अनोळखी दिशा पर्व २ (भाग ४३)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, नेत्राने नयना ताई आणि निलम काकीने मिळून जो काही घोळ घातला होता ते सर्वकाही हर्षला सांगितले. हर्षने मग सर्वांसमोर ह्या दोघींच्या चुकांचे पाढे वाचले. माधवरावांनी देखील त्यांच्या पद्धतीने प्रकरण हाताळले. त्याच दिवशी रात्री नेत्राची तब्बेत बिघडली.

आता पाहुयात पुढे...

मध्येच नेत्रा ताटावरून उठली आणि धावतच ती बाथरुमध्ये गेली.

"हिला काय झालं अचानक?"

हर्षचे जेवण झालेच होते त्याने घाईतच मग हात धुतला आणि तो नेत्राच्या पाठोपाठ गेला.

"नेत्रा दार उघड. काय होतंय नेमकं तुला?"

तेवढ्यात नेत्रा बाथरुममधून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर अगदी अशक्तपणाचे भाव होते.

"काय झालं? उलटी झाली का?"

"हो ना...खाल्लेलं सगळं बाहेर आलं हर्ष."

"तू पण ना यार. आधीच जेवली नाही व्यवस्थित. त्यात आता उलटी काढलीस."

"हर्ष अरे मी मुद्दाम केलं का असं?" चिडक्या सुरात नेत्रा बोलली.

"बरं चिडू नकोस. पोटात काहीच नाही त्यामुळे चिडचिड होतिये तुझी. एक काम कर हे सगळं राहू दे, मी उचलतो. आधी शांत बस इथे आणि ग्लासभर थंड दुध घेतेस का? आय थिंक पित्त झालंय तुला."

"यार मला काहीच नकोय आता. इच्छाच नाहीये."

"हा बावळटपणा बंद कर आ नेत्रा. गुपचुप दूध घे ग्लासभर. पोटात काहीच नाहीये तुझ्या. अजिबात स्वतःकडे लक्ष नाहीये आ तुझे. नको त्या गोष्टींचे टेन्शन घेत बसतेस. रात्रभर विचार करत जागरण करत बसतेस आणि मग हे असं होतं. घे आणि संपव सगळं." नेत्राच्या हातात दुधाचा ग्लास देत हर्ष बोलला.

हर्षने दम भरल्यामुळे नेत्राने कसाबसा दुधाचा ग्लास संपवला. त्यानंतर दोघेही झोपायला गेले.

"नेत्रा...पित्ताची गोळी घेतेस का?"

"नाही नको. दूध घेतलंय आता. वाटेल बरं."

"उद्या सकाळी ऑफिसला जायच्या आधी दवाखान्यात जाऊयात आणि नाही म्हणायचं नाही. जरी तुला उद्या सकाळी कितीही बरं वाटलं तरीही दवाखान्यात जायचंच आहे हे ध्यानात ठेव. समजलं?"

"हो...य.."

"आणि सॉरी..." नेत्राचा हात हातात घेत नजर चोरत हर्ष बोलला.

"कशासाठी?"

"आज खूप रागावलो ना मी तुझ्यावर आणि गेले काही दिवस तुझ्याशी खूप रुडली वागत होतो मी त्यासाठी खरंच सॉरी."

नेत्राला कुशीत घेत हर्ष बोलला. एकमेकांच्या प्रेमळ मिठीत दोघांनाही मग केव्हा झोप लागली ते समजलंच नाही. तब्बल महिन्याभरानंतर हर्ष आणि नेत्रामधील गैरसमज आता कुठे दूर झाले होते. नेत्रा हर्षुचाच विचार करते पण तिला आईलाही दुखवायचे नाही आणि म्हणूनच ती तिच्या मतावर ठाम राहू शकत नाही. हे आता हर्षला देखील कळून चुकले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी हर्षला जाग आली तेव्हा नेत्रा मात्र शांत झोपली होती. त्याने घड्याळात पाहिले आणि लगेचच तो उठला. स्वत:चे आवरुन रेडी झाला.

थोड्याच वेळात नेत्राला जाग आली.

"गुड मॉर्निंग. काय मग कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना?" हर्षच्या आवाजाने नेत्राची मॉर्निंग नक्कीच गुड झाली होती. पण अजूनही तिला तितकंसं बरं वाटत नव्हतं.

"म्हणावं तितकं नाही रे." नेत्रा उत्तरली.

"नक्कीच तुझ्या शरीरात काहीतरी कमी झालंय नेत्रा. तू उठ बरं चल आवर पटकन्. आधी आवरुन पोटभर खाऊन घे काहीतरी. मग जाऊयात दवाखान्यात."

"ह्ममम..." म्हणत नेत्रा बळेच अंथरुणातून उठली.

"तुझी आंघोळ झाली पण? अरे उशीर झाला ना मला उठायला? तू उठवायचे तरी मला."

"बरं वाटत नाही ना! मग कधीतरी झोपलीस तर कुठे बिघडलं?"

हर्षचे बोलणे ऐकून नेत्राच्या चेहऱ्यावर आपसूकच मग गोड स्माइल आली.

दवाखान्यात जाऊन पुन्हा मग ऑफिसला पण जायचे आहे. म्हणून मग इच्छा नसतानाही तिने मनाला समजावले आणि तशीच ती बाथरुममध्ये गेली. हर्ष आधीच आवरुन रेडी होता. एरव्ही नेत्राच्या नंतर उठणारा हर्ष आज तिच्या आधी आवरुन तयार होता. नेमकी आज नेत्राची तब्बेत ठीक नसल्याने आपसूकच त्याच्यात हे शहाणपण आले होते जणू.

ते काही का असेना पण हर्षमधील हा बदल नेत्राला मात्र सुखावून गेला हे नक्की. नात्यात हाच समजूतदारपणा तर आवश्यक असतो.

नेत्राने आवरुन आधी पोटभर नाश्ता केला आणि दोघेही सोबतच मग बाहेर पडणार तोच आजीने विचारले,
"काय रे आज लवकर निघालात?"

"अगं आजी हिला खूप पित्त झालं. रात्री जेवण झाल्यावर उलटी झाली. त्यात अशक्तपणा आहे तिला. म्हटलं अजून काही वाढण्याआधी एकदा दवाखान्यात जाऊन येऊ."

"अरे देवा...पण अचानक कसं पित्त झालं?"

"रात्र रात्र विचार करत जागरण करत बसायचं. कोणी काही बोललं की मनाला लावून घ्यायचं." नयना ताईंकडे एक रागीट कटाक्ष टाकत हर्ष बोलला.

"बरं जा सावकाश." आजी म्हणाल्या आणि दोघेही मग निघून गेले.

कालच्या गोंधळानंतर नयना ताईंना नेत्राचा अजूनच राग आला होता. त्यात हर्ष सतत अशी बायकोची बाजू घेत असतो याचा त्यांना जरा जास्तच त्रास होत होता.

'खरंच निलम म्हणते ते अगदी बरोबर आहे, नेत्रा दिसते तशी अजिबात नाहीये. आधी हर्षुला माझ्यापासून तोडलं आणि आता हर्षला सुद्धा माझ्यापासून तोडण्याचा हिचा प्रयत्न सुरू आहे. ह्यांच्या नजरेत देखील मला पूर्णपणे उतरवलं हिने.' नयना ताई मनातच बोलल्या.

थोड्याच वेळात हर्ष नेत्राला घेऊन दवाखान्यात पोहोचला. सकाळची वेळ असल्याने दवाखान्यात जास्त काही गर्दी नव्हती. त्यामुळे गेल्याबरोबर डॉक्टरांनी नेत्राला तपासले.

"नेत्रा मॅडम सिस्टर सोबत आत जा. एक छोटीशी टेस्ट आहे ती करून घ्या. सिस्टर सांगतील तुम्हाला समजावून."

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नेत्रा सिस्टरच्या पाठोपाठ आत गेली.

हर्षला मात्र खूपच टेन्शन आले होते.

"डॉक्टर काय झालंय नेत्राला? टेन्शन घेण्यासारखे काही नाही ना?"

"नाही नाही. डोन्ट वरी. काही नाही."

दहा ते पंधरा मिनिटात नेत्रा बाहेर आली. नेत्राच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज दिसत होते. तिने हर्षकडे पाहून एक गोड स्माइल दिली. हर्षला मात्र काहीच समजेना.

"डॉक्टर खरंच टेन्शन घेण्यासारखे काही नाही ना?" पुन्हा एकदा हर्षने विचारले.

"टेन्शन घेण्यासारखे नाही पण तरीही तुम्हाला यांची आता जास्त काळजी घ्यावी लागणार आहे."

"म्हणजे मी समजलो नाही डॉक्टर." काळजीच्या सुरात हर्ष बोलला.

"अहो आनंदाची बातमी आहे मिस्टर इनामदार, मिसेस नेत्रा आई होणार आहेत आणि तुम्ही बाबा."

"काय...?" क्षणभर हर्षचा त्याच्या कानांवर विश्वासच बसेना त्याच्या चेहऱ्यावर मग आपसूकच हास्य फुलले. त्याच्या तोंडून काही शब्दच फुटेनात.

हर्ष आणि नेत्राने एकमेकांकडे पाहून एक गोड स्माईल दिली. नजरेतूनच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला.
ह्या आनंदाच्या बातमीने नेत्राचा थकवा तर कुठच्या कुठे पळून गेला.

घरच्या सगळ्या टेन्शनमध्ये ते दोघेही ह्या आनंदाच्या क्षणाची वाट पाहत आहेत हे अगदी विसरुनच गेले होते. फायनली दुःखामागून सुखाची अलगद चाहूल लागली होती. नेत्रा मनोमन खूपच खूश झाली. हर्षचा आनंद तर त्याच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत होता. दोघांनाही एकदमच हर्षुची आठवण आली.

'हर्षुला समजले तर तिला प्रचंड आनंद होईल.' मनातच नेत्रा बोलली.

"मिस्टर हर्षवर्धन पुढचे काही दिवस यांना जपा, त्यांना जास्त टेन्शन देवू नका. धावपळ, दगदग होणार नाही याची काळजी घ्या. पहिले तीन महिने जरा महत्त्वाचे असतात. त्यामुळे उगीच रिस्क नको आणि उलट्या, मळमळ हे अगदी नॉर्मल आहे मिसेस इनामदार. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. तसे तुम्हाला जास्त काही समजवायची गरज आहे असे मला तरी वाटत नाही. बाकी तुमची ट्रीटमेंट सुरू होईल तेव्हा तुमचे गायनॅक पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित समजावून सांगतीलच. सो डोन्ट वरी आणि काही गरज पडलीच तर मी आहेच." हसतच डॉक्टर बोलले.

डॉक्टरांनी दोघांनाही अगदी शांतपणे समजावून सांगितले आणि तात्पुरती काही औषधं लिहून दिली.

"थँक्यू डॉक्टर, तसं काही वाटलंच तर मी फोन करतो." हर्ष बोलला.

"हो नक्कीच."

हर्ष आणि नेत्रा दोघेही मग दवाखान्याच्या बाहेर आले.

"नेत्रा मला वाटतंय तू आज ऑफिसला नको येऊस. मी घरी सोडतो तुला, तू आज घरीच आराम कर."

"काही नाही होत रे मी येते ऑफिसला."

"डॉक्टर काय म्हणाले ऐकलंस ना?"

"घरी थांबलं की उगीच टेन्शन येतं रे मला. त्यात आई धड बोलत नाहीत त्याचा आणखी त्रास होतो मला आणि कालच्या प्रसंगानंतर तर आता आई माझ्या सोबत चांगलं वागतील ही अपेक्षा तरी मी कशी ठेवू?" नाराजीच्या सुरात नेत्रा बोलली.

"असे काही होणार नाही. आता सगळं ठीक होईल. अजिबात काळजी करू नको. मी आहे ना आणि हा फक्त थोडे पेशंस ठेव." समजुतीच्या सुरात हर्ष बोलला.

"होप सो तसेच होवो."

"बरं चल मी घरी सोडतो तुला."

"ऐक ना हर्ष. मला येऊ दे ना रे ऑफिसला. खूप कामं पेंडिंग आहेत. आता ठीक आहे मी. मला काहीच होत नाहीये बघ आणि घरी तरी काय करणार रे? कामाची सवय लागलीये. दिवसभर बोअर होईल रे घरी. तसंही ऑफिसला कुठे काही ओझं उचलायचंय मला. त्यात आता उलट घरी जाण्यापेक्षा ऑफिसला जाऊयात. घरापेक्षा ऑफिस जवळ आहे."

"बरं बाई चल तू ऐकणार नाहीस, माहित आहे मला आणि तू किती हट्टी आहेस तेही माहीत आहे."

"हो का... असू दे मग."

"बरं चला मॅडम, निघुयात." गाडीचा दरवाजा उघडत हर्ष बोलला.

"थॅन्क्स हर्ष."

"थॅन्क्स काय त्यात. उलट थॅन्क्स तर मी म्हणायला हवं तुला. आज सकाळीच इतकं सुंदर गिफ्ट दिलंस तू मला." नेत्राचा हात हातात घेत हर्ष बोलला.

आपसूकच मग नेत्राच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल पसरली.

"आणि मागच्या काही दिवसांत मी तुझ्याशी खूपच रुडली वागलो त्याबद्दल खरंच खूप सॉरी."

"गप रे काहीही काय. परिस्थितीच तशी होती त्यात तुझी तरी काय चूक. उलट मला तुझा खूप हेवा वाटतो, तू तुझ्या प्रत्येक मतावर किती ठाम असतोस. माझं तसं होत नाही रे."

"कारण तू प्रत्येक वेळी बुध्दीने नाही तर भावनेतून विचार करतेस ना म्हणून. आपल्यामुळे कोणी दुखावला जाऊ नये हा प्रामाणिक उद्देश असतो तुझा. पण प्रत्येक वेळ इतकंही भावनिक होऊन चालत नाही मिसेस नेत्रा इनामदार आणि आता माझ्यामुळे तुला जो काही त्रास झाला असेल तो मी पूर्णपणे भरुन काढणार आहे. बाळाचा बाबा म्हणून आता माझी जबाबदारी सुद्धा वाढलीये बरं का."

"ए पण आता घरात हे असं वातावरण आहे, आई पण खूप चिडलेल्या आहेत. कसं सांगायचं आपण घरात? ही इतकी आनंदाची बातमी सर्वांना सांगायला तर हवीच ना."

"नाही..इतक्यात काहीच नाही सांगायचं. आईला आणि काकिला तर अजिबात नाही."

"अरे पण हर्ष असं कसं वागू शकतो आपण? काकींना नाही पण आईंना तर सांगायलाच हवं ना आणि माझी खात्री आहे, त्या आजी होणार आहेत म्हटल्यावर ह्या बातमीने त्यांचा राग थोडा तरी कमी होईल असं मला वाटतं. 'डॉक्टर काय म्हणाले ?' या प्रश्नाचं उत्तर तर मला द्यावंच लागेल ना."

"आताही जास्त भावनिक होतीयेस नेत्रा तू. इतक्याही अपेक्षा बऱ्या नव्हेत. आजी सोडून इतर कोण विचारणार आहे तुला? आईला आनंद होईल मान्य आहे पण जितका व्हायला हवा तितका होईलच असे नाही. त्यामुळे थोडे पेशंस ठेव. आईलाही जाणीव व्हायला हवी, ती चुकत आहे याची. तिलाही थोडा वेळ द्यायला हवा. त्यात आता कालच्या सगळया गोंधळामुळे तिचा तुझ्यावर आणखीच रोष वाढला आहे."

"सगळं ठिक आहे हर्ष, पण त्या चुकल्या म्हणून आपण पण चुकायचं?"

"हो..मुद्दाम करायचं असं."

"म्हणजे...?"

"म्हणजे आईला जाणीव करून द्यायची आपण. बोलून नाही तर वागण्यातून."

"ते कसं?"

"आपण जर ही एवढी मोठी गोष्ट आपणहून आईला सांगितलीच नाही तर तिला खूप त्रास होणार याची खात्री आहे मला आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने तिला जाणीव होईल ती कुठे चुकत आहे याची."

"हे असं होईल?"

"आता बुध्दीने विचार करणाऱ्या बिझनेमनचं डोकं आहे गं हे."

"हो का? बरं मग पाहुयात कितपत यश मिळतंय त्यात."

"हो..बघच तू. मला खात्री आहे."

"तुझी खात्री सत्यात बदलो. बरं चला उशीर होतोय ऑफिसला."

"आज चल ऑफिसला पण पुढचे काही दिवस घरीच थांब. रोज रोज प्रवास आणि जास्त धावपळ करायची नाही. आज ऐकलंय मी तुझं पण उद्या नाही...समजलं?"

"ओके सर." हसतच नेत्रा बोलली.

हर्षलाही मग हसू आले.

क्रमशः

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all