Login

अनोळखी दिशा..(भाग २२)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, हर्षची जुनी प्रेयसी सुपर्णा अचानक हर्षच्या समोर येते. पण हर्ष मात्र कायमस्वरूपी तिला मनातून काढून टाकण्याचाच निर्णय घेतो. दुसऱ्याच दिवशी मग हर्ष आणि नेत्राच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी कुटुंबातील मोठे जाणार होते. आता पाहुयात पुढे...

"हर्ष आवरले की नाही? चल रे बाबा!" आईने आवाज दिला.

"हो आई दोनच मिनिट दे, आलोच."

आज नेत्राला भेटायचे म्हणून भारीच तयारी सुरू होती हर्षची. आधी कितीही ओळख असली दोघांची तरी आज मात्र हर्षच्या मनात वेगळीच फुलपाखरं इकडून तिकडे नुसती पिंगा घालत होती. तिकडे नेत्राचीदेखील अगदी हीच अवस्था होती.

"काय गं आई, काका आणि काकीला आपण माझ्या आणि नेत्राच्या लग्नाची बोलणी करायला जात आहोत हे सांगितले आहे का कोणी?"

"नाही सांगितले, कदाचित देवाची पण हिच इच्छा असावी."

"म्हणजे?"

"म्हणजे आज महेश भाऊजी आणि निलम, दोघेही घरी नाहीत."

"आता दोघेही जोडीने मध्येच कुठे गेले?"

"निलमच्या माहेरी...आज तिच्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे सर्व भावंडं मिळून आई बाबांना सरप्राइज देणार आहेत. असं तिने सांगितलं बाबा मला."

"काकी स्वतःच एवढं मोठं सरप्राइज आहे, त्यात आणखी नवीन सरप्राइज देण्याची गरजच काय?" हसतच हर्ष बोलला.

"त्यात आता आल्यावर दोघांनाही तुझ्या लग्नाचं मोठ्ठं सरप्राइज मिळेल. आल्यावर आता दोघेही काय गोंधळ घालतात देवच जाणे! त्यात भाऊजींना वाटतं हे लोक मला काहीच सांगत नाहीत. माझ्यापासून काही गोष्टी लपवून ठेवतात. "

"मग त्यानेही विचार करून वागावं, छोट छोट्या गोष्टीही तो काकीला सांगून मोकळा होतो. ती आहेच मग तमाशा करायला मोकळी."

"महेश भाऊजींचे काही नाही रे, नंतर बायकोला समजल्यानंतर वाद नकोत म्हणून तेही सांगत असतील."

"अगं पण, प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असतात की नाही?"

"ह्मममम...ते तर आहेच."

"अरे काय चाललाय रे तुमचा टाईमपास? वेळ काय आणि तुम्ही मायकेल गप्पा कसल्या मारत बसलात? चला बरं पटकन्!"

आजीने येवून दोघांनाही पुढे घालून आधी बाहेर काढले.

"हर्ष! आज मी चालवतो गाडी. तू निवांत बस." माधवराव म्हणाले.

"का ओ बाबा? चालवतो की मी."

"नको नको आज तू बाजूलाच बस. आधीच ध्यानी मनी स्वप्नी फक्त नेत्राच आहे. त्यामुळे गाडी चालवण्याकडे थोडीच तुझे लक्ष राहील."
आजीचे असे गमतीचे बोलणे ऐकून सगळेच हसायला लागले.

आजी मात्र आज फूल फॉर्म मधे होती. नातसून येण्याचा उत्साह आजीच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

"काय गं आजी! काहीही काय?" लाजतच हर्ष बाजूच्या सीटवर येवून बसला.

"बरं हर्ष! नेत्राला कॉल करून आपण निघालोय म्हणून सांग." नयना ताईंनी लेकाला फर्मान सोडले.

"सांगितले." चटकन हर्ष उत्तरला.

"कधी? मी तर आतापर्यंत तुझ्या सोबतच होते आणि तू कधी फोन केलास?" नयना ताईंनी आश्चर्यकारकरित्या प्रश्न केला.

"अगं मगाशी हा रुमाल विसरण्याचे नाटक करुन पुन्हा एकदा त्यासाठीच तर आत गेला होता." गमतीच्या सुरात माधवराव बोलले, तसा गाडीत एकच हशा पिकला.

"बापरे! हे अनुभवाचे बोल आहेत वाटतं, काय रे माधवा? म्हणूनच हे आमच्या आधी तुझ्या लक्षात आलं बाबा." आजीने लेकाला बरोबर टोमणा मारला.

