Login

अनोळखी दिशा..(भाग २५)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, हर्षने त्याचा भूतकाळ नेत्राला सांगून नात्यातील विश्वास आणखीच दृढ केला. दुसरीकडे निलम काकी मात्र ह्या लग्नात विघ्न आणण्याचे प्लॅनिंग करत होती. आता पाहुयात पुढे...

"हर्ष अरे वाजले बघ किती?"

"हो ना अगं खूपच उशीर झाला! गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला ते समजलेच नाही. आता घरी गेल्यावर माझे काही खरे नाही बघ."

"काय रे! आता आजी आणि आई ओरडतील का?"

"अगं ओरडणार नाही पण दोघी मिळून खूप खेचतील आता माझी. त्यातमी तुझ्यासोबत आहे हे माहिती आहे त्यांना. आजी तर एखाद्या मैत्रिणीसारखी सारखी चिडवत असते मला."

"किती छान! मी पण असायला हवं त्या दोघींसोबत. नुसत्या कल्पनेनेच इतकं छान वाटतंय तर खरंच प्रत्यक्षात मी त्यांच्यासोबत असेल तेव्हा तर विचारूच नकोस." नेत्रा क्षणभर कल्पनाविश्वात रमली.

"तेव्हा तुमच्या तिघींची एक टीम होणार आणि मी मात्र एकटा पडणार." नाराजीच्या सुरात हर्ष बोलला.

"असं काही नाही होणार रे. ये पण हर्ष खरंच खूप खूप खूप थँक्यू रे! फक्त आणि फक्त तुझ्यामुळे हे सारे सुख मला मिळणार आहे. पहिल्यापासून कुटुंबाच्या याच प्रेमासाठी मी खूप तरसले होते. बघ ते मिळायला मला इतकी वाट पाहावी लागली."

"बरं आभार प्रदर्शन पुरे आता! निघुयात का? नाहीतर घरचे  आपल्याला शोधत इकडे यायचे. हसतच हर्ष बोलला.

'का कोण जाणे पण आज घरी जायची इच्छाच होईना.'
नेत्रा नजरेतूनच जणू हर्षला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. तिने त्याचा हात घट्ट पकडलेला होताच, हाताची पकड मात्र तिने अजूनच घट्ट केली.

नजरेतूनच दोघांचेही संभाषण सुरू झाले.

'बस आता थोडेच दिवस...मग तुला आणि मला एकत्र येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.
नेत्राचे दोन्ही हात हातात घेत हर्षदेखील नजरेतूनच तिच्या मनातील प्रश्नांचा गुंता सोडवू लागला.

हर्षच्या नजरेतील प्रेमवर्षावात नेत्रा अगदी चिंब न्हाऊन निघाली. लाजतच तिने नजर खाली झुकवली. अलगद मग ती हर्षच्या मिठीत शिरली. एकमेकांच्या उबदार मिठीत दोघांनाही क्षणभर साऱ्या जगाचा विसर पडला. हृदयाची स्पंदने देखील आगगाडीच्या वेगाने धावू लागली. एकमेकांच्या मिठीची ऊब दोघांनाही हवीहवीशी वाटत होती. परंतु, मर्यादेची बंधने दोघांच्याही संस्कारांच्या आड येत होती. तरीही न राहवून हर्षने दोन्ही हातांच्या ओंजळीत नेत्राचा चेहरा पकडला आणि अलगद आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले. तशी ती शहारली. दोघांनाही एकमेकांच्या हृदयाची धडधड अगदी स्पष्ट ऐकू येत होती.

आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राखत दोघांनीही प्रेमाची मिठी अलगद सैल केली. त्या दिवशी खूप साऱ्या आठवणींची साठवण मात्र दोघांनीही हृदयाच्या कप्प्यात अलगद बंदिस्त केली आणि दोघेही मग परतीच्या प्रवासाला निघाले.

नात्यातील आपलेपणा आणि हक्क पूर्वीपेक्षा आता थोडा जास्त वाढला होता. एकमेकांना समजून घेत नेत्रा आणि हर्ष दोघेही आयुष्याच्या नव्या अध्यायाला काही दिवसांतच सुरुवात करणार होते. दोघांचाही समजूतदारपणा आणि आयुष्यातील काही कटू अनुभवांमुळे स्वभावात आलेला पोक्तपणा तसेच वागण्या-बोलण्यातील समंजसपणा यामुळे दोघांमध्येही एक परिपक्व नाते फुलू पाहत होते.

अनोळखी वाटेवर एक होत असलेल्या ह्या दोन अनोळखी दिशा आयुष्याच्या एका सुंदर अशा वळणावर येवून पोहोचल्या होत्या.
हर्षने मग नेत्राला तिच्या घरी ड्रॉप केले आणि तोही मग त्याच्या घरी गेला.

आज हर्ष आणि नेत्रा वेगळ्याच स्वप्नांच्या दुनियेत रममाण होते. एकमेकांसोबत घालवलेला क्वालिटी टाइम आठवून दोघांच्याही चेहऱ्यावर आपसूकच हास्यलकेर उमटत होती. आज नेत्रा सोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवून हर्षने हसऱ्या चेहऱ्यानेच घरात प्रवेश केला.

समोर आजी आणि नयना ताई त्याच्या स्वागताला उभ्या होत्याच. हर्षला असे स्वतःशीच हसताना पाहून सवयीप्रमाणे आजीने त्याची खेचायला सुरुवात केली.

"आज स्वारी खूपच खुशीत दिसतीये." मस्करीच्या सुरात आजी बोलली.

"काय गं आजी... झालीस पुन्हा सुरू!"

"अरे यातच खूप गंमत असते रे. उगीच माझी हर्षु इथे नाही म्हणून सांग, म्हणून मग तिचे काम सध्या तिने माझ्यावर सोपवले आहे असे समज हवं तर."

"हो ना! इकडे तिच्या दादाचे लग्न पण पोरीला नेमकी महिन्याभरासाठी बाहेर जावं लागलं. सकाळीच फोन आला होता तिचा. खूपच चिडली आहे ती आपल्या सगळ्यांवर आणि हर्ष आणि नेत्रावर तर थोडं जास्तच.
'मी इकडे आल्यावर तुम्ही मुद्दाम दादाचे लग्न जमवले. मुद्दामच असे केले. माझ्याशी बोलूच नका तुम्ही. दादासोबत सुद्धा मी अजिबात बोलणार नाही, त्याला सांगून ठेव आणि त्या नेत्राकडे तर आल्यावर मी बघणारच आहे.' असे बरेच काहीबाही बडबडत होती. खूपच चिडली होती बाबा ती. आता तूच तिला समजावू शकतोस." नयना ताई म्हणाल्या.

"मी येईपर्यंत दादाला छळण्याची जबाबदारी आजी तुझी, असे नातीने दरडावून मला सांगितले आहे आणि मीही तिच्या शब्दाचे पालन करण्याचे तिला प्रॉमिस केले आहे. त्यामुळे सध्या तरी मी माझ्या नातीच्या टीममध्ये आहे; बरं का रे हर्ष!" आजी मुद्दाम खोचकपणे बोलली.

"हो, ते याआधीही दिसतच होतं आजी. तसंही तू मला आजकाल सारखं पिडत असतेस. एक संधी सोडत नाही माझी खेचायची. पण ठीक आहे लग्नानंतर माझीही टीम तगडी होईल. एकटी नेत्राच पुरेशी आहे माझ्यासाठी, समजलं?" कॉलर ताठ करत हर्ष बोलला.

हर्षच्या या बोलण्यावर दोघीही सासू सूनेने मोठ्याने हसायला सुरुवात केली. हर्षला मात्र समजेना, "ह्या दोघींना अचानक झालं तरी काय?"

"आई मी काय आता जोक केला का?"

"आमच्यासाठी जोकच होता तो." एकमेकींना टाळी देत आजी बोलली.

"हर्ष तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्या टीम मध्ये. हसू दे त्यांना काय हसायचंय." हर्षची बाजू घेत आजोबा बोलले.

"बरं जाऊ दे ते सगळं, आजचा दिवस कसा गेला? ते आधी सांग." नयना ताईंनी उत्सुकतेपोटी विचारले.

"खूप छान गेला. खूप गप्पा मारल्या आम्ही. त्यात आई...मी आज नेत्राला माझा भूतकाळ सांगून टाकला. म्हणजे सुपर्णा बद्दल मी तिला सर्वकाही सांगितले."

"हे एक बरं केलंस. कारण कोणतेही नाते विश्वासाच्या भक्कम पायावर उभे असते. जो विश्वास मला तुमच्या दोघांच्याही नात्यात आतापासूनच दिसत आहे." नयना ताई म्हणाल्या.

"अगदी खरं! आणि कोणतंही नातं विश्वासातूनच सुरू व्हावं. त्यात खोटारडेपणा असेल तर मग नात्यातील आपलेपणा, हक्क जास्त काळ तग धरत नाही." आजीनेदेखील तिचे मत व्यक्त केले.

