अनोळखी दिशा पर्व २ (भाग ३९)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, माधवराव हर्षु सोबत आदित्य आणि तिच्या नात्याविषयी अगदी मनमोकळेपणाने बोलतात. हर्षुनेही मनात काहीही न ठेवता सर्वकाही वडिलांसोबत शेअर केले. फायनली माधवरावांनी लेकिवर विश्वास ठेवला आणि आदित्य आणि तिच्या नात्याला पर्सनली होकार दर्शवला.

आता पाहुयात पुढे...

"काय हो काय म्हणाली हर्षु? तुम्ही नीट समजावले ना तिला?"

"नयना...काय सुरू आहे तुझं? अगं तिलाही तिची मतं आहेत. थोडा तिच्या बाजूने देखील विचार करायला हवा ना आपल्याला."

"म्हणजे...आलात वाटतं तुम्ही तिच्या बोलण्यात. याची मला आधीच कल्पना होती. एकीकडे मी लेकीच्या सुखासाठी धडपडतिये आणि दुसरीकडे तुम्ही तिच्या चुकांना पाठिंबा देताय. कसं कळत नाही ओ तुम्हाला? आदित्य सोबत आपली मुलगी कधीच सुखी होऊ शकत नाही."

"का तो माणूस नाही का?"

"उगीच उलट प्रश्न विचारून मला आणखी कन्फ्युज करू नका बरं. तुमच्या दोघांचं नेमकं काय बोलणं झालं ते मला सांगा."

"मला खूप झोप येतिये, मी झोपतो आणि तूही झोप. उगीच विचार करत जागत बसू नकोस."

"मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असतं तेव्हाच तुम्हाला झोपायचं असतं का हो?"

"असं नाहीये काही नयना. उगीच विषय भरकटू देऊ नकोस. मला उद्या थोडं बाहेर जायचंय. दुसऱ्या एका कंपनीला भेट द्यायची आहे. त्यामुळे आता मला झोपणं मस्ट आहे. समजून घे. गूड नाईट."
एवढे बोलून माधवराव झोपले सुद्धा.

'काय अर्थ आहे अशा वागण्याला?' म्हणत नयना ताई देखील झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण त्यांना झोप काही येईना.

' ह्यांनी जर हर्षुच्या आणि आदित्यच्या नात्याला परवानगी दिली तर...? सगळेच अवघड होईल बसेल. पण समीर जर तयार असेल तर मग बरेच प्रश्न सुटतील. काहीही झाले तरी समीर सोबत आणि त्याच्या आईसोबत बोलायला हवं. निदान आपला प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवायला काय हरकत आहे?' नयना ताईंनी खूप विचार केला तेव्हा त्यांनी काही गोष्टी मनात अगदी पक्क्या केल्या.

विचार करता करता खूप वेळानंतर मग त्यांनाही झोप लागली.

पुढचे दोन चार दिवस निलम आणि नयना ताईंमधे एकच प्लॅन शिजत होता तो म्हणजे, माधवी ताईंना समीरसाठी हर्षुचे स्थळ सुचवायचे. पण अडचण एकच होती, ती म्हणजे घरात सतत अवतीभोवती कोणी ना कोणी तरी असायचे. त्यामुळे त्यांना मनमोकळेपणाने बोलता यायचे नाही. त्यात हर्षुच्या बाबांचाही तिला आता सपोर्ट आहे हे नयना ताईंना कळून चुकले होते. त्यामुळे त्यांना काहीही समजणार नाही यासाठी नयना ताईंची धडपड सुरू होती.

दोन दिवस वाट पाहिल्यानंतर अखेर घरात कोणीही नाही हे पाहून निलमने माधवी ताईंना फोन केला. नयना ताई देखील तिथेच होत्या.

"हॅलो, माधवी ताई...मी निलम इनामदार म्हणजेच हर्षची काकी."

" हो हो.. ओळखलं...बोला ना...काही काम होतं का?"

"हो म्हणजे थोडं कामच होतं. पण तुम्हाला वेळ आहे ना बोलायला?"

"हो आहे ना...बोला की."

"तुमच्या समीरसाठी एक मुलगी आहे आमच्या पाहण्यात. त्या दिवशी तुम्हीच म्हणत होतात ना की त्याच्यासाठी मुलगी शोधताय, म्हणून विचारले."

"हो म्हणजे अजून मुली शोधायला तशी रीतसर सुरुवात नाही केली आम्ही पण तुमच्या पाहण्यात एखादी मुलगी असेल तर पाहायला काहीच हरकत नाही. कुठून तरी सुरुवात होणंही गरजेचंच आहे ना?"

"तशी मुलगी तुम्हीसुद्धा पाहिलेली आहेच फक्त आता फॉर्मल बोलणं होणं गरजेचं आहे."

"मी मुलगी पाहिलेली आहे म्हणजे? मी समजले नाही काही."

"आता कसं सांगू..बरं मी स्पष्टच बोलू का थोडं?"

"हो बोला की...तरच मला समजेल तुम्हाला काय म्हणायचंय ते."

"तुम्हाला आमची हर्षु कशी वाटली?"

"म्हणजे? समीरसाठी म्हणताय का?" आश्चर्यकारकरित्या माधवी ताई उत्तरल्या.

"हो समीरसाठीच."

"खरं सांगू...तुम्ही माझ्या अगदी मनातलं बोललात. त्या दिवशीच हा विचार माझ्या डोक्यात येऊन गेला. पण बोलणार तरी कसं. त्यात तुम्ही एवढे मोठे लोक, तुम्ही आज विचारलं नसतं तर कदाचित मीही कधी हे बोलू शकले नसते. तुमच्या सारख्या माणसांशी सोयरिक करणं आमचं भाग्यच म्हणावं लागेल."

"अरे वा...मग तर प्रश्नच नाही आता."

"हो म्हणजे तसा काहीच प्रॉब्लेम नाही फक्त मला समीर आणि त्याच्या बाबांसोबत बोलावं लागेल. समीर जर हो म्हणाला तर मग काही प्रश्नच नाही."

"बरं तुम्ही बोलून घ्या समीरसोबत आणि तो काय म्हणतो ते एकदा सांगा."

"हो हो..मी आज रात्रीच बोलते त्याच्यासोबत आणि मग तुम्हाला सांगते.

एवढे बोलून दोघींनीही मग आनंदातच फोन ठेवला.

"ताई...आपण अर्धी लढाई तर फत्ते केली. माधवी ताईंचा होकार आहे. आता फक्त समीर काय म्हणतो ते पाहुयात. आणि मला खात्री आहे त्याचाही होकारच असणार." नयना ताईंना टाळी देत निलम बोलली. 

"अगं हो ना.. पहिल्याच भेटीत तो किती फ्रीली बोलत होता हर्षुसोबत. तू म्हणते तसेच होणार बघ निलम. पण अगं आपण परस्पर हर्षुचे लग्न ठरवतोय असे नाही ना होणार?"

"तुम्ही ना खूपच घाबरता ओ ताई. आपण कुठे लगेच लग्न फायनल करणार आहोत. एकदा का समोरून होकार आला की मग घरात सांगायचं? हर्षुचे बाबा थोडीच मग तेव्हा काही बोलणार आहेत. त्यात गोष्टी एकदा का पुढे गेल्या की मग त्यांनाही काहीच करता येणार नाही. त्यांनाही मग हो म्हणण्याशिवाय काही पर्यायच उरणार नाही." निलमने नयना ताईंना बरोबर पटवून दिले.

"तसे हर्षच्या वेळीही त्यांनी सगळं ऐकलं होतं आता ह्यावेळी देखील तसेच होऊ दे." नयना ताई म्हणाल्या.

"अगदी तसेच होईल ताई. काही काळजी करू नका."

निलमच्या सपोर्टमुळे नयना ताई चुकांवर चुका करत होत्या.

माधवी ताईंचा रिप्लाय ऐकून नयना ताईंना तर खूपच आनंद झाला. दोघी जावांच्या हसून गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात आजी आजोबा घरी आले. दोघेही आज किर्तनासाठी मंदिरात गेले होते. अचानक त्यांना असे समोर पाहून निलम आणि नयना दोघीही शांत झाल्या आणि लगेचच निलम तिथून निघून गेली.

नयना ताईदेखील किचनमध्ये जायला निघाल्या. तेवढ्यात आजीने त्यांना थांबवले.

"नयना...तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, थांबतेस?"

"बोला ना आई.."

"तुला एकच सल्ला द्यावासा वाटतोय मला, तू निलम पासून थोडं लांबच रहा. तुमचं नेमकं काय सुरू आहे, मला काही माहीत नाही पण तिच्या बोलण्यात येऊन तू स्वतःचे नुकसान करुन घेत आहेस हे मात्र नक्की."

"आई...असे नाहीये ओ काही आणि चांगलं काय नि वाईट काय यांतला फरक मलाही कळतो ना."

"हो का, मग असे असेल तर चांगलीच गोष्ट आहे. बरं जा तू, तुझे काम कर. तुझी काळजी वाटते म्हणून तुला सांगावंसं वाटलं. बाकी तुझी मर्जी."

आजींनी नयना ताईंना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही फायदा झाला नाही.

नयना ताईंनी निलमला पुढे करून माधवी ताईंना परस्पर कॉन्टॅक्ट केला. ही खूप मोठी चूक त्यांनी केली होती. कारण पुढे जाऊन हे सगळे त्यांच्या एकटीच्याच अंगाशी येण्याची दाट शक्यता होती.

त्याच दिवशी रात्री म्हटल्याप्रमाणे माधवी ताईंनी समीर आणि त्याच्या बाबांना ही गोष्ट सांगितली. त्यांनाही हे सगळे अनपेक्षित होते.

"पण एवढी मोठी गोष्ट आणि ही अशी समजावी. म्हणजे माधवरावांनी स्वतः मला ही गोष्ट सांगायला हवी होती का?" मनोहरराव म्हणाले.

"उगीच फाटे नका ओ फोडू तुम्ही आता."

"बरं बाई..नाही फोडत फाटे. मनात आले म्हणून अगदी सहज बोललो."

"समीर अरे, तू का एव्हढा शांत झालास? कुठे हरवलास?"

"आई..अगं माझ्या आता लक्षात येतंय सगळं."

"काय रे?"

"म्हणजे हर्ष सर आणि नेत्रा मॅडम रोज एकदा तरी लग्नाचा विषय घेऊन मला खूप सल्ले द्यायचे, चिडवायचे...
तेव्हा मला याचं कारण समजत नव्हतं पण आता सगळं लक्षात येतंय बघ."

"पण तुला हर्षिता कशी वाटली?"

"म्हणजे तशी छान आहे. त्यात एवढी शिकलेली. आय थिंक ती ॲडव्होकेट आहे ना?"

"हो...बरोबर."

"म्हणजे आई..तिच्यात नाही म्हणावं असं तर काही नाही वाटत मला. पण तरीही एव्हढा मोठा निर्णय घेण्याआधी मला तिच्यासोबत मैत्री करायला आवडेल. त्यात आधी स्वभाव जुळले तर पुढे जाऊन मलाच सोप्पं जाईल."

"तुम्हा आजकालच्या मुलांचे ना मला हेच पटत नाही बघ. एवढं चांगलं स्थळ स्वतःहुन चालून आलंय तर आता तुही तुझ्या बाबांसारखे असे फाटे कशाला फोडतोस समीर?"

"फाटे नाही गं आई. पण म्हणजे आधी मैत्री करायला आवडले असते मला आणि त्यानंतर लग्न. असं म्हणायचं होतं मला."

"बरं बाबा. पण तू ॲटलिस्ट हो म्हणालास हेच खूप आहे माझ्यासाठी आणि तसेही लगेच कोण लग्न लावून देणार आहे तुमचे. या सगळ्यांत वेळ तर जाणारच ना. मग तेव्हा आपोआपच तुमची मैत्री होईल."

"हो...तेही आहेच."

"जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं समीर. आतापर्यंत लग्नापासून दूर पळणारा तू, आज बघ तुझं नशीब."

"हो ना आई. मला अजूनही विश्वास बसत नाहीये, त्यांनी स्वतः हून विचारले."

"मग काय झालं, काय कमी आहे माझ्या लेकात? सगळ्याच बाबतीत अव्वल आहे माझा लेक."

"पुरे झाले आता लेकाचे कौतुक. उद्या ऑफिसला गेल्यानंतर सर आणि मॅडम माझी किती खेचतील याचा अंदाज नाही तुला."

"ते बघ बाबा तू तुझं. मी जाते आता झोपायला. तुझं चालू दे."

सगळं काही इतक्या घाईत सुरू होतं की कोणाला काही कळायच्या आतच आता समीरच्या घरून हर्षुला होकार यायचाच तेवढा बाकी होता.

मागचा पुढचा कोणताही विचार न करता निलम काकी आणि नयना ताईंनी हा इतका मोठा घोळ घालून ठेवला होता.

एक दिवसाच्या अंतराने माधवी ताईंनी नयना ताईंना फोन करून त्यांचा निर्णय सांगितला. नयना ताईंना तर खूपच आनंद झाला. पण आता पुढे काय आणि कसे करायचे याचा मात्र त्यांनी कोणताही विचार केला नाही.

"माधवी ताई मीही कळवते तुम्हाला पुढचे प्लॅनिंग." म्हणत नयना ताईंनी फोन ठेवला.

क्रमशः

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all