Login

अनोखी नात्यांची गाठ

Anokhi Natyanchi Gatha
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५.
संघ वनिता.

अनोखी नात्यांची गाठ भाग १


आज जवळच्या श्रीराम चौकात सकाळी खूप ट्रॅफिक जाम झाली होती. गाड्यांची खूप मोठी रांग लागली होती. गाड्यांचा कर्णकर्कश आवाज नकोसा झाला होता. जो तो पुढे जाण्यासाठी हॉर्न वाजवत होता. माया आपल्या विचारात गर्दीतून वाट काढत पुढे रस्त्याने चालली होती, बाकी दुनियेची तिला काही फिकीर पडली नव्हती, अचानक कोणीतरी तिला धक्का दिल्याने तिच्या हातातील फुले खाली पडली.
“अरं नीट चाल की!”
“डोळे फुटलं की काय तुझं,”
“सकाळी माझं काम वाढवतो नुसतं”,
“अजून बोहणी पण नाही झाली”,
असे बोलून फुले गोळा करत असताना ती खाली वाकली तर एक कापडी पिशवी खाली पडलेली दिसली. माया स्कूटरवर जाणाऱ्या व्यक्तीला बोलली.
“अरं भावा,तुझी पिशवी पडली की एकदा पाठीमागं वळून बघं की”.
सिग्नल सुरु झाल्यावर वेगाने जाणाऱ्या स्कुटरला उद्देशून ती बोलली पण त्याचे मायाच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते, तो जो कुणी होता,भुर्रकन स्कूटरचा धूर सोडत निघूनही गेला.

माया गरीब, स्वाभिमानी आणि कष्टाळू होती. हरवणं काय असतं हे तिला चांगलंच ठाऊक होतं. तिने आयुष्यात खुप काही हरवलं होतं काही प्रश्नांची उत्तरं ही वेळेवरच सोडून द्यावी लागतात, वेळेनुसार आपोआप उत्तरे मिळतात. हरवलेली पिशवी शोधायला कुणी येईल या अपेक्षेने ती अंधार होईपर्यंत सिग्नलवर वाट पाहत उभी राहिली. परत कुणी आलं नाही. रस्त्यांवर उभी असताना काही टवाळखोर तिची चेष्टा करू लागले.
“आज घरी नाही जायचं वाटतं”,
“कोणीतरी आशिक येणारं आहे बाबा”,
“नवी कोरी पिशवी बघं की”,
“चला रं आपण पण बघू तो कोण राजा आहे”.
मायाने हे ऐकल्यावर असा काही एक रागीट कटाक्ष टाकला की ती पोरं पळून गेली.

तिची खूप निराशा झाली. पिशवीत काय आहे हे बघण्यासाठी ती उत्सुक होती,कोणी पिशवी न्यायाला परत आले तर ह्या विचाराने तिने पिशवी उघडली नाही.

अजून किती वेळ बसणार म्हणून तिनं पिशवी उघडून पाहिली. पिशवी उघडल्यावर तिला त्यात जांभळ्या रंगाची साडी, नाजूक काठ,भरजरी पदरावर मोराची नक्षी असलेली लगेच कोणाच्याही मनात भरावी अशी काठपदर साडी दिसली. ती क्षणभर थबकली. किती प्रेमाने घेतली असेल साडी त्याने आपल्या जवळच्या बहिणीसाठी किंवा आईसाठी. जांभळा तिच्या आवडीचा रंग होता. साडी बघितल्यावर क्षणभर तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. रक्षाबंधन दोन दिवसावर आले होते. त्यामुळे ही साडी नक्की आपल्या लाडक्या बहिणीसाठी घेतली असावी असा अंदाज तिने मनाने बांधला.

मायाने त्या साडीकडे पाहिलं आणि तिच्या चटकन डोळ्यात पाणी आलं. का कुणास ठाऊक ती साडी खूप जवळची वाटत होती. कळायला लागलं तेव्हापासून तिला आई, वडील, भाऊ, बहीण हे जवळचे कोणतेच नाते माहित नव्हते. माया रस्त्यावर वाढलेली अनाथ मुलगी होती की पळवून आणलेली, नेमकं ठाऊक नव्हतं. मायेने जवळ घेणारी असं कोणी तिचं नव्हतं. मिळेल ते काम करून आपलं पोट भरत होती.

श्रीराम चौकातील सिग्नलला ती मोगरा,जाई, जुईचे गजरे,गुलाबाची फुले अजून असं बारीक सारीक सामान विकायची. आवाज तिचा गोड होता. लहानपणापासून तिला फुले खूप आवडायची पण फुलं विकण्याचे काम कधी आवडलं नाही, यात तिचं मन कधी रमलं नाही. पोटापाण्यासाठी काहीतरी काम करावं लागतं. आपल्या कामात खूप तत्पर होती. तिचं बोलणं खूप स्पष्ट असल्याने तिच्या कोणी जास्त नादी लागत नसे.


माया नीटनेटकी स्वच्छ रहायची. कुणाच्या अध्यात न मध्यात होती आपलं काम भलं नि आपण भलं. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या वाईट नजरा तिला त्रास द्यायच्या, म्हणून तिनं एक मंगळसूत्र गळ्यात बांधलं होतं. मंगळसूत्र घालणारा असा तिचा हक्काचा नवरा नव्हता.