अनोळखी दिशा पर्व २ (भाग ५०)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, नेत्रा आणि हर्षच्या लेकीचा बारशाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडतो. बाळाची आत्या बाळाचे नाव ठेवते. त्यातच प्रमिला ताईंना म्हणजेच आदित्यच्या आईला हर्षु आणि आदित्यच्या नात्याविषयी थोडी शंका येते.

आता पाहुयात पुढे...

प्रमिला ताईंना पडलेला प्रश्न त्यांना काही शांत बसू देईना. दुसऱ्याच दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी त्या आदित्यसोबत त्याविषयी बोलल्या.

"तुझे आणि तुझ्या लाडक्या बहिणीच्या नणंदेचे नेमके काय सुरू होते काल?"

"कुठे काय सुरू होते?"

"तेच विचारतिये मी तुला आदित्य? एकत्र फोटो काय काढताय.. हसताय काय..गप्पा काय मारताय.."

"मग काय झालं त्याने. सगळेच हसत होते, फोटो काढत होते आणि गप्पाही मारत होते. मग आम्ही असं वेगळं काय केलं?"

"मला वेगळं वाटलं म्हणूनच मी तुला विचारतेय ना!"

"आहे आमची मैत्री...त्यात काय झालं मग?"

"फक्त मैत्रीच आहे ना?"

"मग अजून काही वाटतंय का तुला?"

"हो... काल जावई काय म्हणाले तेही मी ऐकलं ना...'बाळाची आत्या आणि मामा होऊन जाऊ द्या एक फोटो...' याचा अर्थ काय होतो?"

"मग चुकीचं काय होतं त्यात. ती बाळाची आत्या आणि मी मामा आहेच ना!"

"पण ते कोणत्या अर्थाने तुम्हाला आत्या आणि मामा म्हणाले हे समजण्याइतपत मी काही मूर्ख वाटले का तुला आदित्य. लोक काय म्हणतील निदान याचा तरी विचार करायचा होता."

"बापरे! तू कधीपासून लोकांचा एवढा विचार करायला लागली गं? हा विचार माझ्या दीला त्रास देताना नाही आला तुझ्या डोक्यात? ती जेव्हा घरी परतली नव्हती त्यावेळी तिला साधं शोधण्याचा सुद्धा तू प्रयत्न केला नाहीस. ' बरं झालं गेली,' असं वाटलं त्यावेळी तुला. तेव्हा लोकांचा विचार नाही आला का गं तुझ्या मनात? अगं आताही लेकीचं हे पहिलं बाळंतपण तिच्या सासरच्यांनी केलं तेव्हा लोक काय म्हणतील हा विचार करायचा होता. आम्ही एकत्र एक फोटो काय काढला तर लोक काय म्हणतील याची चिंता तुला पडली. आई...नको वागू असं. त्रास होतो मला तुझ्या वागण्याचा."

"पण अरे काय गरज होती तुम्हाला एकत्र फोटो काढण्याची?"

"बरं तुला ऐकायचंच आहे ना तर आज ऐक...मी आणि हर्षु आणि दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतो. गेल्या दोन वर्षापासून आम्ही काँटॅक्टमध्ये आहोत आणि हे तिच्या घरच्यांना देखील माहिती आहे. आज तुझ्या लेकाने जे काही यश मिळवलंय ना हे फक्त तिच्यामुळे आणि फक्त तिच्यासाठी. अजून फक्त एक वर्ष.. माझ्या राहिलेल्या दोन एक्झाम एकदा का क्लिअर झाल्या की मग आम्ही लग्न करणार आहोत आणि आताच तुला सांगतोय जसा दीला तू त्रास दिलास तसा हर्षुला दिला तर तू तुझ्या मुलाला कायमचं गमावशील हे ध्यानात ठेव आणि लोक काय म्हणतील हा विचार आपण नाही तर हर्षुच्या घरच्यांनी करायला हवा होता ना! पण त्यांनी तसे नाही केले. आपली आणि त्यांची बरोबरी नसताना आणि त्यात तुझे सगळे कारनामे त्यांना माहीत असताना ते ह्या घरात मुलगी देण्याचे धाडस तरी करत आहेत. नाहीतर मला नाही वाटत तुझ्या नशिबात ह्या जन्मी तरी सून होती म्हणून. हे सुख फक्त माझ्या बहिणीमुळे मला भेटणार आहे. बाबांची पुण्याई म्हण किंवा दीचे नशीब चांगले म्हणून सोन्यासारखी माणसं तिला मिळाली. नाहीतर आमच्या आयुष्याचे वाटोळे फिक्स होते आणि तेही फक्त तुझ्यामुळे."

"आदित्य...का रे असा बोलतोस? तुझी आई इतकी वाईट आहे का रे? इतकं बोलायची काही गरज आहे का रे? हे एवढं सगळं परस्पर ठरवून तू मोकळा झालास? इतका मोठा कधी झालास ते कळलंच नाही रे?" बोलता बोलता प्रमिला ताईंच्या डोळ्यात पाणी आले. आदित्यचे हे इतके टोचून बोलणे त्यांच्या मनाला खूपच लागले होते.

"आई प्लीज...एमोशनली ब्लॅकमेल नको करुस आणि मला आणखी काही बोलायला तर अजिबात भाग पाडू नकोस. माहीत नाही रागाच्या भरात मी आणखी काय बोलेल. प्लीज आता या विषयावर काहीच नको बोलुयात. या सगळ्याचा परिणाम मला माझ्या अभ्यासावर नाही होऊ द्यायचा."

एवढे बोलून आदित्य त्याच्या खोलीत निघून गेला.

' हा आताच असा वागतोय तर लग्न झाल्यावर कसा वागेल? त्यात ती एवढ्या मोठ्या घरची पोर आणि एवढी शिकून वकील झालेली, माझ्या काय कामाची ती. घरात इकडची काडी तिकडं करायची माहीत नसेल तिला. आता आयुष्यभर हे असं लोढणं गळ्यात बांधून घ्यायचं का! वाटलं होतं एकदा का लेकाचं लग्न झालं की मग मी सुटले ह्या कामाच्या जाचातून. पण हे काय होऊन बसलंय...त्यात ती अर्पिता आहेच नको ती कामं करायला. तिनेच भडकवलं असणार ह्याला. मोठ्या घरची सून काय झाली पण माझा बदलाच घ्यायला बसलीये जणू.'

'म्हणतात आपल्या कर्माची शिक्षा आपल्याला ह्याच जन्मी भोगावी लागते, ते खरं असेल का?' मनातच प्रमिला ताई बोलल्या.

'मी अर्पिताला खरंच खूप त्रास दिला. सावत्र आई म्हणून तिचा खूप छळ केला. त्याबदल्यात माझा मुलगा आता माझा राहिला नाही. एका आईसाठी याहून मोठी शिक्षा ती काय असू शकते. आदित्यला कितीतरी वेळा त्याच्या बहिणीपासून दूर करण्याचा मी प्रयत्न केला पण त्यांच्यातील प्रेम आणखीच वाढत गेले आणि आता तर तिच्या नणंदेसोबतच हा लग्न करणार म्हटल्यावर हे नातं आणखीच घट्ट होणार. मी मात्र ह्यात काहीच करू शकत नाही. हीच देवाची इच्छा तर नाही?'

प्रमिला ताईंचे मन त्यांनाच खात होते आणि त्यांना मनातून कुठेतरी त्यांची चूक मान्य देखील होती. आता लेकाच्या निर्णयापुढे त्यांचे काहीच चालणार नाही हे त्यांनाही ठाऊक होते. त्यामुळे गप्प बसण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता. कारण आदित्य त्याच्या निर्णयावर ठाम होता. त्यात विशेष म्हणजे नेत्रा आणि तिच्या घरचे सगळेच त्याच्या पाठीशी भक्कम उभे होते. त्यामुळे प्रमिला ताई मात्र एकट्या पडल्या होत्या. आदित्यच्या निर्णयापुढे आता त्यांचाही नाईलाज होता.

