अनोळखी दिशा पर्व २ (भाग ४१)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, समीर डायरेक्ट नेत्रा सोबतच बोलतो. काकींचे वागणे पाहून नेत्राला तर धक्काच बसतो. समीरलाही सर्वकाही खरे समजते. खरंतर त्याला वाईट वाटतं पण सत्य परिस्थिती तो लगेचच स्विकारतो आणि योग्यवेळी सर्व सत्य समोर येणे देखील तितकेच गरजेचे होते हेही मान्य करतो.

आता पाहुयात पुढे...

दुपारच्या वेळी काम थोडं बाजूला ठेवून नेत्रा समीरच्या आईला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाते. घडलेला सर्व प्रकार त्यांना समजावून सांगते. तशी समीरने त्यांना आधीच थोडीफार कल्पना दिली होती.

सुरुवातीला नेत्राचे बोलणे ऐकून समीरच्या आईला तर खूपच राग आला.

"हे असे इतके अविचाराने कोणी वागते का? हे सगळं खूप शॉकिंग आहे माझ्यासाठी." माधवी ताई रागातच रिॲक्ट होतात.

"काकू त्यासाठी खरंच सॉरी. हर्षुच्या मनाविरुद्ध जाऊन तिचे समीरसोबत लग्न लावून देण्यात काहीच पॉइंट नाहीये. पण हेच आमच्या आईंना समजत नाहीये. त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला आम्ही; पण त्या समजून घेतच नाहीयेत. शेवटी आईचे काळीज आहे. लेकीच्या भल्याचाच त्या विचार करत आहेत. म्हणजे त्याही पूर्णपणे चुकीच्या आहेत असे नाही."

"तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे नेत्रा मॅडम, पण नयना ताई जर चुकत असतील तर त्यांना त्यांची चूक समजावून सांगायचं सोडून निलम ताई तर त्यांना सपोर्ट करत होत्या. हे कितपत योग्य आहे?"

'खरं सांगायचं झालं तर तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे."

"म्हणजे...मी समजले नाही."

"म्हणजे पहिली गोष्ट, तुम्ही मला मॅडम म्हणू नका. मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. मी हक्काने तुम्हाला काकू म्हणते ना, मग तुम्ही सुद्धा मला नेत्राच म्हणा."

"बरं... पण ह्यावेळी वाटलं होतं की माझा समीर लग्नाला तयार झाला ना बस आता हेच माझ्यासाठी खूप आहे. एवढंच नाही तर जास्त आढेवेढे न घेता त्याने पहिल्यांदा एखादया मुलीला होकार दिला होता. तेही तो तुम्हा सगळ्यांना आधी ओळखतो म्हणून आणि योगायोगाने त्याने त्या दिवशी कार्यक्रमात हर्षिताला पाहिले होते त्यामुळे तोही लगेचच तयार झाला होता. आता तो पुन्हा मुली पाहायला होकार देईल असे वाटत नाही."

"काकू... तुम्ही समीरची अजिबात काळजी करू नका. मी स्वतः त्याच्याशी बोलेन ह्या विषयावर."

"एकदा का समीरचे लग्न झाले की मग आम्ही मोकळे. योग्य वयात सगळ्या गोष्टी झाल्या की मग टेन्शन राहत नाही."

"सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. काळजी करू नका आणि पुन्हा एकदा आई आणि निलम काकींच्या वतीने मी तुमची माफी मागते."

"नको गं सारखं सारखं सॉरी म्हणू. तसंही जोड्या या स्वर्गात जुळल्या जातात. आपण फक्त निमित्त मात्र असतो.
पण समीर तुझ्याशी बोलला हे एका अर्थी बरंच झालं. नाहीतर आम्हाला काहीच समजले नसते आणि आम्ही आपलं तर्क वितर्क लावत बसलो असतो."

"हो ना. आता जर पुन्हा कॉल आला काकींचा किंवा आईंचा तर त्यांना फक्त एकच सांगा, समीरचे बाबा हर्षच्या बाबांसोबत या विषयावर बोलतील. मग पुढे काही बोलणार नाहीत त्या आणि मीही माझ्या पद्धतीने यातून लवकरच मार्ग काढण्याचा प्रयत्न करते."

"हो चालेल."

"बरं... काकू मी येते आता, खूपच उशीर झालाय."

"नेक्स्ट टाईम येशील तेव्हा जेवायलाच ये गं."

"हो काकू नक्की येणार."

"तुझ्या रूपात माझ्या समीरला एक हक्काची बहीण मिळाली. तो रोज तुझे कौतुक सांगत असतो आणि तूही अगदी तशीच आहेस. इतक्या लहान वयात किती समज आहे गं तुला."

"थँक्यू काकू. खूप छान वाटलं आज तुम्हाला भेटून."

"मलाही खूप छान वाटलं, आज तू घरी आलीस. खूप इच्छा होती हीच ओळख सोयरिकीमध्ये बदलली असती तर मनाला वेगळेच समाधान भेटले असते."

"काही गोष्टी आपल्या हातात नसतात काकू, असे म्हणायचे आणि पुढे चालत राहायचे."

"हो गं.."

माधवी ताईंचा निरोप घेऊन नेत्रा मग तिथून निघाली.

बाकी काही का असेना, पण नेत्राने मात्र समीरच्या आईला भेटून सर्व काही खरं सांगून टाकलं हे एक बरंच झालं होतं. तिच्या ह्या एका कृत्यामुळे पुढे जाऊन होणारे अनेक गैरसमज दूर झाले होते आणि विशेष म्हणजे समीरच्या आईने तिला समजून घेतले, ही खूप मोठी गोष्ट होती तिच्यासाठी. पण आता जेव्हा नयना ताईंना हे सर्व समजेल तेव्हा त्या नेत्राचा आणखीच राग राग करणार हेही तितकेच खरे.

त्याच दिवशी रात्री नेत्राने निलम काकीसोबत बोलायचे ठरवले. नयना ताईंसोबत सध्या तरी बोलून काहीच उपयोग होणार नव्हता. काकिंसोबत बोलण्याआधी नेत्राने घडलेला सर्व प्रकार आधीच हर्षच्या कानावर घातला. हे सर्व ऐकून खरंतर त्याला खूपच राग आला.

"हे बघ नेत्रा, काकीसोबत बोलून काहीच उपयोग होणार नाही. ती काही सरळ उत्तर देईल असे वाटत नाही आणि स्वतःची चूक मान्य करणार नाही तो भाग वेगळा."

"अरे पण मग आता आपण काय करायचे?"

"मी आता डायरेक्ट बाबांसोबत बोलणार आहे. काकीच्या बोलण्यात येऊन आईदेखील चुकांवर चुका करत आहे आणि तू...समीरच्या घरी जायच्या आधी एकदा तर मला सांगतेस." हर्ष नेत्रावरच डाफरला.

"आजकाल तुझ्याकडे वेळ आहे का माझं काही ऐकून घ्यायला?" रागातच नेत्रा बोलली.

"गप्प बस..उगीच कारणं देऊ नकोस आता. तुला सांगायचे असते तर तू कसेही सांगितले असते."

"मी दुपारी तुझ्यासोबत बोलायला आले होते, आठवतंय? पण तू काय म्हणालास, घरचा विषय असेल तर मला नाही बोलायचे. काल पण मला जेव्हा समीरकडून ही एवढी मोठी गोष्ट समजली तेव्हा रात्रीच तुला सांगणार होते पण आजकाल रात्री तुला लवकर झोप येते. मग केव्हा सांगायचं होतं मी? आणि तसंही आजकाल तुला मीच चुकीची वाटते ना, तुला तुझ्या बहिणीची काळजी आहे तशी मला माझ्या भावाची काळजीच नाही. त्या दोघांचं लग्न व्हावं असं मला वाटतंच नाही. हो ना."

"आता एवढं सगळं ऐकवायची गरज आहे का?"

"हो आहे. कारण तू किती खडूस आहे ते फक्त मलाच माहीत आहे."

"बरं... झालं असेल बोलून तर जायचं जेवायला? कारण तुझ्यासोबत भांडून माझं पोट नाही भरणार." खोचकपणे हर्ष बोलला.

"हो ना... जशी रोजच भांडते मी तुझ्यासोबत. आज चांस मिळाला म्हणून बोलले."

"बरं बस झालं ना आता. तुम्हा बायकांचं नवऱ्याशी भांडताना तोंड कसं दुखत नाही देवच जाणे. मी जातो जेवायला तुला यायचं तर ये नाहीतर बस इथेच."

"मिस्टर हर्षवर्धन इनामदार इथून पुढे असं खडूससारखं वागायचं नाही आ माझ्यासोबत." हर्षचे टी शर्ट पकडत, त्याच्या डोळ्यात डोळे घालून नेत्रा बोलली.

"बापरे! घाबरलो ना! इतके दिवस झाले तू खडूससारखं वागत होतीस माझ्याशी, मी नाही. स्वतःच सरळ बोलत नव्हतीस. मग मलाही बघायचे होते किती दिवस तुझा राग टिकतो ते."

"हो का, प्रेमाने बसून विचारलेस का कधी? माझ्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज तरी होता का तुला? तिकडे आईंचे वागणे आणि इकडे तुझे. जणू काही मी खूप मोठा गुन्हा केलाय. आईंचे वागणे एकवेळ मी समजू शकते पण तुझं काय?"

"बरं बस झालं ना माझे आई...किती बोलशील आता? चल ना जेवायला. खूप भूक लागलीये मला."

"ह्ममम... चला. पण सांगितलेलं तेवढं लक्षात ठेव आणि कंट्रोल ठेव स्वतःवर. लगेच वाद घालत बसू नकोस कोणासोबत." खुन्नस देत नेत्रा बोलली.

"ते बघेल मी आणि धन्यवाद... काकी सोबत बोलायच्या आधी मला काही गोष्टी सांगितल्या त्याबद्दल."

"तुझ्यावर विश्वास ठेवलाय पण काही घोळ घातला नाही म्हणजे मिळवलं." नेत्रा तोंडातच पुटपुटली.

"काय म्हणालीस?"

"काही नाही. मलाही खूप भूक लागलीये म्हटलं."

लटक्या रागातच हर्षने नेत्राकडे पाहिले.

नेहमीप्रमाणे सर्वजण जेवणासाठी डायनिंग टेबलवर जमलेलेच होते. नेत्रा आणि हर्ष थोडे उशिराच आले. सर्वांनी जेवण सुरू केले होते. जवळपास सर्वांचे जेवण आटोपलेच होते. अजूनही कोणी कोणाशी पहिल्यासारखे सरळ बोलत नव्हते. घरातील वातावरण बऱ्यापैकी बिघडलेलेच होते.

"बाबा, हर्षु नाही आली जेवायला." हर्षने विचारले.

"अरे तिचं जेवण झालंय मगाशीच. केसचा स्टडी करायचा होता तिला म्हणून मग लवकर आटोपले तिने आणि तसेही इथे हे असे सर्वांचे खुनशी चेहरे पाहण्यापेक्षा बरं झालं लवकर जेवून घेतलं तिने." नयना ताईंकडे रागाने पाहत माधवराव बोलले.

"तुम्ही मला का ऐकवताय?" नयना ताई म्हणाल्या.

"माधव जेव बरं शांत आणि नयना तुलाही वाण नाही पण गुण लागलाय बरं का."

"आई आता मी काय केलं?"

"तू आजकाल खूप काय काय करतेस आई. आता तुझा गुरू कोण? हे न समजण्याइतपत आम्ही थोडीच ना वेडे आहोत." न राहवून मध्येच हर्ष बोलला.

नेत्राने त्याला हळूच चिमटा काढला.
'गप्प बस.' म्हणून तिने त्याला डोळ्यांनीच दम भरला.

"बरं झालं तू पण बोललास. तेवढंच बाकी होतं आता." नाराजीच्या सुरात नयना ताई बोलल्या.

"तू वागतेस तसं आई. अशी नव्हतीस गं आधी तू. आता खूप बदललीस. हल्ली खूप अविचाराने वागतेस आई तू."

"काय केलं मी आता? लेकीच्या सुखाचा विचार करणं यात काय अविचारी वागणं आहे? सांगतोस जरा."

शब्दाने शब्द वाढत होता. त्यामुळे जेवण सोडून आता विषय भलतीकडेच वळणार अशी नेत्राला मनातून धास्तीच भरली आणि शेवटी तसेच झाले.

"आई...काय गरज होती समीरच्या आईला फोन करून हर्षुच्या आणि समीरच्या लग्नाबद्दल डिस्कस करण्याची? आमच्यापैकी कोणालाच सांगावंसं वाटलं नाही का तुला? काकी आणि तू... तुम्ही दोघींनी मिळून हर्षुच्या लग्नाची बोलणी सुद्धा उरकून घेतली आणि आता समोरून होकार सुद्धा आला आहे, असे असताना तुम्ही दोघी काय करणार आहात आता? अगं जिच्या सुखाचा तू विचार करत आहेस ती स्वतः या लग्नाला तयार नाहीये. असे असताना सगळ्यांना अंधारात ठेवून तुम्ही दोघी हे असे घाणेरडे डाव रचत आहात?
अगं आई, काकीचं समजू शकतो मी, तिला सवयच आहे असं वागण्याची पण तुझं काय? हिला तर हेच हवंय. घराची शांती तिला बघवतच नाही. पण तुलाही इतकी साधी गोष्ट कळू नये का गं." न राहवून हर्ष शेवटी बोललाच.

"हर्ष...मी ऐकून घेते म्हणून वाटेल ते बडबडू नकोस. उगीच भलते सलते आरोप करू नकोस माझ्यावर." निलम काकी तावातावाने बोलली.

"एक मिनिट काकी, तू आता शांतच बस. हे जे काही सुरू आहे ना, त्या सगळ्याला तू कारणीभूत आहेस, हे विसरू नकोस आणि माझ्यावर अजिबात आवाज चढवायचा नाही आ. सांगून ठेवतोय. मोठी आहेस म्हणून मान देतोय त्याचा बिलकुल गैरफायदा घ्यायचा नाही." आज पहिल्यांदा हर्षने निलम काकीला सर्वांसमोर इतके सुनावले होते.

अचानक हे एवढे मोठे सत्य सर्वांसमोर आल्यामुळे नयना ताई आणि निलम काकी खूपच घाबरल्या होत्या. क्षणात त्यांच्या चेहऱ्याचा जणू रंगच उडाला. हर्षला असे चिडलेले पाहून दोघीही एकदम शांत झाल्या.

"हे काय बोलतोस तू हर्ष? मला तर काहीच समजत नाहीये."

"बाबा माझं म्हणणं पटत नसेल तर तुम्ही आईलाच विचारा की, ती सगळं खरं सांगेल. हो ना आई?"

"नयना...काय बोलतोय हर्ष... तो बोलतोय ते खरं आहे का?"

"हो. पण हे पूर्ण सत्य नाहीये. म्हणजे हे सर्व मला लपवायचे नव्हते हर्ष. पण तुम्ही सगळे हर्षुला सपोर्ट करत आहात. त्यामुळे मला असं वागणं भाग होतं. मी जर चुकीची वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही सगळे तितकेच जबाबदार आहात या सर्व गोष्टींना."

"अजून किती चुका करणार आहेस नयना? अगं तुझ्या या अशा वागण्याने घराची शांतता भंग झालीये. हे कसं तुझ्या लक्षात येत नाही? निदान कोणाचं ऐकावं आणि कोणाचं नाही, याचं तरी भान ठेव गं." माधवरावांच्या रागाचा पारा देखील खूपच चढला होता.

"हो बरोबर आहे. शेवटी मीच चुकीची ठरणार... हे आधी पासूनच मला माहिती होतं." रागातच नयना ताई बोलल्या.

"आज सर्वांना मी शेवटचं सांगतोय, हर्षुच्या लग्नाचा निर्णय घ्यायला तिचा बाप अजून जिवंत आहे. इतर कोणालाही त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. अगदी तुलाही हेच सांगेल मी नयना आणि नेत्रा, हर्ष तुम्ही दोघे समीर आणि त्याच्या घरच्यांशी बोलून घ्या. ह्या दोघींनी घातलेला घोळ आता आपल्यालाच निस्तरावा लागणार आहे."
निलम आणि नयना ताईंकडे रागाने पाहत माधवराव बोलले.

आज पहिल्यांदा नेत्राने तिच्या सासर्यांना इतके चिडलेले पाहिले होते.

"बाबा...नेत्रा बोललिये आज समीरच्या घरच्यांशी. तिने तिच्या पद्धतीने सॉल्व्ह केले आहे सगळे प्रकरण. माफी सुद्धा मागितली आहे त्यांची."

"हे एक बरं केलंस बघ नेत्रा. मीही बोलतो नंतर समीरच्या बाबांसोबत. लग्न म्हणजे यांना खेळ वाटतोय. आपल्याबद्दल काय विचार करत असतील ते लोक देवच जाणे."

रागातच हळहळ व्यक्त करत माधवराव झोपायला निघून गेले. माधवरावांचा रोष निलमवर होता. हे सर्वांच्याच लक्षात आले.

त्यात नेत्राने ह्या सर्वात मध्यस्थी केल्यामुळे पुन्हा एकदा नयना ताईंचा सूनेवरील राग उफाळून आला. त्या रागारागाने नेत्राकडे पाहत होत्या.

नेत्राला तर आता नयना ताईंच्या नजरेला नजर देण्याचीही भीती वाटत होती.

क्रमशः

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all