अनोखी गाठ ५१ # मराठी _ कादंबरी
© आरती पाटील
( मागच्या भागात आपण पाहिलं की, द्वारकेहून आलेल्या सरस्वती आजींशी सर्वांची भेट होते आणि त्याचं आपल्या सरस्वती आजी असल्याचेही समजते. अभिषेक , स्वाती, जानकी आणि समीरा आजीला आपल्यासोबत येण्याबद्दल बोलतात. आजी नकार देते परंतू सर्वजण अगदी सुमतीजी सुद्धा सरस्वती आजींना परत घर जाण्यासाठी तयार करतात. आश्रमातील सर्वांचा निरोप घेऊन आजी आपल्या पतवंडांसोबत पुन्हा आपल्या गावी निघतात. गावाच्या वेशीतून आत येताना गावात झालेले बद्दल त्यांना जाणवतात आणि त्याबद्द्ल त्या बोलत असतात. अभिषेक मात्र खूप खुश असतो. आता पुढे........)
अभिषेक, स्वाती , जानकी आणि समीरा सरस्वती आजीला घेऊन वाड्याजवळ आले. अभिषेक सोडून सर्वांना आश्चर्य वाटलं कारण वाड्याला फुलांच्या तोरणांनी सजवलं होतं. बाहेर छोटा मंडप होता. आतून छान मंगल सूर वाजत होते. समीराने अभिषेककडे एक प्रश्न करणारा कटाक्ष टाकला, अभिषेकने तिच्याकडे हसून पाहिले. समीरा अभिषेक जवळ येऊन म्हणाली," आपण कावेरी आजीला सरप्राईज देणार होतो ना ? मग तू आधीच का सांगितलंस ? "
अभिषेक ," काळजी करू नकोस, मी कोणालाही सांगितलेला नाही की आपण सरस्वती आजीला घेऊन येणार आहोत पण एवढ्या वर्षांनी आजी घरी येणार तर स्वागत सुद्धा तसं व्हायला हवं ना ? म्हणून थोडासा खटाटोप केला. "
समीरा, " म्हणजे ?"
अभिषेक, " थोडा धीर धर. लगेच कळेल. " असं म्हणून अभिषेकने कावेरी आजीला वाडयाच्या बाहेरूनच आवाज दिला.
कावेरी आजीसोबत घरातले इतर मंडळी सुद्धा लगबगीने बाहेर आली. आजीच्या हातात आरतीचं ताट होतं. बाहेर आल्यावर कावेरी आजी सरस्वती आजीला पाहून स्तब्ध झाली. थोडावेळ कळेना काय झालंय. कावेरी आज्जी आणि सरस्वती आजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कावेरी आजीने आरतीचं ताट बाजूला ठेवलं आणि धावत जाऊन सरस्वती आजीला घट्ट मिठी मारली. तिथे उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. सरस्वती आजी आणि कावेरी आजी यांना जणू हर्षवायू झाला होता. स्वतःला सावरत कावेरी आजीने सरस्वती आजीला ओवाळलं आणि अभिषेक कडे पाहत म्हणाली, " तू गंगा घेऊन येणार होतास ना ? " खट्याळ हसत अभिषेकने गंगाजल कावेरी आजीसमोर ठेवला. कावेरी आजीने पुन्हा गंगाजल आरती करून घरात घेतलं. सर्वजण आत आले. आत पूजेची तयारी होती. तेवढ्यात समीरा आणि जानकीच लक्ष भालचंद्र आणि श्रावणीकडे गेलं. दोघी जाऊन आपल्या आई- बाबांना बिलगल्या. तेवढयात मागून आवाज आला," फक्त आई- बाबांना भेटणार ? आत्याला नाही भेटणार का ? " दोघीनी मागे वळून पाहिलं तर मागे वसुधा आत्या म्हणजेच अभिषेकाची आई आणि बाबा उभे होते . दोघीनी जाऊन आत्याला मिठी मारली. अभिषेक आणि स्वाती जाऊन भालचंद्र आणि श्रावणीच्या पाया पडतात. सर्व घर गोकुळ भासत होतं. तो सोहळा पाहून कावेरी आजीच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. सर्व घर आज एकत्र होतं.
समीरा," आज सर्व एकदम एकत्र कसे ?
भालचंद्र," खूप दिवस झाले माझ्या पाखरांना पाहिलं नव्हतं, त्यामुळे मन लागतंच नव्हतं. मग राणीसरकारांना म्हणालो,' भरा बॅग लगेच निघुयात.'
वसुधा," जानकी आणि तू इकडे आल्याचे माहित होतं मला पण एका महत्वाच्या कामामुळे नाही येता आलं. काम झालं तसं लगेच आले. भालचंद्र दादा काल रात्री आला आणि मी आजच सकाळी आले. "
कावेरी आजी," आज देवाने माझ्या ओंजळीत सर्व सुख एकदम द्यायचं ठरवलं होतं." ( आजीच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्याचं तेज वेगळंच होतं.)
सर्वजण गंगाजल पूजनाला बसले. गंगाजल दर्शन घेण्यासाठी गावातील बरेच जण आले होते. पूजा यथासांग पार पडली. सर्वजण वाड्याच्या हॉलमध्ये बसले होते. जानकीने अभिषेकला प्रश्न केला, " अभिषेक तू घरी असं काय सांगितलंस की आजीने पूजेची तयारी करून ठेवली होती ?"
अभिषेक ," सरस्वती आजीचं सामान बांधत असतानाच मी बाहेर येऊन फोन केला आणि सांगितलं की आम्ही या या दिवशी घरी पोहचू. येताना मी गंगाजल घेऊन येतोय तर गंगाजल पूजनाची तयारी करून ठेवा."
जानकी ," मग ? म्हणजे , गंगाजलची पूजा करावीच लागते का ? "
कावेरी आजी , " हो, बाळा गंगाला प्रचंड वेग असतो, त्यामुळे जेव्हा आपण गंगाजल घरी घेऊन येतो तेव्हा गंगेचा वेग कमी करण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी गंगाजलची पूजा केली जाते आणि मग घरात ठेवतात. पूर्वी तुळशी वृंदावन मोठं असायचा आणि त्यात गंगाजल ठेवण्यासाठी जागा सुद्धा असायची त्यामुळे पूजा करेपर्यंत गंगाजल घरात न घेता तिथे ठेवला जायचं. "
जानकी, " ओह्ह... असा आहे तर.... ! म्हणून हे कारण सांगून अभिषेकने वाडा सजवून घेतला. "
अभिषेक मंद स्मित करत होता. समीरा म्हणते," आजी तुझ्या इच्छेप्रमाणे आज पूर्ण कुटुंब एकत्र आहे. मग एक फॅमिली फोटो काढूयात. "
सर्वजण आपल्या वयाप्रमाणे , नात्यांप्रमाणे जागा घेऊन बसतात आणि एक सुंदर फोटो खेचला जातो. फोन मध्ये घेतलेला तो फोटो सर्वांनाच खूप आवडतो. अभिषेक म्हणतो, " आजी दोन दिवसात या फोटोची मोठी तसबीर करून मी आपल्या वाड्याच्या हॉलमध्ये मध्यभागी लावतो. "
सर्वांना ते आवडतं. सर्वजण प्रेमाने एकमेकांची विचारपूस करत असतात, सरस्वती आजीला काय हवं नको अगदी अगत्याने करत असतात. कावरी आजीला परिपूर्ण कुटुंब दिसू लागलं. कावरी आजीने मुलांना सांगून सरस्वती आजीची पूर्वीची खोली ( वैधव्य येण्यापूर्वीची ) तयार करायला सांगितली. रात्रीची जेवणे साग्रसंगीत झाले. ना ना प्रकारचे पदार्थ, मिठाई, भजी, कोशिंबिरी, लोणची एक ना अनेक. सरस्वती आणि कावेरी आजीला हा क्षण कधी सरू नये असं वाटू लागलं. रात्री उशिरापर्यंत गप्पा- गोष्टी रंगल्या होत्या.
कावेरी आजीच्या मनात जुन्या नात्यांना नवीन मुलामा देण्याचा विचार घोळू लागला. रात्री कावेरी आजी सरस्वती आजीसोबतच झोपली. सर्व जुन्या आठवणी उजळू लागल्या. एवढ्या वर्षांच्या गप्पा - गोष्टी संपतच नव्हत्या. सरस्वती आजी आपल्या एवढ्या वर्षांच्या गोष्टी सांगत होत्या. सरस्वती आजी काशीला गेल्यावर झालेल्या घडामोडी कावेरी आजी सरस्वती आजीला सांगत होत्या. यात रात्र सरली.
सकाळी वाड्यात मंगल वातावरण होतं. लेकी - सुना चुलीवर न्याहारी बनवत होत्या, मुले गायींना अंघोळ घालत होते. मुली फुले वेचत होत्या. कोणी चारा घेऊन येत होतं. वाडा आज खूप आणि खऱ्या अर्थाने गजबजला होता. अभिषेकची नजर समीराला शोधत होती. सर्वजण आनंदाने वावरत होते. आजीने सर्वांना न्याहारीला बसायला सांगितलं. अभिषेक न्याहारीला बसला आणि समोरून समीरा आली. गुलाबी पंजाबी ड्रेस, कानात छोटेसे डूल, डोळयांत काजळाची रेष, धुतलेले केस हे पाहून अभिषेकच्या हातातला घास हातातच राहिला. समीरा मात्र अभिषेककडे न पाहता अजून भालचंद्राच्या म्हणजेच तिच्या डॅडच्या बाजूला बसते. अभिषेक आपली न्याहारी पूर्ण करतच होता, तोच समीराने बोलायला सुरुवात केली," डॅड , तुम्ही मला येथे यायला सांगितलं. मी ते ऐकलं, इथे आले. खरंच मला इथे येऊन खूप छान वाटलं. सर्व खूप आवडलं. हा बदल छान आहे. डॅड पण आता मला अमेरिकेची आठवण येतेय. तर मी निघायचं म्हणतेय."
समीराच बोलणं ऐकून अभिषेकला ठसका लागला. कावेरी आजीला सुद्धा समीराचं बोलणं ऐकून नवल वाटलं. सर्वजण तिच्याकडे पाहू लागले. कावेरी आजी म्हणाली, " समीरा , अचानक जायचं कसं मनात आलं तुझ्या ?"
समीरा ," अचानक नाही आजी, आपल्या घरी जायची इच्छा असतेच ना ? ते काय म्हणतात......अ..अ... हा .... ओढ...! ओढ... मी लहानाची मोठी तिथे झाले, आठवण तर येणार ना. मला इथे येऊन बराच वेळ झालाय. तर आता मला जायचं आहे. शिवाय डॅडच्या बिसनेसमध्ये सुद्धा लक्ष द्यायचं ठरवलं आहे मी. आता इथे पण सर्व एकत्र आले आहेत, काल फॅमिली फोटो पण झाला. माझं उद्याच तिकीट केलंय मी. " समीरा असं बोलून उद्याची पॅकिंग करायला आपल्या रूममध्ये निघून गेली.
समीराने तिकीट पण केलंय ? सर्वजण तिच्याकडे पाहतच राहिले. अभिषेकला कळत नव्हतं नक्की समीरा अशी का वागतेय? अचानक परत जायचं म्हणतेय? असं का ? कावेरी आजी सुद्धा तीच वागणं पाहून आश्चर्य करत होत्या. असं नेमकं काय झालंय ?
क्रमश :
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा