अनोळखी दिशा पर्व २ (भाग ३७)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, नयना ताईंनी समीरच्या आईला फोन केला. खरंतर हर्षुसाठी समीरचा हात मागण्यासाठी त्यांनी हा फोन केला होता. पण माधवी ताईंचे विचार ऐकून त्या बोलू शकल्या नाहीत. मनातून आपण चुकत आहोत असे नयना ताईंना त्यांच्या बोलण्यातून जाणवले. पण पुन्हा एकदा निलमने त्यांना अखेर डायव्हर्ट केलेच.

आता पाहुयात पुढे....

नयना ताईंच्या बोलण्यामुळे निलम दुखावली गेली होती. म्हणून तिची माफी मागावी या उद्देशाने नयना ताई निलमच्या खोलीत गेल्या. समीरच्या आईंच्या बोलण्यातून कुठेतरी त्यांना त्यांची चूक समजली होती. 'आपण आपला निर्णय हर्षुवर लादत आहोत असे त्यांना वाटले होते.

एव्हढेच नाही तर निलमने हे सर्व मुद्दाम केले आहे हे देखील नयना ताईंनी बरोबर ओळखले. पण पुन्हा एकदा नयना ताई निलमच्या बोलण्यात येऊन पुढच्या चुका करण्याच्याच तयारीत होत्या जणू.

"निलम अगं तुला दुखावण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. अगं हे सर्वकाही इतक्या घाईत होत आहे ना की त्यामुळे मीच पूर्णतः कन्फ्युज झाले आहे. कोण चूक, कोण बरोबर काहीच समजत नाहीये मला. तू एवढी मदत केलीस माझी, आताही थोडं समजून घे ना मला."

पाठमोऱ्या निलमची नयना ताई समजूत काढत होत्या.

'किती मूर्ख बाई आहे ही. क्षणभर मला वाटलं की, आता संपला माझा खेळ. एव्हढा सगळा प्लॅन करून फ्लॉप होतो की काय! पण नाही, थँक गॉड, वाचवलंस मला.'

"ताई अहो माफी कसली मागताय. मी नाही रागवले तुमच्यावर. हा थोडं वाईट वाटलं, बस इतकंच."

"खरंच ना गं?"

"हो ताई, अगदी खरं."

"थँक्यू निलम, मला समजून घेतल्याबद्दल. बरं ऐक ना... मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुला."

"अहो बोला की मग ताई, इथे बसा बरं तुम्ही आधी." नयना ताईंचा हात धरून निलमने त्यांना बेडवर बसवले."

निलमची ॲक्टिंग अखेर कामी आली होती. त्यामुळे ती मनातून खूपच खुश होती. आता नयना ताई काय नवीन सांगणार याकडे तिचे लक्ष लागले होते.

"अगं मी एक खूप मोठा निर्णय घेतलाय निलम."

"म्हणजे कोणत्या संदर्भात ताई?"

"हर्षुच्या लग्ना संदर्भात."

"काय...? म्हणजे तुम्ही आदित्य आणि हर्षुच्या लग्नाला परमिशन द्यायचं फायनल केलं?"

"नाही गं."

"मग? मला तर काहीच कळत नाहीये ताई तुम्ही काय बोलताय ते."

"अगं म्हणजे मी हर्षुसाठी एक मुलगा शोधलाय. मुलगा खूप हुशार, कर्तबगार आणि विशेष म्हणजे चांगला कमावता आहे."

"अरे वा! कोण आहे पण तो?"

"अगं आपल्याच कंपनीत नवीन जॉईन झालाय. त्या दिवशी आपल्या घरी प्रोग्रामसाठी आला होता बघ."

"कोण ओ ताई." बुद्धीला थोडा ताण देत निलम विचार करू लागली."

"अगं समीर राज्याध्यक्ष नाव त्याचं. खूप हुशार मुलगा आहे आणि तितकाच मेहनती सुद्धा."

"हो हो आठवलं. यांच्या तोंडून नाव ऐकलंय बऱ्याचदा त्याचं. त्या दिवशी तुम्ही त्याच्या आई वडिलांसोबत बोलत होतात तोच ना?"

"हो तोच... समीर."

"छान आहे की हो ताई मग मुलगा. अगदी आपल्या हर्षुच्या तोडीस तोड आहे बघा आणि जोडा तर अगदी लाखात एक शोभून दिसेल."

"हो ना...तुलाही असंच वाटतं ना! अगं म्हणूनच जावई म्हणून क्षणात पसंत पडला बघ तो मला. पण हर्षु या लग्नासाठी तयार नाहीये."

"हर्षुला आपण करू तयार, पण मुलाच्या घरच्यांना ही गोष्ट माहीत आहे का?"

"नाही ना. तोच प्रॉब्लेम आहे बघ. मी त्याच्या आईला केला होता फोन पण विचारायची माझी हिंमतच नाही झाली."

"काय ताई तुम्ही पण. जे होईल होईल पण विचारायला काय जातंय. एक काम करा मला त्यांचा नंबर द्या मी बोलते हवं तर."

