Login

अनोखी नात्यांची गाठ भाग २

Anokhi Natyanchi Gatha
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५.
संघ वनिता.

अनोखी नात्यांची गाठ भाग २


माया रुपानं देखणी नव्हती पण नजरेत भरणारी होती. काळी सावळी उंचपुरी शिडशिडीत बांध्याची तिचे टपोरे डोळे खूप काही बोलून जायचे. फुलं विकण्याचे कसब खूप छान होते त्यामुळं तिच्याकडून फुलं घेण्याची रांग लागायची. तिच्या कंबराशी एक भली मोठी सुरी ठेवलेली असायची, स्वसंरक्षणासाठी ती जवळ ठेवायची. त्यामुळे सगळे तिला घाबरायचे. तिचा चंडिकेचा अवतार एकदा सगळ्यांनी पहिला होता.
फुलं विकत असताना एका पोरानं तिचा हात धरला.
“अरं सोड की हात, घरी आया बहिणी नाही कां”?
“आला शहाणा मोठा हात धरणारा ”
दोघांची थोडी झटापट झाली. मायाने आपला हात सोडून घेतला आणि सणकन त्या मुलाच्या कानशिलात लावली.
“परत कोणत्या पोरीचा हात धरला तर गाठ माझ्याशी आहे.” अशी मारून धुलाई केली की त्याला जागेचे उठता येईना. पोरगं गाल चोळत निघून गेलं. जमा झालेल्या सगळ्या लोकांना हातातला सुरा दाखवत माया बोलली,
“आलं मोठे शहाणे हात पकडणारे”
“अंगाला हात लावून दाखवा”
“ नाही त्याच्या नरडीचा घोट घेतला तर माया नाव लावणार नाही. परत तिला कोणी हात लावायची हिंमत केली नाही.

संध्याकाळी सात वाजल्यानंतर ती घराकडे निघाली. घर म्हणजे तरी काय रस्त्याच्या एका बाजला साड्यांनी बांधलेले गरीबाचे घर, तुटकी फुटकी दोन चार भांडी. दोन तीन जण आपले कुटुंब घेऊन आपला जीव मुठीत घेऊन तिथे राहत होते. तिला लांबून आलेलं पाहून बाकी मुलांनी तिच्याभोवती घोळका केला. सगळ्या लहान मुलाची ती आवडती आक्का होती. फुले विकून संध्याकाळी आल्यावर लहान मुलांना काहींना काही खाऊ घेऊन ती नक्की यायची. आजपण तिने काहीतरी आणले असेल या आशेने मुले तिच्याकडे पळाली.

तिच्या हातातली नवी कोरी पिशवी पाहून आम्हाला काही खायला आणले कां? “आक्का, दाखिव नां काय आणलंस ते?” म्हणून विचारू लागली.
“काही नाही जा तिकडं” असे बोलत तिनं सगळ्यांना हुसकावून लावलं. मायाने हात फिरवत साडीची पिशवी आपल्या हृदयाशी धरली. किती पवित्र नातं भावा-बहिणीचं. आपण पण असू का कोणाची बहीण ह्या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी आले.
“आपणं कोण आहोत?”
“इथे कशी काय आले?”
“आई-बाप, भाऊ-बहीण?”
“कुणीच कसं नाही का आपलं?”
असे खूप प्रश्न तिला पडले. पण यांची उत्तरे आपल्याला काही मिळणार नाही. जाऊ दे कशाला तो विचार करायचा. साडीजवळ आल्याने तिला सगळी नाती आठवू लागली.

तिला वाटलं, मी साडी अंगाला लावून बघू का? कशी दिसेन मी नवी कोऱ्या साडीत? माझ्यासाठी असेल का ही साडी? आजपर्यंत कधी नवीन साडी कपडे बघितले नव्हते. नवीन वस्तू असल्यावर तिचं अप्रूप वाटत. तिच्यासारख्या गरिबाला जे मिळेल त्यात समाधान मानायचं. गरिबी खरंच खूप वाईट असते. इथे रोज जेवण मिळेल की नाही याची भ्रांत, साडी तर लांबची बात.

पण तिचं मन काही केल्या धजेना. बिचाऱ्या भावानं आणली असेल. खिशातली पै पै दमडी जमवली असेल. चार काम जास्तीची केली असतील. यावर आपला कोणताही हक्क नाही. उद्या परत त्याची वाट बघेन जर कोणी आले तर देऊन टाकेन साडी. नको ती साडी नको मला असे मनात बोलून माया मुलांना खाऊ द्यायला निघून गेली.

दोन दिवसांवर रक्षाबंधन आलं होतं. यावेळी तिनं राख्या विकायला आणल्या होत्या. हातातली पिशवी सगळ्यांना दिसेल अशी ठेवून ती नेहमीप्रमाणे सिग्नलला उभी राहिली. जर कोणाची असेल तर शोधत नक्की येईल. तिचे डोळे त्याला शोधत होते. पण ओळखणार कशी? तिने त्याला पाहिलंच नव्हतं. दोघेही एकमेकांसाठी अनोळखी होते. तिच्या मनाला उगाच रुखरुख लागून राहिली.