'पण नेत्राचा खरा भूतकाळ तर अजूनही घरात कोणाला माहीत नाही. डोळे झाकून घरातील सर्वांनी आमच्या दोघांवर विश्वास ठेवला आहे. पण आम्ही काही गोष्टी लपवून चूक तर करत नाही ना?'
आजीच्या बोलण्याने हर्ष मात्र मनातच विचार करू लागला.

'नाही सांगितले तर नात्यात खोटारडेपणा येईल आणि पर्यायाने आजी म्हणते तसं पुढे जाऊन नात्यातील आपलेपणा आणि हक्क जास्त काळ तग धरणार नाही. खरे बोलले तरी प्रॉब्लेम आणि नाही बोलले तरी प्रॉब्लेम. काय करावे?' हर्षचे विचारचक्र आता वेगळ्याच दिशेने धावायला लागले होते.

'आईला आणि आजीला विश्वासात घेऊन आधीच काही गोष्टी सांगितल्या तर...त्या समजून घेतील का नेत्राला आणि मला?' शून्यात नजर लावून हर्ष विचारांच्या गर्दीत हरवला होता.

"अरे! याला काय झालं अचानक? हर्ष! अरे कुठे हरवलास?" हर्ष समोर चुटकी वाजवत नयना ताईंनी त्याच्या विचारांची तंद्री भंग केली.

"काही नाही गं आई, मला एक काम आठवले आहे आलोच मी!"

खूप विचार करून हर्षने नेत्राला कॉल केला.

"हॅलो, हर्ष बोल ना! तुझ्याबद्दलच मी विचार करत होते. आजचा दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच स्पेशल आहे. हर्ष! आज मी खूप आनंदात आहे आणि या सगळ्याचे क्रेडिट मी तुला देवू इच्छिते.
सॉरी हा! काय हे, मी एकटीच बडबडत आहे. काय रे काय झालं? तू का बोलत नाहीस? एनी प्रॉब्लेम हर्ष?"

"प्रॉब्लेम असा नाही ग पण खरंच सॉरी नेत्रा, मी तुझ्या आनंदावर विरजण टाकतोय असे वाटू शकते तुला. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट मला बोलायची आहे तुझ्याशी."

"अरे बोल ना मग. मनात काहीही ठेवू नकोस. बोल बिनधास्त."

"आई आणि आजीसोबत बोलता बोलता एक खूप महत्त्वाची गोष्ट मी नोटीस केली आणि ती म्हणजे त्या दोघींचाही प्रचंड विश्वास आहे आपल्यावर. आजीच्या मते, कोणत्याही नात्याचा पाया हा फक्त विश्वासावरच अवलंबून असतो. मला सांग नेत्रा, काही गोष्टी आपण त्यांच्यापासून लपवून काही चूक तर करत नाही ना; असं राहून राहून वाटतंय."

"हो...हे तर अगदी खरं आहे आणि तुला काय म्हणायचंय ते अगदीच कळतंय मला. काळजी करु नकोस, मी उद्या घरी येते.  मीही खूप दिवस झाले हाच विचार करत आहे, खोट्यातून कोणत्याही नात्याची मला सुरुवात करायची नाहीये. कारण पुढे जाऊन सत्य समोर आल्यावर खूपच त्रास होईल सर्वांना आणि ह्याबाबतीत तरी स्वार्थी होवून मला नाही चालणार. पण घरच्यांचा निर्णय काहीही असू देत, तू शेवटपर्यंत माझ्या सोबत असशील ना हर्ष? देशील ना शेवटपर्यंत मला साथ?"

"हे काय विचारणं झालं नेत्रा? अगं मनापासून प्रेम केलंय मी तुझ्यावर. अशी मध्येच तुझी साथ नाही सोडणार. काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. जे काही होईल ते आता दोघे मिळून फेस करु."

"थँक्यू यू सो मच् हर्ष. मी खूप भाग्यवान आहे रे, तुझ्यासारखा जोडीदार मला लाभला. उद्या मी घरी येते, मग बोलते आजी आणि आईंसोबत."

"बोलते मी नाही, आपण बोलू असं म्हण. आता जे काही करायचे ते दोघांनी मिळून करायचे." हसतच हर्ष बोलला.

"ह्मममम..." नेत्रानेही मग हसतच रिप्लाय दिला.

क्रमशः.

नेत्राचा भूतकाळ समजल्यानंतर काय असेल आजी आणि नयना ताईंचा निर्णय? जाणून घ्या पुढील भागात.