अनोळखी दिशा पर्व २ (भाग ४९)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, नेत्राची डिलिव्हरी अगदी सुखरूप पार पडते. लक्ष्मीच्या रुपात इमानदारांच्या घरी मुलगी जन्माला येते. घरात अगदी आनंदाचे वातावरण असते. बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर बाळाचे आता बारसे करण्याचे ठरले होते.

आता पाहुयात पुढे....

"ये वहिनी ही काही नावं मी सर्च केलीत, यातील तुम्हा दोघांना कोणते नाव आवडते ते सांगा ना."

"हर्षु...मी म्हटलं ना तुला जे आवडेल ते तू फायनल कर."

"असं कसं वहिनी..तुला आवडेल गं...पण ह्या खडूसला आवडायला हवं ना. अगं मोजून शंभर नावं तरी याच्या समोर मांडली असतील. प्रत्येक नावात हा काही ना काही फॉल्ट काढतो. मग तूच सांग, कसं करु मी आता? त्यामुळे बस झालं, आता मी नाही शोधणार. ही फायनल दहा नावं आहेत, त्यातून एखादं सिलेक्ट होत असेल तर बघा नाहीतर तुमच्या लेकीचे नाव तुमच्या पद्धतीने तुम्ही दोघंच ठेवा." वैतागून हर्षु म्हणाली.

"काय हे हर्षु...तुम्ही दोघेही भाऊ बहिण ना अगदी सारखेच आहात बघ. इकडे बारशाची तारीख फिक्स झाली. पण अजून तुमच्याकडून बाळाचं नाव काही फायनल होईना."

"बघ ना गं...मी तर कंटाळले बाई."

हर्ष मुद्दाम ऐकून न ऐकल्यासारखे करत होता.

"अगं... हर्ष मुद्दाम छळत आहे तुला. तू ती सगळी नावं माझ्याकडे दे. आम्ही दोघंही विचार करून एक नाव फायनल करतो."

"ते ठीक आहे वहिनी पण हा बघ ना किती खडूस आहे ते...बघ आता ऐकू तरी येतंय का ह्याला." रागातच हर्षु बोलली.

"कोण... मी? मला काही म्हणालीस का?"

"नाही दगडाशी बोलतिये मी." हर्षु आता खूपच चिडली होती.

"नेत्रा... बघ तुला दगड म्हणाली ही!" हसतच हर्ष बोलला.

"वहिनी, तुला नाही गं... ह्याचं काही ऐकू नकोस. उगीच आपल्यात भांडण लावतोय तो."

"हो गं...मी काही म्हणाले का तुला? तुझ्या भावाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण ओळखू शकतं.?" हसतच नेत्रा बोलली.

"ही घे नावांची लिस्ट...यातील एखादं नाव फायनल करा आणि लवकर करा म्हणजे झालं."

"हो हो आत्याबाई." मस्करीच्या सुरात हर्ष बोलला.

"तू गप रे, बोलूच नकोस माझ्याशी."एवढे बोलून रागातच हर्षु तिथून निघून गेलीस.

"हर्ष....काय हे लहान मुलासारखं."

"मजा येते गं तिला छळायला आणि ती जेव्हा चिडते ना तेव्हा तर आणखीच मजा येते मला." हसतच हर्ष बोलला.

"तू पण ना...बरं यातील कोणतं नाव आवडलंय तुला सांग."

"सगळीच नावं छान आहेत त्यामुळे मीच कन्फ्युज झालोय."

"म्हणजे खरं तर तुला नावं आवडली होती. पण तू खोटं बोललास. किती नौटंकी करायची हर्ष."

"बरं हे बघ, हे नाव आवडलंय मला. तुला कसं वाटतंय सांग."

"वाव मस्तच की."

"मोठयाने बोलू नकोस. ऐकेल कोणीतरी आणि हर्षुने तर अजिबात नको ऐकायला. तिच्यासाठी सरप्राइज आहे आणि हे नाव फक्त आपल्या दोघांतच राहील. कोणालाही सांगायचे नाही. समजलं."

"का पण..? घरातल्यांना सांगायला काय हरकत आहे?"

"अगं हर्षुला आवडलंय हे नाव. सगळ्यांत पहिल्यांदा हेच नाव सुचवले होते तिने मला. मलाही आवडले पण मीच मुद्दाम तिला छळत होतो. बिचारी तीन दिवस झाले तिचं काम सोडून नावं शोधत बसलीये." हसतच हर्ष बोलला.

"तुला खरंच काही काम नसेल तर सांग...नसेलच तुला ऑफिसला जायचं तर माझ्याकडे खूप कामं आहेत. काय आनंद मिळतो तुला यात काय माहित."

"स्वर्गसुख... यासाठी लहान बहीण असायलाच हवी, जी की माझ्याकडे आहे."

"छानच की मग..त्याबाबतीत तर नशीबच काढलंत आपण. बरं ते सगळं राहू दे मला एक सांग...खरंच हे नाव फायनल करायचं ना?"

"हो गं. मी त्या दिवशीच फायनल केलंय. फक्त तुला सांगितले नाही."

"काय...? म्हणजे हर्षु म्हणते त्यात काहीही चुकीचं नाही. खरंच किती खडूस आहेस रे तू आणि नशीब आज तरी मला ही एवढी मोठी गोष्ट सांगितलीस. नाहीतर माझ्याच लेकीचे नाव मला न विचारता ठेवले असतेस तू."

"असे कधी होईल का नेत्रा. बरं चल आवरतो मी. निघतो आता ऑफिसला."

"गेले तासभर झाले हेच ऐकतिये मी, पण तू काही जागचा हलेना." हातातील कपड्यांच्या घड्या कपाटात लावत खोचकपणे नेत्रा बोलली.

"हो का...तुला तर तेच हवंय गं. जाऊ दे... तसंही घरी थांबून तरी काही उपयोग आहे का? बायकोला आजकाल मी दिसतच नाही. लेक काय आली तर नवऱ्याचे स्थान दुय्यम झाले तिच्यासाठी.  "

"आता नको ना सुरू होऊस. उठ पटकन् आवर बरं. नाहीतर खरंच उशीर होईल. आधीच बाबा बोलतात, नेत्रा ऑफिसला येत होती तोपर्यंत हर्ष वेळेत ऑफिसला येत होता. हल्ली अर्धा एक तास तरी उशिराच पोहोचतो."

"हो का...बरं असू दे...नको लेक्चर सुरू करू लगेच. जाणारच आहे मी. समजलं...?"

"हो समजलं." नेत्रा म्हणाली.

तेवढ्यात नयना ताई बाळाला घेऊन खोलीत आल्या.

"नेत्रा... घे बाई हिला. आता भूक लागली असेल तिला. खूप वेळ खेळलो आता आम्ही. दमलो खेळून. आता झोपसुद्धा आली. झोपू दे तिला थोडा वेळ उठल्यावर मग आंघोळ घालू."

"चला...पिल्लू." लेकीला घेण्यासाठी नेत्राने दोन्ही हात पसरले. बाळाने लगेच बोळके दाखवत आईकडे झेप घेतली.

बाळाला नेत्राकडे देऊन नयना ताई त्यांच्या कामाला निघून गेल्या.

"तुम्ही सगळे घरात बसून हिच्यासोबत मस्त एन्जॉय करता यार आणि आम्हाला जावं लागतं ऑफिसला." तोंड फुगवून हर्ष बोलला.

"मग तू थांब घरी मी जाते ऑफिसला. हो की नाही पिल्लू. बाबाला थांबू दे ना घरी? त्याबदल्यात मी जाते ऑफिसला. तुला चालणार आहे का? सांग बरं." बोबड्या बोलात नेत्राने आपल्या इवल्याशा लेकीला प्रश्न केला.

आई काहीतरी बोलतीये, म्हणून मग लगेचच त्या इवल्याशा जीवाने बोळके दाखवत प्रतिसाद दिला.

"गप्प बस खडूस. हसा माझ्यावर. मजा येतिये ना तुम्हाला दोघींनाही? " लटक्या रागात हर्ष बोलला आणि इच्छा नसतानाही तो मग आवरुन ऑफिसला गेला. आजकाल त्याचा पायच निघायचा नाही घरातून. त्यामुळे ऑफिसला जायला रोजच उशीर व्हायचा.

पुढच्याच आठवड्यात बाळाचे बारसे होते. ठरल्याप्रमाणे सर्व पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले. लेकीच्या बारशाची तयारी जोरात सुरू होती. बाळाचे नाव मात्र गुलदस्त्यातच होते. डायरेक्ट बारशाच्या दिवशीच सर्वांना नाव समजणार होते.

नातीच्या बारशासाठी माधवरावांनी मोठा हॉल बुक केला होता . बारशाची जय्यत तयारी सुरू होती. निलम काकीने परदेशातून तिच्या मुलाला म्हणजेच राजला देखील येण्यासाठी आग्रह केला. हर्षच्या लग्नानंतर तो आता पहिल्यांदाच घरी येणार होता.

बघता बघता बारशाचा दिवस उजाडला. सर्व तयारी झाली होती.  राज देखील आदल्या दिवशीच पोहोचला होता. लहान बाळामुळे खऱ्या अर्थाने घराला घरपण आले होते. घरातील बदलले वातावरण पाहून राज देखील मनोमन सुखावला. विशेष करून निलम काकी मधील बदल त्याला जरा जास्तच सुखावून गेला.

इनामदारांच्या नातीचे बारसे म्हणजे नक्कीच सोहळा सजणार आणि तो सोहळा पाहण्यासाठी आवर्जून सगळे उपस्थित झाले होते.

थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात झाली. सगळ्यांनाच बाळाचे नाव जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. हर्षने मात्र अजूनही बाळाच्या नावाचे सिक्रेट नेत्रा व्यतिरिक्त घरात कोणालाही कळू दिले नव्हते. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती. त्यातल्या त्यात हर्षुला तर जास्तच.

बाळाला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.  त्याबरोबरच पाळण्याची गाणी देखील जोशात सुरू होती. बाळ देखील फुल एन्जॉय करत होते जणू. येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना पाहून गोड अशी स्माईल देऊन ती सर्वांनाच खुश करत होती. बायका देखील तिला आपली दृष्ट लागू नये म्हणून कोणी अलगद आपल्या डोळ्यातील काळजाचे बोट बाळाच्या कानामागे लावत होते तर कोणी दुरुनच बाळाच्या चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवत आपल्या कानशिलाजवळ बोटे मोडत होते.

सर्वांसाठीच हा कार्यक्रम अगदी आठवणीत राहणार यात अजिबात शंका नव्हती.

पाहुणे रावळे, ऑफिसमधील स्टाफ तसेच त्यांची फॅमिली सर्वजण मिळून कार्यक्रमाचा आनंद घेत होते.

हा सर्व सोहळा पाहून एका क्षणाला नेत्राच्या डोळ्यांत पाणी आले.
'आज हर्ष जर माझ्या आयुष्यात आला नसता तर माझे अस्तित्व शून्य होते. इव्हन हा आनंद साजरा करायला कदाचित मीच इथे नसते. खरंच कसे असते का आयुष्य... अनेक वळणे घेत सुख दुःखाचे चढउतार पार करत माणूस आनंदाच्या शोधात आयुष्यभर वाटचाल करत राहतो. एखाद्याला ते सुख लवकर मिळते तर एखाद्याला आयुष्यभर त्यासाठी झगडावे लागते. पण एवढे सगळे होऊन देखील समाधान मात्र हाती लागत नाही. आज माझ्या बाबतीत मात्र ते समाधान मनाला वेगळाच आनंद देत आहे.'

"नेत्रा...अगं कुठे हरवलीस?" तेवढ्यात हर्षने प्रश्न केला आणि नेत्राची तंद्री भंग पावली.

"काही दुखतंय का?" नेत्राचा पडलेला चेहरा पाहून काळजीपोटी हर्षने विचारले.

"नाही रे कुठे काय?" नेत्रा उत्तरली.

'याला म्हणतात खरे सुख आणि समाधान. एका अनोळखी वाटेवर हर्षची आणि माझी भेट होणं आणि त्यानंतर सुरू झालेला सुंदर प्रवास अखंड सुरुच राहणं याला देवाची योजना म्हणायचं की आणखी काही माहीत नाही. पण हर्षसारखा अनोळखी वाटेवर भेटलेला आणि पूर्णतः अनोळखी दिशेने जाणारा माणूस आपले जेव्हा आयुष्य बनतो ना तेव्हा मिळणारे सुख आणि समाधान याची शब्दात गणनाच होणे अशक्यच. मग आयुष्यात आणखी हवे तरी काय?' चेहऱ्यावर एक गोड स्माइल आणत मनातच नेत्रा बोलली.

आता वेळ आली होती ती म्हणजे बाळाच्या नावाची घोषणा करण्याची.

नेत्रा आणि हर्षने मिळून मग नावाच्या बोर्डवरील सोनेरी कापड अलगद बाजूला केले.

"ईरा.."

सर्वांनी एकत्रच बाळाच्या नावाचा उल्लेख केला आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

नाव पाहून हर्षुला तर खूपच आनंद झाला.
"थँक्यू सो मच दादा.." म्हणत तिने हर्षला मिठी मारली.

"पण किती खडूस आहेस रे तू...सगळ्यात पहिले जे नाव मी तुला सांगितले होते तेच फायनल करायचे होते तर मग पुढचे तीन दिवस का मला त्रास दिलास रे शहाण्या."

"तुला त्रास देणं हा माझा जन्मसिद्ध हक्कच आहे." हर्ष उत्तरला.

सर्वांनी मिळून मग बाळ आणि बाळाच्या नावासोबत सुंदर असे फोटो सेशन केले.

त्यातच हर्षुने बाळासोबत आदित्यचा आणि तिचा फोटो काढण्याचा आग्रह केला. हर्षला तिने तसे सांगितले.

"दादा आम्हाला दोघांना ईरासोबत एक छान फोटो काढायचा आहे रे. तू सांग ना फोटोग्राफरला." हर्षु हळूच हर्षच्या कानात बोलली.

"एव्हढेच ना...या इकडे. अरे ये की आदित्य, बाळाची आत्या आणि मामा... होऊन जाऊ द्या एक फोटो." हसतच हर्ष बोलला.

हर्षने लगेचच फोटो ग्राफरला हर्षु आणि आदित्यचा ईरा सोबत एक फोटो काढायला सांगितले.

प्रमिला ताईंना मात्र ही गोष्ट काही रुचली नाही. 'बाळाची आत्या आणि मामा.. हे कोणत्या अर्थाने बोलले जावई बापू?'
त्यांच्या मनात विचारचक्र सुरू झाले. कारण अजूनतरी प्रमिला ताईंना आदित्य आणि हर्षुच्या नात्याबद्दल काहीही माहीत नव्हते. पण आज मात्र त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

क्रमशः

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all