अनोखी गाठ ४७ # मराठी _ कादंबरी
© आरती पाटील
( मागच्या भागात आपण पाहिलं की, कावेरी आजी आपली गोष्ट संपवून झोपायला जाते. इकडे रात्री समीराला जाग येते तेव्हा ती अभिषेकच्या मिठीत होती. तिला तो स्पर्श सुख देत होतं. ती पुन्हा तशीच त्याच्या मिठीत झोपी जाते. सकाळी अभिषेकला जाग येते. समीराला मिठीत पाहून त्याच्या मनात देखील फुपाखरे उडू लागतात. समीरा कूस बदलताना अभिषेक भानावर येतो आणि खाली निघून जातो. अभिषेकला सर्वत्र आता समीरा दिसू लागते आता पुढे......)
सर्वजण न्याहारीला बसले तेव्हा समीरा चोरटा कटाक्ष अभिषेकवर टाकत होती. अभिषेकला सुद्धा तिच्या नजरेतलं वेगळेपण जाणवत होतं. अभिषेकला समीरा पाहता क्षणी आवडली होती पण समीराला भारत , इथे बंधनात राहण तिला आवडत नसल्यामुळे त्याने पुढे विचार केला नव्हता. आता तिचा तो चोरटा कटाक्ष खूप काही सांगत होता. तिचं हळूहळू या मातीत रुजणं त्याला भावत होतं. मन त्याचंही आतुर होतं.
न्याहारी झाल्यावर अभिषेक शेतावर निघाला तसा समीराने त्याला आवाज दिला. तिच्या तोंडून स्वतःच नाव ऐकून त्याच्या हृदयाची स्पंदने वाढत होती. समीरा म्हणाले," थोडं थांब. मी सुद्धा तुझ्यासोबत येते शेतावर." त्यावर स्वाती म्हणते," आपण सर्व नंतर एकत्र जाऊयात , आता त्याला जाऊ दे." त्यावर पुन्हा समीरा म्हणाली," तुम्ही दोघी मागून या मी जाते अभिबरोबर आता." समीराचा हट्टी स्वभाव माहित असल्याने स्वाती जास्त बोलली नाही. अभिषेकच्या मनाची धडधड मात्र वाढलेली असते.
अभिषेक आपली बाईक काढतो. समीरा त्याच्या मागे बसते. हा प्रवास असाच सुरु राहावा असं तिला वाटत होतं. गावचे रस्ते म्हणजे रस्ता कमी आणि खाच- खळगे जास्त. एरवी अश्या रस्त्यावरून जाताना तिने भारताला पुन्हा एकदा नावेचे ठेवली असती पण यावेळी मात्र त्यात खाच- खळग्यांमुळे होणाऱ्या स्पर्शामुळे ती सुखावत होती. गाडी अडखल्यावर अभिषेकच्या खांद्यावर ठेवलेल्या हाताची पकड अजून घट्ट होत होती आणि त्या स्पर्शातल्या विश्वासामुळे अभिषेकच्या चेहऱ्यावर समाधान वाढत होतं. दोघेही शेतावर पोहचले. विहिरीतून पाणी काढलं आणि फ्रेश होऊन अभिषेकच्या ग्रीन हाऊस मध्ये गेले. समीरा त्याला तो करत असलेल्या प्रयोगाबद्दल विचारत होती. शेतीबद्दल, प्रयोगाबद्दल बोलताना, सांगताना अभिषेकच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. समीराच्या कानावर किती शब्द पडले ते माहित नाही कारण ती फक्त माहिती सांगणाऱ्या अभिषेककडेच पाहत होती. बोलता- बोलता त्यांचं लक्ष समिराकडे गेलं आणि तिचं एकटक पाहणं त्याच्या हृदयावर कोरलं.
नंतर समीराला छोटी- छोटी कामे सांगून अभिषेक शेतातील काही मोठे दगड पारेच्या मदतीने काढू लागला. उन्हात त्यांच्या अंगातून घाम निथळत होता. त्यामुळे ओल्या झालेल्या शर्टमधून त्याचं रांगडं रूप अजून खुलत होतं.समीराच्या बदललेल्या स्वभावामुळे तिच्या नैसर्गिक सौंदर्यात सुद्धा भर पडली होती. सुंदर दिसण्यासाठी आता तिला सौंदर्य प्रसाधनांची गरज नव्हती. अभिषेकच्या विचाराने सुद्धा तिच्या चेहऱ्यावर चमक येतं होती. गालावर गुलाबी लाली चढत होती.
हळू - हळू समीरा शेतात रमू लागली. रोज अभिषेकच्या मागे शेतात जाऊ लागली. कळत - नकळत होणाऱ्या स्पर्शाने दोघेही सुखावत होते. काहीही न बोलता प्रेम बहरत होते. होणारे बदल कावेरी आजीच्या नजेरेतून सुटले नव्हते. एका संध्याकाळी सर्वजण म्हणजेच स्वाती, जानकी, अभिषेक आणि समीरा शेतात चहा घेत असताना समीराला काहीतरी आठवलं आणि ती म्हणाली," मी काय म्हणते, आपण एकदा सरस्वती आजीला शोधण्याचा प्रयत्न करूयात का ? म्हणजे कावेरी आजी म्हणाली होती, तिची इच्छा आहे या घरात सर्वांना एकत्र पाहायची. म्हणून आपण एकदा प्रयत्न करून पाहायचा का ?"
स्वाती," कल्पना छान आहे पण देव न करो पण सरस्वती आजी नसतीलच तर ? म्हणजे वय पाहता म्हणतेय मी."
जानकी," स्वाती बरोबर आहे तुझं पण समीरा म्हणाली तसं, प्रयत्न करायला काय हरकत आहे ? तेवढाच भारतात अजून फिरता येईल आम्हांला."
सर्वांना समीराचं बोलणं पटत आणि सर्वजण एक प्रयत्न करून पाहायचं ठरवतात. हे सर्व करत असताना मात्र कावेरी आजीला आपण सरस्वती आजीला शोधायला जातोय हे सांगायचं नाही असं ठरवलं. कारण प्रयत्न करून सुद्धा सरस्वती आजी नाही भेटली तर कावेरी आजीला वाईट वाटेल. चौघेजण प्लांनिंग करून शेतातून घरी येतात.
संध्याकाळी जेवण झाल्यावर अभिषेक खोबरेल तेलाची वाटी कावेरी आजीच्या हातात देत तिच्या समोर जाऊन बसला. आजीने आपल्या सुरकुतलेल्या हातांनी अभिषेकच्या डोक्याला तेल लावायला सुरुवात केली. स्वाती, समीरा आणि जानकी सुद्धा आजीच्या भोवती येऊन बसल्या. समीरा अभिषेककडे पाहत होती पण अभिषेक डोळे बंद करून मालिशची मज्जा घेत होता. ते पाहून समीराने हळूच अभिषेकला चिमटा काढला. अभिषेक कळवळून तिच्याकडे पाहत होता. समीराने डोळ्यानेच आजीजवळ विषय काढायला सांगितले. त्यांची चुळबुळ पाहून आजीनेच विचारलं," काय झालं ? " अभिषेक आजीला म्हणाला," आजी समीरा म्हणत होती की भारतात येऊन बरेच दिवस झालेत पण भारत पहिला नाही अजून हवा तसा. त्यामुळे उत्तर भारत फिरायला जायचं का ? असं विचारतेय ती."
कावेरी आजी," मग हे तू का सांगतोयस ? ती बोलले ना ." आजी समीराकडे पाहू लागली.
समीरा लाडिक होऊन म्हणाली," आजी, प्लिज. मला उत्तर भारत बघायचा आहे. मी ऐकलं आहे त्याबद्दल म्हणून. आमची पिकनिक सुद्धा होईल. "
आजी ," मी नाही कुठे म्हणाले ? मी फक्त एवढंच विचारलं की तुझ्या जागी अभि का बोलतोय ? म्हणजे आमच्यावेळी परवानगी काढायला नवऱ्याला पुढे करायचो आम्ही. म्हणून विचारते." आजी डोळे मिचकावत म्हणाली. समीराला लाजल्यासारखं झालं. अभिषेक सुद्धा सकपकलाच. आजीने परवानगी दिल्यामुळे सर्वजण खुश झाले. अभिषेकने ट्रेनची टिकेट्स बुक केली. दोन दिवसांनी चौघे निघणार होते. त्यामुळे मुलींचे दोन दिवस खरेदीतच गेले. आजीने दोन दिवसांत मुलांसाठी थोडा कोरडा फराळ बनवून दिला. सर्वजण आपापलं सामान घेऊन निघाले. आजी दरवाजातून सर्वांना निरोप देत होती आणि मनात म्हणत होती," तुम्ही परत आल्यावर तुमच्यासाठी फटाके तयार असतील." आजीच्या गालावर खट्याळ हसू आले.
प्रवासात दोन दिवस जाणार होते म्हणून अभिषेकने एक कंपार्टमेंट बुक केलं होतं. अभिषेकने डायरेक्ट काशीची टिकेट्स काढल्या होत्या. त्यामुळे मध्ये कुठे थांबायची गरजच नव्हती. ट्रेन मधून बाहेरचा निसर्ग पाहत प्रवास करण्याची मज्जा सर्वजण अनुभवत होते. समीरा आणि अभिषेकाचा डोळ्यातला खेळ सुरूच होता. रात्री स्वाती आणि जानकी छान झोपी गेल्या. तेव्हा समीरा हळूच अभिषेकच्या बाजूला येऊन बसली. खिडकीतून थंड हवा आत येत होती. आकाशात चांदणं पसरलेलं होतं. समीराने अभिषेकच्या खांद्यावर डोकं ठेवलं. अभिषेकने सुद्धा तिला आपल्या कुशीत खेचलं. कोणी काहीच बोलतं नव्हते. एकमेकांच्या सहवासाची ऊब नातं अजून उबदार करत होती. हातात हात गुंफलेले, चेहऱ्यावर समाधानाची लकेर होती,पसरलेल्या चांदण्यात हरवण्याची आस होती. त्याक्षणी ते चांदणं पिणारे चकोर पक्षी भासत होते. हा हात , ही साथ जन्मोजन्मीची असणार याची खात्री होती.
प्रवासाचा आनंद घेत दोन दिवसांनी सर्वजण काशीला पोहचले. हॉटेल आधीच बुक केलं होतं. सर्वजण फ्रेश झाले अन काशीच्या सफारीला निघाले. सर्वात आधी त कशी काशी- विश्वेश्वराच्या मंदिरात गेले. सर्वानी देवाला सरस्वती आज भेटू दे एवढंच मागितलं. एवढ्या आक्रमणानंतर सुद्धा काशी- विश्वेश्वराचं दिव्यता बघण्यासारखी होती. असं म्हणतात की, काशी- विश्वेश्वर हे नगर स्वतः भगवान महादेवांनी वसवलेलं आहे. सगळीकडे पूर्व वैभवाचे दाखले होते. देखणेपण डोळ्यात भरणारं. एकूणच काय सर्वांच्या मनात काशी- विश्वेश्वर बसले.
आता सर्वानी आसपास चौकशी सुरु केली. तेथे येणार जास्त करून पर्यटक होते. त्यामुळे एवढ्या गर्दीत सरस्वती आजीला शोधणं एक आव्हानच होतं. दिवसभर फिरून सुद्धा कोणालाही काहीही क्लू मिळाला नाही. संध्याकाळी जेवून सर्वजण हॉटेलवर परत आले. सर्वजण उदास होते. सरस्वती आजीला कसं शोधायचं तेच कळत नव्हतं.
क्रमश : ...................
