Login

अनोखी गाठ  ५२         # मराठी _ कादंबरी

--------

अनोखी गाठ  ५२         # मराठी _ कादंबरी

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की, अभिषेक, समीरा, स्वाती आणि जानकी सरस्वती आजीला घेऊन वाड्यात येतात. गंगाजल घेऊन येत असल्यामुळे पूजेची तयारी करून आणि वाडा सजवून ठेवण्यासाठी अभिषेकने कावेरी आजीला आधीच फोन केला होता. सरस्वती आजीला पाहून कावेरी आजीला हर्षवायू झाला होता. मुलांनी सरस्वती आजीचा शोध सर्वांना सुखावून गेला. श्रावणी - भालचंद्र आपल्या लेकींना भेटायला भारतात आले होते तर अभिषेकाची आई म्हणजेच वसुधा सुद्धा आपल्या यजमानांसोबत वाड्यात हजर होती. कावेरी आजीला हा क्षण जुन्या नात्यांना नवीन मुलामा देण्यासाठी योग्य वाटला पण दुसऱ्या दिवशी सकाळी समीराने ती अमेरिकेला परत जात असल्याचे सांगितले. आता पुढे ......... )

समीरा उद्या अमेरिकेला जात असल्याचे सांगून आपल्या रूममध्ये निघून गेली आणि सर्वजण तिच्याकडे पाहतच राहिले. बाकीच्यांना नाही पण कावेरी आजी आणि अभिषेकला हे समजत नव्हतं की समीरा असं का वागतेय ? अचानक जायचं का ठरवलं तिने ?   

समीरा आपल्या रूममध्ये येऊन आपल्या सामानाची पॅकिंग करून लागली. अभिषेक तिच्या मागून तिच्या रूममध्ये आला आणि त्याने तिला विचार, " समीरा , अचानक जायचं का ठरवलंस ? अगदी तिकीट पण काढलंस ? " 

समीरा ," ओढ...... मगाशी म्हणाले ना मी. अरे लहानाची मोठी झाले मी तिथे. आता आठवण येतेय तर जाते शिवाय खूप वेळ झालाय मला येऊन. " 

अभिषेक ," तुला परत जायचंय ? मला सोडून ?" 

समीरा ," तूला सोडून म्हणजे ? तू माझ्यासोबत येणार आहेस का ? " 

अभिषेक ," समीरा असं काय बोलतेयस ? प्रेम आहे ना आपलं एकमेकांवर ?" 

समीरा, " प्रेम....... ? कोणाचं ? कोणावर ? " 

अभिषेक कावरा- बावरा होऊन तिच्याकडे पाहत म्हणाला," अगं एकत्र आहोत ना आपण ? तू माझ्या मिठीत ......" 

समीरा मधेच त्याला तोडत म्हणाली ," मग ...? मिठीत होतो तर ? अरे या वयात असं होत शिवाय अमेरिकेत हे सर्व कॉमन आहे. त्यासाठी कायम एकत्र राहायचं का ? जमणार आहे का ? पूर्व- पश्चिम आहोत आपण. शिवाय मी कायमची अशी खेडेगावात नाही राहू शकत." 

अभिषेक थोडं चिडून ," समीरा हे अमेरिकेमध्ये कॉमन आहे आणि हि अमेरिका नाहीये ." 

समीरा ," मुळात मी तुझ्यावर प्रेम करते किंवा इतर कोणताही शब्द मी तुला आजपर्यंत दिलेला नाहीये. त्यामुळे  आवाज चढवून बोलू नकोस. तूला ते खरं वाटलं असेल किंवा तुला दुखावलं असेल तर त्यासाठी सॉरी ! पण त्यापेक्षा जास्त काही नाही." असं बोलून समीरा अभिषेककडे पाठ करून पुन्हा सामान पॅकिंग मध्ये लागते. तिने पुन्हा मागे फिरून सुद्धा पाहिलं नाही. 

अभिषेक समीराच्या बोलण्याने खूप दुखावला जातो. तो तसाच शेतावर निघून जातो. कावेरी आजी अभिषेकला चिडून शेतावर जाताना पाहते आणि समीराच्या खोलीकडे वळते तोच समीरा समोरून येताना दिसते. कावेरी आजी काही बोलणार तोच समीरा कावेरी आजीला मिठी मारून म्हणते," आजी उद्या मी जातेय पण मी येत राहणार. मला प्लिज तुझ्या हाताने फराळ बनवून देना. तुझ्या हातची चवच वेगळी आहे. लव्ह यू...." 

सर्वजण आसपास असल्यामुळे कावेरी आजी काहीही बोलायचं टाळतात आणि फराळ बनवायला घेतात. समीरा कुटुंबापासून दूर जातच नव्हती. लोकांमध्ये थांबली होती. त्यामुळे कावेरी आजीला तिच्याशी बोलायची संधी मिळत नव्हती रादर समीरा ती मिळूच देत नव्हती. रात्री उशिरापर्यंत समीरा जाणार म्हणून सर्वजण बोलत बसले होते. अभिषेकचं कशातच लक्ष लागतं नव्हतं. तो सर्वांसोबत असून सुद्धा सर्वापासून अलिप्त होता. समीरा मात्र अगदी नॉर्मल वागत होती. कावेरी आजीला समीराच्या वागण्याचं कोडं पडलं होतं कारण कावेरी आजीला तिच्या नजरेतलं प्रेम दिसलं होतं. रात्री सुद्धा समीरा उद्या जाणार म्हणून सर्वांना एकत्र झोपू असं सांगते. काहीही झालं तरी ती कावेरी आजीसोबत एकत्र , एकटी येईल असं होणं टाळत होती. 

