अनोखी गाठ ५० # मराठी _ कादंबरी
© आरती पाटील
( मागच्या भागात आपण पाहिलं की, साधूबाबांकडून आश्रमाचा पत्ता मिळाल्यावर सर्वजण दुसऱ्या दिवशी आश्रमात जातात. तिथे त्यांची चौकशी करून आणि काही कागदपत्र घेऊन सुमतीजी त्यांना तिथे आलेल्या सरस्वती नावांच्या स्त्रियांबद्दल सांगतात. माहितीतुन कळत की एक सरस्वती पणजी आजीच्या वयाच्या नाहीत, दुसऱ्या ४ वर्षांपूर्वीच वारल्या, तिसऱ्या कधीच आश्रम सोडून गेल्या. त्यांच्याबद्दल अधिक माहिती नाही आणि चौथ्या सरस्वती द्वारकेला गेल्या आहेत ज्या दुसऱ्या दिवशी येणार आहेत. सुमती अभिषेककडे फोटो असलेले फॉर्म देऊ करतात, परंतु पूर्वी कधीही न पाहिल्यामुळे सरस्वती आजी नक्की कश्या दिसतात हे कोणालाच माहित नव्हतं. समीरा - स्वाती विनंती करून तिथे राहण्याची परवानगी मागतात. त्यांच्यातला खरेपणा जाणवल्यामुळे सुमतीजी त्यांना तिथे राहण्याची परवानगी देतात. आता सर्वांना दुसऱ्या दिवशीच्या सूर्यनारायणाची प्रतीक्षा होती. आता पुढे........)
पहाटे दरवाजाच्या आवाजाने सर्वांना जाग आली. अभिषेकने जाऊन पटकन दार उघडलं. समोर आश्रमातील एक स्त्री उभी होती. त्या स्त्रीने सर्वांना उठून तयार व्हायला सांगितलं. सगळ्यांच्या मनात आजच्या दिवसाची, त्या क्षणाची उत्सुकता होती. ज्या क्षणी द्वारकेला गेलेल्या सरस्वती परत येतील. सर्वांनी पटापट आवरलं, त्यांना दिलेली खोली रिकामी केली आणि आश्रमाच्या बाहेरच्या झाडाखाली जाऊन बसले. सर्वांचे डोळे आश्रमाच्या गेटकडे लागले होते.
काही वेळ गेला आणि गेटकडे नजर असणाऱ्यांना ( सर्वांना ) मागून गोड आवाज आला," बाळांनो, थोडी न्याहारी करून घ्या." सर्वानी मागे पाहिलं तर तिथे एक अगदी वयोवृद्ध स्त्री उभी होती. तिच्या हातात पोह्यांच्या डिश होत्या. डोळ्यात करुणा, तलम , तुकतुकीत त्वचा, चंदेरी - चमकणारे केस , त्या केसांचा लिंबा एवढा आंबाडा, अंगावर फिकट नववारी. सर्वजण त्यांच्याकडे पाहतच राहिले. त्या आजींनी डिश पुढे केल्या. तसे सर्वजण भानावर आले आणि आजींच्या हातातून डिश घेतल्या. त्या आजींच्या मागून सुमती आल्या. सुमती बोलू लागल्या," याच आहेत सरस्वती. या भल्या पहाटेच परत आल्या. मी त्यांना तुमच्याबद्दल सांगितलं आहे. आता तुम्ही बोलून घ्या. " असं बोलून सुमती बाजूला उभ्या झाल्या.
