अनोळखी दिशा पर्व २ (भाग ३८)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, समीरच्या आईसोबत बोलल्यानंतर नयना ताईंना हर्षुच्या बाबतीत त्या चुकत आहेत याची जाणीव होत होती. पण निलमने पुन्हा एकदा शब्दांचे खेळ करत नयना ताईंना त्या बरोबर आहेत असे भासवले. माधवराव देखील हर्षुसोबत बोलतात. हर्षु तिची बाजू अगदी बिनधास्त पणे मांडते.

आता पाहुयात पुढे....

"हर्षु...तुझा आदित्यवर विश्वास आहे ना?"

"स्वतः पेक्षाही जास्त बाबा."

"बरं मला एक सांग तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही अजून दोन तीन वर्ष लग्नासाठी थांबलात आणि काही कारणास्तव पुढे जाऊन तुम्ही तुमचा निर्णय बदलला तर...? म्हणजे असं होताना मी पाहिलंय हर्षु. आपल्याच घरात एक उदाहरण आहे याचं. सुपर्णा आणि हर्षच्या बाबतीत काय झाले माहितीच आहे तुला. पुन्हा ती पुनरावृत्ती नको."

" बाबा.. असे काहीही होणार नाही."

"हर्षु...पण एक पालक म्हणून आम्ही यावर कसा काय विश्वास ठेवायचा?"

"माझा माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे बाबा. दोन वर्षापासून मी आदित्यला ओळखते. मला मिळवण्यासाठी तो जीवाचे रान करत आहे. रात्रीचा दिवस करून अभ्यास करत आहे आणि विशेष म्हणजे त्याच्या प्रयत्नांना यश देखील मिळत आहे. एव्हढेच नाही तर यापुढेही ते मिळेल. हे फक्त मी बोलायचं म्हणून बोलत नाहीये बाबा तर मला पूर्ण खात्री आहे. माझे मन मला तसे सांगत आहे."

आज हर्षुचे एक वेगळेच रूप माधवराव पाहत होते. तिच्या बोलण्यातील आत्मविश्वास, आदित्यवरील प्रेमाची जणू ग्वाही देत होता.

"प्रत्येक आई वडील आपल्या मुलीसाठी हुशार, शिकलेला, निर्व्यसनी, जबाबदार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक बऱ्यापैकी कमावता मुलगाच शोधतात. यातील एक गोष्ट सोडली आदित्यकडे सगळ्याच गोष्टी आहेत बाबा."

"आणि जीवन जगण्यासाठी ती एकच आणि सर्वात महत्वाची गोष्ट आवश्यक असते ना बाळा. कारण पैसा असेल तरच माणूस सुख विकत घेऊ शकतो."

माधवरावांनी मुद्दाम हर्षुला असा उलट प्रश्न विचारला.

"हो पण ज्या व्यक्तीकडे आधीच्या गोष्टी असतील तर त्याच्याकडे पैसा यायला मग वेळ लागत नाही बाबा. हे माझे प्रामाणिक मत आहे आणि आदित्यच्या प्रामाणिकपणावर माझा विश्वास आहे. हा फक्त थोडा वेळ लागेल पण तो सक्सेस मिळवणार यात मुळीच शंका नाही."

"कुठून एवढं शहाणपण आलं गं तुझ्यात. आदित्यमुळे किती बदलली आहेस हर्षु तू. माझी अल्लड लेक आता खरंच मोठी झाली बरं का."

"बाबा मला बाकी काही नको फक्त अजून थोडा वेळ हवाय. तुमचा विश्वास हवाय." माधवरावांचा हात हातात घेत हर्षु बोलली.

"दिला....विश्वास आणि वेळ...दोन्हीही." कोणतेही आढेवेढे न घेता माधवराव बोलले.

"थँक्यू सो मच बाबा. आय एम सो लकी. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही ही जबाबदारी आता माझी." माधवरावांना मिठी मारत हर्षु बोलली.

लेकीचे बालपण झरझर बापाच्या डोळ्यासमोर तरळले. सारे काही आठवून माधवरावांचे डोळे पाणावले.

'कामाच्या व्यापातून लेकीसाठी असा ठरवून कधी वेळ काढलाच नाही. त्यामुळे आयुष्यात अशा असंख्य मिठ्यांना मी मुकलो. आतापर्यंत मी खूप काही गमावलंय आणि नेमकं काय गमावलंय ते आज समजतंय. भरभर दिवस जातील आणि लेक माझी भूर्कन उडून जाईल.' माधवराव मनातच बोलले. नुसत्या विचाराने त्यांना आता अश्रू अनावर झाले.

