Login

अनोळखी दिशा..(भाग २४)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, नेत्रा आणि हर्षच्या लग्नाची बातमी जेव्हा निलम काकीला समजली तेव्हा तिने करायचा तो तमाशा केलाच. नेत्रा सून बनून या घरात येवू नये यासाठी निलम काकी नवनवीन मनसुबे आखू लागली. आता पाहुयात पुढे.

त्या दिवशी निलम काकीला रात्रभर झोप काही लागली नाही. सतत या कुशीवरून त्या कुशीवर तिचे सुरुच होते. डोक्यातील विचारांचे वादळ थांबायचे काही नाव घेत नव्हते.

'एकवेळ त्या बिनडोक सुपर्णाला या घरात एन्ट्री मिळू दिली असती तर ते चाललं असतं. पण ही नेत्रा मात्र अवघड जागेचं दुखणं होऊन बसलीये. आता फक्त घरातच नाही तर कंपनीत सुद्धा मालकीण बनून फिरेल. तेवढी लायकी तरी आहे का तिची! त्यात ह्या दोघी आहेतच मोकळ्या, तिला डोक्यावर घेऊन नाचायला.'

निलम काकीच्या विचारांचे चक्र थांबायचे काही नावच घेईना. तिच्या बरोबरच त्या बिचाऱ्या महेश काकांचे देखील हाल.

पुढच्या दोनच दिवसांत लग्नाचे कपडे आणि दागिने खरेदीचे प्लॅनिंग करण्यात आले. एकीकडे घरातील सर्वच लग्न तयारीत गुंतले होते तर दुसरीकडे निलम काकीचे वेगळेच प्लॅनिंग सुरु होते.

एकीकडे नेत्रा आणि हर्ष मात्र त्याच्या नव्या प्रेमाच्या नव्या नवलाईत अगदी रंगून गेले होते. दिवसागणिक प्रेमाची हिरवळ आणखीच बहरत होती.
तर दुसरीकडे नयना ताई आणि आजीला मात्र वेगळीच चिंता सतावत होती.

"काय गं नयना सर्व काही समजल्यानंतर देखील मॅडम इतक्या शांत कशा?" आजी थोडी संशयास्पद सुरात बोलल्या.

"जाऊ द्या ना आई, उलट आपल्यासाठी बरंच आहे ना ते. ती शांत असली की माझे कामात तरी लक्ष लागते. भलेही मग तिने काडीचे काम नाही करु दे पण शांत राहून घरात देखील शांतता नांदू द्यावी असेच वाटते."

"अगं पण मला तर वेगळीच शंका येतिये. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता तर नसेल ना? एकदा का हे लग्न व्यवस्थितपणे पार पडले म्हणजे झाले."

"तसे काही नसेल ओ आई."

दोघी सासू सुनेच्या गप्पा सुरू असताना निलम काकी त्यांच्या शेजारून बाहेर निघून गेली. तेही अगदी शांतपणे. अगदी काहीही न बोलता. हे थोडे शॉकिंग होते आजी आणि नयना ताईंसाठी. कारण छोट्या छोट्या गोष्टीवर ओव्हर रिऍक्ट करणारी निलम एवढी मोठी गोष्ट समजल्यानंतर इतकी शांत कशी? असा प्रश्न दोघींनाही सतावत होता.

त्यात नेहमीपेक्षा व्यवस्थित साडी नेसून आणि हातात महागडी पर्स घेवून ती बाहेर पडली होती. एरव्ही बाहेर जाताना ह्या दोघींना सांगून जाणारी निलम आज मात्र मुद्दाम न सांगता बाहेर गेली होती.

आता मात्र आजीचा डाऊट आणखीच वाढला.

"बघ मी म्हटलं ना नयना, नक्की हिच्या डोक्यात काहीतरी शिजतंय."

"हो ना आई! अहो खरंच, तुम्ही म्हणताय तसं ही वादळापूर्वीची शांतता आहे! हे पटतंय आता मला."

"बरं ते जाऊ दे सगळं, तिला काय करायचंय ते करु दे; फक्त आपण सावध राहायला हवं." आजी काळजीपोटी बोलल्या.

तेवढयात हर्ष तयार होवून आला.
"आई मी निघतो गं. उशीर झालाय मला ऑफिसला जायला.."

"नक्की ऑफिसलाच निघालास ना? की दुसरे काही प्लॅनिंग  आहे हा? नाही म्हणजे नेहमीपेक्षा आज थोडा जास्तच स्मार्ट दिसत आहेस ना म्हणून म्हटलं बाकी काही नाही रे." आजीमध्ये कोणता जोश संचारला होता ते देवच जाणे.

