Login

अनोळखी दिशा..(भाग २०)

कथा अनोख्या प्रेमाची.
मागील भागात आपण पाहिले की, हर्षने त्या तरुणाविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये रीतसर कंप्लेंट दाखल केली . नेत्राचा देखील जबाब घेण्यात आला. नेत्राला छळणाऱ्या तिच्या सावत्र आईला आणि मामाला देखील पोलिसांनी कडक शब्दांत समज दिली. आता पाहुयात पुढे...

नेत्राच्या भूतकाळाबद्दल पोलिसांना सांगावे की नाही? ह्या संभ्रमात हर्ष होता. पण काही काळ तोही जणू स्वार्थीच झाला.

'आता जर मी काही बोललो तर सगळेच अवघड होऊन बसेल आणि नेत्राची बदनामी होईल ती वेगळीच. त्यातच घरी जर ही गोष्ट समजली तर इतक्यात तरी आमचे लग्न होणे शक्य नाही. निलम काकीला तर आयते कोलीतच मिळायचे कांगावा करण्यासाठी. पाहू जेव्हा समजेल तेव्हा समजेल. तसाही लौकिक तर पोलीसांच्या ताब्यात आहे. अगदीच गरज पडली तर तेव्हा बघू काय करायचे ते?'

खूप विचार करून हर्षने तो विषय तात्पुरता का होईना पण क्लोज केला.

"बरं सर चला येतो मी. काहीही मदत लागली तर आवर्जून सांगा. शक्य तितकी मदत करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल." साहेबांची परवानगी घेऊन हर्ष घरी जायला निघणार तोच समोरून सुपर्णा आत येताना त्याला दिसली.

तिला पाहून काही क्षण तो जागेवरच स्तब्ध झाला. दोघांचीही नजरानजर झाली. हर्षला समोर पाहून ती पुरती गोंधळली. अपराधीपणाची भावना तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती त्याला. त्याच्या डोळ्यांत मात्र तिच्याबद्दल फक्त आणि फक्त रागच होता.

काहीही न बोलता हर्ष लगेचच तिथून निघून गेला. सुपर्णा मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे काही क्षण बघतच राहिली.

'एकदा फक्त हर्षने माझे ऐकून घ्यावे', असे क्षणभर मनात आले तिच्या. पण कोणत्या तोंडाने ती आता त्याच्याशी बोलणार होती. तिला तिच्या कृत्याचा पश्चात्ताप होत होता. तिला मनापासून माफी मागायची होती हर्षची. पण आता वेळ निघून गेली होती.

'का आली असेल सुपर्णा पोलिस स्टेशनमध्ये?' राहून राहून हा एकच प्रश्न हर्षच्या मनात घोळत होता.

विचार करता करता हर्ष केव्हा घरी पोहोचला हे त्यालाही समजले नाही.

घरी आल्यावर घरात पूर्णत: शांतता पसरली होती. नयना ताई आणि आजीने हर्षला पाहून न पाहिल्यासारखे केले. हे हर्षच्या बरोबर लक्षात आले.

"आलात साहेब! कुठे होतात सकाळपासून? काहीतरी पद्धत असते ना घरच्यांना सांगून जाण्याची. एरव्ही काम, बिझनेस याबद्दल इतरांना ज्ञान पाजळणाऱ्या व्यक्तीने तरी इतकं बेजबाबदारपणे वागू नये...ॲटलिस्ट एखाद्या इंपॉर्टन्ट मीटिंगच्या दिवशी तरी." निलम काकीने सवयीप्रमाणे प्रचंड तोंडसुख घेतले हर्षवर.

हर्षला स्वतःची चूक मान्य होती. त्यामुळे निलम काकीला प्रतिउत्तर देण्याचे त्याने टाळले. उगीच वाद नको म्हणून तो काहीही न बोलता त्याच्या रुममधे निघून गेला.

नयना ताईंना मात्र लेकाचे आजचे हे वागणे अजिबात पटले नाही. सर्वांसमोर आणि विशेष करून निलम काकीसमोर तमाशा नको म्हणून त्या लागलीच हर्षच्या पाठोपाठ त्याच्या रुममध्ये गेल्या, त्याला जाब विचारण्यासाठी.

"हर्ष! तुझ्याकडून ही अपेक्षा मुळीच नव्हती मला. असं ऐन मीटिंगच्या वेळी क्लायंट समोर असताना तू कसा काय बाहेर निघून जाऊ शकतोस? इतकं बेजबाबदारपणे आज वागला आहेस ना तू की, बाबांचा राग कसा शांत करु मी? तेच मला समजेना झालंय."

"आई, सॉरी ग! पण खरंच माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. बिझनेस डील आज नाही तर उद्या मिळेल पण एखाद्याचे आयुष्य... त्याचे काय? ते एकदा का बरबाद झाले की मग पुन्हा पूर्वपदावर येणे अशक्यच."

"नेमकं काय म्हणायचंय तुला? तू नेत्राकडे गेला होतास ना? तिकडे काही प्रॉब्लेम झालाय का?"

"आई... आज नेत्राचा साखरपुडा होता."

"काय...?" नयना ताई जवळपास हादरल्याच.

हर्षने मग घडलेला सर्व प्रकार कथन केला नयना ताईंना. त्यांनाही खूप मोठा धक्का बसला.

"माझा मुलगा किती विचारी आहे, तो अजिबात बेजबाबदार नाही! हे मी घरातील इतर लोकांना कसे पटवून देऊ हर्ष? तू कधी एखादी मोठी चूक करतोस आणि अलगदपणे त्यात अडकतोस, यावरच घरातील काही लोकांचे लक्ष आहे हर्ष. तुझे चांगले झालेले घरातीलच काही लोकांना बघवत नाही, हे कसे समजत नाही रे तुला?"

"आई मला काहीच कळत नाही असं वाटतंय का गं तुला? तू निलम काकीबद्दल बोलत आहेस; हे लक्षात येतंय माझ्या. पण तिचा स्वभाव माहिती आहे ना तुला; मग नको ना लक्ष देवूस तिच्याकडे."

"मी कितीही दुर्लक्ष करेल रे पण तिने तसं होवू द्यायला हवं ना! अरे जेव्हापासून महेश भाऊजींचा फोन येवून गेलाय दुपारी, तू घरी आला आहेस का? हे विचारण्यासाठी आणि जेव्हापासून तिला समजलंय की तू घरीही नाही आणि ऑफिसमध्येही नाही तेव्हापासून सारखं तोंड सुरू आहे तिचं. घालून पाडून सारखं काही ना काही बोलत आहे ती आणि तुला हे असं कुणी बोललेलं मला नाही सहन होत रे बाबा." लेकाच्या प्रेमापोटी नयना ताई बोलल्या.

"म्हणजे बाबांनी काकांना मी नेत्राकडे गेलोय हे सांगितलेच नाही."

"हिला समजू नये म्हणून कदाचित त्यांनी सांगितलं म्हणून मुद्दाम नसेल सांगितले आणि आई, तू नको ना जास्त विचार करुस. दुर्लक्ष कर तिच्याकडे."

"बरं जाऊ दे, ते सोड सगळं! मला सांग, नेत्रा कशी आहे? खूप आठवण येते रे तिची. खूप लळा लावला होता पोरीने. गेल्यापासून तिचा आवाज देखील ऐकला नाही बघ."

"बोलायचे का तुला तिच्यासोबत?" हर्षने विचारले.

"अरे पण तिची आई? ती बोलू देईल का?"

"त्यांचे नको आता तू टेन्शन घेवू. पोलिसांनी चांगलीच तंबी दिलीये त्यांना. आता काही हिम्मत करणार नाहीत त्या तिला त्रास देण्याची. थांब मी लगेच फोन लावतो तिला."

"तू लाव फोन, मी आजीला बोलावून आणते तोपर्यंत. त्यांनाही तिची खूप आठवण येते रे." घाईतच मग नयना ताई आजीला बोलवायला बाहेर गेल्या. घडलेला सर्व त्यांनी मग आजीच्या कानावर घातला.

"हॅलो, काय ग कशी आहेस?" खूप दिवसांनी फोन झाल्यावर जसे बोलतात तसे हर्ष बोलला.

"का रे? असं का विचारतोस?" आज बराच वेळ सोबत असूनही हर्षचा हा प्रश्न अनपेक्षित होता नेत्रासाठी.

"माझी मर्जी, तुला काही प्रॉब्लेम? मला वाटलं मी विचारलं." लटक्या रागातच हर्ष उत्तरला.

"तसे नाही रे! पण आताच एक तासापूर्वीपर्यंत मी तुझ्यासोबतच होते ना? म्हणून म्हटलं बाकी काही नाही."

"वाकडंच बोल तू. सरळ उत्तर काही देवू नकोस."

"बरं बाबा! मी ठीक आहे. आतातरी झालं का तुझं समाधान?"

"नाही, तू लवकर कायमची इकडे निघून ये. तेव्हाच माझे समाधान होईल."

"तू ये की मग मला लवकर घेऊन जायला. लगेच मी येते की नाही तुझ्याबरोबर बघ मग."