"पण ते हो म्हणतील ना गं?"

"न म्हणायला काय झालं? इनामदारांची एकुलती एक लेक आहे हर्षु. त्यात आता वकील होऊन स्वतःच्या पायावर उभी आहे. अजून मग काय पाहिजे?"

"हो ना मीही तोच विचार केला. पण अगं हर्षुच्या पायाचा प्रॉब्लेम आहे ते आपल्याला सांगावं लागेल त्यांना."

"अहो ताई, तो काही जन्मतः प्रॉब्लेम नाहीये तिचा आणि आज ना उद्या पूर्ण रीकव्हर होणार आहे ती. कायमस्वरूपी तशीच थोडी राहणार आहे."

"हो ते पण आहे फक्त आपल्याला त्यांना तशी कल्पना द्यायला हवी."

"तुम्ही काळजी करू नका ताई मी बोलते समीरच्या आईसोबत. निदान अंदाज तर येईल. होकार आला तर ठिकच आहे नाहीतर  लगेच दुसरे स्थळ शोधायला सुरुवात करायची."

"पण आपण काही चुकीचे तर नाही ना करत? म्हणजे हर्षुवर आपण आपला निर्णय तर नाही ना लादत."

"हे पहा ताई...असे काहीही नाहीये. तुम्ही उगीचच काहीही विचार करताय. उलट तिच्या भविष्याचा विचार करूनच आपण हा निर्णय घेत आहोत आणि त्या आदित्य सोबत लग्न लावून आपली हर्षु सुखी होईल हा स्वप्नात सुद्धा विचार करू नका."

"नशीब माझं निदान तुला तरी माझं म्हणणं पटलं."

"न पटायला काय झालं त्यात. समीर सारख्या मुलाला जो नाही म्हणेल तो स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेईल. पण तुम्ही काळजी करू नका. हवं तर मी स्वतः बोलते समीरच्या आई वडिलांसोबत."

"हो ना, त्यांचे मत एकदा का आपल्याला समजले की मग हर्षुला सुद्धा आपण तयार करुयात. तिचे हित अजून तिला समजत नाहीये तेच तिला पटवून द्यायला हवे."

"हो ना...बरं ताई तुम्ही नंबर देऊन ठेवा माझ्याकडे. मी त्यांची वेळ पाहून फोन करेल?"

नयना ताईंनी मग निलमला माधवी ताईंचा नंबर दिला. नयना ताईंनी ही खूप मोठी चूक केली होती. निलमवर विश्वास ठेऊन त्यांनी घरातील सर्व नात्यांवर अविश्वास दाखवला होता. हर्षु वरील प्रेमापोटी त्या असं वागत होत्या. हे जरी खरं असलं तरी निलमला जवळ करणे म्हणजे स्वतःचेच नुकसान करून घेण्यासारखे आहे हे दुर्दैवाने नयना ताईंनी ओळखलेच नाही. निलमच्या ट्रॅपमध्ये त्या बरोबर अडकल्या.

हल्ली घरातील वातावरण खूपच बदलले होते. कोणी कोणाशी धड बोलत नव्हते.

एक दिवस योग्य संधी पाहून रात्रीची जेवणं आटोपल्यानंतर माधवराव लेकीसोबत बोलण्यासाठी म्हणून तिच्या खोलीत गेले.

" हर्षु बेटा...काम करत आहेस का गं?"

"बाबा तुम्ही...या की! अहो केसचा स्टडीच करत होते. पण या ना तुम्ही बसा."
हातातील पुस्तकं बाजूला ठेवत हर्षु बोलली.

"हर्षु... तुलाही माहीतच आहे मी इथे का आलो आहे ते?"

"थोडा अंदाज आहे बाबा. पण तरीही तुम्ही सांगा."

"हे बघ मग मी मूळ मुद्द्याचच बोलतो."

"हो बाबा बोला की."

"तुझ्या आणि आदित्यच्या नात्याविषयी तू किती सिरियस आहेस?"

"बाबा... थोडं स्पष्टच बोलू?"

"अगं बोल की, तू तुझ्या बाबाशी नाही तर तुझ्या मित्रासोबत बोलत आहेस असे समज मग बोलताना थोडं सोप्पं जाईल."

"थॅन्क्स बाबा...तुम्ही मला एवढं जरी समजून घेतलंत तरी खूप आहे माझ्यासाठी.
बाबा खरंतर आईकडून तुम्हाला सर्वकाही समजले आहे. वाईट फक्त या गोष्टीचं वाटतंय की ही एवढी मोठी गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. पण त्याआधीच तुम्हाला समजले. काही गोष्टी इच्छा नसतानाही अशा पद्धतीने समोर आल्या. ज्या की नव्हत्या यायला पाहिजे."

"हे बघ हर्षु.. जे झालं ते आता आपण बदलू शकत नाही. असो तू बोल."