दुसऱ्या दिवशी सकाळी समीरा खाली येते पण तिला तिथे अभिषेक दिसत नाही. तिची नजर बराच वेळ अभिषेकला शोधत होती. दुपारी जेवण्याच्या वेळी अभिषेक घरी येतो. जेवण झाल्यावर अभिषेक समीराला म्हणतो," आपल्याला ४ वाजेपर्यंत निघावं लागेल एअरपोर्टला. तू तयार हो. तोपर्यंत मी माझी कामे आटोपतो. " असं बोलून अभिषेक वळणार तोच समीरा त्याला म्हणते," अभी, मी ड्राइवर सोबत जाईन, तू नको त्रास घेऊस." 

अभिषेक ," समीरा तू भारतात आहेस आणि आमच्या घरी पाहुण्यांना असंच नाही सोडत. माझे संस्कार म्हणून मी तुला सोडायला येतोय. तू नाही म्हणालीस तरी. तेव्हा तुझं आवरायला घे." असं म्हणून अभिषेक त्याचं काम करायला निघून गेला. थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या कावेरी आजीने त्यांचं बोलणं ऐकलं होतं. सर्व सुरळीत सुरु असताना हे असं काय झालं ? याचा विचार आजी करत होती. 

४ वाजता  .............

समीरा आपलं सामान घेऊन अंगणात आली. सर्वजण तिच्याभोवती जमले होते. समीरा सर्वांना आलिंगन देऊन अभिवादन करत होती, मोठ्यांच्या पाया पडत होती. परत येईन असं वचन देत होती. भालचंद्र ( समीराचे वडील ) तिच्याजवळ येतात आणि म्हणतात," बाळा थोडं थांबली असतीस तर सर्व एकत्र निघालो असतो ना ?" 

समीरा ," नाही डॅड , तुम्हांला आरामाची गरज आहे, सो तुम्ही २ - ३ महिने इथेच थांबा. इथे तुम्हांला लवकर बरं वाटेल. मी जातेय ना परत तर तुमच्या बिसनेसकडे लक्ष देईन. तुम्ही आल्यावर मला बिजनेसमध्ये तयार करा. तोपर्यंत मी बेसिक माहित घेऊन ठेवते. शिवाय मी तिथे असेंन तर माझं लक्ष राहील. " 

समीरा सर्वांचा निरोप घेऊन गाडीत ड्राइवर सीटच्या बाजूला येऊन बसते. अभिषेक ड्रायविंग सीट वर बसलेला होता. त्याचं लक्ष फक्त पुढे होतं. समीरा सर्वांना बाय करून निघाली. बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हतं. अभिषेक पुढे पाहत गाडी चालवत होता. समीरा काही बोलणार तोच अभिषेक म्हणाला ," मागे एक बॅग आहे ती घे. " 

समीरा मागे हात करून बॅग पुढे घेते. 

अभिषेक तिच्याकडे न पाहताच म्हणतो," त्यात स्काफ आहे. ब्रँडेड आहे. तू वापरू शकशील. " 

समीरा स्काफ बाहेर काढते. स्लीकचा सुंदर स्काफ होता. तलम , गुलाबी रंगाचा. हातात घेतला तर मोरपीस फिरवल्याचा भास होत होता. समीराचं लक्ष बॅगकडे गेलं. त्यावर दुकानाचं नाव आणि पत्ता होता. जो वाड्यापासून २ - ३ तासांच्या अंतरावर होता. सकाळपासून अभिषेक कुठे होता ? हे समीराला उलगडलं होतं. समीराला पुढे काही बोलावत नव्हतं. या अबोल्यातच गाडी एअरपोर्टला पोहचली. 

अभिषेकने समीराला सामान उतरवायला मदत केली. समीरा सामान घेऊन अभिषेकला बाय बोलून आत जाऊ लागली. आता मात्र अभिषेक एकटक आत जाणाऱ्या समीराकडे पाहत होता. त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. समीरा एकदातरी मागे वळून पाहिलं या अपेक्षेने अभिषेक तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. समीरा मात्र एकदाही मागे वळून न पाहता निघून जाते. 

समीरा गेल्यानंतरही अभिषेक कितीतरी वेळ तसाच उभा होता. थोड्यावेळाने अभिषेक बाहेर येऊन गाडी बसतो. २ - ३ तासांनी विमान अवकाशात भरारी घेतो. इथून मुंबई आणि मुंबई वरून रात्री अमेरिकेसाठी समीराची फ्लाईट असते. अवकाशात भरारी घेतलेल्या त्या विमानाकडे अभिषेक पाहत राहतो. त्याचं प्रेम, त्याने रंगवलेली स्वप्ने , त्याचं समाधान त्याच्यापासून दूर जात असल्याचं त्याला जाणवत होतं. अभिषेकला आत काहीतरी तुटल्याचा भास होतो. तो बराच वेळ तसाच बसून होतो. 

२ महिन्यांनंतर ......... 

अमेरिकेतल्या घरी सकाळी - सकाळी समीरा देवपूजा करून तुळशीला जल अर्पण करत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. समीरा येऊन फोन रिसिव्ह करते. कामासंदर्भात फोन असल्यामुळे समीरा बोलत - बोलत गॅसवर चहा ठेवते. चहा होईपर्यंत समीरा आपली किरकोळ काम उरकते. चहा घेऊन ऑफिससाठी तयार होते. ती तिच्या फाइल्स चेक करत असताना डोअरबेल वाजते आणि समीरा तशीच फाईल घेऊन दरवाजा उघडायला जाते. दरवाजा उघडते आणि समोर पाहिल्यानंतर तिच्या हातातली फाईल गळून पडते. 

क्रमश : ........................ 

0

🎭 Series Post

View all