मागील भागात आपण पाहिले की, नेत्रासोबत ज्याचा साखरपुडा होणार होता त्या तरुणाला पोलिस अटक करतात. आता पाहुयात पुढे..
"बरं नेत्रा ऐक ना! तू येतेस का माझ्यासोबत पोलिस स्टेशनला?" हर्षने प्रश्न केला.
"नको...मला खूप भीती वाटते रे. पोलिस काहीही प्रश्न विचारतात."
तेवढयात हर्षचा फोन वाजला. पोलिस स्टेशन मधून फोन आला होता.
"हॅलो! हा सर बोला ना."
"अरे हर्ष येताना त्या मुलीला घेवून येशील का? कारण तिचे स्टेटमेंट पण खूप गरजेचे आहे.
"हो सर, येतो मी तिला घेऊन."
"बरं आणखी एक काम कर, तिच्या आईला आणि मामाला पण आम्ही बोलावलंय म्हणून सांग."
"ओके सर."म्हणत हर्षने फोन ठेवला.
"आदित्य एक काम कर, तुझ्या आई आणि मामाला पोलिस स्टेशनला बोलावलंय म्हणून सांग. मी नेत्राला घेऊन जातो."
"हो.." म्हणत आदित्य आत निघून गेला.
नेत्रा मात्र खूपच घाबरली.
"मी आहे ना! तू कशाला घाबरतेस? विश्वास आहे ना माझ्यावर?" हर्षने प्रश्न केला.
"स्वतःपेक्षाही जास्त." नेत्रा उत्तरली.
"मग झालं तर! चल निघूयात मग?
नेत्राने मग होकारार्थी मान डोलावली. हर्षनेदेखील एक हलकीशी गोड स्माईल देत त्याची बाईक काढली.
आज पहिल्यांदा नेत्रा आणि हर्षमधील मर्यादेची काही बंधने कमी होऊ पाहत होती. त्या एका मिठीने दोघेही स्वप्नांच्या दुनियेत हरवले होते. एकमेकांचा स्पर्श दोघांनाही हवाहवासा वाटत होता.
आज पहिल्यांदा नेत्रा आणि हर्षमधील मर्यादेची काही बंधने कमी होऊ पाहत होती. त्या एका मिठीने दोघेही स्वप्नांच्या दुनियेत हरवले होते. एकमेकांचा स्पर्श दोघांनाही हवाहवासा वाटत होता.
ते निघणारच तेवढ्यात आदित्य निरोप पोचवून बाहेर आला.
"थॅन्क्स आदी, खूप मदत केलीस तू मला. आज तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालं. नाहीतर आज माझा साखरपुडा त्या नालायक व्यक्तीसोबत झाला असता तर माहित नाही रे माझं काय झालं असतं?" जाता जाता नेत्रा आदित्यचे आभार मानायला विसरली नाही.
"अगं ताई मला कशाला थँकयू म्हणतेस? आभार मानायचेच असतील तर हर्षचे मान. आज तो वेळेत आला नसता तर मग सगळेच अवघड होवून बसले असते. मग मीही काहीच करु शकलो नसतो."
"ये अरे! तुझ्यापेक्षा मोठा आहे ना तो, मग नावाने हाक काय मारतोस रे त्याला?" नेत्राने आदित्यला हटकले.
"मग काय म्हणू? 'दादा' बोललेलं तुला जर चालणार असेल तर बोलतो मी त्याला आजपासून हर्ष दादा." गमतीच्या सुरात आदित्य पटकन् बोलून गेला.
नेत्राने डोळे मोठे करत हलकेच नकारार्थी मान हलवून नजरेतूनच मग दादा म्हणायला नकार दर्शवला आदित्यला.
हे पाहून हर्षला मात्र हसू आले.
"आदित्य! हिचं काही ऐकू नकोस. तू मला हर्षच बोल. मला आवडेल आणि तसंही आपण मित्र बनलो नाही का! जेव्हा मी तुझ्याकडे प्रोजेक्ट नोट्स न्यायला आलो तेव्हा." थोडंसं खट्याळ हसू चेहऱ्यावर आणत हर्ष बोलला.
दोघेही मग एकमेकांना टाळी देत मोठ्याने हसले.
"अरे, त्या लौकिकला माझी थाप पटली, यातच समजले तो किती मूर्ख आहे. आपल्याकडे पाहून आपण एकाच क्लासमध्ये असू शकतो; हे कसे काय पटले त्याला देवच जाणे." दोघांनाही आता हसू आवरेना.
नेत्राने लटक्या रागातच दोघांकडेही मग खुनशीने पाहिले.
"बरं चला! आता नाही उशीर होत वाटतं." नाराजीच्या सुरात नेत्रा हर्षला म्हणाली.
लगेचच हर्षने मग त्याची बाईक स्टार्ट केली.
"ह्ममम...बसा मॅडम!"
आज पहिल्यांदाच दोघेही एकाच बाईकवरुन जाणार होते. दोघेही आज मनातून खूपच खुश होते. प्रेमाची ती एक मिठी नात्याचा वेगळाच अर्थ सांगून गेली होती दोघांनाही. हळूहळू नेत्रा आणि हर्ष मधील प्रेमाचे नाते फुलायला अखेर सुरुवात झाली.
"देवा कोणाचीही नजर न लागो या दोघांच्याही नात्याला, अगदी माझीसुद्धा." नेत्रा आणि हर्षच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत आदित्यने देवाला प्रार्थना केली.
"थँक्यू हर्ष. आज जर तू वेळेत नसता पोहोचलास तर सगळंच संपलं असते रे." नेत्रा भावूक होत म्हणाली.
"मी बरं असं लगेच संपू देईल सगळं. डोन्ट वरी गं, नको जास्त विचार करुस आणि तसंही आता आपल्यामध्ये कोणीही येणार नाही." हर्ष नेत्राला धीर देत बोलला.
"अरे पण अजून एक भीती आहेच की, आता पोलिस काय प्रश्न विचारतील माहित नाही. उगीच नको त्या गोष्टींची गावभर चर्चा व्हायची. त्यात माझा भूतकाळ जर तुझ्या घरी समजला तर पुन्हा सगळं विस्कळीत होणार."
"ते तू माझ्यावर सोड गं आणि आता एक लक्षात ठेव, काहीही झाले तरी मी तुला एकटं नाही सोडणार. विश्वास ठेव माझ्यावर."
"एवढं प्रेम करतोस माझ्यावर?"
"एनी डाऊट?"
"तसं नाही रे. पण कधीकधी वाटतं की, मी तुझ्या योग्यतेची नाही हर्ष."
नेत्राचे वाक्य कानी पडताच हर्षने जोरात गाडीचा ब्रेक दाबला. तशी नेत्रा हर्षच्या पाठीवर आदळली.
"उतर...नाही ना तू माझ्या योग्यतेची मग आज आत्ता तोडूयात आपलं नातं. तू तुझ्या दिशेने जा मी माझ्या दिशेने जातो."
"सॉरी ना हर्ष! अरे राहून राहून मनाला जी खंत वाटते ती फक्त मी बोलून दाखवली." बाईकवरुन खाली उतरत नेत्रा हर्षच्या समोर मान खाली घालून उभी राहिली. तिला आता खूपच अपराध्यासारखे वाटत होते.
"गरज आहे का पण वारंवार तेच तेच बोलायची? एकदा सांगितले आहे तुला, मला काहीच प्रॉब्लेम नाही मग का विचार करतेस एवढा? जे झालं ते झालं. ते बदलणार आहे का आता? भूतकाळ विसरुन आता भविष्याची स्वप्न रंगव. ते जास्त आवडेल मला."
"रिअली व्हेरी सॉरी हर्ष. मला तुला दुखवायचे नव्हते रे."
"मला प्रॉमिस कर आधी, हा विषय आता पुन्हा चर्चेत काय तर मनात सुद्धा आणणार नाहीस तू."
"प्रॉमिस." हर्षच्या हातात हात देत नेत्राने त्याला प्रॉमिस केले.
"चल बस आता लवकर, उशीर होतोय."
'ह्या सगळ्यात तिकडे बाबा काय म्हणत असतील मला? हे तर मी विसरुनच गेलो. मीटिंग व्यवस्थित पार पडली की नाही देवच जाणे.' हर्ष मनातच काळजी करु लागला.
