Login

अनोखी गाठ  ४८         # मराठी _ कादंबरी 

--------

अनोखी गाठ  ४८                 # मराठी _ कादंबरी 

सर्वप्रथम सर्व वाचकांची क्षमा मागते. मागचे काही महिने मी भाग प्रकाशित केला नाही. खूप वाचक पुढच्या भागाची वाट पाहत होते. काही वैयक्तिक कारणांमुळे मला कथा पुढे नेता आली नाही त्याबद्दल क्षमस्व..... )

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की,  समीरा आणि अभिषेकच्या मनात एकमेकांविषयी प्रेम भावना निर्माण झाली होती . कावेरी आजीच्या दोघांमध्ये सुरु असलेला इशाऱ्यांचा लपंडाव लक्षात आला होता. समीरा स्वाती, जानकी आणि अभिषेकसमोर सरस्वती आजीला शोधण्याविषयी बोलते. समीराला कावेरी आजीची सर्व कुटुंब एकत्र पाहण्याची इच्छा पूर्ण करायची होती. काही वेळ चर्चा केल्यानंतर आजीला आपण सरस्वती आजीला शोधायला जातोय याची कल्पना न देता जायचा ठरवतात. ठरवल्याप्रमाणे उत्तर भारत दर्शनाची परवानगी घेऊन समीरा, अभिषेक, जानकी आणि स्वाती निघतात. ट्रेनमध्ये रात्री स्वाती आणि जानकी झोपल्यानंतर समीरा अभिषेकच्या कुशीत विसावते आणि दोघेही त्या धावत्या ट्रेनच्या खिडकीतून टपोऱ्या चांदण्याचा आनंद घेत होते. दोन दिवसांच्या प्रवासानंतर सर्वजण काशीला पोहतात. आता पुढे......) 

 काशी - विश्वेश्वराचं मन तृप्त करणारं दर्शन चौघांना झालं. त्यानंतर सर्वजण सरस्वती आजीच्या शोध मोहिमेच्या मागे लागले. सर्वजण खूप प्रयत्न करत होते पण सरस्वती आजीचा शोध लागत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी गंगा आरती घ्यायचं ठरवलं, पण प्रवासाच्या थकव्यामुळे त्यांना सकाळी लवकर जाग आली नाही. अभिषेकला सकाळी साडेसात दरम्यान जाग येते आणि तो सर्वांना उठवतो.  

जानकी - ओह शीट... आपल्याला उठायला उशीर झाला. आता आपल्याला गंगा आरती मिळणार नाही. ( जानकीचा चेहरा पडला होता. ) 

स्वाती - हो ना. मी सुद्धा खूप ऐकलं आहे काशीच्या गंगा आरतीबद्दल. गंगा आरती म्हणजे नेत्र दीपक सोहळा असतो.  ( स्वाती अंगावरची चादर बाजूला करत म्हणते.) 

अभिषेक - ठीक आहे ना. आता नाही मिळाली , उद्या सकाळी जाऊ. आज संध्या आरती घेऊ. तसही काही दिवस आहोत आपण येथे तेव्हा रोज गंगा - आरती मिळेल. आता लवकर उठा आणि तयार व्हा. आपल्याला काशी फिरायचं पण आहे आणि सरस्वती आजीविषयी चौकशी पण करायची आहे. 

समीरा मात्र सर्वांचं बोलणं ऐकता - ऐकता पटकन बाथरूम मध्ये जाते अंघोळीला. स्वाती आणि जानकी बाहेरून दार ठोकत असतात. " आम्ही तुझ्या आधी उठलो आहोत आणि तू अंघोळीला पळलीस." समीरा छान अंघोळ करून येते.त्यानंतर स्वाती अंघोळीला जाते तर जानकी रिसिप्सनवर तिच्या फोनसाठी चार्जर मिळतोय का ? पाहायला जाते. समीरा आपले ओले केस पुसत असताना अभिषेक तिला पाठीमागून मिठी मारत तिच्या गालावर आणि मानेवर हळुवार चुंबन घेतो. अश्या हळुवार प्रेमाने समीरा शहारली. हा क्षण असाच थांबून राहावा असं दोघांनाही वाटत होतं. समीराला अभिषेकाची मिठी या जगातील सर्वांत सुरक्षित आणि सुखद भासत असते. 

दारावरच्या टकटकने दोघेही आपल्या विश्वातून बाहेर येतात. समीरा जाऊन दरवाजा उघडते. जानकी चार्जर घेऊन येते आणि फोन चार्जिंगला लावून स्वाती बाहेर आल्यावर अंघोळीला जाते. अभिषेक नेटवर आजूबाजूच्या परिसराची आणि जुन्या जागांची माहिती घेत होता. थोडया वेळात सर्वजण तयार होऊन निघतात. काशीच सौंदर्य खरंच डोळ्याचं पारणं फिटवणारं होतं. दशाश्वमेध घाट , मणिकर्णिका घाट, रामनगर फोर्ट अजूनही बऱ्याच ठिकाणी फिरत होते आणि ते सौंदर्य डोळ्यात साठवत आणि आसपासच्या जुन्या मंदिरांमध्ये, धर्मशाळांमध्ये ते सरस्वती आजीविषयी चौकशी करत होते पण इच्छित फळ त्यांना मिळत नव्हते. दिवस उगवत होता , मावळत होता. स्वाती , जानकी , समीरा आणि अभिषेक सर्व जागा शोधात होते.  

समीरा - आज दोन दिवस झाले काशीला येऊन पण सरस्वती आजीविषयी काहीही माहिती मिळाली नाहीये. 

स्वाती - हो ना, आता असं वाटतंय की , आजी नाही भेटणार.

अभिषेक- आपण आलो आहोत तर अजून दोन दिवस प्रयत्न करून बघू. 

सर्वजण एकमेकांकडे पाहून मानेनेच होकार देतात. 

संध्याकाळच्या वेळी घाटावर सर्वजण संध्या- आरतीसाठी आले. एका ओळीत उभे राहून अनेक दिवे एकाच दिशेने , एका वळणात, आरतीच्या सुरात वरून - खाली आणि खालून वर गोलाकार फिरत होते. सात्विक सौंदर्य , भक्ती त्यातून दिसत होती. आरती जसं जशी पुढे सरकत होती तसं - तसं त्या वातावरणाशी, काशी - विश्वेश्वराशी एकरूप होतं असल्याचा भास होत होता. आरती संपल्यावर चौघेही तिथेच घाटावर बसले आणि तिथलं सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवू लागले. तिथूनच थोडं दूरवर एक साधूबाबा बसले होते. कदाचित काही मंत्रपठण सुरु होतं त्यांचं. डोळे लावून ध्यानस्त बसलेले बाबा अभिला तेजाळ दिसले. अभि त्यांच्याजवळ गेला आणि त्यांची पूजा पूर्ण होण्याची वाट पाहू लागला. मंत्रपठण संपलं आणि बाबांनी डोळे उघडले. अभिला बाजूला पाहून त्यांनी स्मितहास्य दिले. अभिने स्मितहास्याने प्रतिउत्तर देऊन बोलायला सुरुवात केली. 

( त्यांचं संभाषण हिंदीतून झाले. मात्र येथे ते मराठीतून लिहिले आहे. ) 

अभिषेक - बाबा तुम्ही येथे कधीपासून आहात ?

साधूबाबा- मी एका जागी नाही थांबत. मी फिरत असतो. कधी द्वारका, कधी मथुरा, कधी काशी , कधी केदारनाथ तर कधी बद्रीनाथ. जिथे देवाचं दर्शन घ्यायची इच्छा होते, मी जातो. 

अभिषेक-  छान.... देवाच्या सानिध्यात राहणं म्हणजे मुक्तीच्या दिशेने अग्रेसर राहणं.

साधूबाबा- असं नाही मुला, देवाच्या सानिध्यात राहून तुमच्या मनात इतर विचार असतील तर काही उपयोग नाही होत. त्या उलट संसारात राहून सुद्धा तुम्ही देवाला मनापासून जवळ केलं तर सर्व कर्मफळ भोगण्याची मानसिक तयारी मजबूत होते. त्यानंतर या सर्वातुन तुम्ही बाहेर पडता आणि मुक्तीच्या दिशेने अग्रेसर होता. 

अभिषेक - ते ही बरोबरच आहे म्हणा.. बरं बाबा तुम्ही एवढे फिरलात, काही गोष्टी किंवा वर्णन सांगा ना , म्हणजे आम्हाला पुढच्या वेळी जायला. 

अभिषेकच्या बोलण्यावर साधूबाबा वेगवेगळ्या देवस्थानची माहिती सांगतात, तिथली महती सांगतात आणि पुढे विचारतात.

साधूबाबा - तुम्ही इकडे फिरायला आलात का ? 

अभिषेक - हो बाबा, फिरायला तर आलो आहोतच पण....

साधूबाबा- पण काय ?

अभिषेक- बाबा खरं तर आम्ही आमच्या चुलत पणजी आजीला शोधायला आलो आहोत. अनेक वर्षांपूर्वी त्या इकडे आल्या. आम्हाला तर त्यांच्या बद्दल काही दिवसांपूर्वीच कळलं. त्यामुळे त्यांचा शोध घेत आलोत पण अजून तरी त्यांच्याविषयी काही माहिती मिळाली नाहीये. 

साधूबाबा- बाळा , तू तुझ्या पणजी आजीबद्दल बोलतोयस. म्हणजे खूप वर्षांपूर्वीच त्या आल्या असणार. अरे कितीतरी बायका येतात इथे. काही टाकलेल्या, काही विधवा, काही देवाला सोडलेल्या. एवढ्या वर्षानंतर कठीण आहे भेटणं. 

अभिषेक - माहित आहे बाबा पण एक प्रयत्न करावा म्हणून आलोत आम्ही. 

साधूबाबा- बरं पणजीच नाव काय आहे तुझ्या ?

अभिषेक - " सरस्वती ."

साधूबाबा- सरस्वती ........ मी एका सरस्वतीला भेटलो होतो बऱ्याच वर्षांपूर्वी. याच घाटावर . विधवा होती ती. आम्ही साधू म्हणून सेवा केली तिने आणि तिच्यासारख्या बायकांनी. साधुसेवा देवाजवळ पोहचते म्हणून. त्यांना काही पूजा विधी, मंत्रपठण शिकवले होते मी, काही दिवस इथे राहून. पण तिच्या घरी कोणी नाही म्हणाली ती.

अभिषेक - त्या राहतात कुठे ? 

साधूबाबा- इथून अर्ध्या तासावर एक आश्रम आहे. तिथे सर्व स्त्रिया राहतात पण मी तुला खूप वर्षांपूर्वीची गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे तिथे आता कोणी असेल -नसेल माहित नाही. शिवाय तीच तुझी पणजी याची सुद्धा खात्री नाही. कारण तिला कोणीही नाही असं तिने सांगितलं होतं. 

अभिषेक- तसं असेलही बाबा पण कदाचित तिथे जाऊन आम्हांला काही माहिती मिळेल. 

साधूबाबा - हो असं सुद्धा होऊ शकत. ( असं म्हणून बाबांनी अभिषेकला तिथला पत्ता सांगितला. ) 

अभिषेकने साधूबाबाचे आभार मानले आणि स्वाती, जानकी , समीरा बसल्या होत्या तिथे आला. 

स्वाती-  काय मग दादा काय गप्पा झाल्या साधूबाबांसोबत ?

अभिषेक- एका आश्रमाबद्दल कळलं आहे. उद्या तिथे जाऊन एकदा चौकशी करूयात. 

सर्वजण मान डोलावतात.