मागील भागात आपण पाहिले की, सुपर्णाने हर्षच्या घरी येवून सर्वांची माफी मागितली त्यामुळे निलम काकीचा प्लॅन मात्र तिच्यावरच उलटला. आता पाहुयात पुढे...
"अहो! तुम्ही एकदा तुमच्या त्या पोलिस मित्राला फोन करून बघा ना, नेत्रावर अन्याय करणाऱ्या त्या नराधमाला शिक्षा ही झालीच पाहिजे. हर्षने फोन करणं बरं दिसणार नाही." नयना ताई माधवरावांना म्हणाल्या.
"हे बघ नयना...माझे वैयक्तिक असे मत आहे की, सध्या आपण हर्ष आणि नेत्राच्या लग्नावर फोकस करायला हवे. कारण एकाच वेळी आपण दोन्हीकडे लक्ष देऊ शकत नाही. हवं तर मी फोन करतो संजयला...त्याला काही गोष्टींची कल्पना देवून ठेवतो, पण मला तरी असं वाटतं की, या सगळ्यात आतातरी नको पडायला. लग्नाची ही गडबड एकदा का उरकली की मग करुयात जे काही करायचं ते." माधवरावांनी सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून हा निर्णय घेतला होता.
"हो...तुमचेही बरोबरच आहे. मी हा विचार केलाच नव्हता, खरंच आपण एकाच वेळी दोन्ही गोष्टींकडे लक्ष नाही देवू शकणार." नयना ताई बोलल्या.
"त्यातच लग्नाला आता अवघे पंधराच दिवस उरलेत. कुठे कुठे आपण लक्ष देणार आहोत? तुम्हा बायकांची देखील धावपळ होणार. घरात आनंदाचे वातावरण त्यात पोलिस स्टेशनच्या वाऱ्या, इतक्यात त्या गोष्टी नको." माधवरावांनी त्यांचा मुद्दा अगदी व्यावस्थितपणे मांडला.
दुसऱ्या दिवशीपासून घरात लग्नाची गडबड सुरू झाली. दोनच दिवसांत हर्षिता देखील घरी परतली. ती आली नि आनंदाला जणू उधाण आले. आता खरे घर गजबजू लागले. शेवटी म्हणतात ना, ज्या घरात मुलींच्या हसण्या खिदळण्याचा आवाज येतो ते घर अत्यंत सुखी असते.
घरी आल्यानंतर सर्वात आधी हर्षिताने घरातील सर्वांची हजेरी घेतली.
"मला सगळे विसरले, मला कोणीच फोन करत नाही, आता नेत्रा येणार तर सगळेच तिचे लाड करायला लागले, माझे कोणीच लाड करत नाही." आल्यापासून हर्षिताची एकसारखी बडबड सुरु होती.
लुटूपुटूच्या त्या भांडणात देखील प्रेम, माया स्पष्ट दिसत होती.
"मला सगळे विसरले, मला कोणीच फोन करत नाही, आता नेत्रा येणार तर सगळेच तिचे लाड करायला लागले, माझे कोणीच लाड करत नाही." आल्यापासून हर्षिताची एकसारखी बडबड सुरु होती.
लुटूपुटूच्या त्या भांडणात देखील प्रेम, माया स्पष्ट दिसत होती.
अखेर तिची बडबड थांबावी म्हणून हर्षने एक पेढा तिच्या तोंडात जवळपास कोंबलाच.
"हे घे, खा...माझ्या आणि नेत्राच्या लग्नाचा पेढा खा. पण पाया पडतो बाई तुझ्या, एकदाची तुझी बडबड थांबव." नेहमीप्रमाणे दोन्ही भावंडांची मजा मस्ती सुरू झाली.
"आता माझी बडबड टोचणारच रे तुला. गुपचूप लग्न जमवले आणि मला कानोकान खबरसुद्धा नाही. तुला तर आजकाल बोलायला सुद्धा वेळ नाही. मोठ्या भावाचे काही कर्तव्य असते की नाही?" सवयीप्रमाणे हर्षिता हर्षसोबत वाद घालू लागली.
"आता समजले ना आणि पेढाही खाल्ला ना आमच्या लग्नाचा. मग चला आता लग्नाच्या तयारीला लागा. जरा मदत कर घरात. नुसता नट्टापट्टा करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. आईला, आजीला कामात मदत करायची." हर्षिताची खेचण्यात हर्षला वेगळेच समाधान मिळत होते.
