Login

अनोखी गाठ  ५४           # मराठी _ कादंबरी

-------

अनोखी गाठ  ५४           # मराठी _ कादंबरी

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की, अभिषेक समीराला घेऊन भारतात परत येतो. सर्वजण समीरा पाहून खुश होतात. कावेरी आजी सर्वांना अभिषेकच्या लग्नाच्या जबरदारी वाटून देत होती. कावेरी आजी समीरा परवा मंदिरात सर्वांच्या आधी जाऊन व्यवस्था पाहण्याचं काम देते आणि उद्या स्वतःसाठी खरेदी करायला सांगते. समीरा आपल्या रूममध्ये निघून जाते. जेवणासाठी बोलावल्यावर भूक नसल्याचे सांगते. आता पुढे............) 

रात्री स्वाती समीराच्या रूममध्ये येते आणि म्हणते," समीरा, चल आपण आधीसारखं गच्चीवर जाऊन बसुयात. आजी तेल लावून देईल आणि आपण तिथेच झोपुयात. नंतर असं कधी मिळेल माहित नाही."  समीरा त्या मनस्थितीत नसते त्यामुळे ती म्हणते," आज नको स्वाती. मी प्रवासाने खूप थकली आहे. पुन्हा कधीतरी. " स्वाती 'ठीक आहे' म्हणून तिथून जाते. जानकी एवढे दिवस तिथेच असल्यामुळे स्वाती सोबतच झोपते. समीराला हा कालावधी कधी संपतोय ? आणि कधी परत अमेरिकेला जातोय असं झालं होतं.  

दुसऱ्यादिवशी वाडयात नेहमीपेक्षा जास्त लगबग होती. वाड्याचे राहिलेले भाग सजवले जातं होते. समीरा खाली येते. पाहते तर सर्वजण प्रसन्न चेहऱ्यांनी आपापली कामे करत होते. शिवाय मज्जा- मस्ती सुद्धा सुरु होती. सर्वांचे प्रसन्न चेहरे पाहून समीराला बरं वाटतं. समीरा जाऊन अंघोळ करून केस पुसत बाहेर येत असतानाच समोरून वसुधा आत्या येते. आत्या समीराला आवाज देते आणि हाताला धरून बाजूला नेवून बसवते. वसुधा आत्याच्या हातात काही बॅग होत्या. आत्या एक - एक बॅग उघडते आणि त्यातून एक- एक दागिना बाहेर काढते. 

वसुधा आत्या, " समीरा बघ ना, मी काही दागिने केले आहेत शर्वरी साठी  ( होणाऱ्या सुनेसाठी ). तू एकदा बघ कसे आहेत ? तिला आवडतील का ? म्हणजे एक पिढीचं अंतर आहे ना. त्यामुळे डिजाईन वगैरे आवडेल का तिला ? बघ ना जरा." असं म्हणून वसुधा आत्याने तिच्या समोर ठुशी, चिंचपेटी, सर , बोरमाळ, तन्मणी, कोल्हापुरी साज, झुमके, वेली, तोडे, बाजूबंद, तोडे, अंगठी, नथ, पैंजण एक ना अनेक दागिने ठेवले. समीराने एवढे पारंपरिक दागिने पहिल्यांदाच पाहिले होते. समीराला ते मनापासून आवडले देखील. 

समीरा, " आत्या, मला यांची नावे नाही माहित पण सर्व दागिने खूप छान आहेत. शर्वरीलाही नक्की आवडतील. " समीरा दागिन्यांवरून हात फिरवत म्हणाली. 

वसुधा आत्या, " नक्की आवडले का ? की माझं मन राखण्यासाठी बोलतेयस ?" 

समीरा," नाही आत्या, खरंच खूप सुंदर आहेत हे दागिने." 

वसुधा आत्या ," नक्की ना ? नाहीतर बदलून घ्यायला. " 

समीरा, " आत्या मला विचारलं तर तुमची चॉईस एक नंबर आहे." समीरा आत्याच्या गळ्यात हात घालून म्हणाली.

वसुधा आत्या हसून हसून समीराची पापी घेतात आणि सर्व परत व्यवस्थित बॅगमध्ये ठेवून , ते सांभाळून ठेवायला जातात. तेवढ्यात कावेरी आजी आणि सरस्वती आजी मंदिरातून येतात. समीराला पाहून सरस्वती आजी म्हणते ," समीरा, लवकर न्याहारी करून घे. " 

समीरा," का आजी ? काही काम आहे का ?" 