लेकीच्या त्या एका मिठीने माधवरावांमधील बाप खूपच भावूक झाला होता.

बाबाची ती उबदार मिठी हर्षुलाही सोडवेना.

माधवरावांच्या डोळ्यांतील पाणी हर्षुच्या गालावर पडले. तशी ती भानावर आली.

"बाबा...तुम्ही रडताय?"

"नाही गं...ते आपलं असंच." डोळ्यांतील अश्रू लपवत माधवराव म्हणाले.

"बाबा..मी कुठेही जाणार नाहीये इतक्यात. अजून खूप वेळ आहे त्यासाठी."

"तसे नाही गं बाळा, पण तू अचानक अशी मिठी मारली आणि त्यामुळे भावूक व्हायला झालं बघ. याआधी तू शेवटची मिठी कधी मारली होती ते आठवत नाही आता."

"मी सांगू?"

"तुला आठवतंय?"

"ती मी कधीच विसरणार नाही बाबा.
तुम्हाला आठवतंय बाबा...मी सहावी की सातवीत होते तेव्हा एकदा आई कामात बिझी होती तेव्हा अचानक बाथरूम जवळील पाय पुसणीत पाय अडखळून मी बेसिनवर पडले होते आणि त्यावेळी माझं डोकं फुटलं होतं. खूप रक्त गेलं होतं. त्यावेळी तुम्ही एक महत्त्वाची मीटिंग सोडून माझ्यासाठी घरी धावत आला होतात. माझी अवस्था पाहून मला  घट्ट मिठी मारली, कुशीत घेतलं. मला उचलून दवाखान्यात नेलं. माझ्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून आईला किती ओरडला होतात तुम्ही. आठवतंय बाबा, रात्रभर आई आणि तुम्ही माझ्या उशाशी बसून होतात.
त्रास मला होत होता पण काळजी तुमच्या चेहऱ्यावर दिसत होती. पुढचे काही दिवस रोज तुमची उबदार मिठी मला बरं व्हायला मदत करत होती. असं वाटत होतं मी कधी बरं होऊच नये, म्हणजे रोज माझे बाबा माझ्यासाठी लवकर घरी येतील आणि रोज बाबाच्या कुशीत मला झोपता येईल. पण मी पूर्ण बरी झाले आणि तुम्ही पुन्हा एकदा कामात बिझी झालात. ते आजपर्यंत बिझीच आहात. आज कितीतरी दिवसांनी असं निवांत गप्पा मारतोय आपण."

हर्षुचे हे बोलणे ऐकून माधवराव भूतकाळात रमले.

'काळ किती पुढे निघून आला आणि आपण मात्र पैसा कमवायच्या नादात किती काय काय गमावलं हे आता समजतंय.'

"खरंच सॉरी हर्षु. कामाच्या व्यापामुळे त्यावेळी म्हणावा तसा वेळ नाही देऊ शकलो मी तुम्हाला."

"बाबा...काहीतरी मिळावायचं असेल तर काहीतरी गमवावं लागतंच ना. असं तुम्हीच म्हणता ना. त्यावेळी तुम्ही आमच्यासाठी सुख आणि समाधान कमवत होतात. फक्त आमच्या भविष्यासाठी दिवस रात्र मेहनत करत होतात. त्यामुळे आम्हाला वेळ देऊ शकला नाहीत याचं अजिबात दुःख मानू नका. खूप काही दिलंय तुम्ही आम्हाला."

"एका लेकीचा बाप होणं काय असतं ते तुझ्यामुळे समजलं हर्षु. लेकीचा बाप होण्याचं सुख फक्त तुझ्यामुळे माझ्या नशिबी आलं आणि आज माझी तीच लेक इतकी मोठी कधी झाली ते समजलंच नाही गं. विश्वास बसत नाही, एवढीशी माझी हर्षु आज किती समंजस झाली. विचाराने किती समृद्ध आणि परिपक्व झाली. आदित्य खूप नशीबवान आहे हर्षु, माझी लेक त्याच्या प्रेमात पडली आणि तुझ्या निवडीवर माझा पूर्ण विश्वास आहे बाळा. तुझ्या म्हणण्याप्रमाणे आदित्य जर नेत्रासारखा आहे तर मग मला जास्त विचार करण्याची गरजच नाही."

"बाबा...तुम्ही मला समजून घेतलंत यातच सगळं आलं. पण आईला कसं समजावू मी? ती तर समीरला जावई करण्याच्याच जणू तयारीत आहे आणि आता तर काय, काकी आहेच तिच्या जोडीला. आईला पण समजत नाही. सगळं काही माहीत असूनही कसा काय तिने तिच्यावर विश्वास ठेवला काय माहीत."

"जाऊ दे.. तू नको जास्त विचार करू. मी आहे ना. तुझ्या कामावर तू फक्त फोकस कर. बरं चल येतो मी. खूप उशीर झालाय आता. तू पण झोप. आता जास्त जागत बसू नकोस."

"हो बाबा."

"जाता जाता एक विचारू हर्षु? तसं काही वेगळं वाटून घेऊ नकोस, जस्ट मनात आलं म्हणून अगदी सहज विचारतो."

"बाबा..बोला की, एव्हढा काय विचार करताय?"

"आता आपण एक ते दीड तास झाले गप्पा मारतोय, जनरली प्रेमात पडलेली आजची तरुण पिढी जेवण वगैरे आटोपल्यानंतर खोलीत एकटे असतात तेव्हा फोनमध्ये बिझी असतात. म्हणजे फोनवर रात्र रात्र बोलणं सुरू असतं. ते ठरलेलंच असतं म्हणा, त्यात काही विशेष नाही पण मग असं असताना आदित्यने तुला कॉल नाही केला? आता मी इथे असल्यामुळे तू नाही त्याला फोन करू शकत पण त्यानेही तुला कॉल न करणं म्हणजे मला काही समजत नाही तुमचं. की फोन सायलेंटवर आहे तुझा?"

"बाबा...हे बघा फोन ऑनच आहे आणि आम्ही रोज रोज फोनवर नाही बोलत. म्हणजे तसं आम्हीच ठरवलं आहे. कारण तो त्याच्या अभ्यासात बिझी असतो आणि त्याला जर सक्सेस मिळवायचे असेल तर मग असा वेळ वाया घालवून नाही चालणार बाबा. तेवढं मीही समजून घेते त्याला आणि तोही मला. प्रेमात हेच महत्त्वाचं असतं ना बाबा. कधीकधी वाटतं खूप बोलावं पण मग मनाला समजवावं लागतं आणि माहितीये वहिनीला सुद्धा हाच प्रश्न पडला होता. शक्यतो कोणालाही पटणार नाही ही गोष्ट पण हेच सत्य आहे बाबा."

"आय एम प्राउड ऑफ यू बेटा. खरंच खूप समजूतदार आहात दोघेही हे मनापासून पटलंय आता मला."

"पण अधूनमधून एखादी चूक होतेच ना बाबा."

"म्हणजे..?"

"अहो...माझ्या बर्थडे च्या दिवशी एक्साइटमेंटमध्ये आदित्यला इथे येण्यासाठी आग्रह केला आणि तिथेच मी चुकले. त्याला एकदा म्हटलं असतं ना की येऊ नको तर खरंच तो आला नसता, ना त्याने सर्वांसमोर मला घड्याळ दिले असते आणि काकीलाही मग संधी मिळाली नसती. "

"जाऊ दे जास्त विचार करू नकोस आता त्या गोष्टीचा. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, असं म्हणायचं आणि पुढे चालायचं. बरं चल झोप. मीही झोपतो."

"ओके गुड नाईट बाबा."

"गूड नाईट बेटा.."

"बाबा..एक मिनिट," म्हणत हर्षुने पुन्हा एकदा माधवरावांना मिठी मारली.

"आता शांत झोप लागेल मला." हर्षु म्हणाली.

"माझ्यासारखा नशीबवान बाबा मीच." हसतच माधवराव म्हणाले आणि ते झोपायला निघून गेले.

आज हर्षु खूपच आनंदात होती. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. बाबांजवळ मन मोकळं केल्यामुळे तिला हलकं वाटत होतं आणि माधवराव देखील आज इतक्या दिवसांनी लेकीसोबत पोटभर गप्पा मारून खूपच बेटर फील करत होते. विशेष म्हणजे लेकीने अगदी एखादया मित्राप्रमाणे त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. अगदी मनात काहीही न ठेवता.

तिकडे नयना ताई आणि निलम काकीची मात्र त्यांचा प्लॅन आमलात आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू होती.

क्रमशः

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all