असे असले तरीही त्यांचे मन त्यांना काही स्वस्थ बसू देईना. एक दिवस धाडस करून प्रमिला ताई नेत्रासोबत या विषयावर बोलल्याच. तिच्याशी बोलून काही मार्ग निघेल असे त्यांना वाटले होते, पण प्रमिला ताईंनी विषयाला काही फाटे फोडायच्या आधीच नेत्राने त्यांना काही गोष्टी स्पष्टच सांगितल्या आणि थोडेफार समजूतदारीचे शहाणपण देखील शिकवले.

"हे बघ आई...त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आता तू यात काही विघ्न आणू नकोस. होऊ दे त्यांच्या मनासारखे. पहिली गोष्ट म्हणजे तू हे लग्न थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करू नकोस. त्याने काहीही साध्य होणार नाही. माझ्या बाबतीत तू काय करण्याचा विचार केलास आणि आज काय झाले बघ. सगळं काही तू तुझ्या डोळ्याने आता पाहत आहेस. याचा अर्थ देव आहे आई. त्यामुळे निदान आता तरी त्याला घाबर. नको कोणतेही डावपेच करु आता. आदित्य सुद्धा छान पोस्ट मिळवेल, शिकलेली सून घरी येईल. सगळं काही छान होईल. एक सुखी आयुष्य तुझ्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे प्लीज निदान आता सुनेच्या राज्यात तरी नव्याने आयुष्याची सुरुवात कर. बाकी काही नको आम्हाला."

नेत्रा बोलत होती आणि प्रमिला ताई मात्र शांतपणे ऐकत होत्या. नेत्राचा एक एक शब्द प्रमिला ताईंच्या ह्रदयाला जाऊन भिडत होता.

"चल ठवते मी आता ईरा रडतिये." एवढे बोलून नेत्राने फोन ठेवला.

'खरंच काय मिळालं मला एवढं सगळं करून? अर्पिताचे किती वाईट चिंतले मी. पण खरंच तिच्या बाबतीत सगळे कसे अगदी छान झाले. खरंच ती म्हणते तसं नक्कीच देव आहे. स्वप्नातही कोणी विचार केला नसेल असे सासर आणि सासरची माणसे तिला मिळाली. आता तिच्यामुळे जर माझ्या आदित्यचे चांगले होणार असेल तर मला आता बदलायला हवं आणि तसं नाहीच केलं मी तर माझ्या मुलाला मी कायमचं गमावून बसेल.'

नेत्रा सोबत बोलल्यानंतर प्रमिला ताईंना त्यांच्या चुकीची जाणीव झाली खरी पण फक्त आदित्यसाठी त्यांनी स्वतःला बदलायचे ठरवले. कारण आदित्य शिवाय त्यांच्याकडे दुसरे काहीही नव्हते.

दिवस जात होते. आदित्यचे प्रयत्न आता शेवटच्या टप्प्यात होते. अठरा महिन्यांची आर्टिकलशिप पूर्ण करून पहिल्या ग्रुप मधील दोन एक्झाम देखील तो आधीच क्लिअर झाला होता. बघता बघता त्याने दुसऱ्या ग्रुप मधील पुढच्या दोन एक्झाम देखील क्लिअर केल्या. इतक्या दिवसांपासून सुरू असलेल्या त्याच्या प्रयत्नांना अखेर यश आले. सर्वांनीच त्याचे भरभरून कौतुक केले. पण अजूनही लढाई काही संपली नव्हती. पुढील महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे इंडस्ट्रिअल ट्रेनिंग. नऊ महिन्यांचा हा ट्रेनिंग कालावधी होता. परंतु, ट्रेनिंगसाठी पात्र होण्याकरता त्याला एक महत्त्वाचा इंटरव्ह्यू देणे गरजेचे होते. त्याची वेगळी तयारी देखील करावी लागणार होती.

हर्षने त्याच्या एक दोन सी.ए मित्रांसोबत आदित्यची भेट घडवून आणली. त्यांच्याकडून आदित्यला प्रॉपर गायडन्स मिळाला. त्यामुळे आदित्यचे बरेचसे टेन्शन कमी झाले.

लवकरच त्याचे इंटरव्ह्यू थ्रू इंडस्ट्रिअल ट्रेनिंगसाठी देखील सिलेक्शन झाले. सर्वांसाठी ही खूपच आनंदाची बातमी होती. पण हर्षु मात्र नाराज झाली. आधीच या सगळ्यांत खूप उशीर झाला होता. आता अजून नऊ महिने ट्रेनिंगमध्ये जाणार त्यामुळे लग्न हा विषय अजून लांबणीवर पडणार. आता हर्षुची सहनशीलता संपत चालली होती.

"अजून किती दिवस कॉम्प्रमाईज करायचं यार. आता खूप झालं. खूप वेळ दिला मी तुला पण आता नाही आ आदी."

"समजू शकतो यार, पण आता शेवटचे नऊ महिने मग झालंच ना."

"नऊ महिने म्हणजे खायची गोष्ट आहे का रे? एक एक दिवस मोजत साडे तीन वर्ष काढली ना यार... आता अजून नऊ महिने?"

"हे मला मिळालेलं यश आहे ना ते माझं एकट्याचं नाहीये गं हर्षु त्यात सगळ्यात मोठा वाटा तुझा आहे. तू साथ दिली नसती तर आज मी इथवर आलो तरी असतो का? एवढे दिवस वाट पाहिली आता अजून थोडे दिवस. लग्न काय मी आताही करेल गं, पण त्यानंतर काय? पुन्हा दुरावाच ना..मग आताच थोडं थांबणं योग्य नाही का? आपण आपल्या स्वप्नांपर्यंत जवळपास पोहोचलोच आहोत. पण फक्त लास्ट एक टप्पा बाकी आहे तेवढा पूर्ण झाला की मग सगळं काही आपल्या मनासारखं होईल. आता काय हत्ती गेला आणि शेपूट फक्त बाकी."

आदित्यचे म्हणणे हर्षुला देखील पटले.

"मी तयार आहे थांबायला पण एका अटीवर."

"तू म्हणशील ती अट मला मान्य आहे."

"नाही इतक्यात लग्न निदान एंगेजमेंट तरी करुयात?"

"तू म्हणशील तसं." हसतच आदित्य बोलला.

दोघांनीही त्यांचा प्रस्ताव मग घरच्यांसमोर ठेवला. आता घरचे थोडीच नाही म्हणणार होते.

जास्त वेळ वाया न घालवता प्रमिला ताईंसोबत बोलून एक उत्तम मुहूर्त पाहून आदित्य आणि हर्षुचा साखरपुडा देखील करण्याचे ठरले आणि त्याप्रमाणे सगळे पार पडले.

साखरपुडा झाला आणि लगेचच आदित्यला ट्रेनिंगसाठी जावे लागले. सुट्टीच्या दिवशी हर्षुची आणि त्याची भेट ही ठरलेलीच असायची.

छोटी ईरा देखील आता जवळपास दीड वर्षाची झाली होती. तिच्या बाललीलांत घर अगदी आनंदून जात होते. तिचे बोबडे बोल सर्वांना वेड लावत होते. त्यातच आता नेत्राने देखील पुन्हा ऑफिस जॉईन केले. त्यामुळे इराची संपूर्ण जबाबदारी नयना ताईंवर होती. त्यामुळे निलम काकीने आता किचनची बरीच जबाबदारी उचलली होती. आजीदेखील होत्याच मदतीला पण त्यांचेही आता वय झाले होते.

हर्षु मात्र एक एक दिवस मोजत होती. बघता बघता सहा महिने झाले, आता प्रश्न फक्त तीनच महिन्यांचा होता. ट्रेनिंग नंतर लगेचच लग्न असे आधीच ठरले होते. त्यामुळे हळूहळू आता घरचे लग्नाच्या तयारीला लागले.

पत्रिका छापणे, हॉल बुकिंग, कपडे तसेच दागिने खरेदी हे आता हळूहळू सुरू झाले. हर्षुचा आनंद आता गगनात मावत नव्हता. तिची सहनशीलता आणि इच्छाशक्ती दोन्ही गोष्टी जणू तिने पणाला लावल्या होत्या. त्यात आता तिला यश मिळणार यात काही शंकाच उरली नव्हती.
तसेच नेत्रा आणि हर्षमुळे पुन्हा दोन अनोळखी दिशा एक होऊन नव्या आयुष्याची सुरुवात करणार हेही तितकेच खरे.

क्रमशः

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all