सुमतीच बोलून ऐकून अभिषेकने पटकन आपल्या हातातली पोह्यांची डिश खाली ठेवली आणि आजींजवळ जाऊन त्यांचे हात हातात घेऊन सर्व गोष्ट सांगितल्या आणि पुढे म्हणाला," आजी आम्हांला या गोष्टी नुकत्याच कळल्यात आणि म्हणून आम्ही आमच्या सरस्वती आजींना शोधायला निघालो आहोत. आमचा शोध तिथपर्यंत आला आहे. तुमच्याकडे पाहिल्या - पाहिल्या मला तुमच्या डोळ्यात कावेरी आजीसारखं प्रेम दिसलं. तुम्हीच आमच्या सरस्वती आजी आहात ना ?" अभिषेक काकुळतीला येऊन बोलत होता. आजी काही बोलत नव्हत्या पण त्यांच्या डोळ्यात पाणी नक्कीच तरळलं होतं. आता मात्र स्वाती, जानकी आणि समीरा यांच्या सुद्धा नजरेत आजीच्या डोळ्यातलं पाणी आलं होतं. अभिषेकने पुन्हा विचारलं," आजी तूच आमची सरस्वती आजी आहेस ना ?" आता मात्र अभिषेकच्या डोळ्यातील अश्रू पाहून आजीने होकारार्थी मान डोलावली. आजीने मान डोलावताच सर्वजण आजीला जाऊन बिलगली. असं वाटतं होतं की दाणे आणायला गेलेल्या चिमणीला खूप उशीर झाला आणि तिची छोटी- छोटी पिल्लं तिला पाहायला आतुर आहेत आणि चिमणी आल्यावर पिल्लांनी तिला घट्ट मिठी मारली आहे.
अनेक वर्ष असा मायेचा , आपुलकीचा स्पर्श आजीला झालाच नव्हता. बिलगलेली पिल्लं आजीला सोडायला तयार नव्हती. सर्वजण त्या आनंदाश्रूंत चिंब भिजत होते. आजी सुद्धा एवढे वर्ष वैराग्यात जागूनही आपल्या पिल्लाना समोर पाहून मायेत अडकली. आजी खूप वेळ आपल्या वंशजांना गोंजारत होती. चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत होती. कित्येक वर्ष राहिलेलं प्रेम आपल्या पिल्लांवर उधळत होत्या. सुमती बाजूला उभ्या राहून सर्व पाहत होत्या.
थोड्या वेळाने भावनेचा वेग ओसरल्यावर आभिषेक म्हणाला, " आजी तुझं सामान बांधायला घे, मी पण मदत करतो. आपण आता आपल्या घरी जातोय. " अभिषेक ठामपणे आणि हक्काने बोलला. आजीने आपले डोळे पुसले आणि म्हणाली," नाही बाळा, मी नाही येऊ शकत. तुम्ही माझ्यासाठी एवढ्या लांब आलात, मला पुढचा मार्ग मोकळा झाला. यापेक्षा जास्त देवाकडे काय मागू मी ? मी काही स्वप्नातही विचार केला नव्हता की कोणी मला शोधात येईल, तेही एवढ्या वर्षांनी. एवढे वर्ष देवाच्या सानिध्यात राहिले आता शेवटच्या काळात परत संसार मोहात नाही पडायचं मला. माझा आशीर्वाद नेहेमी तुमच्या पाठीशी राहिलं. "
आजीचं बोलणं ऐकून समीरा पुढे आली आणि म्हणाली, " नाही आजी, आम्ही तुला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही. एवढे वर्ष देवाला दिलेस ना तू. आता तुझी, तुझ्या सहवासाची गरज आम्हांला आहे, कावेरी आजीला आहे. "
अभिषेक," हो आजी, जेव्हा तुला वाड्याबाहेर जावं लागलं तेव्हा आम्ही नव्हतो पण आता तुला आमच्या सोबत घरी यावंच लागेल. आम्ही काहीही ऐकणार नाही. "
जानकी," हो आजी, " आम्हाला कावेरी आजीची फॅमिली फ्रेम पूर्ण करायची आहे. "
स्वातीसुद्धा डोळ्यात अश्रू घेऊन आजीला विनवत होती. मस्ती केल्यावर आई रुसते आणि मग तिची बाळे तिची मनधरणी करतायत असं काहीसं चित्र तिथे दिसत होतं. अभि, समीरा , जानकी, स्वाती सर्वजण एकदम लहान बाळासारखे हट्ट करून रडत आजीला मनवत होते. सुमतीबाईंनी या आश्रमात असं दृश्य यापूर्वी , एवढ्या वर्षात पाहिलं नव्हतं. जिथे आई- वडिलांना आश्रमात मुलं सोडतात, तिथे पणजीला न्यायला तिचे पतवंडं एवढी मेहनत घेत, आजीला शोधत आले होते. सुमती मध्ये म्हणाल्या, " आजी आजवर या आश्रमात असं कधी झालेलं नाहीये. तुमची पिल्लं तुम्हांला शोधत आले आहेत. तुम्ही तुमचं आजवरचं आयुष्य देवासाठी जगलात, कदाचित देवाची इच्छा असेल की आता तुम्ही प्रेमाच्या , आपुलकीच्या सानिध्यात जगावं. देवाला फक्त मनाचा भाव हवा असतो. तो तुमच्या मनी आहेच. तेव्हा आता तुम्ही जा, तुमच्या स्नेह आणि प्रेमाने भरलेल्या जगात."