"येतो लवकरच." हसतच हर्ष बोलला. तेवढयात नयना ताई आणि आजी आत आल्या. तसा हर्ष गडबडला.

बेडवर आडवा झालेला हर्ष झटकन मग उठून बसला.

"बरं नेत्रा ऐक ना, अगं! आईला आणि आजीला तुझी खूप आठवण येत आहे. त्यांना बोलायचे आहे तुझ्याशी."

"अच्छा! म्हणजे आठवण फक्त आजीला आणि आईला येत आहे माझी. तुला येत नाही हे फायनली तू कबूल केलंसच."

"गप गं! तुझ्याकडे मी नंतर बघतो. " एकदम हळू आवाजात हर्ष बोलला.

नयना ताईंना आणि आजीला मात्र हसू आले.

"बरं आम्ही जावू का? तुमचं चालू द्या आम्ही काय नंतरही बोलू शकतो. उगीच कबाब मे हड्डी कशाला ना!" आजीने नातवाची मस्करी केली. आजीलाही क्षणभर तिचे जुने दिवस आठवले मग.

"गप गं आजी. बरं नेत्रा ऐक ना, मी व्हिडिओ कॉल करतो; बोल मग आजी आणि आईसोबत."

हर्षने मग लगेचच व्हिडिओ कॉल केला नेत्राला.

"हॅलो आजी! कशा आहात आणि काकू तुम्ही?"

"आम्ही सगळे मजेत गं. तुझी सारखी आठवण येते बघ."

"मलाही खूप आठवण येते ओ तुम्हा सगळ्यांची."

"नेत्रा आता बस झालं बाई, ये तू लवकर आता कायमची इकडे."

नयना ताईंचे हे शब्द कानी पडताच नेत्राच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. बाजूला उभा असलेला हर्ष देखील गालातल्या गालात हसत होता. नेत्रालाही आता कधी एकदा हर्षच्या घरी जाते असेच झाले होते जणू.

नेत्राला तिचे भविष्यातील सुखाचे दिवस खुणावत होते. पण तरीही त्या सुखाला भूतकाळातील त्या घटनेचे कोंदण होतेच.

इकडे आई, आजी आणि नेत्राच्या गप्पा संपायचे काही नावच घेईनात.

"ये आजी, आवरा बरं लवकर. माझ्या मोबाइलची बॅटरी लो झालीये आता. तुम्ही बायका एकदा का सुरु झाल्या की मग थांबायचे काही नावच घेत नाहीत बाबा."

"ह्मममम... कळतंय हो आम्हाला तुला कसला त्रास होतोय ते!" नयना ताई गमतीच्या सुरात बोलल्या.

"बरं चल बाई नेत्रा, आम्ही जातो आता. तुम्ही दोघं बोला, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी पण करायची आहे."

हर्षकडे फोन देवून आजी आणि नयना ताई आपापल्या कामासाठी निघून गेल्या.

"काय मग मॅडम, बघितलं ना आतापासूनच कशी पार्टी चेंज केली ह्या दोघींनी. आम्ही आपले गरीब बाबा! आम्हाला कोण विचारतो आता. खऱ्याचा जमानाच नाही राहिला हल्ली."

"अरे देवा! हो का? काय रे आदी कुठून तरी जळण्याचा वास येतोय का रे तुला?"

"गप ग ताई! आतापासूनच किती त्रास देशील त्याला? हर्ष तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पार्टीत. समोरुन आदित्य बोलला."

"तूच रे! तूच बाबा. फक्त तुलाच माझी काळजी आहे."

"बरं चल बाय हर्ष. मलाही स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तू काय बाबा मस्त आडवा झालास बेडवर. कर मग आराम."

"ओके, चल बाय."

दोघांनीही मग फोन ठेवला. फोन ठेवताच हर्षने लगेचच मेसेज केला नेत्राला, 'आवरल्यानंतर रात्री झोपताना फोन कर.'

हर्षचे हे असे नेत्रामध्ये गुंतत जाणे तिलाही मनापासून आवडत होते, हे मात्र तितकंच खरं.

'देवा आता प्लीज कोणतेही विघ्न येवू देवू नको आमच्या नात्यात.' म्हणत नेत्राने देवाला नमस्कार केला. हर्षबरोबर सुखी संसाराची स्वप्न पाहण्यात मग ती हरवून गेली.

क्रमशः

आता हर्ष आणि नेत्रा या दोन अनोळखी दिशा फायनली एक होणार हे तर फिक्स झाले. पण तरीही त्यांच्या सुखी आयुष्याची सुरुवात होण्याआधीच कोणते विघ्न तर येणार नाही ना? जाणून घ्या पुढील भागात.