मागील भागात आपण पाहिले की, नेत्रा आणि हर्षने खूप विचार करून नेत्राचा भूतकाळ त्याच्या घरच्यांना सांगितला. तेव्हा मात्र सर्वांनी तिला पाठींबा दर्शवला. एवढेच नाही तर होणाऱ्या सुनेला न्याय मिळवून देण्यासाठी नयना ताईंनी पुढाकारदेखील घेतला. आता पाहुयात पुढे...
"आई... तुम्ही नेत्रावर आणि माझ्यावर जो काही विश्वास दाखवला त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच आणि आजी तुलाही खूप थँक्यू."
"गप रे! नात्यात कशाला हवंय हे थँक्यू आणि सॉरी? आपणच जर एकमेकांना समजून घेतलं नाही तर मग काय उपयोग त्या नात्यांचा आणि नेत्रासारखी गुणी सून कोणाला नको आहे!" हसतच नयना ताई बोलल्या.
"बरं नेत्रा...आलीच आहेस तर तुझ्या हातचा एक फक्कड चहा होऊन जावू दे. चहा प्यायची खूपच इच्छा झालीये बघ." हळूच आजी नेत्राला म्हणाल्या.
"हो आजी, लगेच करून आणते." म्हणत नेत्रा लगेचच किचनमध्ये गेली.
"आजी...हल्ली चहा खूपच वाढलाय बरं तुझा. कंट्रोल ठेव जरा. झालं अजून काही दिवसांनी रोजच नेत्राच्या हातचा चहा प्यायची तुझी इच्छा पूर्ण होईल. पण त्याचे वेगळेच दुष्परिणाम व्हायला नको!"
"नाही होत रे! मी तेव्हा रोज थोडीच ना तिला त्रास देणार आहे." शांत सुरात आजी बोलली.
"बरं हर्ष, तू बाबांच्या त्या पोलिस मित्रासोबत कधी बोलशील ?"
"आजच बोलून घेतो आई."
"हो, लवकर बोलून घे. त्यात ओळखीतून गेलं की लवकर कामं होतात आणि अजून आठ दहा दिवसांत घरात लग्नाची गडबड सुरु होईल. मग आहे तो वेळही कमी पडेल." नयना ताई म्हणाल्या.
थोडा विचार करून हर्षने मात्र लगेच फोन करण्याचे टाळले.
"आई म्हणजे बघ पटतंय का..मी बोलण्यापेक्षा बाबा जर lबोलले त्यांच्या मित्रासोबत तर खूप फरक पडेल. हा थोडा नाजूक विषय आहे ना म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. त्यात आधी बाबांना विश्वासात घेवून हे सर्व काही सांगायला हवं आणि मग ते त्यांच्या मित्रासोबत बोलतील. मी बोलणं बरं नाही दिसणार."
"हो चालेल, तू म्हणतो तेही बरोबरच आहे. हे बोलले तर फरक पडेल आणि त्यांचे काही नाही रे, ते घेतील समजून; याची मला खात्री आहे. तसं मी रात्री बोलते त्यांच्याशी. फक्त आता महेश भाऊजी आणि निलमचे काही सांगू शकत नाही. त्यात ती निलम कधी आणि काय घोळ घालून ठेवेल, याचा काही नेम नाही." नयना ताई म्हणाल्या.
"ते अगोदरपासूनच नकारघंटा वाजवत आहेत मग आता तरी काय अपेक्षा ठेवायची त्यांच्याकडून? तसेही त्यांना हे लग्न कधी मान्य नव्हतेच. एकवेळ महेश समजून घेईल आणि त्याचीही संमती आहेच म्हणा पण निलम... तिच्याकडून जास्त अपेक्षा ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये." आजीने जे मनात होते ते पटकन् बोलून दाखवले.
"हो अगदी खरं आहे आई. तसंही तिच्या निर्णयाची मला तरी गरज वाटत नाही. आयुष्य हे हया दोघांचे आहे. दोघांनीही एकमेकांना पसंत केलंय. दोघेही सुज्ञ आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त हुशार आणि समंजस आहेत. काही शुल्लक गोष्टीवरून कोणी अडून राहत असेल तर तो निव्वळ मूर्खपणा म्हणावा लागेल. त्यांचे आयुष्य त्यांना कोणासोबत घालवायचे हा सर्वस्वी त्या दोघांचा निर्णय आहे. इतर कोणी त्यात हस्तक्षेप करावा, हे मला तरी पटत नाहिये." नयना ताई हर्ष आणि नेत्राची बाजू सावरत म्हणाल्या.
"हो नयना अगदी खरंय तुझं. मला पटतंय तुझं बोलणं." आजीने लगेचच सुनेच्या मताला दुजोरा दिला.
तिकडे किचनमध्ये नेत्रा चहा बनवण्यासाठी गेली. पाणी पिण्याचा बहाणा करुन हर्षदेखील तिच्या पाठोपाठ किचनमधे गेला.
"थँक्यू हर्ष! आज मनावरचं खूप मोठं दडपण कमी झालं बघ. फक्त आणि फक्त तुझ्यामुळे हे शक्य झालं. एवढी मोठी गोष्ट लग्नानंतर घरच्यांसमोर आली असती तर माहित नाही त्यावेळी परिस्थितीचा मी कसा सामना केला असता? सत्य लपवल्यामुळे नात्यात दुरावा आला असता तो वेगळाच. पण आता खूप मोकळं वाटतंय. मनावरचं खूप मोठ्ठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय."
नेत्रा बोलत होती पण हर्ष मात्र चेहऱ्यावर मंद स्मित आणत एकटक नेत्राकडे बघत होता. क्षणभर स्वप्नांच्या दुनियेत तो रममाण झाला. सुखी संसाराचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागले. नेत्राचे सौंदर्य तो नजरेत साठवत होता. तिचे लक्ष मात्र गॅसवर असलेल्या चहाच्या पातेल्याकडे होते. ती एकटीच बडबड करत होती. हर्ष मात्र मनातल्या मनात सुखी संसाराचे घरटे विणत होता.
"हर्ष, फ्रिजमधून दुधाचे पातेले देतोस प्लीज?" नेत्राने प्रश्न केला.
हर्ष मात्र एक नाही की दोन नाही. एकटक नेत्राला न्याहाळण्यात
तो व्यस्त होता. नेत्राच्या बोलण्याकडे त्याचे लक्षच नव्हते.
नेत्राने अगदी सहज त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्याला असं एकटक आपल्याकडे पाहताना पाहून ती मात्र पुरती घायाळ झाली. जमिनीच्या दिशेने नजर खाली झुकवत नि डाव्या गालावर आलेली केसांची बट अलगद कानामागे सरकवत लाजतच ती पाठमोरी झाली नि फ्रिजच्या दिशेने वळली. फ्रिजमधून मग दुधाचे पातेले तिने तिचेच काढून घेतले.
कोणाचे लक्ष नाही हे पाहून तिने थंडगार दुधाचे पातेले अलगद हर्षच्या पाठमोऱ्या हातावर टेकवले. करंट बसावा तसा तो जागेवरच टणकन उडाला. त्यावर हर्षची आलेली क्वीक रिऍक्शन पाहून नेत्राला तर हसूच आवरेना.
तो व्यस्त होता. नेत्राच्या बोलण्याकडे त्याचे लक्षच नव्हते.
नेत्राने अगदी सहज त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्याला असं एकटक आपल्याकडे पाहताना पाहून ती मात्र पुरती घायाळ झाली. जमिनीच्या दिशेने नजर खाली झुकवत नि डाव्या गालावर आलेली केसांची बट अलगद कानामागे सरकवत लाजतच ती पाठमोरी झाली नि फ्रिजच्या दिशेने वळली. फ्रिजमधून मग दुधाचे पातेले तिने तिचेच काढून घेतले.
कोणाचे लक्ष नाही हे पाहून तिने थंडगार दुधाचे पातेले अलगद हर्षच्या पाठमोऱ्या हातावर टेकवले. करंट बसावा तसा तो जागेवरच टणकन उडाला. त्यावर हर्षची आलेली क्वीक रिऍक्शन पाहून नेत्राला तर हसूच आवरेना.
आज पहिल्यांदा नेत्राला इतके मनमोकळेपणाने हसताना पाहून हर्षचा आनंद गगनात मावेनासा झाला.
"कुठे लक्ष आहे? चहा उतू गेला बघ!" हर्ष अचानक मोठ्याने ओरडला. आता यावेळी करंट बसल्यागत ओरडण्याची वेळ मात्र नेत्राची होती.
यावेळी नेत्राची क्वीव रिॲक्शन पाहून हर्षला देखील आता हसू आवरेना. लटक्या रागातच मग तिने हलकेच त्याच्या हातावर एक चापट ठेवून दिली. त्यालाही तिचे हे असे लहान मुलासारखे वागणे मनाला वेगळेच आनंद देवून गेले. न बोलताही दोघेही नजरेतूनच आज बरेच काही बोलत होते.
दाखवत जरी नसल्या तरी नयना ताई मात्र चोरट्या नजरेेतून दोघांचेही निरीक्षण करत होत्या. दोघांना असे आनंदी पाहून त्यांनाही वेगळेच समाधान लाभले. आजी देखील काही कमी नाही बरं का! त्या तर बोलायची एकही संधी सोडत नव्हत्या.
"बरं चला, आवरलं असेल तुमचं तर आणा लवकर चहा. नाहीतर अजून थोडा वेळ वाट पाहिली तर चहाऐवजी बासुंदी समोर यायची."
आजीच्या आवाजाने नेत्रा भानावर आली. उकळलेल्या चहात उगीचच केव्हाची गाळणी फिरवत असलेली ती घाईने मग कपबशी शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली. तिला असे गोंधळलेल्या अवस्थेत पाहताना तो मात्र, 'बरं झालं असंच पाहिजे,' असे म्हणत जणू नजरेतून तिची टांग खेचत होता. पण तिही काही कमी नव्हती बरं का! कोणाच्याही लक्षात येणार नाही असा एक जोरदार चिमटा घेतला तिने त्याच्या दंडाला. ओरडून आता कोणाला सांगतो हा? शेवटी शांत बसण्यातच शहाणपण मानले त्याने.
एकमेकांची खेचण्यात मात्र दोघेही अगदी शेरास सव्वाशेर होते.
एकमेकांची खेचण्यात मात्र दोघेही अगदी शेरास सव्वाशेर होते.
दुरूनच मग नयना ताईंनी,' दोघांच्याही नात्याला कोणाचीही नजर न लागो' अशी देवाकडे प्रार्थना केली. मनोमन आजीनेही देवाला हीच विनवणी केली.
नेत्राने मग दोघींनाही चहा दिला. हर्ष आणि स्वतः साठीदेखील दोन कपमधे चहा गाळून घेतला. काहीकाळ मग छानपैकी चहाची मैफिल रंगली इनामदारांच्या घरी. चहाची वेळ केव्हाच निघून गेली होती तरीदेखील मस्त गप्प मारत सर्वांनीच नेत्राच्या हातच्या चहाचा आस्वाद घेतला. नयना ताईंनी आणि आजीने मग तोंड भरून होणाऱ्या सुनेचे कौतुक करायला सुरुवात केली.
"ये बस झालं आ तुम्हा दोघींचं. इतकाही काही बरा नव्हता चहा. एवढं कौतुक करायची काहीच गरज नाहीये. मला नाही आवडला." हर्षने मुद्दाम निगेटिव्ह कमेंट पास केली.
नेत्राने मग त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला. 'तुला नंतर बघते,' म्हणत नजरेतूनच त्याला प्रेमळ दम भरला.
"हर्ष उगीच पंगा घेवू नकोस आ तीच्यासोबत. पुढे जावून हे चहा प्रकरण तुझ्याच अंगाशी नाही आले म्हणजे मिळवले." आजीला टाळी देत नयना ताई हसतच बोलल्या.
नेत्रा घरी आल्यामुळे घरातील वातावरण काही वेळातच बदलून गेले. आनंदाच्या या गप्पा सुरू असतानाच दारावर कोणीतरी नॉक केले.
"येवू का आत?" कानावर शब्द पडताच सर्वांनी अगदी चमकून दरवाजाकडे पाहिले. समोर सुपर्णा उभी होती. काहीकाळ सर्वजण अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहिले. इतक्या हसत खेळत सुरु असलेल्या गप्पांना मात्र अचानक ब्रेक लागला.
अपराधीपणाची भावना नजरेत ठेवून सुपर्णा जागेवरच स्तब्ध उभी होती. नेत्राने तर तिला ओळखलेच नाही.
"अगं सुपर्णा तू...? ये ना...आत ये. अशी दारात का उभी? अजूनही हे तुझेच घर आहे असेच समज. कितीही गोष्टी बदलल्या तरी काही गोष्टी ठरवूनही नाही बदलता येत. तशीही या घराला आधीपासूनच तुझी खूप सवय आहे. हे सत्य थोडीच ना आता बदलणार आहे!"
गेल्या दोन चार दिवसांपासून अगदी शांत झालेली निलम काकी व्हीलन बनून अखेर समोर आलीच. जणू काही तिनेच मुद्दामहून सुपर्णाला जाणुनबुजून घरी बोलावून घेतले होते. हे चित्र आता स्पष्ट दिसत होते. सर्वांच्या ते लक्षातही आले.
क्षणभर नेत्राला मात्र धडकीच भरली. कालच तिला हर्षने त्याचा पास्ट सांगितला आणि आज अचानक सुपर्णा समोर हजर. हे सर्व शॉकिंग होते नेत्रासाठी.
क्रमशः
काय होणार आता पुढे? निलम काकीची ही खेळी कितपत यशस्वी होणार? जाणून घेण्यासाठी वाचत राहा, 'अनोळखी दिशा... कथा अनोख्या प्रेमाची.'
©® कविता वायकर