सरस्वती आजींना मुलांचे मन मोडवले नाही. सर्वांचे अश्रू पुसत त्यांनी त्यांच्यासोबत जाण्यासाठी होकार दिला. सुमती बाई म्हणाल्या, " तुम्ही सरस्वती आजींना नक्की घेऊन जा पण तुम्ही घरी पोहचेपर्यंत आमचा एक माणूस तुमच्यासोबत असेल. तुमचे काही कागदपत्र आहेत आमच्याकडे तरीसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने आजी त्यांच्या घरी जाईपर्यंत एक जण असेल सोबत." सर्वांनी आनंदाने होकार दिला. सर्वजण आजीच्या खोलीत जाऊन तीच सामान बांधू लागले. आजीला सोबत नेतानाचा आनंद अवर्णीय होता. आजीच्या सामानाची बांधाबांध सुरु असताना अभिषेक बाहेर येतो आणि एक फोन करतो.
सरस्वती आजीला निरोप द्यायला जवळ जवळ सर्व आश्रम जमा झालं होतं. आपल्या पणजीला न्यायला आलेले पतवंडं पाहून सर्वांना "नशीब" या शब्दाचा अर्थ उमगत होता. आजीनी आश्रमातील सर्वांचे आजवरच्या साथीसाठी आभार मानले आणि साश्रू नयनांनी आश्रमाला निरोप दिला.
परतीच्या प्रवासात सर्वांनी सरस्वती आजीला खूप जपलं. आजी घरातल्या सर्वांबद्दल विचारपूस करत होती. कावेरी आजीबद्दल सारखं विचारत होती. परतीच्या प्रवासात सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा आयुष्याचा पूर्ण प्रवास सरस्वती आजीच्या डोळ्यासमोरून गेला. गाव किती बदललं असेल ? वाद किती बदलला असेल ? सगळे मला बघून आनंदी होतील का ? अर्ध्यापेक्षा जास्त जण तर मला ओळखतही नाहीत. एक ना अनेक प्रश्न होते आजीसमोर पण आपल्या पतवंडांनी एकाच क्षणात लावलेला जीव आजीला कळला होता. कावेरीची माया सर्वांमध्ये उतरलेली जाणवत होती. परिस्थिती खूप बदलेली असेल. खूप काही मनात एकाच वेळी सुरु होतं.
अभिषेकने गाडी गावाच्या वेशीला लागायच्या आधीच घरी फोन केला आणि मी थोड्या वेळात पोचतोय असं सांगितलं. सरस्वती आजी खिडकीतून बाहेर कुतूहलाने पाहत होत्या. गाव आधीच्या मानाने खूप बदलल होतं. आजी एखाद्या लहान मुलाप्रमाणे प्रश्न विचारत होती. ' तिथे आधी विहीर होती ना ?, शाळा तर पलीकडे असायची , ती कुठे आहे ? या बाजूला वडाच झाड होतं , ते कुठे गेलं ? ' सरस्वती आजीचे हे सर्व प्रश्न अभिषेक एन्जॉय करत होता. अभिला आता कावेरी आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि सरस्वती आजीच्या मनाला मिळाणार समाधान बघायचं होतं.
क्रमश :
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा