Login

अनोळखी दिशा..(भाग १८)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की हर्ष नेत्राच्या मदतीसाठी गेला असता तिथे नेत्रासोबत साखरपुडा होणाऱ्या तरुणासोबत त्याची बाचाबाची सुरु असतानाच त्या तरुणाचे आई-वडील तिथे पोहोचतात. आता पाहुयात पुढे..

"अरे हे काय सुरु आहे सगळं?" गाडीतून खाली उतरताच त्या तरुणाच्या वडिलांनी रागातच प्रश्न केला.

"प्रमिला ताई तुमच्या मुलीचे सगळे प्रताप माहीत असताना देखील आम्ही या लग्नाला तयार झालो. गेली सहा महिने ती एका भलत्याच मुलाच्या घरी राहत होती, हे माहीत होऊन देखील आम्ही आमचा शब्द फिरवला नाही. पण तुम्ही मात्र आमचे चांगलेच स्वागत केले बरं का! लग्नानंतर ही अशी खातीरदारी करणार आहात का जावयाची? आणि काय रे लौकिक, तुला म्हटलं होतं ना मी की आपण सोबत जाऊयात म्हणून; स्वतःचा असा अपमान करुन घ्यायला पुढे आला होतास का?"

प्रमिला ताईंच्या होणाऱ्या विहीनबाईदेखील स्वतःचाच बडेजाव सांगत समोरचे लोक कसे लाचार आहेत त्यांच्यासमोर, हेच अप्रत्यक्षरीत्या सांगत होत्या जणू साऱ्यांनाच.

"अहो! अख्ख्या गावातून चपलांचा हार घालून गाढवावरुन धिंड काढायला हवी तुमच्या या लाडक्या दिवट्याची. हीच लायकी आहे त्याची. कारनामेच इतके महान आहेत साहेबांचे की ही शिक्षाही कमीच पडेल."

कोणताही विचार न करता हर्ष फक्त बोलत होता. कारण संपुर्ण कुटुंबाचा खोटारडेपणा तो स्वतःच्या डोळ्याने पाहत होता. या सर्वात बळी मात्र नेत्राचा दिला जात होता.

"बस झालं अपर्णाची आई! आता खूप होतंय हे. कोण कुठला हा मुलगा वाटेल ते बोलतोय आणि तुम्ही मात्र शांतपणे तमाशा बघत आहात." लौकिकच्या आईलाही आता राग अनावर होत होता.

"ये बाबा! तू जा की आता. का माझ्या लेकीच्या सुखाआड येत आहेस? मी हात जोडते तुझ्यासमोर. हवं तर पदर पसरते. पण थांबव आता हा सगळा तमाशा. तिकडे मुहूर्ताची वेळ टळून चाललीये. ब्राम्हण देखील पोहोचतच असतील." प्रमिला ताई रडत रडत बोलत होत्या. खरं की खोटं हे हर्षला आता चांगलंच माहित झालं होतं.

आता तर नमते न घ्यावे तर लेकीचा साखरपुडा होणे शक्यच नाही. हे आता त्यांनाही कळून चुकले होते आणि हेच नेमके त्यांना नको होते.

"बस करा हो तुमची नाटकं. किती तो खोटारडेपणा ठासून भरलाय तुमच्यात, अगदी जवळून अनुभवले आहे मी. लेकीचे सुखच मुळी नको आहे तुम्हाला. म्हणूनच तर ह्या अश्या मूर्ख माणसाला तिचा जोडीदार म्हणून निवडले तुम्ही." पोटतिडकीने हर्ष बोलत होता.

हर्षचे बोलणे खिडकीतून नेत्रा ऐकत होती. त्याचा तो निडरपणा नेत्राला अधिकच भावला.

'कोणतेही नाते नसताना आज हा फक्त माझ्यासाठी इथे आलाय. माझ्यासाठी सर्वांसोबत एकटा लढतोय. खरंच अनोळखी वाटेवर कधी असंही कुणी भेटेल, असा स्वप्नातही विचार केला नव्हता मी.'
डोळ्यातील आसवे अलगद टिपत दुरुनच नेत्रा नजरेच्या कप्प्यात शक्य तितके साठवून घेत होती हर्षला.

"चल लौकिक...पुरे झालं आता. चला हो! तुम्हाला काही वेगळं सांगायला नको." लौकिकच्या आईने दम भरला दोघा बाप लेकाला.

"अहो सविता ताई ऐका हो माझं. आम्ही नाही ओळखत हो ह्याला. त्याला हे लग्न व्हायला नको आहे आणि म्हणूनच तो हे सगळं मुद्दाम करत आहे. तुम्ही तरी समजून घ्या ना. नका ना असा टोकाचा निर्णय घेऊ." प्रमिला ताईंचे त्यांच्या परीने प्रयत्न सुरू होते पाहुण्यांना मनवण्याचे.

"काही उपयोग नाही त्याचा आता. झाली तेवढी शोभा पुरे आहे. आम्हालाही चार माणसांत मान आहे. आमचीही काहीतरी पत, प्रतिष्ठा आहे. तुमच्या म्हणण्यानुसर सगळे सुरू होते. बाकी गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीने मॅनेज करणार होतात. पण तसे तर काहीच झाले नाही. उलट आम्हाला इथे बोलावून आमचाच बँड वाजवला तुम्ही. काय मामा! बरोबर बोलतोय ना मी? त्या दिवशी मोठमोठ्या बाता करत होतात, मग आज का असे मूग गिळून गप्प बसलात?"

लौकीकचे वडीलदेखील तावातावाने बोलत होते. नेत्राच्या मामांकडे मात्र बोलण्यासाठी आता शब्दच नव्हते.

तेवढयात पोलीसांची गाडी पोहोचली तिथे. पोलिसांना समोर पाहून नेत्रा मात्र प्रचंड घाबरली. आता तिचा भूतकाळ तसाही समोर होताच पण तरीही तो सर्वांना समजणार की काय? या भीतीने नेत्राचे धाबेच दणाणले.

"नमस्कार साहेब, मी हर्षवर्धन इनामदार, माधवराव इनामदारांचा मुलगा. मीच फोन केला होता तुम्हाला."

"अरे तू माधवचा मुलगा होय? माधव आणि मी एकाच कॉलेजला शिकलो बरं का. मला सरकारी नोकरीची अपेक्षा तर त्याला बिझनेस मध्ये इंटरेस्ट. त्यामुळे पुढे जाऊन आमचे मार्ग वेगवेगळे झाले. पण माधव सारखाच धाडसी आहे बघ तू. कोणाचाही त्रास त्याला बघवायचा नाही. त्यालाही कधी खोटं सहन झालं नाही आणि तुही अगदी तसाच आहेस. रिअली प्राउड ऑफ यू. अशीच प्रामाणिकपणाची साथ कधीही सोडू नकोस बेटा आणि माधवला सांग कधीतरी या मित्राची आठवण आली तर फोन कर म्हणावं."

"हो सर, नक्की तुमचा निरोप देतो मी बाबांना." हसतच हर्ष बोलला.

मोठ्या साहेबांची आणि हर्षची ओळख आहे हे पाहून सगळेचजण घाबरले. आश्चर्याचा धक्काच बसला सर्वांना. आदित्य आणि नेत्राच्या मनात मात्र हर्षबद्दलचा आदर कैकपटीने वाढला.

त्यात हर्ष एका नावाजलेल्या बिझनेसमनचा मुलगा आहे हे पाहून लौकिक आणि त्याची फॅमिली मात्र अचंबित झाली.

"साहेब अहो मी वसंतराव महाजन! आपण तर ओळखतोच ना एकमेकांना." लौकीकच्या वडिलांनी स्वतःची ओळख वापरून पुन्हा एकदा लेकाला पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला.

"हो! चांगलंच ओळखतो मी तुम्हाला. प्रत्येक वेळी मुलाच्या चुकांना पाठीशी घालत आलात तुम्ही आणि आताही तेच करत आहात. याआधीही खूपदा समजावले तुम्हाला. त्याला वेळीच आवर घातला असता तर आज ही वेळच आली नसती महाजन." साहेबांनी कडक शब्दांत सुनावले महाजनांना.

"तसे नाही ओ साहेब. मुलीच्या आणि तिच्या घरच्यांच्या परवानगीनेच हा साखरपुडा होणार होता. उलट काही चुकीच्या गोष्टी समोर आल्या तरी आम्ही आमचा शब्द फिरवला नाही आणि या लग्नाला परवानगी दिली. " वसंतराव अजूनही त्याच चुका करत होते.