"बाबा...मी आदित्यला स्वतः प्रपोज केलं होतं. जनरली मुलगा मुलीला प्रपोज करतो पण आमच्या बाबतीत थोडं उलट झालं होतं. एक वर्षाच्या मैत्रीनंतर मला जाणवलं की आदित्यच माझा जन्मभराचा जोडीदार होण्यासाठी एकदम परफेक्ट मुलगा आहे आणि ज्या दिवशी हृदयात ही भावना जागृत झाली त्याच दिवशी मी आदित्यला लग्नासाठी विचारलं. पण त्याच दिवशी त्याने स्पष्ट नकार दिला आणि याचं कारण माहितीये काय होतं बाबा?"

"काय..?"

"तो म्हणाला, 'आपल्या दोन्हीही फॅमिली दोन टोकाच्या आहेत. आपल्या एकत्र येण्याला कोणीही पाठिंबा देणार नाही हे माहीत असतानाही कशाला उगीच आगीत उडी घ्यायची आणि घरच्यांना मनस्ताप द्यायचा.'

"आदित्यचे हे समजूतदारपणाचे बोलणे ऐकून मी तर आणखीच त्याच्या प्रेमात पडत गेले. बाबा मनातून त्याला मी आवडत होते पण फक्त दोन कुटुंबातील ही आर्थिक आणि सामाजिक दरी पाहता तो नाही म्हणत होता, हे माझ्या लगेचच लक्षात आले आणि खरं सांगू बाबा... आदित्य ना अगदी नेत्रा वहिनीसारखाच आहे. तिच्यासारखाच हुशार, समजूतदार आणि जबाबदार. कोणीही त्याच्या प्रेमात पडावं अगदी तसा."

"हे सगळं ठीक आहे हर्षु, पण ह्या अशा आलिशान ऐशोआराम असलेल्या वातावरणात वाढलेली तू, तुला आदित्य सोबत पावलापावलावर संघर्ष करावा लागेल, हे जमणार आहे का बाळा तुला?"

"का नाही जमणार बाबा? अहो समाजात अशी कितीतरी उदाहरणे आहेत, किंबहुना यापेक्षा खूप विरोधाभास असणारी उदाहरणे पाहायला मिळतात आपल्या आजूबाजूला आणि दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या समृद्ध कुटुंबात लेकीची पाठवणी करून देखील काही वर्षांनंतर तेच बाहेरून सुखी दिसणारे कुटुंब घटस्फोटासाठी कोर्टाच्या वाऱ्या करताना दिसतात. दिसताना सर्व ठिक दिसतं पण म्हणून ते सुखी आणि समाधानी असतातच असे नाही बाबा. म्हणजे लव्ह मॅरेज करणारे सर्वच जण अगदीच सुखात असतात असे नाही म्हणत मी. पण नात्यात विश्वास, प्रेम आणि समजूतदारपणा असेल तर मग परिस्थिती कोणतीही असू देत तिथे सुख आणि समाधान मात्र नक्कीच मोठे असते."

हर्षुचे विचार ऐकून माधवरावांच्या चेहऱ्यावर लेकिबद्दल अभिमान दिसत होता.

"बाबा तुमच्या दृष्टीने माझे सुख समीर बरोबर लग्न करण्यात आहे पण फक्त भौतिक आणि आर्थिक सुख मिळाले म्हणून समाधान मिळेलच असे नाही ना. मी समीरला नावे नाही ठेवत किंबहुना तो अधिकारही नाही मला. पण म्हणून तुलनेत आदित्यला कमी लेखण्यात काय अर्थ आहे बाबा? सध्या आई असेच वागत आहे, असे नाही वाटत का तुम्हाला?"

"समीर आज इथपर्यंत पोहोचला कारण त्याच्या नशिबात आधीपासूनच सर्व सुख होते, पण एक ना एक दिवस आदित्य तिथे पोहोचेल तेव्हा दोघांमध्ये तुलना करायचीच झाली तर आदित्य माझ्या नजरेत नक्कीच उजवा असेल बाबा. माझ्यासाठी खूप स्ट्रगल करत आहे तो. कारण नेत्रा वहिनीने अटच तशी ठवलीये त्याच्यासमोर."

"कसली अट?"

"जोपर्यंत तो सी.ए होत नाही तोपर्यंत ती आमच्या नात्याला परवानगी देणार नाही. त्यात आईने या सगळ्याला वहिनीला जबाबदार ठरवले. पण प्रत्यक्षात जे दिसतंय तसं काहीच नाहीये बाबा. उलट वहिनी आमच्या नात्याच्या विरोधातच होती पहिल्यापासून. फक्त दादामुळे तिने तिचा निर्णय बदलला आणि या सर्वाचा मध्य शोधून काढला. त्यात आदित्यने देखील अगदी हसत हसत हे चॅलेंज स्वीकारले. तेही फक्त माझ्यासाठी बाबा. मग तुम्हीच सांगा...असे असताना तुम्ही समीर सोबत माझे लग्न लावून देणार?"

क्रमशः

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all