"काय गं आजी, काहीही काय बोलतेस?" लाजतच हर्ष बोलला..

"आई अहो काय बोलताय हे, कशाला उगीच छळताय माझ्या लेकराला." हर्षची बाजू घेत नयना ताई बोलल्या.

"मग मी काय खोटं बोलतेय का रे हर्ष, तूच सांग."

"नाही, म्हणजे अगदीच खोटं नाही. पण अगं आज मेहता टेक्सटाइल मध्ये जायचंय. तिकडे थोडं काम आहे. बाबांचा फोन आला होता की, त्यांना एकदा प्रत्यक्ष भेटून घे. त्यामुळे आधी मी तिकडे जाणार आहे आणि वेळ मिळालाच तर नेत्राला भेटणार आहे."

"अच्छा! तर हे खरे कारण आहे होय." भुवया उंचावात आजीने नयना ताईंकडे पाहत हर्षला पुन्हा एकदा पिडायला सुरुवात केली.

"मग त्यात लपवायचे काय रे हर्ष? आता नेत्राचा आणि तुझा साखरपुडा झालाय. चोरुन लपून भेटण्याचे दिवस संपले आता. एकदा का लग्न झाले की मग हे दिवस काही पुन्हा येणार नाहीत. त्यामुळे जगून घ्या हे प्रेमाचे दिवस."

आईच्या ह्या अशा बोलण्याचे हर्षच्या चेहऱ्यावर मात्र लाजेची लाली पसरली. लाजतच त्याने मग नजर चोरली.

"जा बाबा! भेटा दोघेही पण तुझ्या निलम काकीपासून थोडे सावध राहा. तिची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत आम्हाला." आजीने हर्षला सावध केले.

"हो गं आजी, तू काळजी करु नकोस. चल निघू मी आता?"

"सावकाश जा रे आणि बाईक जरा सावकाश चालव. नाहीतर फोर व्हीलरच घेवून जा ना." सवयीप्रमाणे नयना ताईंनी लेकाला सूचना द्यायाला सुरूवात केली.

"अगं लहान नाही राहिला तो आता. किती काळजी करशील? तू जा बाबा, नाहीतर तुझ्या आईच्या सूचनांचा पाढा काही संपायचा नाही." हसतच आजी बोलल्या.

हसतच हर्ष मग बाहेर पडला. त्याने त्याची बाईक काढली. निघण्यापूर्वी त्याने नेत्राला मॅसेज केला. 'एक दीड तासात माझे काम आवरेल, तू तोपर्यंत आवरुन तयार राहा.'

काम आवरुन बरोबर पुढच्या दोन तासांत तो नेत्राच्या घराबाहेर हजर झाला. तीही आवरुन तयारच होती.

"दी... एंजॉय युअर स्पेशल डे" म्हणत आदित्यने दोघांनाही शुभेच्छा दिल्या.

हर्ष आणि नेत्राच्या नात्यातील मर्यादेची बंधने आता बर्यापैकी कमी होत होती. सहवासातून नाते आता अधिकच घट्ट होत होते.

एका निसर्गरम्य ठिकाणी, नदीकिनारी दोघेही पाण्यात पाय बुडवून सोबतीतले सोनेरी क्षण भरभरून जगत होते.

डोळ्यांत होते एकमेकांबद्दलचे अतूट प्रेम, हातात होता विश्वासाचा घट्ट हात आणि स्पर्शात होता प्रेमाचा ओलावा.

"नेत्रा मला तुला काहीतरी सांगायचे आहे." नजर खाली झुकवत हर्ष बोलला.

"बोल ना.."

"तुझा सगळा पास्ट मला माहिती आहे पण तुला तर माझ्याबद्दल, माझ्या पास्टबद्दल काहीही माहिती नाही."

"मला काही जाणून देखील घ्यायचे नाही हर्ष. तुझा पास्ट काहीही असला तरी त्याचा आपल्या नात्यावर काहीही परिणाम होणार नाही."

"तरी मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत."

"बरं बोल, तुला जर मनापासून बोलावेसे वाटत आहे तर नक्की बोल."

"मागच्या दोन वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक मुलगी आली होती. तिचे नाव सुपर्णा. कॉलेजमध्ये आम्ही सोबत होतो. आता काहीही झाले तरी मी सुपर्णाशीच लग्न करणार हे मनातून मी ठरवून मोकळा झालो. घरीही लगेच सांगितले. तसेही घरच्यांना, पाहताक्षणी सुपर्णा आवडली होती. हळूहळू आमची प्रेमकहाणी फुलत होती. दरम्यान सुपर्णाचे घरी जाणेयेणे वाढले.
कॉलेज पूर्ण झाले आणि फायनली आम्ही लग्न करण्याचा विचार घरी सांगितला. पण जशी वेळ जवळ येत होती तशी सुपर्णा मात्र मागे हटत होती. कारण काहीच कळेना. शेवटी अचानक एक दिवस सुपर्णाचे दुसऱ्याच कुणाशी तरी लग्न होत असल्याचे समजले. नात्यात इतका मोठा विश्वासघात झाल्यामुळे मनातून मी खूपच खचलो. जगण्याची आशा विरूनच गेली आणि रागाच्या भरात मागचा पुढचा कोणताही विचार न करता भर पावसात रात्रीच्या त्या भयाण शांततेत मन वेगळ्याच वाटेवर धावू लागले. सर्वत्र फक्त अंधार पसरला होता आणि सोबतीला होती अवेळी पडणाऱ्या पावसाची साथ."

बोलता बोलता हर्ष खूपच भावूक झाला.

नेत्रा कान देवून अगदी शांतपणे हर्षचे बोलणे ऐकत होती. हर्ष कोणत्या रात्रीबद्दल बोलत आहे हे आता नेत्राच्या हळूहळू लक्षात येत होते.

हर्ष पुढे बोलू लागला.

"भूतकाळ सोडायला मन राजी नव्हते आणि सुपर्णा शिवाय वर्तमान आणि भविष्याचा विचार देखील ते करत नव्हते. अशावेळी आता जगून काहीच उपयोग नाही असे सतत वाटत होते. पावले मग मृत्यूची खाई शोधत पुढेच सरसावत होती. नकोच हे आयुष्य आणि नकोच मनावर ब्रेक अपचा ठपका घेऊन लाचारासारखं जगणं. कारण झालेला इतका मोठा  विश्वासघात मन स्विकारायलाच तयार नव्हते. अखेर मृत्यूच्या दाढेपर्यंत जाऊन मी पोहोचलो तर समोर माझ्याआधी कोणीतरी मृत्यूला जवळ करण्याचाच तयारीत होते. मग माझ्या मनाचा विचार मागे पडला आणि समोरच्या व्यक्तीला वाचवण्याचा विचार त्याक्षणी खूपच गरजेचा वाटला मला."

नेत्राने डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. कोणत्या अनोळखी वाटेवर आणि कोणत्या परिस्थितीत ह्या दोन अनोळखी दिशा एक झाल्या, हे तिला आता कळून चुकले होते.

'मी तुला नाही तर तू मला वाचवले,'या हर्षच्या तोंडातून वारंवार बाहेर पडणाऱ्या वाक्याचा अर्थ आताकुठे नेत्राला उमगत होता.

मृत्यूच्या अगदी जवळ जाऊनदेखील अचानक दोघांनाही मृत्यूने हुलकावणी दिली होती. कारण सुंदर असा वर्तमानकाळ आणि सोनेरी असा भविष्यकाळ दोघांनाही खुणावत होता. अर्थातच परमेश्वरी इच्छेपुढे कोणाचे काहीही चालत नाही हे मात्र तितकेच खरे.

"नेत्रा आज मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय,"जशी सुपर्णा मला सोडून गेली तशी तू सुद्धा जाणार नाहीस ना?"

"अजिबात नाही. तसा विचारसुद्धा मनात आणू नकोस. ही नेत्रा शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबत असेल."

दोघेही क्षणभर एकमेकांच्या मिठीत अलगद विसावले.  विश्वासाच्या भक्कम पायावर हर्ष आणि नेत्राचे नाते पुढेच जात होते. मनातील भावनांना आज शब्दातून वाट मोकळी करून देत हर्षने नात्यातील विश्वास आणखीच दृढ केला होता.

पण एक मात्र नक्की आता हर्ष आणि नेत्राच्या नात्यातील विश्वासाचा हा पाया निलम काकीच काय तर इतर कोणीही डळमळीत करु शकणार नव्हते.
लवकरच आता हे दोन जीव एक होणार यात कोणतीच शंका नव्हती.

क्रमशः

आता लवकरच नेत्रा आणि हर्षच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार पण तरीही निलम काकी काहीतरी गोंधळ घालणार असेच वाटत होते सर्वांना. आता पुढे काय होणार? जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचायला विसरु नका.