Login

अनोखी नात्यांची गाठ भाग ३

Anokhi Natyanchi Gatha
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
संघ वनिता

अनोखी नात्यांची गाठ भाग ३


तिचं मन आज मुळीच लागत नव्हतं. अंधार पडायला लागला. ती खूप निराश झाली. आज पण खूप वाट बघितली पण कोणी आलचं नाही. ती निघणार तेवढ्यात एक स्कुटर जवळ येऊन थांबली, आणि तो माणूस बोलला
“आक्का ही पिशवी तुमच्याकडे कशी काय?”
“तुमची आहे कां?”
“मला हिथं गावली.”
“हो,काल माझी पिशवी कुठे पडली कळलंच नाही,असू दे.”
“पिशवीत साडी आहे का?”
“हो आहे ना .”
माया बोलली.
“म्हणजे तुमची पिशवी का?”
“हो माझीच आहे”
“तूमचीच पिशवी आहे कशावरून”
“मला सांगा, साडीचा रंग कोणता हाय?”
“रंग सागितलं तरचं मी दीन ही पिशवी लै चोर हैत इथं.” ज्याची आहे त्यालाचं मिळायला पाहिजे .

“माझ्या आक्काला जांभळा रंग आवडतो, म्हणून त्याच रंगाची साडी मी घेतली होती.” हे ऐकून मायाला आनंद झाला.
“बरं झालं तुम्ही भेटला, ह्यात जांभळ्या रंगाची साडी आहे.” कमरेची पिशवी काढत माया बोलली “ही पिशवी घ्या, आणि आक्कांना साडी द्या.”
“माझा नमस्कार बी सांगा त्यास्नी.”
तो बोलला, “माझी आक्का तिच्याबद्दल काय सांगू तुम्हांला?”
ती लहानपणीच हरवली. आई सांगत होती,“तिला जांभळा रंग खूप आवडायचा.” कदाचित तुमच्या वयाची असेल ती. मी तर जन्मलो ही नव्हतो, कुठं असेल, कशी दिसते, कशी असेल, काय करते, ह्या जगात आहे की नाही हे मला काहीच माहित नाही.
मला जसे समजायला लागले तसे मी तिची आठवण म्हणून या रंगाची साडी घेतो आणि अनाथाश्रमात नेऊन देतो या आशेवर की कधीतरी ती साडी माझ्या आक्काला मिळेल. त्यांचे बोलणे ऐकून मायाला खूप वाईट वाटलं. हा पण माझ्यासारखाच अभागी, आपल्या माणसाच्या मायेला पारखा झालेला.
. “भाऊ, ही घ्या साडीची पिशवी”.
त्याचे डोळे चमकले. तो बोलला,
“आक्का उद्या ही साडी तू नेसून येशील का इथं?”
तेवढ्यात सिग्नल चालू झाला. सगळे जण पुढे जाण्याची घाई करू लागले. त्यामुळे त्याला घाई करावी लागली तरी तो घाईत बोलला
“येतो मी आक्का उद्या याच वेळेला.”
“तू साडी घालून ये.”
“उद्या भेटू”. असे बोलून तो निघून गेला. माया एकटक त्या रस्त्याकडे बघत राहिली.
तो मला “आक्का” म्हणाला. मायेची अशी हाक पहिल्यांदा तिने ऐकली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं ती जांभळी साडी पोटाशी धरली. जणु काही सगळी भावाची माया त्यात सामावली आहे.

या मतलबी दुनियेत सिग्नलला फुलं विकणाऱ्या गरिब मुलीकडे कुणी तरी बहीण म्हणून पाहिलं, याचं तिला अप्रूप वाटलं. नाहीतर आज काल सगळे शिकार करायला टपलेले असतात. तिचा कंठ दाटून आला. या दुनियेत नाती असतात यांवर तिचा विश्वास बसला, आधीचे तिचे अनुभव खूप वाईट होते.

आज कोणी कोणाला विचारत सुद्धा नाही. स्वार्थी दुनिया कुठली. दोघेही आपापल्या घरी निघून गेले उद्या परत भेटू या आशेवर. क्षणांत दोघांचे बहीण भावाचे नातं तयार झालं होतं. दुसऱ्या दिवशी ती नेहमीपेक्षा लवकर उठली कधी एकदा त्याला भेटते असे तिला झाले.