आज काही आजी कोणाला बोलायची एक संधी सोडत नव्हती. आता तर स्वतःच्या लेकालाही त्यांनी सोडले नाही.

आजीच्या बोलण्यावर मात्र पुन्हा एकदा खो खो करुन सगळेच हसायला लागले.

"काहीही काय गं आई?" हसतच माधवराव उत्तरले हळूच मग त्यांनी समोरच्या आरशातून पाठीमागच्या सीटवर बसलेल्या आपल्या बायकोकडे एक हलकासा कटाक्ष टाकला. नयना ताईंनी मात्र लाजतच नजर चोरली.

आताही आजीने त्यांची चोरी बरोबर पकडली.

"माधवा, गाडीकडे लक्ष दे बाबा. आम्ही पण आहोत मागे." आजीने आता लेकालाही सोडले नाही.

आज दोघा बाप लेकाचे काही खरे नव्हते. कारण आजी आज बोलायची एकही संधी सोडत नव्हती.

ते काही का असेना, पण आज सगळेचजण खूपच आनंदात होते. हे मात्र तितकंच खरं.

गप्पांच्या ओघात नेत्राचे घर जवळ आल्याचेही कोणाच्या लक्षात आले नाही. हसत खेळत सर्वचजण नेत्राच्या घरी पोहोचले.

नेत्राच्या आईने पाहुण्यांचे आदराने स्वागत केले. आदित्यला पहिल्यांदा भेटून सगळेजण खूपच खुश झाले. त्याने ज्या पद्धतीने भावाचे कर्तव्य निभावले होते ते ऐकून आधीच सगळे त्याच्यावर खुश होते. सर्वांना भेटून आदित्यही खूपच खुश झाला.

आज नेत्रा आणि हर्षचा रितसर कांदे पोह्यांचा कार्यक्रम होता. आतल्या रुममध्ये नेत्रा तयार होत होती. तशी तिची तयारी झाली होती. पण आता सर्वांसमोर येताना मात्र तिची पावले जड झाली होती. शेवटी लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक क्षण. स्वतःच्या लग्नाचा विचार करुन क्षणभर नेत्रा हळवी झाली. आई बाबांची आठवण खूपच सतावत होती तिला. सावत्र आईचे आणि तिचे बाँडींग कधी झालेच नाही. कळत्या वयात तिला आईचे मार्गदर्शनही कधी मिळाले नाही.

'आता स्वतःहून बाहेर जावे? की कोणी बोलवण्याची वाट पाहावी?' या संभ्रमात ती अडकली होती. प्रमिला ताई दाखवत जरी नसल्या तरी नेत्रा आणि हर्षचे लग्न त्यांना मनातून मान्यच नव्हते. एकंदरीतच ही गोष्ट नयना ताईंच्या बरोबर लक्षात आली.

कोणताही विचार न करता नयना ताई उठल्या. नेत्राला आपली गरज आहे हे मनातून नयना ताईंना जाणवत होते.

"आदित्य, मला नेत्राची रुम दाखवतोस?" नयना ताई म्हणाल्या.

"हो चला ना." म्हणत आदित्य नयना ताईंना घेऊन आत गेला. दोन चौकटी ओलांडून गेल्यावर समोरच नेत्राची रुम होती.

"नेत्रा, बाळा आवरले का गं ?"

नयना ताईंना समोर पाहून नत्राचे डोळे पाणावले.

"हो काकू आवरले आहे. पण बाहेर कशी येवू तेच समजेना?"

"अगं इतका काय विचार करतेस? आम्ही थोडीच ना कोणी परके आणि नवखे आहोत. चल माझ्यासोबत आणि आणखी एक, खूप गोड दिसतियेस तू बरं का! माझीच दृष्ट लागायची बाई तुला." म्हणत नयना ताईंनी तिच्या तोंडावरून हात फिरवत कडाकडा बोटे मोडली.

"थँक्यू काकू." हसतच नेत्रा म्हणाली.
"आज हर्षचे काही खरे नाही बाबा." नयना ताईंनी नेत्राची खेचायला सुरुवात केली.

"काय हो काकू तुम्ही पण ना..." म्हणत लाजतच मग नेत्राने नजर खाली झुकवली.

नेत्राचा मूडच एकदम चेंज होवून गेला. खरंच...नयना ताईंचा खूपच आधार वाटला त्याक्षणी नेत्राला. मनातून कुठेतरी नयना ताईंमधे ती स्वतःची आई शोधत होती.

नयना ताईंच्या पाठोपाठ नेत्रा बाहेर आली. प्रमिला ताईंनी पाणी दिले होते सर्वांना. नेत्रा मग पोह्यांचा ट्रे घेऊन आली.

नेत्राला समोर पाहून हर्षची नजर तिच्यावरच खिळली. बदामी रंगाच्या साडीतील नेत्राचे रुप जास्तच खुलले होते. गालावर रुळणारी केसांची बट तिच्या सौंदर्यात आणखीच भर घालत होती. बरेच दिवस इनामदारांच्या घरात राहणारी ती हीच नेत्रा आहे का? असा प्रश्न क्षणभर सर्वांनाच पडला.

इनामदारांच्या घराला जशी सून हवी होती नेत्रा अगदी तशीच होती. आज खऱ्या अर्थाने हर्ष आणि नेत्राच्या नात्याला अर्थ प्राप्त होणार होता.

नेत्राच्या हातातील ट्रेमधून पोह्यांची प्लेट घेताना हर्षची आणि तिची नजरानजर झाली. दोघांच्याही हृदयाची धडधड मात्र तेव्हा अचानक वाढली. प्लेट घेताना नकळतपणे हाताला झालेल्या एकमेकांच्याय स्पर्शाने दोघेही शहारले. आधी एकमेकांबद्दल असणाऱ्या मैत्रीच्या भावना आता मात्र अचानक बदलल्या.

सर्वांना पोहे देऊन नेत्रा समोरच्याच खुर्चीत बसली. आजचा हा पाहण्याचा कार्यक्रम म्हणजे फक्त एक फॉर्मलिटी होता. चहा नाश्त्याचा कार्यक्रम सुरू असताना नेत्राचे मामा तिथे आले. अर्थातच प्रमिला ताईंनीच भावाला बोलावून घेतले होते.

आज इनामदार फॅमिली नेत्रा आणि हर्षच्या लग्नाची बोलणी  फायनल करूनच जाणार होते.

माधवरावांनी आणि हर्षच्या आजोबांनी मग नेत्राच्या मामा आणि आईसोबत बोलून लग्नाची सर्व बोलणी केली.

"आम्हाला बाकी काहीही नको, आम्हाला फक्त मुलगी द्या. लग्न आणि लग्नाचा सर्व खर्च आमचा आम्ही पाहतो. तुम्ही फक्त मुलीला घेऊन हजर राहा, लग्न ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी पार पडेल."

फायनली हर्ष आणि नेत्राच्या लग्नाची सुपारी फुटली.

नजरेतून आणि अनोळखी वळणावर सुरू झालेली ही अनोखी प्रेमकहाणी अखेर लग्नापर्यंत येवून पोहोचली होती.

"हर्ष, नेत्रा आजच्या दिवसाची आठवण म्हणून दोघेही छान फोटो काढा. आयुष्यातील हे असे छोटे छोटे क्षण हृदयात आणि कॅमेऱ्यात नेहमी बंदीस्त करुन ठेवावेत. आमच्या वेळी साधा एक फोटो काढायचं म्हटलं तरी आवरून सावरून स्टुडिओत जावं लागायचं. त्यावेळी खूप तारांबळ उडायची. आता तुमच्या वेळी मात्र तसं राहिलं नाही. तुम्ही केव्हाही आणि कितीही फोटो तुम्ही काढू शकता. एन्जॉय करायचे हे दिवस." नयना ताई म्हणाल्या.

नव्या प्रेमाची नवी नवलाई दोघांच्याही चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती. आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी दोघेही आतुर होते. आदित्यने मग हर्ष आणि नेत्राचे मोबाईल मध्ये छान फोटो काढले. आठवणींची खूप सारी साठवण झाली त्या एका दिवसात.

एक महिन्यानंतरची लग्नाची तारीख फायनल करण्यात आली. दोन्ही घरी हे पहिलेच लग्न होते. त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी ओसंडून वाहत होता.

लग्नाची सर्व बोलणी अगदी व्यवस्थितरित्या पार पडली. नेत्राचा आणि तिच्या घरच्यांचा निरोप घेवून सर्वजण निघाले. गाडीत बसण्याआधी नेत्रा आणि हर्षची नजरानजर झाली. दोघांनीही नजरेतूनच एकमेकांवर मग प्रेमाचा वर्षाव केला.

आता खऱ्या अर्थाने सुरू झाला नात्याचा नवा प्रवास.

क्रमशः

हर्ष आणि नेत्राच्या लग्नाची बातमी जेव्हा निलम काकी आणि महेश काकांना समजणार तेव्हा त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया असणार? जाणून घ्या पुढील भागात.