Login

अनोळखी दिशा..(भाग २६)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की कोणत्याही नात्यासाठी विश्वास किती महत्त्वाचा असतो, हे आजीने समजावून सांगितल्यानंतर हर्षने आणि नेत्राने मिळून नेत्राच्या भूतकाळाबद्दल घरी सांगण्याचे ठरवले. आता पाहुयात पुढे..

दुसऱ्या दिवशी नेत्रा हर्षच्या घरी आली. नेत्राला पाहून सर्वांनाच खूप आनंद झाला.

"आजी... कशा आहात तुम्ही?"

"अरे नेत्रा! अशी अचानक न सांगता कशी काय आलीस गं?" आश्चर्यकारकरित्या आजीने प्रश्न केला.

"तुमची आठवण आली मग लगेच आले. तसं आपलं ठरलं होतं ना." हसतच नेत्रा उत्तरली.

"हे एक बरं केलंस. पण गेल्यापासून आज पहिल्यांदा आलीस." नयना ताई म्हणाल्या.

"हो ना. खूपदा यावं वाटायचं, तुम्हा सगळ्यांची खूप आठवण यायची पण नाही जमलं यायला. त्यामुळे आज वेळात वेळ काढून आले. बरं हा घ्या प्रसाद! येता येता गणपती मंदिरात जाऊन आले." सर्वांना प्रसाद देवून नेत्राने त्यांचे आशीर्वाद घेतले.

"अरे वा! छानच की गं. बाई! माझ्या होणाऱ्या सुनेला देवाचे वेड आहे यातच मी भरुन पावले हो." हात जोडत नयना ताईंनी देवाचे आभार मानले.

"म्हणजे तू येणार आहे हे हर्षला माहीत होतं तर. म्हणूनच म्हणाला वाटतं, आज कंपनीत थोडं उशिरा जाणार आहे. तोपर्यंत घरूनच काम करतो म्हणाला. केव्हाचा लॅपटॉप घेऊन बसलाय."

"हो आज दुपारी बहुतेक एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्याचीच तयारी करत असेल." लगेचच नेत्रा बोलली.

"बघ नयना...आतापासूनच हर्षच्या छोटछोट्या गोष्टी किती बारकाईने लक्षात ठेवते ही मुलगी! खरंच, हर्ष खूपच नशीबवान आहे, इतकी जबाबदार आणि समजूतदार मुलगी त्याच्या आयुष्यात आली." आजी नेत्राचे कौतुक करत म्हणाल्या.

"हो ना. पण आई मीसुद्धा खूप नशीबवान आहे बरं का! इतकी गुणाची सून माझ्या नशिबी आली." नयना ताईंनीदेखील नेत्राच्या कौतुकात आणखी भर टाकली.

"तुम्ही दोघी आता माझे किती कौतुक करणार आहात? पण काहीही म्हणा तुम्हा सगळ्यांपेक्षा मीच खूप नशीबवान आहे आणि हेच सत्य आहे." नेत्राने त्यांचेच वाक्य त्यांच्यावरच पलटवले.

"नाही आ, खरंतर सर्वात जास्त नशीबवान मी आहे आणि हेच सत्य आहे." सर्वांची मते खोडून काढत हर्ष त्याच्या खोलीतून बाहेर येत हसतच बोलला.

त्याच्या बोलण्यावर सर्वचजण हसायला लागले.

"बघ बघ नयना दोघांचे चेहरे तर बघ एकदा." आजी  नयना ताईंना म्हणाल्या.

"झालं आजीचं पुन्हा सुरु. आजी तुला दुसरं काही काम नाही का गं? येता जाता सारखी माझी टांग खेचत असतेस." लटक्या रागातच हर्ष बोलला.

"बरं... जोक्स अपार्ट... आजी, आई मला आणि नेत्राला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे." थोडं सिरियस होत हर्ष बोलला.

अचानक हर्षच्या आवाजाचा टोन बदलला त्यामुळे आजी आणि नयना ताई दोघीही टेन्शन मध्ये आल्या.

"काय रे? काय झालं अचानक? एवढे सिरियस का झाले दोघेही? आणि कशाबद्दल बोलायचे आहे? काळजी करण्याचं काही कारण तर नाही ना?" टेन्शनमध्येच नयना ताईंनी विचारले.

"तसे पाहिले तर 'हो' आणि पाहिले तर 'नाही." नजर चोरतच हर्ष बोलला.

"ये बाबा, आता दोघेही आमचा जीव असा टांगणीला नका लावू बरं. जे काही बोलायचे आहे ते पटकन सांगून मोकळे व्हा." काळजीपोटी आजी बोलली.

"आजी काल तू नात्यांमधील विश्वासाबद्दल जे काही बोललीस ते मनाला अगदी पटलं बघ. तेव्हापासून मनात वेगळीच घालमेल सुरु आहे."

"का रे, काय झालं? पटलंही म्हणतोस आणि घालमेल सुरू आहे मनात असंही म्हणतोस!"

"आई, आजी...मी जे काही तुम्हाला सांगणार आहे आता ते अगदी शांतपणे ऐका. कारण त्यानंतर तुम्ही जो काही निर्णय देणार आहात, तुमचे जे काही मत असेल त्यावर आमचे नाते अवलंबून असणार आहे."

"हर्ष! आजी म्हणते तसं नको ना रे आमचा जीव आणखी जास्त टांगणीला लावू. जे आहे ते सांग बरं पटकन्." भांबावलेल्या सुरात नयना ताई बोलल्या.

"आई...ज्या दिवशी नेत्रा आपल्या घरी आली तेव्हा ती कोणत्या परिस्थितीत इथे आली ते तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. पण त्याआधी बरेच काही घडून गेले होते. इथे आल्यानंतर नेत्राने मला विश्वासात घेवून त्याच रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला होता." एकदम संयमी सुरात शांतपणे हर्ष बोलू लागला.

"हर्ष, असे नेमके झाले तरी काय होते?" घाबरतच आजीने विचारले.

हर्ष बोलत होता पण त्या रात्री घडलेला तो सर्व प्रसंग आठवून नेत्राच्या डोळ्यांत मात्र आसवांची दाटी झाली.

"आई... मागे एकदा मी तुला बोललो होतो बघ, सुपर्णाने केलेल्या विश्वासघाताच्या धक्क्यातून सावरणे माझ्यासाठी त्यावेळी खूपच कठीण होते. म्हणून एका पॉइंटनंतर मी आता जगून तरी काय करू, असा विचार करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. ह्याच उद्देशाने एका माहितीतील आडमार्गाला असलेल्या विहिरीजवळ गेलोही, पण माझ्या आधी तिथे नेत्रा आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. त्यावेळी मी सर्वकाही विसरुन नेत्राला वाचवले. सोप्पं नव्हतं त्यावेळी तिला कंट्रोल करणं. कसेबसे तिचे मन वळवून तिला आपल्या घरी आणले. या सगळ्यांत माझ्या स्वतःच्या मनाचा विचार मात्र मागे पडला."

"अरे हर्ष! हे सर्व तू मला आधीच सांगितले आहे पण त्या रात्री अजून असे काय घडले होते? जे तू त्यावेळी मला सांगितले नव्हते." उत्सुकतेपोटी नयना ताईंनी विचारले.

पुढे काही बोलायच्या आधी हर्षने नेत्राकडे एक कटाक्ष टाकला. टेन्शन घेवू नकोस, मी आहे." नजरेतूनच त्याने मग तिला विश्वासाची हमी दिली.

"आजी, आई...त्या रात्री, एका नराधमाने नेत्रासोबत दुष्कृत्य केले होते. पुन्हा एकदा आणखी एका जिजाऊच्या लेकीची अब्रू चव्हाट्यावर आली होती. पण ही गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हा नेमके काय करावे? ते मात्र मला समजले नाही आणि ती स्वतःही काही समजण्याच्या मनःस्थितीत नव्हती. आई... खूपदा वाटलं तुझ्याशी बोलावे पण हा विषय जर चार चौघात आला तर नेत्राची बदनामी होईल, या भीतीने मी दरवेळी बोलायचे टाळले. त्यासाठी खरंच सॉरी आई."

हर्ष बोलत होता पण नेत्राच्या अश्रूंनी तर केव्हाच त्यांची सीमा ओलांडली होती.

ही एवढी मोठी धक्कादायक बातमी ऐकून नयना ताई आणि आजीदेखोल क्षणभर गोंधळल्या. पुढे होवून नयना ताईंनी नेत्राला कुशीत घेवून तिच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. आजीनेही नेत्राच्या पाठीवरून हात फिरवत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. नकळतपणे त्या दोघींचेही डोळे पाणावले.

"नेत्रा बाळा तू खूप धीराची आहेस. किती सहन केलंस! पण शब्दाने कधी तक्रार केली नाहीस. इतकी कशी गं तू सहनशील आणि संयमी?" नयना ताई नेत्राची समजूत काढत म्हणाल्या.

"आई...आणखी एक महत्त्वाची गोष्ट, नेत्रासोबत दुष्कृत्य करणारा दुसरा तिसरा कोणी नसून ज्याच्यासोबत नेत्राचा साखरपुडा ठरला होता तो तोच तरुण आहे."

"अरे! पण हे कसं काय? मला तर काहीच कळेना." नयना ताईंनी मनातील शंका बोलून दाखवली.

"आई, त्याआधी माझ्या आईने आणि मामाने त्याच व्यक्तीसोबत माझे लग्न ठरवले होते. पण त्या मुलाची माहिती मिळाली तेव्हा समजले तो पुर्णत: वाया गेलेला मुलगा आहे. म्हणून मी स्पष्ट नकार दिला. त्याचाच त्याने असा बदला घेतला." खूप वेळापासून शांत असलेली नेत्रा अखेर बोलती झाली.

"तू काहीच काळजी करू नकोस बेटा! आपण त्या नराधमाला असं सहजासहजी सोडायचं नाही." नयना ताईंच्या डोळ्यांत आणि बोलण्यात नेत्रावर झालेल्या अन्यायाचा राग स्पष्ट दिसत होता.

"नेत्रा! बाळा आता रडायचं नाही तर लढायचं. अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी." आजीनेही नेत्राला मनापासून सपोर्ट दर्शवला.

एकप्रकारे दोघींनीही हर्ष आणि नेत्राच्या एक होण्याला संमतीच दर्शवली होती.

"हर्ष! तुझी ओळख आहे ना पोलिस स्टेशनमध्ये?" नयना ताईंनी विचारले.

"आई....म्हणजे, तू खरंच माफ केलंस आम्हाला? आम्ही तुमच्यापासून ही एवढी मोठी गोष्ट लपवली, तुम्ही मात्र मोठया मनाने माफ केलंत सुद्धा!" आश्चर्यकारकरित्या हर्ष बोलला.

"हे बघ हर्ष! ठरवले असते तर तुम्ही आजही सगळं लपवू शकत होतात. उशिरा का होईना पण तुम्ही विश्वासाने आम्हाला सर्वकाही सांगितले, यातच तुमचा सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा दिसून येतोय. शेवटी चुकतो तो माणूसच ना! आणि चुका कोणाकडून होत नाहीत? त्यावेळी परिस्थिती तशी होती त्यामुळे त्यानुसार वागणे तुम्हाला भाग होते. पण कदाचित धाडस करून तेव्हाच जर तुम्ही बोलला असता तर गुन्हेगाराला वेळीच शिक्षा झाली असती हेही खरं. परंतु, सर्व परिस्थिती त्यावेळी विरोधात होती. पण असो...जे झाले ते झाले, अजूनही काही होतंय का ते पाहू आणि त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल त्यासाठी प्रयत्न करूयात." नयना ताई म्हणाल्या.

"आणखी एक गोष्ट हर्ष...आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बाळा! सगळ्या गोष्टी माहित असताना देखील तू नेत्रासोबत लग्नाचा विचार केलास, नेत्राला पुनर्जन्म मिळवून दिला, तिच्या आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त करून दिली. हे सगळं वाटतं तितकं सोप्पं नाही रे हर्ष. खूप मोठं मन असावं लागतं त्यासाठी. जे की तुझ्याकडे आहे." अभिमानाने नयना ताई हर्षबद्दल बोलत होत्या.

नयना ताईंचे बोलणे ऐकून नेत्राच्या मात्र जीवात जीव आला.

"आई, म्हणजे खरंच तुमचा आमच्या लग्नाला विरोध नाही?"

"छे गं! वेडी आहेस का तू? तुझ्या जागी जर माझी हर्षु असती तर तेव्हा मी जे करणे अपेक्षित होते तेच मी आताही करतिये. मी पण एक स्री आहे गं नेत्रा. एक स्रीच जर दुसऱ्या स्रीला समजून घेणार नसेल तर मग आपण स्री म्हणून जन्माला आल्याचा काय उपयोग? तू सून म्हणून मला हवी आहेस. जे झाले त्यात तुझा तर काहीच दोष नव्हता. मग सर्व शिक्षा तुला एकटीलाच का?" नयना ताईंनी नेत्रा आणि हर्षवर जो विश्वास दाखवला होता तो खरंच वाखाणण्याजोगा होता.

क्रमशः

नयना ताईंच्या प्रयत्नांना मिळेल का यश? त्यात निलम काकी सध्या कोणते मनसुबे आखण्यात व्यस्त आहे? सारे काही जाणून घ्या पुढील भागात.