"ते सोडा आता सगळं. आम्हाला तुमच्या मुलाला अटक करावी लागेल. आधीच खूप सारे गुन्हे दाखल आहेत त्याच्या नावावर. मागच्या वेळीच मी तुम्हाला याची कल्पना दिली होती महाजन, आता एक जरी कंप्लेंट आली त्याच्याविरुद्ध तरी आम्हाला त्याला अटक करणे भाग असेल, हेदेखील मी स्पष्टच सांगितले होते तुम्हाला.
आता आमचाही नाईलाज आहे. तुम्ही या पोलिस स्टेशनला आणि हर्षवर्धन तुलाही यावे लागेल रितसर कंप्लेंट द्यायला."

"हो सर येतो मी." हर्ष म्हणाला.

पोलिस मात्र लौकिकला घेऊन गेले.

"प्रमिला ताई हे सगळं तुमच्यामुळे झालंय. आम्ही तुमच्या मागे आलो नव्हतो, तुम्हीच सारख्या मागे लागला होतात या लग्नासाठी. आज जे काही झालंय त्याला फक्त आणि फक्त तुम्ही कारणीभूत आहात. आता जर माझ्या लेकाला काही झाले ना, तर मी सोडणार नाही तुम्हाला. हे लक्षात असू द्या." रडत रडत सविताताई खूप काही सुनावून गेल्या प्रमिला ताईंना.

हर्ष देखील निघणार तेवढ्यात नेत्रा बाहेर आली.

"हर्ष! मला न भेटताच निघालास?" हर्षला पाहून नेत्राच्या अश्रूंचा पुन्हा एकदा बांध तुटला.

कोणाचीही पर्वा न करता, मर्यादेची सारी बंधने तोडून धावत येऊन ती हर्षला बिलगली. हर्षने देखील जगाचा विचार न करता प्रेमाने तिला आपल्या बाहुपाशात सामावून घेतले.

नेत्राला असे भावूक झालेले पाहून हर्षचे डोळेही नकळतपणे पाणावले.

प्रेमाची ही पहिलीच मिठी दोन अनोळखी दिशांना एक करुन गेली. आज पहिल्यांदा हर्षच्या मिठीत नेत्राला प्रेमाचा ओलावा, आपलेपणा, सुरक्षितपणा जाणवला

नेत्राची आई आणि मामा चरफडतच आत निघून गेले. बहिणीची अवस्था पाहून आदित्यच्या डोळेही अश्रूंनी डबडबले. बहिणीचे सुख तो डोळ्यांत साठवून घेत होता.

'आतापर्यंत खूप सहन केले माझ्या ताईने, यापुढे मात्र माझी ताई सुखात राहणार. याची खात्री आहे मला.'

आईने कितीही सावत्रपणाची वागणूक दिली तरी आदित्य मात्र जसे कळायला लागले तसा बहिणीच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला. गेल्या सहा महिन्यात त्याला खऱ्या अर्थाने बहिणीची किंमत कळाली होती पण त्याच्या आईपुढे त्याचेही काही चालत नव्हते.

"ये वेडाबाई, बस झालं ना आता. पुर येईल नाहीतर इथे." नेत्राचे डोळे अलगद पुसत हर्ष बोलला.

हर्ष बोलला तशी नेत्राची कळी खुलली. आदित्यलाही मग हसू आले.

"आतातरी सोडतेस का मला? आदित्य पाहतोय आपल्याकडे." हळूच नेत्राच्या कानात हर्ष बोलला. तशी ती हर्षच्या मिठीतून मागे सरकली.

लाजेची लाली तिच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होती. आज पुन्हा एकदा हर्षने तिच्या आयुष्याची सूत्र हाती घेतली होती. त्या नराधमापासून तिची सुटका केली होती.

"थॅन्क्स भावा, आज तुझ्यामुळे हे शक्य झालं. खऱ्या अर्थाने तू राखीचे कर्तव्य निभावलेस." हर्ष आदित्यचे कौतुक करत म्हणाला.

क्रमशः

आता काय होणार पुढे? हर्षच्या घरच्यांना कळेल का नेत्राचा भूतकाळ? होतील का अखेर या अनोळखी दिशा एक? जाणून घेण्यासाठी वाचत राहा "अनोळखी दिशा"...एक अनोखी प्रेमकहाणी!