अनोळखी दिशा पर्व २ (भाग ४७)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, निलम काकीच्या आईने देखील तिच्या सासरच्या लोकांची बाजू घेऊन तिलाच चुकीचे ठरवले. त्यामुळे रागातच ती पुन्हा सासरी परतली. त्यातच माधवरावांनी आदित्यला घरी जेवायला बोलवायचे ठरवले. नयना ताईंनी देखील होकार दिला. त्यांनीही आता आदित्यला भावी जावई म्हणून स्वीकारले होते.

आता पाहुयात पुढे...

माधवरावांनी वेळात वेळ काढून आदित्यला फोन करून त्याच्या सक्सेससाठी त्याचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. त्याबरोबरच त्याला जेवणासाठी इनव्हाइटदेखील केले.

आदित्यसाठी हे सर्व अनपेक्षित होते. मनातून त्याला खूपच आनंद झाला. 'कधी एकदा ही बातमी हर्षुला सांगतोय' असे झाले होते त्याला. पण माधवरावांनी हे हर्षु आणि नेत्राला कळू द्यायचे नाही असे बजावले. त्या दोघींसाठी हे सरप्राइज असणार होते.

"आई आज संध्याकाळी यांनी आदित्यला घरी जेवायला बोलावले आहे." नयना ताईंनी ही गोष्ट आजीला सांगितली.

"अरे वा..हो का? पण तुझी परवानगी आहे ना त्यासाठी?" मुद्दाम आजीने सुनेचे मत जाणून घेण्यासाठी असा प्रश्न केला.

"हो आई. तुम्ही सगळ्यांनी आदित्यवर जो विश्वास दाखवलाय तो त्याने देखील सार्थ केलाय. आता माझीही खात्री पटली आहे की यापुढेही तो असाच यश मिळवेल."

"गुणी पोरगं आहे गं ते. तू म्हणते अगदी तसेच होईल बघ."

"बरं आई मी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते."

"हो हो...काही मदत लागली तर मला आवाज दे, मी आहे इथेच."

नयना ताईंनी मग होणाऱ्या जावयासाठी जेवणाचा खास बेत केला. हर्षु आणि नेत्राला मात्र यातील काहीच माहीत नव्हते.

संध्याकाळी सात साडे सातच्या आसपास आदित्य इनामदारांच्या घरी पोहोचला. माधवराव त्याची वाटच पाहत होते.

नयना ताई किचनमध्ये होत्या तर नेत्रा देवापुढे दिवा लावत होती. 

आज खास पाहुणे येणार आहेत असे माधवरावांनी घरात सांगितले होते. त्यासाठीच आईची स्वयंपाकाची गडबड सुरू आहे. एव्हढेच  हर्षुला माहीत होते. पाहुणे आले, असे म्हणताच हर्षुने मात्र तिच्या खोलीत धूम ठोकली.

"अरे आदित्य ये ना...कसा आहेस?" माधवरावांनी विचारले.

"मी एकदम मस्त काका."

आदित्यला अचानक असे समोर पाहून नेत्राला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.

"आदित्य तू आणि ह्यावेळी? येणार होतास तर एखादा फोन तर करायचा ना." नेत्रा म्हणाली.

आदित्य एवढ्या उशिरा नेत्राच्या घरी आल्यामुळे तिलाही थोडे टेन्शनच आले होते. लास्ट टाईम निलम काकीने आदित्यचा केलेला अपमान आजही ती विसरली नव्हती.

"अगं दी..पेढे घेऊन आलो होतो तुम्हा सगळ्यांसाठी."

"पण तरीही, एक फोन तर करायचा ना! आणि लवकर यायचं थोडं. किती उशीर झालाय आता."

"अगं आलाय ना तो आता. एवढं काय ऐकवतेस त्याला. सांगून नाही आला म्हणून काय झालं? तो त्याच्या बहिणीच्याच घरी आला आहे ना, का कोणा परक्याच्या?"आजीने नेत्रालाच दम भरला.

"आदित्य तिचं काही मनावर घेऊ नकोस. बरं झालं आलास."

"आजी... हे घ्या पेढे. नंतर एकदमच द्या सगळ्यांना." पेढ्यांचा बॉक्स आजीच्या हातात देत आदित्य बोलला.

त्यानंतर त्याने आजी आजोबांचा आशीर्वाद घेतला.

"यशस्वी भव:...खूप मोठा हो आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत." आजी आजोबांनी आदित्यला मनापासून आशीर्वाद दिला.

तेवढ्यात नयना ताई आदित्यसाठी पाणी घेऊन आल्या.

"अभिनंदन आदित्य." पाण्याचा ग्लास आदित्यच्या हातात देत नयना ताई बोलल्या.

नयना ताईंचे आदित्य प्रतीचे आपुलकीचे वागणे पाहून नेत्रा मनोमन सुखावली.

आदित्यने मग नयना ताई आणि माधवरावांचा देखील आशीर्वाद घेतला.

"ताई तू कशी आहेस?" आदित्यने विचारले आणि तिचा आशीर्वाद घेण्यासाठी तो खाली वाकला.

"अरे अरे काय करतोस हे आदित्य. माझ्या कशाला पाया पडतोस?"

"कशाला म्हणजे काय? तुझा मान आहे तो आणि तुझा आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुला नाही समजणार."

"हो का.." प्रेमाने नेत्राने आदित्यला जवळ घेतले आणि त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

"तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि नक्कीच त्या होणार याची खात्री आहे मला.
बाबा माहितीये, माझ्या प्रत्येक सुख दुःखाचा हा साक्षीदार आहे. आईने माझा कितीही राग केला तरी हा त्याच्या बहिणीच्या पाठीशी नेहमी भक्कम उभा राहिला. आई बऱ्याचदा त्याला चोरुन लपून खाऊ द्यायची पण हा वेडा काय करायचा माहितीये, त्यातला अर्धा खाऊ नेहमी माझ्यासाठी लपवून ठेवायचा आणि आईच्या नकळत हळूच मला आणून द्यायचा. बाबांनंतर त्या घरात आदित्य होता माझी काळजी घेणारा. लहान जरी असला तरी माझ्यासाठी नेहमीच मोठा व्हायचा. त्यामुळे कितीही त्रास झाला तरी आदित्य माझ्या प्रत्येक जखमेवर अलगद फुंकर घालायचा. पण त्यावेळी तोही हतबल होता हे क्षणोक्षणी जाणवायचे मला. पण आता तोच माझा भाऊ आता खऱ्या अर्थाने मोठा झाला, यावर विश्वासच बसत नाहीये माझा."

"दी...जुन्या गोष्टी आता कायमस्वरुपी विसरुन जा. विचारांत सुद्धा नको आता त्या. यापुढे हा तुझा भाऊ त्या त्रासदायक अशा आठवणींच्या जागी नव्या सुखद आठवणींची पेरण करणार आहे. यापुढच्या सगळ्या आठवणी सुखदच असतील याची खात्री देतो मी."

दोघा भावंडांना असे भावूक झालेले पाहून माधवरावांना भरुन आले. त्यांनी लगेच विषय बदलला.

"नेत्रा... अगं हर्षुला बोलावतेस का गं."

"हो बाबा...बोलावते."नेत्रा म्हणाली.

"फक्त मी बोलावलंय म्हणून सांग. बाकी काही बोलू नकोस." माधवराव म्हणाले.

लगेचच नेत्राने मग हर्षुला निरोप दिला. तशी हर्षु लगेचच बाहेर आली.

"काय हो बाबा बोलावलं का मला?"

"हो.."

तेवढ्यात हर्षुला समोर आदित्य दिसला.

"आईशप्पथ... तू कधी आलास?" हर्षुला आनंदाचा सुखद धक्का बसला.

"हे काय तू पाहिलं तेव्हाच आलो." हसतच आदित्य उत्तरला.

"बाबा आणि तुमचे पाहुणे? ते नाही आले का मग?"

"आलेत ना..हे काय तुझ्या समोर आहेत. हेच माझे पाहुणे."

"म्हणजे..? मी समजले नाही बाबा."

"त्यात काय समजायचे. अगं आदित्यच येणार होता, अजून दुसरे कोणी पाहुणे येणार नाहीत."

"याचा अर्थ आजचा हा सगळा बेत फक्त आदित्यसाठी आहे?" हर्षुने विचारले.

"हो मग..तुला काय वाटलं?"

"काहीच नाही." नजर चोरत हर्षु उत्तरली. हे ऐकूनही नेत्रालाही खूप आनंद झाला.

आदित्य प्रती सर्वांचे बदललेले वागणे पाहून हर्षुला आणि नेत्राला आदित्यचा खूपच अभिमान वाटला.

खरंच आदित्यने जिद्दीने आणि त्याच्या मेहनतीच्या बळावर सर्वांच्या नजरेत मानाचे स्थान मिळवले होते.

'आय एम प्राउड ऑफ यू डियर. फायनली तू सगळ्यांना बदलायला भाग पाडलंस आदित्य. खरंच तुझी मेहनत आज खूप कामी आली बघ. आता पुढची लढाई देखील अशीच जिद्दीने लढ. आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत.' नजरेतूनच हर्षुने तिच्या भावना व्यक्त केल्या.

"अभिनंदन साले साहेब." तेवढ्यात हर्ष दारातून एन्ट्री घेत बोलला.

"थॅन्क्स भाऊजी."

"खूप महत्त्वाचा टप्पा पार केला तू. आता पुढची लढाई कितीही अवघड असली तरी तू ती नक्की जिंकणार याची मलाच नाही तर सर्वांनाच खात्री आहे."

हातातील केकचे पार्सल टेबलवर ठेवत हर्ष बोलला.

"हे सगळे यश माझे एकट्याचे नाही. त्यात सर्वात मोठा हात हर्षुचा आहे. तिचे प्रोत्साहन, वेळोवेळी मिळणारे कौतुक आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे तिचा समजूतदारपणा या सर्व गोष्टींमुळे हे शक्य झालंय. तिच्यामुळे मी मोठी मोठी स्वप्न पहायला शिकलो आणि आता तिच्यासाठी मी ती स्वप्न जगतोय. खऱ्या अर्थाने आयुष्य काय आहे ते आता कुठे मला समजतंय आणि माझी लाडकी दी..तिच्या आशीर्वादाशिवाय तर हे सारे काही अशक्यच आहे. त्याबरोबरच तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा देखील तितक्यात इम्पॉरटंट आहेत माझ्यासाठी."

आदित्यचे आजचे हे समजूतदारपणाचे वागणे आणि बोलणे पाहून नेत्राला भावाचा प्रचंड अभिमान वाटला. नयना ताईंचा देखील आदित्यकडे पाहण्याचा दृष्टिकोन क्षणात बदलून गेला.

"बरं आपण हा केक आधी कट करुयात का? म्हणजे मग आदित्यची सक्सेस पार्टी सेलिब्रेट केल्याचा फील येईल."

"काय हे भाऊजी.. हा केक वगैरे कशासाठी?"

"फक्त तुझ्यासाठी, तुझ्या यशासाठी आणि माझ्या या वेड्या बहिणीच्या आनंदासाठी."

"थँक्यू सो मच दादा."

हे सर्व पाहून हर्षुच्या डोळ्यांत पाणी आले. तिच्यासाठी हे सर्व स्वप्नांच्या पलीकडचे होते. तिने स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता की तिच्यासाठी हा दिवस इतका सुंदर असणार आहे.

सर्वांच्या आग्रहास्तव आदित्यने मग केक कट केला.

थोड्याच वेळात सर्वांनी एकत्र जेवण केले. नयना ताईंनी प्रेमाने आपल्या होणाऱ्या जावयाचा पाहुणचार केला. त्यांनीही आता आदित्यला जावई म्हणून स्वीकारले होते. हर्षुसाठी हे खूप मोठे सरप्राइज होते. आज आदित्य बरोबरच नेत्रा देखील अगदी भरून पावली होती. तिच्यासाठी सुद्धा हे सर्वकाही स्वप्नवत होते.

"आदित्य...लवकरच आपल्याला फायनल रिझल्टची पार्टी देखील अशीच सेलिब्रेट करायची आहे बरं का." हसतच माधवराव म्हणाले.

"बाबा...अशीच नाही तर यापेक्षा खूप मोठी." हर्ष म्हणाला.

"हो नक्कीच."

"बरं ॲडव्होकेट हर्षिता इनामदार आजच्या या सरप्राइज विषयी तुम्हाला काही बोलायचे आहे का? नाही म्हणजे बोलावेच लागेल." हर्षने ग्लासचा माईक करत हर्षु समोर धरला.

"दादा...काय हे लहान मुलासारखं..तू पण ना." हर्षु म्हणाली.

"अगं लाजायचं नाहीये बोलायचं आहे." हर्षला हर्षुची खेचायची थोडी लहर आली होती.

"आजचे तुमचे हे सरप्राइज मला मनापासून आवडले. त्यासाठी थँक्यू सो मच."

"झालं एवढंच? बरं काही हरकत नाही. पुढच्या वेळी मोठं भाषण ठेऊयात तुमचं. तेव्हा छान तयारी करून बोला ."

"बरं बस ना दादा आता...किती ॲक्टिंग करशील. त्याला उशीर होतोय जायला तुझं काय सुरू आहे."

"बघ आदित्य ही आताच हाकलून देत आहे तुला. पुढे कसे होणार?" गमतीच्या सुरात हर्ष बोलला.

"नाही नाही तसं काही नाही पण खरंच मला उशीर होतोय, निघावं लागेल आता. आईपण घरी वाट पाहत असेल." आदित्य म्हणाला.

थोड्याच वेळात मग सर्वांचा निरोप घेऊन आदित्य निघाला.

एक एक करत दिवस जात होता. आनंदाचे असे अनेक क्षण इनामदारांच्या घरात साजरे व्हायला आता फक्त नवीन कारणच हवे असायचे.

येणाऱ्या बाळाचा पायगुण खरंच खूप चांगला असणार होता. त्या एका बातमीने आज सगळेच बदलले होते. घर, घरातली माणसं, माणसांचे स्वभाव अगदी सगळंच.

निलम काकी तर आता पूर्णपणे शांतच झाली होती. महेश काकांनी तशी तिला तंबीच दिली होती. आज मात्र ते दोघेही घरी नव्हते. कंपनीच्या एका महत्त्वाच्या कामासाठी महेश काका बाहेरगावी गेले होते. निलमला देखील त्यांनी सोबत नेले होते त्यांनी. महेश काकांमधील हा बदल तिलाही आवडला होता. याआधी असे कधीच व्हायचे नाही. खरंतर निलममध्ये आता आधीपेक्षा खूप सुधारणा दिसत होती. त्यामुळेच महेश काका तिच्यावर मनापासून खुश होते.

बघता बघता नेत्राला सातवा महिना लागला. आता घरात तिच्या डोहाळे जेवणाची चर्चा सुरू झाली होती. पण 'अगदी साध्या पद्धतीने आणि घरातल्या घरात कार्यक्रम साजरा करुयात,'असे आजीचे म्हणणे होते.

"आजी काय गं तू पण. हा दिवस काय पुन्हा पुन्हा येत असतो का."

"म्हणूनच मी म्हणत आहे, आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे ना ही. हा आनंद आपण आपल्यापुरताच ठेवूयात का...कारण आता अजिबात कोणतेही विघ्न नको आहे मला. मान्य आहे हा दिवस पुन्हा येणार नाही पण का कोण जाणे मनात काहीतरी वेगळीच शंका येत आहे. आतापर्यंत सगळे व्यवस्थित झाले ना मग यापुढेही तसेच व्हावे एवढीच इच्छा आहे. जास्त लोकांना बोलावून गर्दी करण्यात काहीच अर्थ नाही. हवं तर बाळाचं बारसं आपण मोठं करुयात. पण आता नको." आजीने तिचे मत सांगितले.

"हो हर्षु...आई बरोबर बोलत आहेत. त्यांच्या मनात शंका आली ना मग आता नकोच. आपण आपलं घरातल्या घरात छोटंसं सेलिब्रेशन करुयात. चालेल का?"

"चालवून घ्यावं लागेल आता काय? तुमचं आधीच ठरलं आहे मग मी तरी काय बोलणार."

"नेत्रा तुला काय वाटतंय?" नयना ताईंनी विचारले.

"आई माझं काही म्हणणं नाही. जे काही मिळालंय तेच खूप आहे माझ्यासाठी. मी खरंच खूप नशीबवान आहे, तुम्ही सगळे आहात माझ्याबरोबर. यापेक्षा आणखी जास्त काय हवंय मला." नेत्रा म्हणाली.

ठरल्याप्रमाणे मग अगदी साध्या पद्धतीने नेत्राचा डोहाळे जेवण कार्यक्रम पार पडला. नात्यातील काही लोक आणि जवळचे शेजारी फक्त एवढेच पाहुणे हजर होते कार्यक्रमासाठी. छोटेखानी पण अत्यंत सुंदर पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

आई बाबा होण्याचा आनंद नेत्रा आणि हर्षच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत होता. सुंदर असे फोटोसेशन करून आठवणींची गोड अशी साठवण करण्यात आली.

क्रमशः

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all