Login

अनोळखी दिशा..(भाग २३)

कथा अनोख्या प्रेमाची.
मागील भागात आपण पाहिले की, नेत्रा आणि हर्षचे लग्न अखेर फायनल झाले. लग्नाची बोलणी यशस्वीरित्या पार पडली. पुढच्या एक महीन्यानंतरची लग्नाची तारीख देखील फिक्स झाली. आता पाहुयात पुढे.

"चल बाबा हर्ष, आता आम्हाला लग्नाच्या तयारीला लागायला हवं. असा चुटकीसरशी महिना निघून जाईल. वेळ खूपच कमी आहे." दाराचे लॉक खोलता खोलता नयना ताई बोलल्या.

नयना ताईंना आता लेकाच्या लग्नाचे इतके वेध लागले होते की, कधी एकदा हर्षचे लग्न होते आणि सून बनून नेत्रा घरी येते; असे झाले होते त्यांना.

"लग्नाची तयारी नंतर करा, आधी निलम काकी आणि महेश काकाला नेत्रा आणि माझ्या लग्नाचे कोणत्या तोंडाने सांगणार आहात? त्याचा आधी विचार करा." काळजीपोटी हर्ष बोलला.

"जाऊ दे बाबा...ती जेवढी घरात नसते तेवढी घरात शांतता टिकून राहते. ती असली की टोमणे ऐकून ऐकून घराला देखील कंटाळा येत असेल." नाक डोळे मुरडतच आजी बोलल्या.

"त्यातल्या त्यात माझे नशीब चांगले की मला दोन लेक आणि दोन सूना आहेत. एक जरी आडमुठी असली तरी दुसरी अगदी समजूतदार आणि माझ्या मनासारखी आहे; यातच देवाचे आभार आणि तितकेच मनाला समाधान." नयना ताईंकडे पाहत आजी बोलल्या.

नयना ताई आज भरुन पावल्या होत्या. सासूच्या तोंडून कौतुक ऐकताना नकळतपणे त्यांचे मन भरुन आले. एक सून म्हणून त्या आज यशस्वी ठरल्या होत्या.

"ते सगळं ठिक आहे आई पण निलमने पुन्हा तमाशा नाही केला म्हणजे मिळवलं." काळजीपोटी नयना ताई बोलल्या.

"जिथे निलम तिथे आपोआपच तमाशा आलाच गं नयना." हसतच आजी बोलल्या.

"आई...अहो ही हसण्याची वेळ नाही. एखादया चांगल्या कामाची सुरुवातच जर कटकटीने झाली तर मग पुढे जाऊन कार्य नीट सिद्धीस जाईल की नाही? यात थोडी शंकाच."

"अजिबात असा नकारात्मक विचार करायचा नाही. मी अजून खमकी आहे. तिला सुतासारखं सरळ कसं करायचं... हे मला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे तू नको काळजी करु. तू जा, देवापुढे दिवा लाव आणि माधवने आणलेला पेढ्यांचा बॉक्स पण देवापुढे ठेव. यापुढच्या कार्यात देखील कोणते विघ्न येवू देऊ नको. सगळं सुरळीत पार पडू दे, असं त्या गणपती बाप्पाच्या कानात सांग." म्हणत आजीने नयना ताईंना धीर दिला.

सासू सुनेचे हे बोलणे सुरु असतानाच निलम आणि महेशराव दारातून आत आले.

"काय गं आई, गणपती बाप्पाच्या कानात काय सांगायचं?" घरात येताच महेशरावांनी प्रश्न केला.

"आईंना बाप्पाकडे माझीच तक्रार करायची असेल!" नाक तोंड मुरडतच लागलीच निलम काकी बोलली.

आता बरोबर ती सासूच्या तावडीत सापडली.

"अगं बाई! हो का? किती बरोबर ओळखलंस गं. मी बाप्पाकडे तुझीच तक्रार करत होते. आता तरी माझ्या धाकट्या सुनेला थोडी का होईना पण अक्कल दे म्हटलं."

"आई तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ओ? मला बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत तुम्ही." रागातच निलम काकी  बोलली.

"हे बघ आता ह्यावेळी मी सुरुवात केली नाही आ. आल्या आल्या तूच सुरू झालीस...समजलं!"

"होणारच ना सुरू! कारण दोन्ही सुनांना जर सासूकडून सारखीच वागणूक मिळाली असती तर हा विचार तोंडातून ओठांपर्यंत कधी पोहोचलाच नसता."

"त्यासाठी सूनदेखील तशी असावी लागते बरं का निलम. आतापर्यंत सुनेचे कोणते कर्तव्य बजावलेस गं तू?" न राहवून शकुंतला आजीने सुनेला स्पष्टच सुनावले.

"आतातरी झालं का तुमचं समाधान? तुमची आई नेहमी माझा दुस्वास करते, हे सांगूनही कधी पटलं नाही तुम्हाला. बरं झालं.. सगळं काही तुमच्या समोरच घडतंय. नाहीतर पुन्हा निलमच खोटं बोलते, असं म्हणायलाही तुम्ही कमी केलं नसतं."

सासूचे बोलणे ऐकून निलम काकी महेश काकांना तावातावाने बोलू लागली.

"मी काय बोलावं अशी तुझी अपेक्षा आहे? आता मी माझ्या डोळ्याने जे पाहिलं आणि कानाने जे ऐकलं त्यावरून तर आज सुरुवात तूच केलीस! हे स्पष्ट दिसलं मला. मी आईसोबत बोलत होतो पण तू मध्ये तोंड घातलंस की नाही?"महेशराव थोडं जास्तच स्पष्ट बोलले.

"तुम्ही कधी तुमच्या आईची बाजू सोडणार आहे म्हणा! तसंही तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही." रागातच निलम काकी मग तिच्या रुममध्ये निघून गेली.

"महेश जरा आवर अरे तुझ्या बायकोला. कुठं? कसं? आणि काय बोलावं? याचं तिला बिलकुल भान नाही ."

"आई...अगं आहे तिचा स्वभाव थोडा चिडका, हे माहिती आहे ना तुला! मग तू तरी कशाला तिच्या नादी लागत असतेस सारखी?"

"हो का? थोडा चिडका स्वभाव! इथे तुझीच जर तिला साथ असेल तर ती तरी कशी सुधरणार म्हणा! बरं जाऊ दे ते... निलमवर चर्चा करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा, तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय ते ऐक."

"कशाबद्दल गं?"

"अरे आम्ही सर्वांनी मिळून एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय, ऐकून तुला धक्का बसेल पण सगळं काही शांतपणे आणि विचारपूर्वकच आम्ही केलं आहे. तूही जरा शांत डोक्याने विचार कर म्हणजे तुलाही पटेल."

"बरं काय आहे? ते तर सांग आधी!"

"आम्ही हर्षचं लग्न करायचं म्हणतोय."

"अगं आई पण आधी सुपर्णाच्या धक्क्यातून तर त्याला सावरू दे."

"अरे त्याच्या मर्जीनेच केलंय सगळं."

"केलंय म्हणजे?"

"म्हणजे आम्ही हर्ष आणि नेत्रा यांच्या लग्नाची बोलणी फायनल करुन आलोय आज."

"एवढी मोठी गोष्ट आणि हे तू मला आता सांगतियेस? एक काम करायचं होतं, डायरेक्ट लग्नालाच बोलवायचं होतं आम्हाला." एवढी मोठी बातमी अशी अचानक समजल्यामुळे महेश काका खूपच नाराज झाले.

"हे बघ महेश...आम्ही तुला आधी का सांगितले नाही, हे तू तुझं समजून घे." आईचा इशारा निलमकडे होता हे महेश रावांना न बोलताही बरोबर समजले.

"काही गोष्टी आरडाओरडा करुन नाही साध्य करता येत. त्यात आधीच निलमला नेत्रा बिलकुल आवडत नाही म्हणजे आजही ती या लग्नाला विरोधच करणार. आम्हाला सांगितले नाही म्हणून आरडाओरडा करुन तमाशाच करणार. हे काही आता आमच्यासाठी नवीन नाही. मान्य आहे तुझी बायको आहे ती, सगळेचजण तिच्या विरोधात असल्यामुळे तुला वाईट वाटणेदेखील स्वाभाविक आहे. पण त्यामुळे सत्य परीस्थिती तूही नाकारु शकत नाहीस ना?"

"पण हर्षसुद्धा काही बोलला नाही मला. दिवसभर आम्ही सोबत असतो पण एकदाही त्याच्या काकासोबत त्याला शब्दाने बोलावेसे वाटले नाही, याचेच वाईट वाटते.
एवढासा होता तेव्हापासून माझं बोट धरुन संपूर्ण कंपनीत आणि ऑफिसमधे इकडून तिकडे काका काका करत फिरायचा. एकवेळ राजला मी अंतर दिलं पण हर्षला कधीच नाही आणि आज मात्र हर्ष फक्त ऑफिसच्या कामापुरता मला काका म्हणतो."

बोलता बोलता महेश काकांचे डोळे पाणावले.

"हे बघ महेश, अजिबात वाईट वाटून घेवू नकोस. तू माझा मुलगा आहेस. तुझी नस ना नस मी ओळखते. लग्न झाल्यानंतर बायकोचे ऐकणे देखील भागच असते पुरुषांना. पण म्हणून तिच्या चुकांवर सतत पांघरून घालणे बरे नाही. आधीची परीस्थिती खूप वेगळी होती आणि आताची खूपच वेगळी आहे. निलममुळे आता तुलाही सगळेच गृहीत धरायला लागले आहेत. काही झाले की तुझ्याकडून निलमला एखादी गोष्ट समजेल याची भीती वाटते सतत. त्यामुळेच हर्षदेखील काही बोलला नाही."

"पण हे एक बरं झालं आई, हर्षने आयुष्यात पुढे जाण्याचा विचार तरी केला. उगीच जुन्या गोष्टींत अडकून वेळ  वाया घालवला नाही. त्यात नेत्राही खूपच हुशार आणि समजूतदार मुलगी आहे. घर संसार सांभाळून हर्षच्या खांद्याला खांदा लावून बिझनेसमध्येदेखील ती उत्तमरीत्या प्रगती करेल, याची मला खात्री आहे."

"हो ना, हे मात्र खरं. त्यात मुलगी आपल्या माहितीतील आहे, पाहण्यातील आहे आणि विशेष म्हणजे संस्कारी आहे. आणखी काय हवंय? नाही का? आता तुझ्या पद्धतीने तू हे सगळं निलमला सांग. त्यात तू किती यशस्वी होणार माहीत नाही. पण आता तूच जबाबदारी घे बाबा तिला सांगण्याची. आमच्यात काही हिंमत नाही बाबा तिच्या तोंडी लागायची हो."

"आता काय, तुमच्या सगळ्यांचा राग माझ्या एकट्यावरच निघणार असंच दिसतंय." नाराजीच्या सुरात महेशराव म्हणाले.

"बघ बाबा! तुझी बायको तुझ्याच कंट्रोलमध्ये राहत नाही मग आम्ही तर खूपच दूर." आजी उपहासात्मक पद्धतीने बोलली.

काहीही न बोलता महेशराव मग त्यांच्या खोलीत निघून गेले.

त्यांनी जेव्हा ही बातमी निलमला सांगितली तेव्हा शेवटी व्हायचे तेच झाले. सवयीप्रमाणे करायचा तेव्हढा तमाशा तिने केलाच. महेशराव मात्र रात्रभर काही शांतपणे झोपू शकले नाहीत.

"नेत्रा कशी या घरात येते? तेच मी बघते. मी घरी नसताना परस्पर हे लोक हा एवढा मोठा निर्णय घेऊन मोकळे झाले. पण कितीही लपवा तुम्ही, मी नेत्राला कधीच या घरात येवू देणार नाही. द्यायचेच असते तर हिच्यापेक्षा सुपर्णा काय वाईट होती मग? आताच सगळ्यांनी हिला एवढं डोक्यावर घेतलंय, कायमची जेव्हा या घरात येईल तेव्हा तर मग काही विचारूच नका. कशीबशी तिला या घरातून घालवून दिली होती आणि आता तर कायमची येणार माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला. "

निलम काकीच्या रागाचा पारा प्रचंड चढला होता. नेत्रा घरात येवू नये म्हणून आता तिने नवीन मनसुबे आखायला सुरुवात केली होती.

क्रमशः

आता हर्ष आणि नेत्राच्या लग्नात निलम काकी कोणते नवे विघ्न आणणार? जाणून घ्या पुढील भागात.