थोड्याच वेळात दोघेही मग पोलिस स्टेशनला पोहोचले. हर्षने मग लौकिक विरोधात रितसर कंप्लेंट दाखल केली.
नेत्राला देखील बरेच प्रश्न विचारले गेले. घाबरतच तिनेही मग त्यांची उत्तरे दिली. नेत्राचा भूतकाळ मात्र आताही समोर आला नाही.
तिच्या आईला आणि मामाला तर चांगलीच तंबी दिली पोलीसांनी.
"एखाद्या व्यक्तीची माहिती असतानाही तुम्ही तुमच्या मुलीसाठी त्याची निवड करूच कसे शकता? शेवटी सावत्र आई जरी असलात तुम्ही तिच्या तरी एक स्रीच आहात ना! आणि स्रीच स्रीची दुश्मन असते हे पुन्हा एकदा सिद्ध केले तुम्ही. पुन्हा चुकूनही अशी चूक करू नका नाहीतर गाठ आमच्याशी आहे."
पोलिसांच्या समोर मात्र नेत्राच्या आईची आणि मामाची बोलतीच बंद झाली.
"नेत्रा तू आईसोबत घरी जा. मी सरांना भेटून येतो." हर्ष नेत्राला म्हणाला.
जाता जाता हर्ष मात्र साहेबांच्या केबिन मध्ये गेला. नेत्रा आई आणि मामासोबत घरी गेली.
"ये ना हर्ष! बस. बाकी काय म्हणतोस? दिली ना कंप्लेंट?"
"हो दिली सर."
"अरे खूपच माजलेला मुलगा आहे तो. सारखे काही ना काही कारनामे करतच असतो आणि आई बाप मात्र दरवेळी पाठीशी घालतात त्याला. एकुलता एक आहे म्हणून डोक्यावर चढवून ठेवलंय त्याला घरच्यांनी. पण ह्यावेळी मी काही सोडत नसतो त्याला. तरीही घरचे येवून जामिनावर सोडवतीलच. मग आमचाही नाईलाज होतो."
"सर पण अशाने गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढेल त्याचे काय?" हर्ष चरफडत बोलला.
"पण कसं आहे ना हर्ष जनतेने देखील आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला को ऑपरेट करायला हवं ना!"
"अरे काही महिन्यांपूर्वी एका रेेप केसमध्ये ह्याचा हात आहे असे समजले आम्हाला. पण ज्या मुलीसोबत हा प्रकार घडला तिला आजही पोलिस शोधत आहेत. तिने कोणतीही कंप्लेंट केली नाही. म्हणजे ती जिवंत आहे याची तपासानंतर खात्री पटली पोलिसांना. पण ती कोण, कुठची मुलगी होती, हे मात्र अद्याप समजले नाही. त्यात पोलिसांच्या रडारवर हा होताच. त्यामुळे त्याच वेळी जर त्या मुलीने कंप्लेंट केली असती तर ह्याला बरोबर जेलमध्ये सडवले असते आम्ही. मग त्याचा बापदेखील काहीच करू शकला नसता.
मग आता तूच सांग याला सर्वस्वी जबाबदार कोण? पोलिस?"
मग आता तूच सांग याला सर्वस्वी जबाबदार कोण? पोलिस?"
"नाही सर. अजिबात नाही. पण बदनामीच्या भीतीने हे असे प्रकार उघडकीस येत नाहीत. शेवटी एखादया मुलीच्या आयुष्याचा प्रश्न असतो सर."
"हो बरोबर आहे तुझे. पण मग त्यामुळे असे गावगुंड मोकाट सुटतात आणि गुन्हेगारीला आपसूकच मग खतपाणी मिळते ना."
एव्हाना हर्षला कळून चुकले होते की सर नेत्राबद्दल बोलत आहेत. क्षणभर त्याला वाटले,'सगळे सांगून टाकावे पोलिसांना.' खूपच संभ्रमात पडला तो.
क्रमशः
तर काय वाटते तुम्हाला नेत्रा सोबत जे काही घडले ते हर्षने सांगायला हवे का पोलिसांना? काय होईल पुढे? जाणून घेण्यासाठी वाचत रहा, 'अनोळखी दिशा..कथा अनोख्या प्रेमाची.'
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा