अनोळखी दिशा पर्व २ (भाग ४२)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, नेत्राने समीरच्या घरी जाऊन झालेल्या प्रकाराबद्दल त्याच्या आईची माफी मागितली. त्यानंतर तिने नयना ताईंचे आणि निलम काकीचे वागणे हर्षच्या देखील कानावर घातले. हर्ष काही गप्प बसला नाही. त्याने सर्वांसमोर माधवरावांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी मात्र नयना ताईंचा समाचार घेतला.

आता पाहुयात पुढे...

"पाहिलंत ताई, तुमच्या सुनेचे प्रताप. म्हटलं होतं ना मी की हिला हर्षुचं सुख पाहवत नाही. म्हणूनच तर ही तोंड वर करून समीरच्या घरच्यांशी बोलली."

"निलम, बस झालं आता. तुला काहीच कसं कळत नाहीये. ही आग लावायची कामं बंद कर आता." महेशरावांच्या रागाचा पारा देखील खूप चढला होता.

"बोला तुम्हीही मलाच बोला. हे जे काही घडतंय त्यात माझी काहीच चूक नाहीये. ताईंनी सांगितले म्हणून मी समीरच्या आईला कॉल केला होता आणि तसंही नवरा म्हणून तुम्ही कधी बायकोची बाजू घेतलीत? सतत आई बापाच्या आणि भावाच्या पुढं पुढं करत राहायचं. भलेही मग समोरून कुत्र्यासारखी वागणूक मिळाली तरी चालेल."

आता मात्र महेशरावांना राग अनावर झाला. त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता निलमच्या सणसणीत कानशिलात लगावली.

"बरी उशिरा का होईना पण माझ्या लेकाला अक्कल आली." तोंडातल्या तोंडात आजी पुटपुटल्या.

'काका...अरे काय हे? कळतं की नाही तुला काही? आपल्या घरची ही रीत नाहीये."

"मग काय करू मी हर्ष? ह्या बाईला सतत समजावत आलो, पण हिच्या डोक्यात प्रकाश पडतच नाही. तिच्यासाठी सतत  तुमच्या सगळ्यांच्या विरोधात मी जातो. आज सुधरेल उद्या सुधरेल म्हणत माझ्या आयुष्याची सव्वीस वर्ष मी वाट पाहिली; पण ही काही सुधरायचं नावच घेत नाही आणि आज तर हद्दच केली हिने."

"तुम्ही माझ्यावर हात उचललात! हे मी कधीही विसरणार नाही लक्षात ठेवा आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय नेत्रा, लायकी नसतानाही तुला ह्या घरात आणून ठेवलंय ह्या लोकांनी. आता तुझ्या भावाची सुद्धा लायकी नसताना हर्षुसोबत लग्नाची स्वप्न पाहतोय तो, हाच डाव होता ना गं तुझा? आता झालं समाधान, एक एक करत आधी सगळ्यांना आपल्या बाजूने करून घेतलं आणि बरोबर डाव साधला. आतातरी शहाण्या व्हा ताई." मनातील सगळी भडास नेत्रा वर काढून तणतण करत निलम तिच्या खोलीत निघून गेली.

"बघितलं हर्ष, अजून किती आणि कोणत्या भाषेत समजवायचं हिला? हरलो रे मी हर्ष." हतबल होत महेश काका बोलले.

"काका तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. होईल सगळं ठीक."

"आतातरी झालं का तुझ्या मनासारखं." रागातच नयना ताई नेत्राला म्हणाल्या.

"अगं आई...तिला का बोलतियेस तू? सगळं काही तुझ्या डोळ्यासमोर घडलंय तरी अजूनही तुला खरं काय ते समजतच नाहीये का?" हर्ष म्हणाला.

"नाही समजत मला आणि समजून घ्यायचंही नाहीये." नयना ताई हर्ष वर ओरडल्या आणि त्याही त्यांच्या खोलीत निघून गेल्या.

"नेत्रा... बस इथे. आज सगळं समोर आलं बघ. घरात नेमकं काय सुरू आहे हेच कळत नव्हतं आणि तसंही आम्हा म्हातारा म्हातारीला सांगतंय तरी कोण रे. थोडं फार कानावर आलं होतं पण नीटसं काही समजत नव्हतं." आजी म्हणाल्या.

"हो ना...गेल्या महिन्याभरात घरचं वातावरणच सगळं बदलून गेलंय. पण पोरांनो..आमच्या समोर असं नका रे भांडत जाऊ. आता ह्या वयात नाही सहन होत रे."

"बाबा...हे सगळं माझ्या बायकोमुळे होतंय. कंटाळलोय मी तिच्या या वागण्याला." महेश काका म्हणाले.

"आता बोलून काही उपयोग नाही महेश. पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणायचं आणि पुढे चालायचं." आजीने लेकाची समजूत काढली.

"आतापर्यंत तेच करत आलोय गं आई. पण आता पाणी डोक्यावरून गेलंय."

"पण ते काही का असेना, तू तिच्यावर हात उचलायला नव्हता पाहिजे...
तेही सर्वांसमोर. आता अजून वेड्यासारखी वागेल ती." आजोबा म्हणाले.

"जे होईल ते होईल बाबा. पण हे मी याआधीच करायला हवं होतं, असं मनापासून वाटतंय मला. प्रत्येक वेळी तिच्या मनाचा विचार करून गप्प बसलो, पण ही तर त्याचा गैरफायदाच घ्यायला लागली. लाख वहिनींनी सांगू द्या, पण हिला समजत नाही. डायरेक्ट हर्षुच्या लग्नाची बोलणीच करून मोकळी झाली ही. हर्षच्या वेळीही तिने हेच केले. काय झाले त्यावेळी, आली ना ती सुपर्णा हिच्या बोलण्यात आणि आता वहिनीसुद्धा. कसं जमतं हिला हे? मला तर कधी कधी लाज वाटते हिला माझी बायको म्हणवून घ्यायला."

"काका पुरे ना आता. शांत व्हा बरं. नाहीतर तुम्हालाच त्रास होईल." महेश काकांची समजूत काढत नेत्रा म्हणाली.

"नेत्रा खरंच किती मोठ्या मनाची आहेस गं तू. निलमच्या वतीने मी तुला सॉरी म्हणतो." अपराधी पणाच्या भावनेने महेश काका बोलले.

"काका त्याची काहीच गरज नाहीये. मला सवय झालिये आता काकिंच्या बोलण्याची. नाही मला वाईट वाटलं. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ." रडवेल्या सुरात नेत्रा बोलली.

"महेश..तू जा झोप जाऊन. दमला असशील दिवसभर आणि निलम आता खूप चिडलेली आहे, ती काहीही बोलली तरी शांत बस. उगीच शब्दाने शब्द वाढवू नकोस." समजावणीच्या सुरात आजी बोलल्या.

"हो आई आणि तसंही माझी तर आतातरी तिच्याशी वाद घालण्याची अजिबात इच्छा नाहीये." असे म्हणून महेश काका देखील झोपायला गेले.

"हर्ष-नेत्रा...तुम्ही दोघेच राहिलात जेवायचे, जेवून घ्या आधी आणि टेन्शन घेऊ नका शांतपणे जेवा. नेत्रा... अगं ती भाजी खूप थंड झाली असेल गरम करून घेशील."

"हो आजी मी घेते, तुम्ही जा झोपायला."

"आणि जेवण झाल्यावर झोपून घे. आवरत बसू नकोस. आधीच उशीर झालाय खूप."

"हो आजी...तुम्ही जा बरं झोपायला. मी करते सगळं व्यवस्थित."

"बरं.. जेवा शांतपणे."

असे म्हणून आजी आजोबा देखील झोपायला निघून गेले.

आज घरात इतकं काही होऊन गेलं की त्यामुळे कोणीच नीट जेवले नाही.

"हर्ष पण जेवताना आज विषय काढायची काही गरज होती का? सांगूनही तू शेवटी तेच केलंस ना."

"मी मुद्दाम नाही काढला तो विषय. चर्चा नको वाढत गेली आणि मला बोलावं लागलं."

"अरे या सगळ्यांत पुन्हा एकदा मीच चुकीची ठरले ना."

"जाऊ दे ना तो विषय आता..जे झालं ते बरं झालं. कुठेतरी थांबायला हवंच होतं हे. दे सोडून तो विषय तू आधी जेवायला आण."

"हो रे आणते थांब. गरम तर होऊ दे ना भाजी."

"कसली भाजी आहे गं?"

"वरण भात आणि मेथीची भाजी आहे."

"आण लवकर..मला खूप भूक लागलीये."

"माझी तर भूकच मेलीये हर्ष."

"एव्हढा विचार नाही करायचा अगं. कितीही राग आला, भांडणं झाली तरी जेवणावर राग नाही काढायचा."

"कोण सांगतंय पहा!"

"म्हणजे काय.. खरं तेच बोलतोय."

"हे कोणी शिकवलं तुला? इतकं हुशारीचं शहाणपण."

"माझी बायको माहितीये तुला, नेत्रा तिचं नाव. तिनेच शिकवलं मला. आधी मी थोडं काही झालं की उपाशी रहायचो पण आता ते जमतच नाही मला."

"हो का...चांगली गोष्ट आहे, जेव आता."

"तूप लागणार आहे का? आताच सांग. पुन्हा उठणार नाही आ मी."

"बरं बाई मी उठेल हवं तर. तू बस आधी जेवायला. भूक मेली असं काही म्हणू नकोस."

"हो बसते. पण का कोण जाणे गेल्या आठ दिवसांपासून भूकच कमी झालीये माझी. जेवणच जात नाही अरे."

"नको तितका विचार करत बस फक्त आणि हवं तितकं टेन्शन घे. मग पोटभर जेवण जाईल."

"नाही रे तसं काही नाही. पण थोडा विकनेसपणा पण जाणवतोय."

"वेडीयेस का...जेवायला बस बरं आधी तू. सारखी भांडत असतेस ना माझ्यासोबत म्हणून नको तिथे एनर्जी वेस्ट झाली असेल. आधी जेवून घे म्हणजे पुन्हा भांडायला ताकत येईल." हसतच हर्ष बोलला.

"हो का...मी मस्करी करतेय असं वाटतंय तुला?"

"मी कुठे म्हणालो तसं."

"तुझ्या बोलण्यावरुन तर तसंच वाटतंय."

"बरं माझे आई बस ना गं आता जेवायला."

"थांब आधी तूप घेऊन आले."

"अगं अगं काय झालं. नेत्रा अगं पडली असतीस की आता."

"अरे अचानक चक्कर आल्यासारखं झालं."

"तू ना हाताने आजारपण वाढवून घेणार आहेस. बस इथे. मी आणतो तूप."

"मला ना काहीतरी होतंय यार हर्ष पण काय तेच कळेना."

"तू पोटभर जेवून घे बरं आधी मग बरं वाटेल तुला.

"जेवायची पण इच्छा नाहीये माझी."

"बस झालं..नाटक करू नकोस. हे घे खा. भाजी थोडी तिखट आहे पण टेस्टी आहे. आवडेल तुला."

"ह्ममम...इतक्या दिवसांनी आज पहिल्यांदा माझ्याशी असं सरळ बोलतोयेस तू. त्यामुळे ती तिखट भाजी आज गोड पण लागेल मला. खूप छान वाटतंय. पण आता तरी विश्वास बसला ना? की मलाही मनापासून वाटतं हर्षु आणि आदित्यचं लग्न व्हावं असं."

"मला आधीच माहीत होतं. फक्त आईच्या वागण्याचा तुला त्रास होत होता म्हणून तू द्विधा मनस्थितीत होतीस आणि काहीही झालं तरी मी नवरा आहे तुझा. माझ्यापेक्षा जास्त तुला कोणी ओळखूच शकत नाही."

"इतकंच वाटत होतं तर मग इतके दिवस स्वतःहून असं प्रेमाने माझ्याशी बोलावंसं नाही वाटलं?"

"असं कधी होईल का नेत्रा. पण खरं सांगू...आईच्या वागण्याचा मलाही खूप त्रास होत होता आणि अजूनही होतोय. त्यामुळे कोणाशी काहीच बोलायची इच्छा नव्हती. त्यात मला तुझं वागणं अजिबात पटत नव्हतं."

"मी काय केलं पण?"

"आई तुझ्याशी सरळ बोलत नव्हती तरी तू सारखी तिच्याशी बोलण्यासाठी धडपड करत होतीस. अरे पण कशासाठी? ती भाव देत नाही ना मग गप्प बसावं. तू जातेच आहे तिच्या मागे आणि ती टाळतच आहे तुला किंवा मग काहीतरी उलटच बोलत आहे. यार कशासाठी हे सगळं? एका पॉइंट नंतर जेव्हा आपल्या प्रयत्नांना शून्य किंमत उरते त्यानंतर मात्र जगाचा विचार न करता आपला स्वाभिमान जपावा. हे माझे प्रामाणिक मत."

"कधी कधी आपल्या माणसांसाठी, आपल्या नात्यांसाठी स्वाभिमान बाजूला ठेवावा लागतो हर्ष. मी ह्या मताची आहे."

"बस झालं...नको बोलूस पुढे. भावना पाहोचल्या." पुढे काही ऐकून न घेण्याच्या सुरात हर्ष बोलला

"खडूस..."

"तूही काही कमी नाहीस."

"हर्ष बस झालं, नको बोलूस काही आणि मला जेवण पण नाही जाणार. मला खूप कसंतरी होतंय"

"नेत्रा अगं काय हे? अर्धी पोळी सुद्धा खाल्ली नाहीयेस अजून तू. नाहीतर एक काम कर भात खा थोडा. असं अर्धवट उपाशी राहू नकोस. झोप येणार नाही नाहीतर."

"बस झालं...नकोय मला हर्ष." ताट सरकवत नेत्रा बोलली  आणि तशीच ती ताटावरून उठली. "

क्रमशः

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all