सरस्वती आजी," लग्नघरात काम आहे का ? असा प्रश्न विचारायचाच नसतो. खूप काम आहेत. त्या साठी आधी तू खरेदी करून ये. उद्या तुलाच सर्वांच्या आधी जाऊन मंदिरात व्यवस्था बघायची आहे. काल कावेरीने सांगितलं होतं ना ?" 

समीरा," हो आजी, पण शॉपिंगची काय गरज आहे. माझ्याकडे खूप काही आहे." 

सरस्वती आजी स्वातीला आवाज देतात आणि म्हणतात, " समीरा, ते मला काही माहित नाही." स्वाती आल्यावर स्वातीकडे पाहत आजी म्हणतात," स्वाती, समीराला खरेदीला घेऊन जा. व्यवस्थित खरेदी करा." 

समीरा नाईलाजाने जायला तयार होते. स्वाती सोबत होती त्यामुळे खूप शॉपिंग होते. घरी परत आल्यावर पाहते तर घरी आचारी बोलावले होते. घरात वेगवेगळ्या मिठाईचा वास दरवळत होता. समीराला आलेलं पाहून कावेरी आजी आवाज देते आणि जवळ बोलावून बसवते. समीराला काय - काय खरेदी केलं ते विचारते. त्यातच समीरा कावेरी आजीला प्रश्न विचारते," आजी एक विचारू ?" 

कावेरी आजी," हो, विचार ना बाळा." 

समीरा, " आजी जेवढा मला माहित आहे. लग्न मुलीकडच्या घरी असत ना ? मग तयारी आपल्या वाडयात का सुरू आहे ? म्हणजे खरं तर तयारी वसुधा आत्याच्या सासरी आणि शर्वरीच्या घरी सुरु असायला हवी होती. " 

कावेरी आजी दोन मिनिट शांत राहून बोलते," बाळा, तू बोलतेयस ते बरोबर आहे पण शर्वरीचं घर खूप लांब आहे. आमची वये झाली आहेत. या वयात प्रवास जमेल का ? शिवाय घरात एक तरी लग्न बघायला मिळालं तर बरं म्हणून वाडयात लग्न करायचं ठरलं." समीराला ते पटतं. ती आजी बोलते," बरं आजी मी माझ्या रूममध्ये जाऊन ही सर्व खरेदी ठेवून येते. " आजी हळूच मान डोलावत आणि समीरा आपल्या रूममध्ये निघून जाते.

रात्री जेवण झाल्यावर समीरा अंगणात शतपाउली करत असते. तिकडून अभिषेक घाईत येत असल्यामुळे तो समीराला येऊन धडकतो. अभिषेकच्या हातात असलेल्या बॅग खाली पडतात. अभिषेक समीराला सॉरी बोलून खाली वाकतो आणि बॅग उचलतो. तो तिथून जाणार तोच समीरा त्याला म्हणते," माझ्याकडून पण सॉरी..." 

अभिषेक तिच्याकडे पाहत, " कशाबद्दल ?" 

समीरा ," सगळ्यासाठीच..." 

अभिषेक वैतागून ," कोड्यात बोलू नकोस प्लिज. " 

समीरा," सॉरी ... सॉरी... काही नाही असंच..." असं बोलून समीरा आपल्या रूमकडे घाईत निघून जाते. 

दुसऱ्या दिवशी ............ 

वाड्यात लगबग सुरु असते. सर्व गोष्टी नीट घेतल्यात का याची चौकशी सुरु होती. जो- तो आपापली कामे सांभाळत तयार होत होता. बराच वेळ समीरा दिसली नाही म्हणून कावेरी आजीने जानकीला विचारलं," जानकी, बाळा समीरा कुठे आहे ? अजून खाली आली नाही का ? " 

जानकी ," नाही आजी अजून ती खाली आली नाहीये." 

सरस्वती आजी ," अगं तिला सर्वांच्या आधी जायचं आहे मंदिरात विसरली की काय ती ? जा जाऊन घेऊन ये तिला खाली." 

जानकी समीराला बोलवायला तिच्या रूमकडे जाते. काही वेळाने जानकीचा जोरात ओरडण्याचा आवाज येतो," आजी... आजी...... डॅड ..........मॉम ....... लवकर वर या ....लवकर......." 

जानकीच्या आवाजात भीती होती. त्यामुळे सर्वजण समीराच्या रूमकडे धाव घेतात. तिथे येऊन पाहतात तर समीरा बेडवर झोपली होती. तिच्या पायाजवळचा सर्व बिछाना रक्ताने भिजला होता. ते पाहून सर्वजण घाबरतात. श्रावणी आणि भालचंद्र लेकीकडे धाव घेतात. श्रावणी समीराचं डोकं उचलून मांडीवर घेते तेव्हा तिच्या लक्षात येतं की समीराला प्रचंड ताप आहे. त्यामुळे ती बेशुद्ध होती. अभिषेक डॉक्टरांना फोन करून बोलावतो. इकडे आजी समीराने पांघरून घेतलेला बाजूला करून पाहते तर समीराच्या तळपायाला मोठी जखम होती. त्यात हळद भरून रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला गेला होता पण जखम मोठी असल्यामुळे रक्त वाहण्याचं थांबत नव्हतं. 

अभिषेक समीराला तसं पाहून कावरा - बावरा होता. तो समीराचा पाय हातात घेऊन त्यावर रुमाल दाबून ठेवतो. तो सारखा समीराला आवाज देत असतो. सर्वजण समीराला उठवण्याचा प्रयत्न करतात. थोड्यावेळाने डॉक्टर येतात आणि समीराला तपासतात. तिच्या जखमेवर पट्टी बांधतात आणि इंजेक्शन देतात. काही मेडिसिन लिहून देतात. अर्ध्या तासात ती शुद्धीवर येईल असे सांगतात. शिवाय समीराला ताप सुद्धा जखमेमुळेच आल्याचे सांगतात. 

डॉक्टर गेल्यावर सुद्धा सर्वजण समीराच्या रूममध्ये बसून असतात. तिला शुद्ध येण्याची वाट पाहत असतात. अभिषेक तिच्या पायाजवळच बसून असतो. श्रावणी थंड पाण्याच्या घड्या समीराच्या डोक्यावर ठेवत होती. फुलासारखं जपलेल्या, एक ही शब्द आजवर खाली पडू न दिलेल्या लेकीला असं निपचित पडलेलं पाहून भालचंद्राच काळीज तुटत होतं. घरात सर्वजण बेचैन होते. सरस्वती आजी देवघरात बसून देवाला आळवत होती. 

थोड्या वेळाने समीराला शुद्ध येते. सर्वजण तिच्या भोवती जमा होतात. अभिषेक जो पायाजवळ बसला होता. पटकन उठून तिच्याजवळ जातो आणि हात पकडून विचारतो," कसं वाटतंय आता ? बरं वाटतंय ना ? पाय खूप दुखतोय का ? हे सर्व कसं झालं ? तुला लागलं कसं ?" 

समीरा अभिषेककडे पाहते आणि त्याच्या हातातून हात सोडवत म्हणते," मी ठीक आहे. रात्री पाणी घ्यायला स्वयंपाक घरात गेले तेव्हा चुकून माझा पाय विळीवर पडला. थोडी जखम झाली पण मी हळद लावली त्यावर. आजी म्हणाली होती हळद जखमेवर लावली की जखम बरी होते. " 

कावेरी आजी डोक्यावर हात मारत म्हणाली, " अगं जखम बरी होते पण कोणती ? छोटी असेल ती. तुझी जखम छोटी आहे का ? किती रक्त गेलंय माहित आहे का ? आणि रात्री लागलं तेव्हा का नाही सांगितलंस कोणाला ? तेव्हाच इलाज झाला असता तर आता ताप नसता आला." 

समीरा कान पकडून ," सॉरी गं आजी. मला माहित नव्हतं एवढं होईल म्हणून."  

अभिषेक अजून तसाच बसला होता. समीरा त्याला म्हणते," अहो नवरदेव, जा तयार व्हा. तिकडे नवरी येऊन बसायची तुमची." 

अभिषेक," तुला असं सोडून ?" 

समीरा," असं सोडून म्हणजे ? एवढ्या मोठ्या वाड्यात आहे मी. " 

आता समीरा सर्वांना उद्देशून म्हणते," तुम्ही सर्वजण जा. नाहीतर मुलीकडची लोकं वाट पाहत बसतील. मी ठीक आहे. " 

श्रावणी," मी थांबते तुझ्याजवळ." 

समीरा," नाही मॉम. सर्वजण जाणार आहात तुम्ही. सर्व...... , तसही ३ -४ तासात तुम्ही सर्वजण परत याल सुद्धा, तोपर्यंत मी आराम करेन. " समीरा सर्वाना जाण्यासाठी फोर्स करते. 

नाईलाजाने सर्वजण मंदिरात निघतात. समीरा आपल्या रूममध्ये आराम करत असते. काही वेळाने समीराला आपल्या गालावरून एक सुरकुतलेला , मायेचा हात फिरत असल्याची जाणीव होते.