मागील भागात आपण पाहिले की, हर्षला पोलिस स्टेशनमध्ये सुपर्णा दिसते. एकमेकांना अचानक असे समोर पाहून दोघेही गोंधळतात. आता पाहुयात पुढे...
नेत्रासोबत फोनवर बोलून हर्ष खूपच फ्रेश फील करत होता. नेत्रासोबत भविष्याची स्वप्न रंगवत फ्रेश होऊन तसाच तो बेडवर आडवा झाला.
अचानक मध्येच त्याला सुपर्णाचा तो भांबावलेला चेहरा आठवला.
'खरंच...का आली होती आज सुपर्णा पोलिस स्टेशनमध्ये?'
हर्षचे मन मात्र विचारांच्या खोल गर्तेत हरवले. क्षणभर नेत्राला विसरुन तो सुपर्णाच्या आठवणीत रममाण झाला.
'सुपर्णा कोणत्या अडचणीत तर नसेल ना?'
'पण मी का विचार करत आहे तिचा?' जुन्या काही गोष्टी आठवून क्षणात हर्षचे मन सुपर्णाच्या विचारांपासून दूर जाऊ पाहत होते.
'हर्ष! बस झालं आता, नको अडकूस आता पुन्हा त्या विश्वासघातकी भूतकाळात. काहीही झाले तरी तुझे वर्तमान आणि भविष्य खूपच सुंदर आहे. तिकडे लक्ष दे सध्या.' हर्षचे मन देखील त्याला सुपर्णापासून दूर जायला सांगत होते.
तरीदेखील इतका विश्वासघात होवूनसुध्दा न राहवून त्याने पोलिस स्टेशनला मोठ्या साहेबांना फोन लावला.
"हॅलो! हा हर्ष बोल."
"सर मला थोडी माहिती हवी होती!"
"कसली माहिती? म्हणजे कोणत्या संदर्भात आहे?"
"दुपारी मी जेव्हा पोलिस स्टेशन मधून निघालो तेव्हा अंदाजे पंचविशीतील एक तरुणी आली होती पोलिस स्टेशनला. ती नेमकी कोणत्या कामासाठी आली होती हे जाणून घ्यायचे होते मला."
"तसं जर पाहिलं तर ही अशी कोणतीही माहिती आम्हाला देता येत नाही बाहेर कोणालाही. पण तू ओळखीचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एक हुशार आणि विश्वासू व्यक्ती आहेस म्हणून द्यायला काही हरकत नाही. पण त्याआधी मला सांग, तू ओळखतोस का त्या तरुणीला?"
"हो ओळखतो." कोणतेही आढेवेढे न घेता हर्ष उत्तरला.
"थोडं स्पष्टच बोलतो सर, ती माझी कॉलेजची मैत्रीण...सुपर्णा. आता आम्ही जास्त कॉन्टॅक्ट मध्ये नाही म्हणून मी तिला न विचारता डायरेक्ट तुम्हाला फोन केला."
"बरं बरं...काही हरकत नाही. देतो मी तुला तिची सगळी माहिती. अरे! तिचा काहीतरी फॅमिली मॅटर झालाय. म्हणजे आता काही दिवसांपूर्वीच तिचा एका तरुणाशी विवाह झाला. पण त्यात तिची फसवणूक झाली, असे तिचे म्हणणे आहे. त्याबाबतीतच कंप्लेंट करायला आली होती ती."
"म्हणजे नेमकं काय झालं होतं ते समजू शकेल का सर?"
"तिचे ज्या मुलासोबत लग्न झाले तो एका मल्टीनॅशनल कंपनीचा सिईओ आहे असे काहीतरी खोटे सांगितले होते त्याने लग्न जमवताना. त्यातच स्वतःचे दोन फ्लॅट पण आहेत मुंबईत हेदेखील खोटेच सांगितले होते. प्रत्यक्षात त्याचा फक्त एक वन बीएचके फ्लॅट आणि पंचवीस हजारांची त्याची नोकरी आणि तीदेखील टेंपररी. एवढीच त्याची प्रॉपर्टी."
"मग आता?"
"आता काय! त्या मुलीला घटस्फोट हवाय आणि त्याला त्याच्या खोटारडेपणाची शिक्षा मिळावी ही तिची अपेक्षा."
"अरे देवा!"
"पण मला हे कळत नाही हर्ष...लग्न काय भातुकलीचा खेळ वाटतो का आजकालच्या तरुणाईला. आधीच पूर्ण चौकशी करायची आणि मगच आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घ्यायचा; ही एवढीशी साधी गोष्ट कशी कळत नाही लोकांना याचेच मला नवल वाटते."
"हो ना! अगदी बरोबर आहे सर तुमचे."
"म्हणून आधीच सांगतो तुला, लग्न करताना खूप विचारपूर्वक निर्णय घे. मुलीची अगदी बारकाईने सर्व चौकशी कर आणि मगच बोहल्यावर चढ बाबा." हसतच सर बोलले.
"हो सर नक्कीच. तेवढी काळजी तर घ्यायलाच हवी. शेवटी संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो.
"बरं चल एक अर्जंट काम आलंय, बोलू आपण नंतर."म्हणत सरांनी फोन ठेवला.
त्यांनी फोन ठेवला पण हर्षच्या कानात मात्र अजूनही त्या सरांचा शब्द न शब्द घुमत होता.
'जैसी करणी वैसी भरणी, म्हणतात ते काही खोटं नाही.' हर्ष मनातच बोलला.
'सुपर्णा आज सगळी सुखं लाथाडून तू तुझ्या मनाचे ऐकलेस. माझ्या प्रेमाचा अनादर केलास. माहीत नाही का तू एव्हढा मोठा निर्णय आणि तोही इतका अविचाराने घेतलास? पण होणाऱ्या गोष्टींना कोणी अडवू शकत नाही, हेही तितकेच खरे. कदाचित यालाच आयुष्य म्हणतात. सुख-दुःख हे ऊन सावलीप्रमाणे मनुष्याचा पाठलाग करतच राहतात.
तू गेल्यानंतर माझ्या आयुष्याच्या उजाड माळरानावर हिरवळ पसरविण्यासाठी म्हणून की काय माहित नाही पण परमेश्वराने अगदी योग्य वेळी नेत्राला माझ्या आयुष्यात पाठवले. हिच नियतीची आणि परमेश्वराची इच्छा होती जणू. मलादेखील हा दैवाचा अनोखा खेळ अजूनही समजला नाही. पण म्हणतात ना...जे होते ते चांगल्यासाठीच, हेही तितकेच खरे. '
तू गेल्यानंतर माझ्या आयुष्याच्या उजाड माळरानावर हिरवळ पसरविण्यासाठी म्हणून की काय माहित नाही पण परमेश्वराने अगदी योग्य वेळी नेत्राला माझ्या आयुष्यात पाठवले. हिच नियतीची आणि परमेश्वराची इच्छा होती जणू. मलादेखील हा दैवाचा अनोखा खेळ अजूनही समजला नाही. पण म्हणतात ना...जे होते ते चांगल्यासाठीच, हेही तितकेच खरे. '
विचारांच्या खोल डोहात हर्ष पुरता बुडाला होता. तेवढयात नयना ताईंनी त्याला जेवायला म्हणून आवाज दिला.
"हर्ष! चल जेवून घे बाळा."
बाहेर डायनिंग टेबलवर सगळेच जमले होते. हर्षच्या मनात मात्र खूपच धाकधूक वाढली होती. बाबा आणि काकांना समोर पाहताच तो मनातून खूपच घाबरला. दोघेही हर्ष सोबत हटकून वागत होते. आता एवढं सगळं होवून गेल्यावर लगेचच काय बोलणार होता तो? त्याच्यामुळे आज हाती आलेली डील कॅन्सल झाली होती. त्यामुळे हर्षला जास्तच अपराधीपणाचे फिलिंग येत होते.
'जेवण झाल्यावर बोलता येईल बाबांसोबत.' असा विचार करून हर्ष खाली मान घालून शांतपणे जेवण करु लागला.
निलम काकी मात्र मनातून खूपच आनंदली.
'चला हे एक बरं झालं. दोघा बाप लेकात ठिणगी पडली ते तर उत्तमच झालं. सुंठीवाचून खोकला गेला.' ओठ दाबत निलम काकीने कसेबसे हास्य कंट्रोल केले.
काहीही न बोलता निलम काकीच्या चेहऱ्यावरील आनंद मात्र स्पष्ट दिसत होता.
आज डायनिंग टेबलवर भयाण शांतता होती. एरव्ही हसत खेळत सुरु असलेला दिनक्रम आज मात्र बदलला होता.
अगदी शांततेत सर्वांची जेवणं आटोपली.
जेवण झाल्यावर माधवरावांनी पेढ्यांचा बॉक्स हर्षच्या समोर धरला. हर्षला काहीच समजेना. बाबा असे का वागत आहेत? एवढी मोठी डील हातातून गेली याचे दुःख करायचे सोडून बाबा पेढे का वाटत आहेत? सर्वजण आश्चर्याने पाहतच राहिले. हे काय सुरु आहे? ते मात्र कोणालाच समजेना.
"बाबा, पेढे कशाबद्दल?" हर्षने घाबरतच विचारले.
"घे आधी तोंड गोड कर, नंतर सांगतो." हर्षला स्वत:च्या हाताने पेढा भरवत माधवराव बोलले.
तुम्ही सगळेही घ्या." म्हणत माधवरावांनी सर्वांच्या हातावर पेढा ठेवला.
इकडे निलम काकीला तर आता चक्कर यायचीच तेवढी बाकी होती.
"बाबा आता तरी सांगा ना, काय बातमी आहे?"
"आपली डील फायनल झाली हर्ष आणि हे फक्त तुझ्या आणि नेत्रामुळे शक्य झाले आहे." माधवराव हसतच बोलले आणि हर्षची त्यांनी गळाभेट घेतली.
"आय एम प्राऊड ऑफ यू माय सन." अभिमानाने माधवराव बोलत होते.
नयना ताईंच्या डोळ्यांत मात्र आनंदाश्रू तरळले.
'देवा! ह्या बाप लेकाच्या नात्याला कोणाचीही दृष्ट न लागो.' म्हणत नयना ताईंनी देवासमोर हात जोडले.
"काय सांगता बाबा? पण हे केव्हा आणि कसं झालं? त्यात नेत्रा आणि माझ्यामुळे, ते कसं काय?"
"अरे मीटिंगच्या आधीच तुमची दोघांची इतक्या दिवसांची मेहनत, ती कामी आली बघ. त्यामुळे सगळेच काम सोप्पे झाले. तुझा अचानक मेसेज पाहिला, तू आज नाही म्हटल्यावर मला तर घामच फुटला. त्यात समोर क्लायंट. सुरुवातीला जाम टेन्शन आले होते मला. पण परीस्थिती हँडल करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.
जेवढ्या फाईल्स होत्या ड्रॉवरमध्ये त्यात एक वेगळीच आणि नवीन फाईल दिसली मला. मीही पहिल्यांदाच पाहत होतो ती फाईल. नेत्राने गेल्या चार महिन्यांचा आराखडा अगदी मुद्देसूद नोट डाऊन करून ठेवला होता त्यात. ती हेही काम इतक्या उत्तम रीतीने करु शकते ते आज समजलले मला. तिला संपूर्ण गायडन्स तुझा होता हेही लक्षात आले माझ्या."
जेवढ्या फाईल्स होत्या ड्रॉवरमध्ये त्यात एक वेगळीच आणि नवीन फाईल दिसली मला. मीही पहिल्यांदाच पाहत होतो ती फाईल. नेत्राने गेल्या चार महिन्यांचा आराखडा अगदी मुद्देसूद नोट डाऊन करून ठेवला होता त्यात. ती हेही काम इतक्या उत्तम रीतीने करु शकते ते आज समजलले मला. तिला संपूर्ण गायडन्स तुझा होता हेही लक्षात आले माझ्या."
खऱ्या अर्थाने आजचे हे यश तुम्हा दोघांचे आहे." बोलता बोलता माधवरावांचा उर अभिमानाने अगदी भरुन आला. त्यांच्या डोळ्यांत नकळतपणे आसवांची दाटी झाली.
"दादा हे एवढं सगळं झालं आज आणि तू एका शब्दाने मला बोलला नाहीस रे! खरंच आज परकं करुन टाकलं बघ तू." महेशराव नाराजीच्या सुरात बोलले.
"गप रे काहीही बोलू नकोस! मी मुद्दाम नाही सांगितले तुला आणि फक्त तुलाच नाही तर इतर कोणालाच नाही सांगितले. कारण मला हर्षला सरप्राइज द्यायचे होते. त्याच्या चेहऱ्यावरील हा आनंद मला पाहायचा होता. लेक एकदा का तयार झाला बिझनेसमध्ये मग बापाच्या डोक्यावरचा खूप मोठा भार हलका होतो बघ आणि त्याने आता खऱ्या अर्थाने बिझनेसमन म्हणून खूप मोठ्ठं व्हावं अशी मनापासून इच्छा आहे माझी."
माधवराव आज लेकाचे कौतुक करता करता थकत नव्हते.
नयना ताई आणि आजी आजोबा आज खऱ्या अर्थाने भरुन पावले.
'कधी एकदा ही बातमी नेत्राला सांगतोय,' असे झाले होते हर्षला.
उद्याच नेत्राच्या घरी जाऊन हर्ष आणि नेत्राच्या लग्नाची बोलणी करण्याचा निर्णय माधवरावांनी आणि नयना ताईंनी अखेर फायनल केला.
क्रमशः
आता तरी ह्या दोन अनोळखी दिशा एकत्र येणार का? सुपर्णाच्या रुपात कोणते नवीन वादळ तर येणार नाही ना? सवयीप्रमाणे निलम काकी मुद्दामहून काही गोंधळ तर घालणार नाही ना? जाणून घेण्यासाठी वाचत रहा 'अनोळखी दिशा'... कथा अनोख्या प्रेमाची.
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा