अनोळखी दिशा पर्व २ (भाग ४०)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, नयना ताईंनी अखेर निलमच्या मदतीने समिरच्या आईला फोन करून हर्षुसाठी समीरचा हात मागितला आणि विशेष म्हणजे समोरून देखील जास्त आढेवेढे न घेता होकार आला. पण घरात ही एवढी मोठी गोष्ट कोणालाही माहित नव्हती.

आता पाहुयात पुढे...

आता आठ दिवस झाले घरात लग्नाचा विषय होऊन. समीर ऑफिसला गेल्यानंतर आशेने वाट बघायचा, 'आज तरी नेत्रा मॅडम किंवा हर्ष सर माझ्या आणि हर्षिताच्या लग्नाचा विषय घेतील.'
पण तसे काहीच व्हायचे नाही. उलट पूर्वी जसे हसून खेळून बोलणे व्हायचे त्यात आता थोडा तरी बदल झाला होता.

'नेमकं झालंय तरी काय? हर्ष सर आणि नेत्रा मॅडम पहिल्या सारखे एकमेकांसोबत वागत नाहीत. आजकाल दोघेही टेन्शन मध्ये असतात आणि मीही काही कामानिमित्त केबिन मध्ये गेलो तरी फक्त कामा संदर्भातच बोलतात. काय कारण असेल?'
त्यांच्या या बदललेल्या वागण्याचा समीरला त्रास होत होता.

घरच्या टेन्शनमुळे नेत्रा ऑफिसमधे शांतच असायची. कामातही तिचे लक्ष लागत नव्हते. हर्षदेखील सतत तिच्या अवतीभोवती करायचा नाही. थोड्याच दिवसांत जणू काही सर्वच बदलले होते.

बघता बघता महिना होत आला पण अजूनही घरात काही गोष्टी सुधारल्या नव्हत्या. समीर आणि त्याच्या घरच्यांसाठी हे सर्व शॉकींग होते.

'आपण होकार देण्यासाठी खूपच घाई तर केली नाही ना?' असे मनातून माधवी ताईंना वाटत होते.

"समीर अरे, काय सुरू आहे हे? मला तर काहीच कळत नाही बाबा."

"आई मलाही काहीच कळेना झालंय. त्यासाठी ना, ही लग्न वगैरे भानगड नकोच वाटते बघ. ऑफिसमधे देखील सगळंच बदललंय असं वाटतंय. नेत्रा मॅडम आणि हर्ष सर पहिल्यासारखे हसून खेळून बोलत नाहीत. माझ्याशी जाऊ दे पण आपापसात सुद्धा जास्त बोलताना दिसत नाहीत."

"ह्या गोष्टीचा आणि ह्या लग्न विषयाचा काही संबंध असेल का रे?"

"कसं सांगू मी आई... एकतर हा विषय आपल्याकडून सुरू झालेला नाहीये. सुरुवात त्यांनीच केली आहे आणि विशेष म्हणजे सरांकडे आणि मॅडमकडे पाहून त्यांना ही गोष्ट माहीत आहे की नाही असा प्रश्न पडतो मला. म्हणजे बघ ना, अगदी सहज का होईना पण त्यांनी हा विषय नक्कीच घेतला असता."

"अरे पण नयना ताई स्वतः नाही बोलल्या या विषयावर माझ्याशी. त्यांची ती धाकटी जाऊ आहे ना, निलम का कोण म्हणजे हर्षची काकी त्या बोलल्या माझ्यासोबत. सुरुवातीला एकदा नयना ताईंनी मला फोन केला होता पण त्यावेळी त्या काही बोलल्या नाहीत. दोन दिवसांनी मग हर्ष सरांच्या काकीने मला फोन केला. ही एवढी मोठी गोष्टी एकतर मुलीची आई किंवा मग वडील ह्यांनी बोलायला हवी ना. तुझे बाबा त्या दिवशी बरोबर बोलत होते. आता असं वाटतंय मला."

"पण तू आपला निर्णय हर्ष सरांच्या आईंनाच सांगितला ना?"

"हो ना..त्याही खूप खूष झाल्या होत्या तेव्हा. 'पुढचे प्लॅन कळवते' असं त्या म्हणाल्या होत्या. बरं ठीक आहे अशा गोष्टीत घाई करून नाही चालत; पण आता आठ दिवसानंतर देखील तुला हर्ष सर किंवा नेत्रा मॅडम काहीच कशा बोलल्या नाहीत. याचेच नवल वाटते रे."

"आई, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय असं मलाही आता वाटतंय. मी एक काम करतो, डायरेक्ट नेत्रा मॅडमशीच बोलतो या विषयावर. नक्कीच काहीतरी समजेल."

"हो बोलून घे एकदा त्यांच्याशी."

दुसऱ्या दिवशी समीर नेत्रासोबत बोलण्यासाठी त्यांच्या केबिन मध्ये गेला. खूप धीर एकवटून त्याने दारावर नॉक केले.

"मे आय कम इन?"

"येस.."

योगायोगाने हर्ष नेमकी बाहेर गेला होता. त्यामुळे नेत्रा तिथे एकटीच होती.

"अरे समीर ये ना. काही काम होतं का?"

"हो मॅम.. थोडं बोलायचं होतं. पण कामाव्यतिरिक्त थोडं पर्सनल आहे, बोलू शकतो मी?"

"एनी थिंग सिरियस समीर?"

"नाही मॅम.. सिरियस नाही काही. फक्त एक गोष्ट जाणून घ्यायची होती."

"हा बोल ना मग."

"सॉरी मॅम...पण कसं बोलू तेच समजेना."

"टेन्शन घेऊ नकोस, जे तुझ्या मनात असेल ते पटकन् बोलून टाक."

"मॅम तुमच्या घरी काही प्रॉब्लेम सुरू आहेत का?"

"का रे असं का वाटलं तुला?" आश्चर्यकारकरित्या नेत्रा रिॲक्ट झाली.

"तुम्ही सुट्टीवरून पुन्हा आल्यापासून ते जाणवतंय. सर आणि तुम्ही पहिल्यासारखे जास्त बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे वाटलं बाकी काही नाही."

"नाही रे तसं काहीच नाही. सध्या कामाचं प्रेशर वाढलंय ना त्यामुळे वाटत असेल तुला." नजर चोरत नेत्रा बोलली.

"हे विचारायचं होतं तुला?"

"नाही मॅम...म्हणजे हो..म्हणजे नाही...माझा प्रश्न वेगळाच आहे."

"बोल की मग. हो नाही हो नाही काय सुरू आहे हे?"

"मॅम.. आठ ते दहा दिवसांपूर्वी हर्ष सरांच्या काकिंचा आईला फोन आला होता."

"काय...?" आश्चर्यकारकरित्या नेत्रा बोलली. तिच्यासाठी हे शॉकिंग होतं.

"म्हणजे तुम्हाला यातील काहीच माहीत नाही मॅम?"

"नो आयडिया. बरं काय म्हणाल्या त्या?"

"मॅडम त्यांनी हर्ष सरांच्या बहिणीचे स्थळ सुचवले माझ्यासाठी."

"हे काय बोलतोस तू समीर? पण याबाबतीत घरात कोणाला काहीच माहीत नाही."

"हो का...मलाही ते जाणवले. तुम्ही कोणी काहीच विषय घेईनात तेव्हाच मला डाऊट आला. म्हटलं तुम्हालाच डायरेक्ट विचारावं."

"बरं मग आणखी काय बोलणं झालं?"

"आई बोलली की समीर आणि त्याच्या बाबांना विचारून सांगते."

"मग...पुढे काही बोलणं झालं का? म्हणजे तुम्ही काही रिप्लाय दिला का? हर्षुसाठी तुझा होकार होता समीर?"

"हो.. म्हणजे तसं मी तिला पाहिलं होतं त्या दिवशी आणि तुमच्या फॅमिलीसोबत नातं जोडायला कोणाला आवडणार नाही त्यामुळे जास्त विचार न करता मीही हो म्हणून सांगितलं आईला."

समीरचे उत्तर ऐकून नेत्राला खूप टेन्शन आले. काय बोलावे तिला काहीच समजेना.

"मग तुम्ही तुमचा निर्णय कळवला?" घाबरतच नेत्राने प्रश्न केला.

"हो...दुसऱ्याच दिवशी आम्ही आमचा होकार कळवला. आईने मग त्यावेळी सरांच्या आईंना फोन केला होता. त्या म्हणाल्या की पुढचे प्लॅन त्या कळवतील आम्हाला. पण त्यानंतर आजपर्यंत काहीही रिप्लाय आला नाही आणि तुम्ही कोणी काही बोलेनात म्हणून मग थोडं वेगळंच वाटत होतं मला. त्यामुळेच तुमच्या सोबतच डायरेक्ट बोलून घ्यावं असं वाटलं."

"हे बघ समीर, तू डायरेक्ट मला बोललास ते खूप छान केलंस. तू खूप मोठं काम केलं आहेस माझं."

"मॅम काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही बोलू शकता माझ्याशी."

"समीर..मी बोलेल या विषयावर पण आता नको आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगू, तुला मी माझी फॅमिली मानते आणि त्याच हक्काने सांगते...तुझी मोठी बहीण तुला काहीतरी सांगत आहे असं समज हवं तर."

"हो बोला ना मॅडम. अजिबात मनात कोणताही संकोच नका ठेऊ."

"समीर, आता तुझ्यापासून काही लपवण्यात अर्थच नाहीये. उगीच तुला आशेवर ठेवून वाट बघायला लावणं हे मला तरी पटत नाहीये.
एक माणूस म्हणून तू खूप छान व्यक्ती आहेस आणि त्यामुळेच की काय माहीत नाही पण आमच्या आईंना पहिल्याच भेटीत तू खूप आवडलास आणि त्याचवेळी त्यांनी तुला जावई म्हणून पसंत केले. त्यात तुझ्या कामाबद्दल बऱ्याचदा घरी देखील तुझे कौतुक व्हायचे. आम्हालाही काहीच प्रॉब्लेम नव्हता पण आमची हर्षु आधीच कोणाच्यातरी प्रेमात पडलीये. तू वाईट वाटून घेऊ नकोस. मलाही खूप वाईट वाटतंय हे सगळं तुला सांगताना."

"नाही मॅडम..तसे काही वाटून घेऊ नका. उलट तुम्ही आपलेपणाने हे मला सांगताय तेच खूप आहे माझ्यासाठी."

"आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हर्षु ज्याच्यावर प्रेम करते ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझा लहान भाऊ आदित्य आहे."

"ओह! असं आहे का!"

"पण मग हर्ष सरांच्या आईंना ही गोष्ट माहीत नाही का?"

"आधी माहीत नव्हती पण नंतर समजली आणि तीही खूप चुकीच्या पद्धतीने."

"पण मला एक कळत नाही, जर त्यांना ही गोष्ट आता समजली आहे तरी त्यांनी आम्हाला विचारायचे कारण काय?"

"कारण त्यांना आदित्य जावई म्हणून पसंत नाहीये."

"पण का?"

"कारण अजून तो सेटल नाहीये ना आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे दोन फॅमिलीतील आर्थिक दरी, हा खूप मोठा इशू आहे. परंतु, पालक म्हणून ते त्यांच्या ठिकाणी अगदी बरोबर आहेत."

"मॅम एक विचारू?"

"ह्ममम.."

"तुम्हाला आधीपासून माहीत होतं सगळं?"

"हो..हर्ष सरांना आणि मला आधीच माहीत झालं होतं."

"म्हणजे तुमच्या दोघांचा सपोर्ट होता हर्षिताला."

"हो पण माझ्यापेक्षाही जास्त हर्ष सरांचा आणि आजही आहे."

"वाव... सर खूप ग्रेट आहेत मॅम."

"समीर तू राग मानून घेऊ नकोस हा. हवं तर मी तुझी माफी मागते."

"अहो काय हे मॅम. असं माफी वगैरे मागून मला परकं नका हो करू. आताच मला भाऊ म्हणालात आणि लगेच हे असं तुटक बोलणं? आणि राग काय मानायचा. फक्त आता तुमच्या फॅमिली सोबत कायमचं नातं नाही जोडता येणार, याचं थोडं वाईट वाटलं."

"असं काही नाहीये. उलट आता आपल्यात एक हक्काचं नातं तयार झालं. आजपासून जसा मला आदित्य अगदी तसाच तू. आजपासून मी तुझी मोठी बहीण. आता हे नातं कायमचं. तसेही तू आमची फॅमिलीच आहेस त्यामुळे आता अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस."

"थँक्यू मॅम. पण कसं जमतं हो तुम्हाला असं सगळ्यांना जीव लावायला?"

"माहीत नाही. कदाचित परिस्थितीने शिकवलं असेल. पण सध्या ना आहे ती परीस्थिती खूप हाताबाहेर जात आहे. कसं मॅनेज करू सगळं काहीच कळत नाहीये."

"डोन्ट वरी मॅम.. सगळं ठीक होईल आणि अगदी तुम्हाला हवं तसंच होईल."

"समीर माझं एक काम करशील?"

"हो बोला ना मॅम.."

"तुझ्या आई बाबांना प्लीज माझ्या वतीने सॉरी म्हण. नाहीतर राहू दे मीच येऊन भेटते काका काकूंना. त्यांनाही सगळं सविस्तर सांगायला हवं." दुसऱ्याच क्षणी नेत्राने लगेच तिचा निर्णय बदलला. तीने स्वतः समीरच्या घरच्यांना भेटायचे ठरवले.

"चालेल मॅम... ही गोष्ट तुम्हीच जर आईला सांगितली तर बरं होईल. माहीत नाही ती कशी रिॲक्ट होईल पण तुम्ही बोला एकदा आईसोबत. तीही खूपच कन्फ्युज आहे."

"मॅम पण आता पुन्हा जर तुमच्या घरून फोन आला तर?"

"त्याआधी तुझ्या घरच्यांना घडलेला सर्व प्रकार समजायला हवा समीर."

"मॅम तुम्ही आजच बोलता का आईसोबत. योगायोगाने आईने आज सुट्टी घेतलीये. ती घरीच आहे आज. तुम्ही बोलून घ्या. आईचा नंबर देऊ का तुम्हाला?"

"अरे हे सर्व फोनवर बोलणं मला तरी योग्य वाटत नाही. बघते दुपारी वेळ काढून जाऊन येते तुझ्या घरी."

"चालेल..मी आईला तशी कल्पना देऊन ठेवतो."

"ओके चालेल." नेत्रा म्हणाली.

क्रमशः

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all