळी सरावासाठी जावू लागले. गावात कुजबुज होत होती पण मी मनावर घ्यायचं नाही हे पक्क केलं होतं. काही दिवसांनंतर गावातील काही बायका सरावाच्या जागी आल्या. त्यांनी मला त्यांनासुद्धा स्वरक्षणासाठी धडे घ्यायचे असल्याचे सांगितले. मला ऐकून बरं वाटलं. त्या म्हणाल्या," ताई , तुम्ही त्या दिवशी सभेत बोलत होतात , तेव्हाच यायचं होतं पण घरचे.... म्हणून त्यावेळी काही बोललो नाही आम्ही. घरी सुद्धा कोणी विषय नाही काढला. स्वतःहून विषय काढायला आम्हांला भीती वाटत होती. तुम्ही सराव सुरु केलात आणि रोज जावू लागलात, तेव्हा आम्ही धीर करून आपापल्या घरी विषय काढला. तुम्ही जमानीदारीण असून पण हे सर्व करताय म्हणल्यावर हा- ना करत घरच्यांनी आम्हांला परवानगी दिली. आता आम्ही पण रोज येणार सरावाला. कासवाच्या गतीने का होईना बदल येणं महत्वाचं.
मी आता सर्व अधिकार एका हाती घेऊन सर्व बघत होते. शेती, वाडा , पै - पाहुणा, व्यवहार अगदी सर्व. 'ह्यांना' वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवलं, 'ह्यांच्या ' कडून काही एक्सरसाइझ करून घेत होते, मुलांना अभ्यासाला 'ह्यांच्या ' खोलीत बसायला सांगत होते. ह्यांना कुठेही एकटेपणा जाणवू नये याची मी पुरेपूर काळजी घेत होते.
पोलिसांची गस्त १ -२ महिन्यांनी बंद झाली. सर्व सावरलं असं वाटत असताना , संधी साधून पुन्हा गावात रात्रीच्या वेळी हल्ला झाला. यावेळी मात्र सर्व सज्ज होते. स्त्री- पुरुष , मुले सर्वांनी प्रतिकार केल्यामुळे हल्ला तर रोखला गेलाच शिवाय हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या गोष्टीमुळे गावकऱ्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला. सर्वजण आता मला जास्त मान देवू लागले. जमानीदारीण बाई शिवाय एक वेगळा आदर दिसत होता. पुढे - पुढे 'ह्यांच्या' तब्बेतीत फरक जाणवू लागला. 'हे' स्वतःहून उठून बसू लागले. जमेल तेवढी स्वतःची कामे स्वतः करू लागले.
काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. मोठ्या मुलाचे 'वसंत'चे शालेय शिक्षण पूर्ण झाले म्हणून मी 'ह्यांच्याजवळ ' त्याच्या पुढील शिक्षणाचा विषय काढला. मी 'ह्यांना' मोठ्या मुलाला 'वसंत'ला पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी पाठ्वण्याविषयी बोलले. आधी 'हे' काही बोलले नाहीत पण नंतर परवानगी दिली. बाजूच्या गावातल्या पाटीलच्या मुलासोबत पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी जायचं निश्चित झालं. वसंत जाणार म्हणून मी कोरडा फराळ स्वतः बनवायला घेतला. करंज्या, लाडू, पोहा चिवडा, कुरमुर्यांचा चिवडा, दशम्या , त्याला आवडतो म्हणून मिरचीचं लोणचं, सर्व तयार केलं. तो जाणार त्याच्या अधल्या रात्रीपासून माझी चलबिचल सुरु होती. रडू येतं होतं. वसंत पाहिल्याचं जेव्हा मला आई बोलला होता तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होता. सरस्वती ताईंच्या गळ्यात पडून त्याने विचारले होते," हीच ना माझी नवीन आई?" ते सर्व आठवून मला अश्रू अनावर झाले होते.
मी खोलीत अश्रुना वाट मोकळी करून देत होते तेवढ्यात दारावर थाप पडली. मी डोळे पुसले आणि दार उघडले. समोर वसंत उभा होता. तो खोलीत आला आणि माझ्या कुशीत शिरून रडू लागला. ते पाहून माझ्या अश्रूंचा बांध ही फुटला. तो म्हणाला," आई , तू या घराला आपल्या पिल्लाला पक्षीण सांभाळते , तस सांभाळलं. तुझ्यासोबत या घरात खूप वाईट झालं , तरी तू मनात कोणताही किंतु न ठेवता आजही आजी- आजोबांची सेवा करतेस. सावत्रपणाची झळ तू कधीच लागू दिली नाहीस. आता सुद्धा सर्व तू एका हाती सांभाळतेस. तुझी होणारी कसरत पाहतच मोठा झालो मी. आजी- आजोबांचा आजार, बाबांना बघायचं, घर, शेती, बाहेरचे व्यवहार सर्व करताना तू आम्हाला दुर्लक्ष केलं नाहीस. तुझ्यासारखं सर्वांनाच जमत नाही. आई मी तुला वचन देतो, मी शिकून परत आल्यावर तिला आराम देईन. तुझं ओझं शक्य तितकं हलकं करेन." त्या रात्री आम्ही माय - लेक प्रेमाच्या अश्रूत भिजून निघालो. रात्री तो माझ्याच कुशीत निजला.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला पाठवताना माझं अंतःकरण जड झाले होते. तालुक्याचं गाव आपल्या गावापासून खूप लांब आहे. त्यावेळी दीड दिवस प्रवासात जायचा. म्हणजे मोठ्या सुट्टी शिवाय वसंतला घरी येणे जमणार नव्हते. घरातील सर्वांचे आशीर्वाद घेऊन माझा वसंत निघाला होता. मी दरवाजात उभी राहून तो दिसेनासा होईपर्यंत पाहत होते.
क्रमश.........
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा