अनोळखी दिशा पर्व २ (भाग ४५)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, हर्षने आजीला नेत्राची आनंदाची बातमी सांगितली. आजीला खूपच आनंद होतो. आतातरी घरातील वातावरण चांगले व्हावे म्हणून आजीने नयना ताईंना कठोर भाषेत पण वेळीच समज दिली.

आता पाहुयात पुढे...

आजीने समजावल्यानंतर नयना ताईंमधे थोडा सकारात्मक बदल जाणवत होता.

दुपारी आराम केल्यानंतर नेत्राला थोडे बरे वाटत होते. फ्रेश होऊन ती रुममधून बाहेर आली. नयना ताई किचनमध्ये होत्या. तीही मग किचनमधे त्यांच्या मदतीसाठी गेली.

संध्याकाळी हर्षु जेव्हा घरी आली तेव्हा नेत्रा आणि नयना ताई दोघीही किचनमधे तिला एकत्र गप्पा मारताना दिसल्या.

"आजी...हे काय पाहतिये मी? कालच्या महाभारतानंतर आज हे चित्र अपेक्षित नव्हतं मला." शॉक बसल्यागत हर्षु आजीला म्हणाली.

"कोणामुळे झालं हे महाभारत आधी ते सांग?" आजीने प्रश्न केला.

"काकीमुळे?" लगेचच हर्षु उत्तरली.

"तिच्यामुळे तर झालंच गं, पण तुझ्यासाठी सगळे भांडत आहेत आपसात. म्हणजे तूही याला तितकीच कारणीभूत आहेस हो."

"माझ्या भविष्याची सगळ्यांनाच चिंता आहे, मग मी तरी काय करू? पण माझी निवड काय चुकीची आहे का गं आजी, तूच सांग."

"चुकीची असती तर आम्ही नयनाच्या बाजूने उभे नसतो का राहिलो शहाणे."

"चला...म्हणजे आई सोडून मी सगळ्यांच्याच परीक्षेत पास झाले असं म्हणायला हरकत नाही आता."

"लवकरच आईच्याही परीक्षेत पास होशील. पण त्याआधी आदित्यने त्याच्या परिक्षेत पास व्हायला हवं बरं का."

"होणार गं. आता परीक्षा मंडळाला लेटर लिहावं लागेल की लवकर लवकर परिक्षा घ्या म्हणून. म्हणजे त्याचा निकाल पण लवकर लागेल आणि इकडे आईच्या परिक्षेत मलाही लवकर पास होता येईल." हसतच नेत्रा बोलली.

"ह्ममम...तेवढंच बाकी आहे आता...जा हातपाय धुऊन घे आधी आणि मग गप्पा मारत बस. तिकडे सासू सुनेने स्पेशल चहा बनवलाय. घरभर कसा चहाचा सुगंध पसरलाय बघ."

"हो ना आजी, आज खूप दिवसांनी असा सुगंध आला नाही."

"हो मग..आज सासू सुनेचे प्रेम आहे त्यात.";

"बरं आलेच मी. पण काय गं आजी, दादा कुठे दिसत नाही. त्याने पाहिला का हा सासू सुनेचा अद्भूत नजारा?"

"तो ऑफिसला गेलाय गं."

"मग वहिनी काय सासू सूनेतील भांडण मिटवायला लवकर घरी आली?"

"ते नंतर सांगते. खूप मोठं सरप्राइज आहे तिच्याकडे. तू जा बरं आधी कपडे बदलून हातपाय धुऊन ये."

"ये आजी सांग ना पण. समजत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार."

"मी नाही तीच सांगेल ना तुला."

"तू सांगितलं तर काही फरक पडेल का?"

"बरं इकडे ये सांगते... अगं तू आत्या होणार आहेस." न राहवून आजी हर्षुच्या कानात बोलली.

"काय...? आजी खरंच?" आनंदाच्या भरात हर्षु मोठ्याने ओरडली.

"मग काय खोटं? पण हळू बोल ना. किती मोठ्याने ओरडतेस."

नयना ताई आणि नेत्राने दोघींनीही एकदमच मागे वळून पाहिलं

"हिला काय होतं मध्येच काही कळत नाही." नयना ताई तोंडातच पुटपुटल्या.

"आजी माझा विश्वास बसत नाहीये गं." हर्षु म्हणाली.

तेवढ्यात नेत्रा चहा घेऊन आली.

"काय गं कशावर विश्वास बसत नाहीये तुझा? आणि कधी आलीस काही समजलं पण नाही. मोठयाने ओरडण्याचा आवाज आला तेव्हा समजलं तू आलीस म्हणून." नेत्रा म्हणाली.

"नाही गं...जेव्हा तुम्ही सासू सून गप्पांत बिझी होतात तेव्हाच आले बरं मी." खोचकपणे हर्षु बोलली.

"हो का..!"

"वहिनी..वहिनी..वहिनी ते जाऊ दे सगळं, पण मी खूप म्हणजे खूप खुश आहे आज." नेत्राला मिठी मारण्यासाठी हर्षु पुढे झेपावली.

"अगं...अगं.. अगं..चहा सांडेल."

"तो चहा ठेव गं खाली." नेत्राच्या हातातून चहाचा ट्रे घेऊन हर्षुने तो टीपॉयवर ठेवला आणि नेत्राला एक घट्ट मिठी मारली.

हर्षु आणि नेत्राचे नेमके काय सुरू आहे? हे नयना ताईंना मात्र समजेना.

"फायनली माझं गिफ्ट मला भेटणार आता." मोठ्या आनंदात हर्षु बोलली.

"म्हणजे बातमी पोहोचली वाटतं तुझ्यापर्यंत. आजी तुम्ही पण ना. हर्ष आणि मी मिळून सरप्राइज देणार होतो ना तिला. तुम्ही कशाला सांगितलं लगेच."

"बरं वहिनी...सांगू देत ना. काय होतंय त्याला आणि काय गं एक सांग मला ह्या बातमीमुळेच आईचा राग शांत झालाय वाटतं. सासू सुनेचे खूपच प्रेम उतू आलं बाबा.?"

"गप गं... टोमणे मारू नकोस.. आईंना अजून माहितीच नाहीये काही."

"मग हा सगळा चमत्कार कसा काय घडला? आईचा तुझ्यावरचा राग कसा काय गेला?"

"अजून पूर्ण राग गेला नाही गं. एवढं सगळं झालं म्हटल्यावर मनात अढी तर राहणारच ना. पण ही बातमी समजल्यावर आईंचा राग नक्की जाणार याची खात्री आहे मला."

"पण तरीही हा चमत्कार कसा काय घडला?"

"चमत्कार घडला नाही, मी घडवून आणला." आजी म्हणाल्या.

"म्हणजे?"

"म्हणजे केली थोडी सासूगिरी आणि न ऐकायला ती काही निलम नाही. माझी नयना आहेच गुणाची आणि तितकीच भोळी. कोणाच्याही शब्दात येते पटकन्. तेच तिला समजावून सांगितलं."

"तू ग्रेट आहेस पण आजी. अशी सासू प्रत्येकाला मिळावी. काश मेरी होनवाली सास भी तुम्हारे जैसी होती आजी."

"हर्षु... अगं काय हे! बस झाली तुझी नौटंकी. अगं नेत्रा समोर तरी नको बोलू असं."

"आज मला खूप आनंद झालाय. म्हणून भावनेच्या भरात बोलले गं वहिनी. त्याबद्दल सॉरी."

"गप गं..मला नाही राग आला."

"अगं घरात आता एवढी आनंदाची बातमी आलीये म्हणून मला आता कोणतेही वाद नकोयेत. बरं आणखी एक गोष्ट, नेत्राची आनंदाची बातमी नयनाला कळू द्यायची नाही इतक्यात. असं हर्षने बजावलंय आ. बाकी तुम्ही तुमचं पहा."

"आजी हे नाही मला पटलं त्याचं. आता आई थोड्यातरी झाल्यात ना नॉर्मल हे त्याला माहीत नाहीये. पण आपल्याला माहीत आहे ना. मग आपण आता आईंना सांगायला काय हरकत आहे?" नेत्रा म्हणाली.

"ते तुम्ही तुमचं पहा मला घेऊ नका त्यात. तो जर काही बोलला तर मी तुमचंच नाव सांगेल."

"बरं राहू द्या. चहा घ्या आधी. थंड होईल नाहीतर."

"वहिनी मी आलेच पटकन चेंज करून...इस खुशी मे आज मस्तपैकी सोबत टी पार्टी करुयात." असे बोलून हर्षु घाईतच तिच्या खोलीत गेली.

"लवकर ये गं. चहा थंड होइल."

"आई तुम्ही पण या ना इकडे. तिकडे का एकट्याच उभ्या आहात?" नेत्रा नयना ताईंना म्हणाली.

"तुमचं काहीतरी महत्त्वाचं बोलणं सुरु होतं म्हणून नाही आले आणि ही अशी का वागत होती? तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून?" नयना ताईंनी विचारले. सर्वांचेच वागणे त्यांना थोडे विचित्र वाटत होते म्हणून लगेचच त्यांनी प्रश्न केला.

"काही नाही आई..तुम्ही चहा घ्या." नेत्राने चहाचा कप नयना ताईंच्या हातात देत विषय बदलला.

"आलीस हर्षु, हा घे चहा. तुला बिस्कीट हवंय?" नेत्राने विचारले.

"हो..पण तू थांब मी घेऊन येते. आता सारखी सारखी उठबस करायची नाही आ वहिनी..समजलं."

लगेच नयना ताईंनी तिच्याकडे पाहिले.

भावनेच्या भरात हर्षु पटकन् बोलून गेली. पाठमोरी होताच तिने दाताखाली जीभ चावली.
'एवढं सांगूनही खाल्लीस माती.' मनातच ती बोलली आणि तशीच पुढे निघून गेली.

' नेत्रा.. काय म्हणाली गं ही?"

"कुठे काय मी नाही ऐकलं. तुम्हाला हवंय का आई बिस्कीट?" नजर चोरत नेत्रा उत्तरली आणि पुन्हा मग विषय बदलला.

"नाही नको." नयना ताई मात्र विचारांत पडल्या.

"तेवढ्यात हर्ष घरी आला."

सासू सुनेला शेजारी बसलेले पाहून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

पाठोपाठ माधवराव देखील आले. त्यांच्यासाठीही हा सुखद धक्काच होता.

"एकदम वेळेत आलात..जा फ्रेश होऊन लवकर या, चहा तयारच आहे." आजी म्हणाल्या.

आज खूप दिवसांनी सगळे असे एकत्र जमले होते. वातावरण आता पुन्हा पूर्वीसारखं होण्याच्या मार्गावर दिसत होतं.

थोड्याच वेळात दोघेही फ्रेश होऊन आले.

"काय गं आजी आपल्या काकी साहिबा दिसत नाहीत. कुठे आहेत कुठे त्या?"

"गेली सकाळीच माहेरी."

"कसं काय बरं?"

"आता सगळं अंगाशी आलं ना. त्यात महेशदेखील तिच्या विरोधात गेला मग तिचं ऐकून घेणारं कोणीतरी असायला हवं ना?"

"हो ते पण आहेच आणि काय गं आजी, हिने गोळ्या घेतल्या का दुपारी? आज नाही ना उलट्या काढल्या? महत्त्वाचं म्हणजे जेवली ना आज पोटभर?"

"हो रे... जेवणंही केलं, गोळ्याही घेतल्या आणि उलट्याही नाही काढल्या." हसतच आजी म्हणाल्या.

"नेत्रा आता कशी आहे गं तब्बेत?" तेवढयात माधवरावांनी देखील तोच प्रश्न केला..

"ठीक आहे बाबा, हे घ्या चहा."

नेत्राने सर्वांना चहा दिला खरा पण आता चहाच्या वासाने तिला मळमळ व्हायला सुरुवात झाली. कोणाला काही कळायच्या आत तोंड दाबून धावतच ती बाथरुमध्ये गेली. आता कितीही लपवले तरी नयना ताईंपासून थोडीच ना हे लपून राहणार होते.

"हर्ष नेमकं काय झालंय नेत्राला?" नयना ताईंनी विचारले.

"तुला काय वाटतंय काय झालं असेल?" चहात बिस्कीट बुडवत, नजर खाली झुकवत हर्ष बोलला.

नयना ताईंनी सर्वांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांनीच खाली नजर झुकवली होती.

"मी सोडून सगळ्यांना माहीत आहे ना नेत्राला काय झालंय?"

"असं काही नाहीये नयना, आम्हालाही आजच समजलंय. म्हणजे अगदी त्या दोघांनाही." आजी बोलल्या.

"आणि मला तर आता येताना अगदी दहा मिनिटापूर्वी समजलं." माधवराव म्हणाले.

"म्हणजे मी आजी होणार आहे ही बातमी खरी आहे का आई?"

"हो गं..खरी आहे." आजी उत्तरल्या.

नयना ताईंच्या चेहऱ्यावर मग आनंदाचे हसू फुलले. डोळ्यांत नकळत पाणी आले. त्यांनी प्रेमाने हर्षकडे पाहिले.

"नयना...झालंगेलं सगळं विसरून जा आणि आता नेत्राची काळजी घ्यायची जबाबदारी तुम्हा दोघींची, समजलं?" माधवरावांनी आदेश दिला.

"दोघींची नाही, तिघींची. मला विसरले ना बाबा." लटक्या रागात हर्षु बोलली.

"नाही गं..तुला कसा विसरेन. आता तुझे आणि हर्षचे बालपण पुन्हा एकदा बाळाच्या रुपात जगायचे आहे आम्हाला."
लगेचच हर्षु माधवरावांना जाऊन बिलगली.

तिने नयना ताईंकडे पाहिले, त्यांच्या डोळ्यात लेकीसाठीची ओढ हर्षुला प्रत्यक्ष दिसली. खूप दिवसांपासून माय लेकींमधे मतभेद सुरू होते. ते मिटवण्याची हीच योग्य वेळ होती.

"आई..." म्हणत हर्षु लगेचच नयना ताईंच्या गळ्यात पडली. इतक्या दिवसांनी आज लेकीने आईला मिठी मारली. त्यामुळे नयना ताईंना भरुन आले.

"सॉरी आई...मी खूप दुखावलंय तुला?"

"मीही खूप दुखावलंय तुला. जमलं तर मला माफ कर."भावूक स्वरात नयना ताई बोलल्या.

एवढं सगळं होऊन देखील एका आनंदाच्या बातमीने  घरातील वातावरणच कसे बदलून गेले होते. सर्वांचे चेहरे आनंदाने खुलले होते. पण निलम काकी पुन्हा घरी येईल तेव्हा तिने ह्या आनंदात विरजण नाही टाकले म्हणजे मिळवलं.

क्रमशः

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all