अनोळखी दिशा पर्व २ (भाग ४४)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, नेत्राची तब्बेत ठीक नसते त्यामुळे हर्ष तिला घेऊन दवाखान्यात जातो. नेत्राची आनंदाची बातमी येते. दोघांनाही खूपच आनंद होतो.

आता पाहुयात पुढे...

नेत्रा हट्ट करून ऑफिसला आली खरी पण थोड्याच वेळात तिला पुन्हा मळमळ आणि उलट्या सुरू होतात.

"सांगितलेलं ऐकायचं नाही. मग हे असं होतं.." रागातच हर्ष बोलला.

"सॉरी ना...सकाळी बरं वाटत होतं मला."

"आता अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही आ नेत्रा. आता ऑफिस आणि काम हे टेन्शन बंद करायचं. मी आहे हे सगळं पाहायला. आता फक्त स्वतःची काळजी घ्यायची. कधीतरी चेंज म्हणून ऑफिसला एखादी चक्कर मारली तर ते ठीक आहे. पण आता रोज रोज नाही."

"दिवसभर घरी काय करू यार मी?"

"छान पुस्तकं आणून देतो तुला. ती वाच आणि आजी आहेच गप्पा मारायला. ह्या दिवसांत काळजी कशी घ्यायची हे समजून सांगायला. आजी आहे त्यामुळे मला कसलेच टेन्शन नाही. हळूहळू आई देखील येईल पूर्वपदावर. मला खात्री आहे नेत्रा, आपले बाळ पुन्हा एकदा घरात आनंद घेऊन येणार."

"नक्कीच...मलाही खात्री आहे. देव करो नि लवकर तो दिवस येवो."

"बरं चल घरी जाऊयात. तुला सोडून येतो मी पुन्हा."

"अरे तू कशाला येतोस आता?  ड्रायव्हरला घेऊन जाईल ना मी."

"काही नको, मी येतो म्हणालो ना. तुला काही प्रॉब्लेम आहे का?"

"मला कशाला काही प्रॉब्लेम असेल. उलट तुला त्रास नको म्हणून म्हणाले मी."

"काही नाही त्रास चल."

"अरे समीर, मी जरा घरी जाऊन येतो. मॅडम पण नाहीयेत इथे. तू थोडा वेळ हॅण्डल करशील. एक दीड तासात येतो मी."

"डोन्ट वरी सर, नो प्रॉब्लेम. मी बघतो. जा तुम्ही."

थोड्याच वेळात दोघेही मग घरी पोहोचतात.

"काय रे काय झालं? अजूनही बरं वाटत नाही का नेत्राला?" हर्ष आणि नेत्राला असे अचानक घरी आलेले पाहून आजीने काळजीपोटी विचारले.

"हो ना आजी. तब्बेत जरा खूपच बिघडली तिची."

"काय गं तू पण. बाई जरा लक्ष दे गं स्वतःकडे. अरे पण डॉक्टर काय म्हणाले हर्ष?"

"काही नाही, औषधं दिलीत. बरं वाटेल म्हणाले."

समोरच्या खोलीतून नयना ताई त्यांचे बोलणे ऐकत होत्या. हर्षचे आईकडे लक्ष गेले. त्यामुळे तो पुढे जास्त काही बोलला नाही."

"नेत्रा जा तू रूममध्ये आणि आराम कर. थोड्या वेळाने जेवण कर आणि औषधं घेऊन झोप."

नेत्रा मग तिच्या खोलीत गेली.

"आजी इकडे ये, तुला एक सांगायचे आहे."

"काय रे..?"

"अगं तू पणजी आजी होणार आहेस." हळूच हर्ष आजीच्या कानात बोलला.

"अरे वा.. काय सांगतोस..खरंच का की आजीची खेचायची लहर आली?"

"हो गं... खरंच...तुझी शपथ. पण हळू बोल. अगं ह्या सगळ्या गोंधळात आमच्याही लवकर लक्षात आले नाही. त्यामुळेच रात्री उलट्या होत होत्या तिला."

"अरे माझ्याही कसं लक्षात आलं नाही हे... आणि तू म्हणालास तिने टेन्शन घेतलंय, जागरण करते मग मला तेच खरं वाटलं. त्यात तुमच्या या आजकालच्या पिढीचे ते प्लॅनिंग का काय ते खूपच अवघड असते बाबा. पण हा निर्णय उत्तम घेतलात तुम्ही आणि वेळेत घेतलात हे महत्त्वाचं."

"बरं आजी मी येतो आता. नेत्राकडे लक्ष दे आणि तिला जेवायला सांग."

' हो रे. मी आहे इथेच."

"आणि ऐक ना...आईला सांगू नको इतक्यात."

"आता हे काय नवीन?"

"तू ऐक ना माझं. मी नंतर सांगतो सगळं."

"बरं बाबा. नाही सांगत. जा आता."

' ह्या आजी आणि नाताच्या काय एवढ्या गप्पा सुरू होत्या? नक्कीच काहीतरी कट शिजत असणार.' नयना ताई विचार करू लागल्या.

न राहवून आजी नेत्राच्या खोलीत गेल्या.

नेत्रा मोबाईलमध्ये टाईमपास करत बसली होती.

"अगं आराम करायला सांगितलाय ना तुला?"

"आता तेच करतिये ना आजी. रिकामं बसून काय करू? झोपही येत नाही."

"आता हे असंच होणार सुरुवातीला काही दिवस."

"म्हणजे हर्षने सांगितलं तुम्हाला?"

"माझा हर्ष माझ्या पासून कधी काही लपवून ठेवेल का..लहान होता तेव्हा शाळेतून घरी आल्याबरोबर दप्तर टाकलं की दिवसभरात काय काय घडले याची इत्यंभूत माहिती सांगितल्याशिवाय त्याला चैन पडायची नाही. जोपर्यंत सगळं सांगून होत नाही तोपर्यंत मांडीवरुन खाली उतरायचा नाही बहाद्दर."

"किती छान ना आजी."

"आता तुलाही बाळ होईल. फक्त या बातमीनेच पुन्हा एकदा ते जुने दिवस आठवले बघ."

"आता मला रोज ह्या अशा आठवणी सांगायच्या आ आजी. माझ्या कामामुळे आपल्याला असा निवांत वेळ कधी मिळालाच नाही ना गप्पा मारायला."

"हो ना.. पण आता ती सगळी कमी भरुन काढूयात आपण." हसतच आजी बोलल्या.

"आजी...मला आईंकडून पण हे सगळं काही ऐकायचं आहे ओ. काय माहित त्यांचा राग कधी जाईल." नाराजीच्या सुरात नेत्रा बोलली.

"तू काळजी करू नकोस. नयना तशी नाही गं. तिला ह्या निलमने फितवलं म्हणून. पण लवकरच तिला तिची चूक कळेल."

"बरं आता चल जेवायला. आधीच हर्षने तुझ्यावर लक्ष द्यायला सांगितलंय मला."

"भूक तर लागली आहे आजी पण पुन्हा उलटी होईल याची भीती वाटतिये."

"अगं मग काय उपाशी राहतेस का? आणि गोळी दिली असेल ना डॉक्टरांनी जेवणाआधीची. ती घे मग नाही होणार उलटी."

"हो ते तर विसरलेच मी."

"आता असा विसरभोळेपणा अजिबात करायचा नाही. गोळी घे आणि ये जेवायला." आजी म्हणाल्या आणि त्या पुढे गेल्या.

"नयना...चल जेवून घे."

आजीने सुनेला आवाज दिला. तेवढ्यात पाठोपाठ नेत्रा आली.

"आई तुम्ही जेवा मी जेवते नंतर." नेत्राला पाहून नयना ताई बोलल्या.

"बस झालं नयना. अजून किती दिवस असं तोंड फिरवणार आहेस? गुपचुप जेवायला चल. उगीच मला सासूगिरी करायला भाग पाडू नकोस आणि लहान मुलासारखं तर बिलकुल वागू नकोस. त्या निलमच्या नादाला लागून तुझंही डोकं काम करेना झालंय. नको तिथे जास्त चालतंय तुझं डोकं. माणसं ओळखायला शिक जरा. सगळं करून काल तिने हात वर केलेच ना आणि तू ठेव अजून तिच्यावर विश्वास. आज मी शेवटचं सांगतिये... आजपासून हे रुसवेफुगवे, हे गैरसमज, हे वादविवाद सगळं बंद म्हणजे बंद. पहिल्यांदा जसे घर हसते खेळते होते अगदी तसेच हवे आहे मला आणि तुम्ही दोघी सासू सूना...जे काही गैरसमज झालेत ते आधी मिटवा. काय म्हणतीये मी समजतंय का दोघींनाही?" आजीने दोघींनाही चांगलाच दम भरला.

"हो आजी." लगेचच नेत्रा उत्तरली.

"तुझं यावर काय म्हणणं आहे नयना?"

"आई माझ्या हर्षुची मला काळजी वाटतेय बस. हिला कळत नाही का हे?"

"हर्षुची काय काळजी वाटायची? घरात काय कमी लोक आहेत का तिची काळजी करायला? अगं ती वकील झालिये, ती तिचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी समर्थ आहे आता. आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे आणि काय गं काय कमी आहे आदित्यमध्ये? उलट नेत्राचा भाऊ म्हणजे आधीच सगळ्या गोष्टी खात्रीशीर माहीत आहेत आपल्याला. तरीही फक्त तोलामोलाचं स्थळ नाही म्हणून इतक्या चांगल्या मुलाला नाही म्हणणे मला तरी पटत नाही आणि लेकरांच्या मनाविरुद्ध जाऊन आपण आपलंच खरं करायचं का गं? त्या निलम पासून फक्त दोन दिवस लांब राहा म्हणजे बघ तुझी सगळी अक्कल जागेवर येते की नाही ते."

"आई बस करा ना. का माझी अक्कल काढताय दरवेळी?"

"तू जेव्हा त्या निलमचं ऐकून स्वतःच्याच सुनेच्या आणि मुलाच्या विरोधात उभी राहिलीस ना तेव्हाच तू दाखवून दिलंस आणि मी कोण गं तुझी अक्कल काढणारी, तुला तुझं समजत नाही तर त्याला मी तरी काय करणार? जेवढं समजवायचं माझं काम होतं तेवढं मी केलंय...बाकी आता तुझा निर्णय तुझ्या हातात. नेत्रा तू बस गं इथे. सासू रागावली म्हणून लगेच मनाला लावून घेवू नकोस. तुम्ही दोघीही सारख्याच आहात. मनाला लावून घ्यायचं आणि बसायचं रात्र रात्र जागरण करत. मग पडायचं हे असं आजारी. नंतर तुमचे नवरे आहेतच तुमची काळजी वहायला. कधी तरी त्यांचा पण विचार करा."

"सॉरी आई...पण तुम्ही तरी समजून घ्या ना ओ."

"का वागतेस मग असं? अगं इतकी गुणी सून तू माझी. किती कौतुक आहे मला तुझं आणि हे असं वेड्यासारखं वागायचं का? हर्ष, नेत्रा, हर्षु सगळेच वेडे आहेत समज पण माधव...त्याच्यावर तुझा विश्वास नाही का? अगं बापाच्या पावलावर पाऊल ठेवत हिमतीने तो आजही उभा आहे. चांगलं वाईट यातला फरक त्याला कळणार नाही का? मग हर्षुच्या बाबतीत तो काही चुकीचं होऊन देईल का? आणि नेत्राला एकदा तरी बोलायची संधी दिली का तू? बसून बोलून प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न केलास का? असं वागतात का नयना? किती वेळा अलर्ट केलं होतं मी तुला... तरी त्या निलमच्या नादाला लागून इतकं टोकाचं पाऊल उचललंस. एकदा माझ्याशी बोलायचं ना. नको गं असं करू. बघितलं ना आता काय झालं त्यामुळे."

"आई...सोडा ना आता सगळं. चला बरं जेवायला. तुम्ही जेवल्याशिवाय मीही जेवणार नाही." नेत्राने दोन पाऊल पुढे येत सासूची मनधरणी केली.

"बस झालं..नको आता जास्त मस्का मारू." नजर चोरतच नयना ताई म्हणाल्या.

"चला जेवायचं ना आता. बडबड करून मला भूक लागली. अजून किती जीव घेणार आहात ह्या म्हाताऱ्या माणसाचा काय माहित बायांनो. आतातरी शहाण्या व्हा गं."

क्रमशः

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all