ह्या दोघा भाऊ बहिणीची नोकझोक घरातील सदस्यांसाठी काही नवीन नव्हती.
"बरं दोघेही पुरे करा रे आता आणि पुढच्या कामाचे नियोजन करण्यात मला मदत करा. चला उठा बरं पटकन्." नयना ताईंनी फर्मान सोडले.
"अरे हर्ष... राजला सांगितले का तुझ्या लग्नाबद्दल?" आजीने विचारले.
"दादाने सांगायच्या आधीच निलम काकीने लाडक्या लेकाला निरोप पोचवला सुद्धा असेल, तू काळजी करू नको गं आजी!" हर्षिता म्हणाली.
"तिने लाख निरोप पोहचवू दे, पण आपलीही काहीतरी जबाबदारी आहेच की! आणि शेवटी चुलत जरी असला तरी तो तुमचा भाऊच आहे बरं का हर्षु!" नयना ताई समजावणीच्या सुरात म्हणाल्या.
"आई डोन्ट वरी अगं! मी रात्री राजला फोन केला होता. तो लग्नाच्या दोन दिवस आधी येईल म्हणाला. तसे काकीकडून त्याला समजले होते पण तरीही त्यानिमित्ताने खूप दिवसांनी आमचं बोलणं झालं. छान वाटलं बोलून." हर्ष म्हणाला.
"हो रे! असेच एकमेकांच्या टचमध्ये राहा. शेवटी तुम्ही दोघेही पुढच्या पिढीचे मुख्य आधारस्तंभ आहात. दोघांनीही एक विचाराने राहायला हवं. उगीच निलमला आवडत नाही म्हणून आपण राजलाही फोन करण्याचे टाळतो. पण तिलाही तेच हवंय, हा विचारच करत नाही." नयना ताई म्हणाल्या.
"हो ना! पण कालचा प्लॅन तर अगदी कमालीचा आखला होता तिने. ऐनवेळी सुपर्णाने पलटी मारली म्हणून ती तोंडघशी पडली. नाहीतर आताही लग्नात विघ्न आणण्याचा तिचा प्लॅन जवळपास सक्सेस झालाच होता." आजी म्हणाल्या.
"नेमके काय झाले होते? आता पुन्हा काय केले निलम काकीने? कोणी मला तरी सांगा." हर्षिताने विचारले.
"तू नको जास्त लोड घेवूस. पुन्हा तीच कॅसेट वाजवायला इथे कोणालाही वेळ नाही. आणखी एक महत्त्वाचे...तू त्या निलम काकीपासून चार हात लांबच राहा बाई. नाहीतर एखाद दिवशी तुमच्यातच मारामारी व्हायची आणि तेव्हा मात्र आम्ही कोणीही चुकूनसुद्धा मध्ये पडणार नाही बरं का! आताच सांगून ठेवतोय. खा मग काकीचा मार. तशीही ती संधीच शोधत आहे तू केव्हा तिच्या तावडीत सापडतेस याची." हळू आवाजात हर्ष बोलला. नुसत्या कल्पनेनेच त्याला हसू आवरेना.
"काहीही...उगीच फालतू जोक करु नकोस हा दादा. मला कळतं कोणासोबत मारामारी करायची आणि कोणासोबत नाही ते." गाल फुगवून आणि भुवया उंचावत लटक्या रागातच हर्षिता म्हणाली.
हर्षच्या बोलण्यावर आता आजी आणि नयनाताई दोघींनाही हसू आवरेना. सगळ्यांना तिच्यावर हसताना पाहून हर्षिता मात्र गाल फुगवून बसली.
असाच एक एक दिवस सरत होता. लग्नाआधीचे उरलेले काही क्षण हर्ष आणि नेत्रा दोघेही मनसोक्त जगून घेत होते. रोज रात्री प्रेमाच्या गप्पांना भलतेच उधाण यायचे. नात्यातील ओढ, काळजी, प्रेमदेखील त्यामुळे द्विगुणित होत होते.
दोन्ही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली होती. बघता बघता लग्न चार दिवसांवर येऊन ठेपले.
माधवरावांनी इनामदार घराण्याला साजेसा असा लग्नाचा हॉल आधीच बुक करून ठेवला होता. चार दिवस आधीच सर्वजण तिथे जमणार होते. लग्नाची मेहंदी, संगीत, हळद आणि शेवटच्या दिवशी लग्नसोहळा असे काहीसे नियोजन होते.
मुद्दामहून दोन्ही फॅमिली चार दिवस आधीच एकत्र येणार होत्या. कारण होते...नेत्राचा आनंद आणि तिच्या चेहऱ्यावरील हास्य टिकवून ठेवणे. तिने आतापर्यंत जे काही सहन केले होते त्याचा तिला कायमचा विसर पडावा आणि नव्या आयुष्याची सुरुवात ही आनंदी आणि मंगलमय वातावरणात व्हावी. प्रमिला ताई लेकीच्या लग्नाची म्हणावी तशी तयारी आणि तिची हौसमौज करतील असे नाही, म्हणूनच नयना ताई आणि माधवरावांनी मिळून चार दिवस आधी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता.
पुढच्या चार दिवसानंतर एका अनोळखी वाटेवरून सुरू झालेला हा दोन अनोळखी दिशांचा प्रवास अखेर एक होणार होता.
हर्ष आणि नेत्रा प्रत्येक क्षण हृदयाच्या कप्प्यात अलगद साठवत होते. आठवणींची हीच साठवण पुढे आयुष्यभर दोघांच्याही कामी येणार होती.
हर्ष आणि नेत्रा प्रत्येक क्षण हृदयाच्या कप्प्यात अलगद साठवत होते. आठवणींची हीच साठवण पुढे आयुष्यभर दोघांच्याही कामी येणार होती.
जसजशी वेळ जवळ येत होती तशी हर्षच्या मनाची घालमेल मात्र वाढत होती. नेत्राच्या मनाची देखील हीच अवस्था असेल का? हे जाणून घेण्यासाठी तोही उत्सुक होता.
"हॅलो नेत्रा... मला एक सांग ना, सध्या काय फिलिंग आहेत गं तुझ्या? म्हणजे नेमकं कसं वाटतंय तुला?"आश्चर्यकारकरित्या हर्षने नेत्राला प्रश्न केला.
"आता लग्न तर तुझेही आहे. मग तुझ्या ज्या फिलिंग आहेत त्याच माझ्याही असणार नाही का... बुद्धू!" हसतच नेत्रा उत्तरली
"हो गं..तेवढं कळतं मला. पण तरीही तू मनापासून खुश आहेस ना गं?"
"हे काय विचारणं झालं का हर्ष! तुला असं का वाटतं मी खुश नाहीये? प्रत्येक गोष्ट अशी बोलून नसते रे दाखवायची. काही भावना या न बोलताही आपोआप समोरच्याला समजायला हव्यात. तेव्हाचा आनंद न बोलताही आपसूकच मग चेहऱ्यावरून ओसंडून वाहायला लागतो आणि त्यातूनच मग नात्याची वीणदेखील आणखीच घट्ट व्हायला मदत होते."
नेत्राचे उत्तर ऐकून हर्ष मनोमन सुखावला.
"नेत्रा.. खरंच मी खूप भाग्यवान आहे. तुझ्यासारखी हुशार मुलगी माझ्या आयुष्याचा कायमस्वरूपी एक भाग होणार आहे. आणखी चार दिवसांनी आपले हे नाते एका नव्या बंधनात बांधले जाईल, तेव्हा सुरू होईल नव्या नात्याचा नवा प्रवास." हर्षला तर किती बोलू नि किती नाही असेच झाले होते.
हर्ष आणि नेत्रा दोघेही खूपच उत्सुक होते त्यांच्या आयुष्यातील हा नवा आनंद लुटण्यासाठी. एकटी निलम काकी सोडली तर हा आनंद प्रत्येकाच्याच चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत होता.
परदेशात शिकायला गेलेला निलम काकीचा मुलगा राजवर्धन, हाही लग्नाच्या आधी चार दिवस घरी परतला. इतक्या दिवसांनी लेकाला पाहिल्यानंतर निलम काकीचा आनंद गगनात मावेनासा झाला. साऱ्या जगाचा तेव्हा तिला पूर्णपणे विसर पडला.
क्रमशः
आता कसा पार पडणार नेत्रा आणि हर्षचा विवाहसोहळा? जाणून घेण्यासाठी वाचत रहा, अनोळखी दिशा..कथा अनोख्या प्रेमाची.
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा