Login

अनोखी गाठ ४६ # मराठी _ कादंबरी

---------

अनोखी गाठ  ४६                # मराठी _ कादंबरी 

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की, बाबांच्या ( सासऱ्यांच्या ) मृत्यू नंतर कावेरी पुन्हा त्या दुःखातून सावरू लागते. वसंत शिक्षण पूर्ण करून येतो आणि शेतात, व्यवहारात लक्ष देऊन कावेरीची मदत करतो. कावेरी छोट्या जाईच लग्न थाटामाटात लावून देते आणि वसंताच्या लग्नाची तयारी करते. लग्नाला एक महिना असताना कावेरीच्या सासूबाई पाय घसरून पडतात आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे लोकांमध्ये कुजबुज सुरु होते. त्या कुजबुजमुळे कावेरी भानावर येते आणि घरच्यांसोबत गौरीच्या घरी जाते. गौरीच्या घरच्यांनी तिला देवाला सोडण्याचा निर्णय घेतला होता. कावेरी आणि तिच्या घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला आणि गौरीला सोबत नेण्याबाबत बोलतात. त्यावर गौरीच्या घरच्यांनी सर्वांची माफी मागून लग्न थाटामाटात लावून देण्याचे वचन देतात. आता पुढे.......)

" म्हणजे पणजी आजी तुम्ही सर्वजण वेळेवर गेला म्हणून गौरी आजी वाचली नाहीतर आजीला काय काय सहन करावं लागलं असतं ? " स्वाती म्हणाली. 

आजी ," हो ना बाळा, मी देवाचे आभार मानते की त्याने मला वेळेवर तिथे जाण्याची बुद्धी दिली. सहा महिन्यात घर बऱ्यापैकी सावरलं होतं. वसंताच्या लग्नाचा मुहूर्त काढला आणि खरेदी सुरु झाली. आधीची खरेदी सुद्धा होतीच त्यामुळे फार काही करावं नाही लागलं. लग्नाचा दिवस जवळ येत होता आणि मला सरस्वती ताईंची खूप आठवण येत होती. जाईच्या वेळी पण असंच त्यांच्या आठवणीने मन भरून येतं होतं. त्यांना शोधायला तरी कुठे जाणार ? काशीला गेल्या खऱ्या त्या पण काशी, द्वारका , वृंदावन, जगन्नाथ पुरी, चार धाम अश्या यात्रांवर असायच्या. त्यात त्या कुठे किती दिवस राहतील ? माहित नसायचं. त्यांच्यासोबत बऱ्याच विधवा ( सोडलेल्या , सासर- माहेरच्यांनी नाव टाकलेल्या ) स्त्रिया होत्या. स्वतःला देवासाठी वाहून घेतलेले आणि वाहिलेले सुद्धा होते त्यामुळे एकप्रकारचं रक्षण सुद्धा होतं. 

लग्नाचा दिवस उजाडला. दारात मांडव होता. मांडव फुलांनी, पानांनी आणि माणसांनी फुलून गेला होता. वसंताच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि एक - एक जबाबदारीतून मी मुक्त होतं असल्याचे समाधान मला मिळाले. गौरी लक्ष्मीच्या पाउलांनी वाड्यात आली. मी हळूहळू एक- एक जबाबदारी गौरीकडे देऊ लागले. मला आता शांतपणे फक्त 'ह्यांची' सेवा करायची होती. मनोहरच लग्न झालं की सर्व जबाबदारी संपवून सर्व सुनांच्या हाती द्यायचं , त्यांना त्यांच्या मनासारखा संसार करू द्यायचा. 

मनोहरच लग्न ठरलं आणि मला बरं वाटलं. 'ह्यांनी' आणि मी त्यावेळी ठरवलं होतं की , मनोहरच लग्न झालं की काही दिवस शेतातल्या घरात राहून देव दर्शनाला जायचं. काशी- विश्वेश्वर, तिरुपती, बारा - ज्योतिर्लिंग अगदी सर्व करायचं. मनोहरच लग्न थाटामाटात पार पडलं. मी आता सर्व गोष्टीतून लक्ष काढून घेऊ लागले. 'ह्यांची' तब्बेत मात्र फारशी साथ देत नव्हती. मी 'ह्यांची' माझ्याकडून शक्य तितकी सेवा केली पण देवाच्या मर्जी पुढे कोणाचं काय चालतं ? मनोहरच लग्न झाल्यावर ३ वर्षांनी 'हे' मला कायमचे सोडून गेले. 'ह्यांनी' मला आजवर दिलेली साथ अनमोल होती. 'ह्यांनी' जे माझ्यासाठी केलं होतं, ते कदाचित माझ्या आई- वडिलांनी सुद्धा केलं नसतं. माझ्यावरचे 'ह्यांचे' उपकार मी कधीही विसरू शकत नाही. 'ह्यांच्यामागे' कुटुंब एकत्र बांधून ठेवणे, ही मोठी जबाबदारी मी उचलली. 

घरात, व्यवहारात, शेतीत मी काम करत नव्हते पण लक्ष ठेवून होते. मुलांनी सुद्धा सर्व जबाबदारी आपापल्या खांद्यावर घेतल्या होत्या. गावात आणि घरात दोन्हीकडे मान मिळालं होता आणि मी तो सांभाळत होते. पुढे कुटुंब वृक्ष वाढत गेलं. वसंताला दोन मुलं वसुधा आणि भालचंद्र. त्यांच्या तुम्ही दोघी मुली समीरा आणि जानकी. जाई ला तीन मुलगेच झाले. ते तिघेही शेतीच करतात. त्यांची मुलं गेली शहरात. मनोहरला एकच मुलगा राम. त्याला दोन मुलं - एक मुलगा राजस तो सध्या शिकायला पुण्याला आहे आणि एक मुलगी म्हणजेच स्वाती. 

भालचंद्र खूप हट्टी त्याने कोणतीही गोष्ट स्वतःच्या ध्येयाच्या आड येऊ दिलं नाही. मुंबईला एवढ्या लांब त्यांना पाठवणं जीवावर आलं होतं माझ्या. शेवटी नातू ना, थोडा जास्तीचा जीव असणारच. तो गेल्यानंतर दुसरा कोणाला अडवू शकत नव्हते. जो- तो  प्रगती करायला बाहेर जात होता. मी मात्र इथेच बसून सर्वांची वाट पाहते. अभिषेक सुद्धा गेला होता पण माझं लेकरू परत आला माझ्याकडे." असं म्हणून आजी अभिषेकच्या डोक्यावरून हात फिरवते. 

" आजी मग सरस्वती आजीसोबत तुझी भेट परत झालीच नाही का ?" समीरा. 

" झाली होती ना. पंढरपुरात , चंद्रभागेत स्नान करायला जाताना भेट झाली होती , एक १३ - १४ वर्षांपूर्वी. मला त्यांना पाहून आनंद झाला. त्यांच्याही डोळ्यात मला पाहून अश्रू उभे राहिले. गळाभेट झाली, जीव शांत झाला आमचा. मी खूप विनवण्या केल्या परत येण्यासाठी पण त्या काही यायला तयारच नव्हत्या. त्यांनी परत एकदा माझी गळाभेट घेतली आणि त्या तिथून गेल्या. त्यानंतर त्या मला आजवर भेटल्या नाहीत. माझी एक इच्छा आहे , डोळे कायमचे बंद होण्यापूर्वी संपूर्ण कुटुंब मला या वाड्यात माझ्या डोळ्यासमोर जेवताना पाहायचं आहे." आजी स्वर गहिवरलेला होता. 

अभिषेक, जानकी, समीरा आणि स्वाती आजीची आतापर्यंतची कहाणी ऐकून गहिवरले होते. सर्व त्यावेळी शांत झालं होतं. आजीने सर्व नातवांच्या  ( पणतू ) गालावरून आपला सुरकुतलेला हात फिरवून झोपायला निघून गेली. आजीच्या विचारात सर्वजण गच्चीवरच झोपी गेले. स्वातीच्या बाजूला जानकी, जानकीच्या बाजूला समीरा आणि थोडंच पुढे अभिषेक झोपला होता . मध्यरात्री समीराला जाग आली तेव्हा अभिषेकचा हात तिच्या कमरेभोवती आवळलेला होता. त्याच्या श्वासांचा वर्षाव तिच्या मानेवर होतं होता. चांदण्यांच्या प्रकाशात अभिषेककडे एकटक पाहत होती ती. शेतात काम करून राकट झालेले  त्याचे हात तिला सुखावत होते. हा क्षण असाच थांबून राहावा असे वाटत होते तिला. त्याचं सावळं पण सुंदर रूप चांदण्याच्या प्रकाशात आपल्या मनात उतरवत होती ती. सर्वांचा मान राखणारा अभी, मालक असताना त्यांचं सामान उचणारा अभी, उच्च शिक्षित असून शेतीशी आणि आपल्या माणसांशी जोडलेला अभी समीराच्या मनात कधी घर करून गेला तिला कळलंच नाही. एक मात्र खरं त्याचा तो वेढा तिने सोडवला नाही. तशीच ती पुन्हा झोपी गेली. 

सकाळी अति गारव्यामुळे आणि सवयीमुळे अभिषेकला भल्या पहाटे जाग आली. समीराच्या कमरेभोवती त्याचा हात, क्षणभर तो समीराला पाहतच राहिला. पहाटेच्या धुक्यात , फुलावरच्या दवबिंदूप्रमाणे भासत होती ती. हात लावला तर पुढ्याच्या क्षणी नसेल असं वाटत होतं. समीरा कूस बदलू लागली तसा अभिषेक भानावर आला. त्याने हळूच आपला हात काढला आणि त्याची गोधडी समीराच्या अंगावर टाकून तो खाली निघून गेला. अभिषेक खाली जाऊन गुरांना चारा- पाणी देऊ लागला पण डोळ्यासमोर समीराचं रूप येतं होतं. चारा देऊन तो कसरत करायला लागलं तर धुक्याच्या चादरीमागून गुलाबी फुले दावात न्हालेली दिसली. समीराचं रूप तसंच काहीस होतं. हिरव्यागार शेतांच्या प्रेमात असलेला अभि गुलाबी रंगात न्हाऊन निघत होता. 

इकडे काही वेळाने स्वातीने दोघीना उठवलं. समीराला जाग येताच ती आजूबाजूला चाचपडू लागली. अभि तिथे नसल्याचं तिच्या लक्षात आलं आणि आपल्या आधी अभिषेक उठल्यामुळे 'ती' मिठी त्यालाही कळली असणार. या विचारानेच तिच्या चेहऱ्यावर गुलाबी हसू फुलतं. गच्चीवरून खाली येताना वरूनच ती कसरत करणाऱ्या अभिषेककडे पाहते. प्रेम, लाज, मनात फुलपाखरू उडणं या गोष्टी ती आज पहिल्यांदा अनुभवत होती. समीरा अभिषेकला पाहत पायऱ्यांवरून उतरत असताना अभिषेकचं लक्ष सुद्धा समीराकडे जातं. पहाटेच्या धुक्यात आकाशातून परी खाली उतरून येतेय असा भास अभिषेकला होता अन तेवढ्यात संजयच्या ( गायी- गुरे राखणारा मुलगा ) मोबाईल रेडिओ वर नवीन गाणं लागतं.  

मन झालं धुंद बाजिंद ललकारी गं
पिरतीचा गंध आनंद नवलाई गं
लागली ओढ
लागली ओढ मन हे लई द्वाड
सतवून झालं समदच ग्वाड
लागलं सजनीला सजनाच याड........... 

क्रमश :

0

🎭 Series Post

View all