Login

अनोळखी दिशा..(भाग ३०)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की इनामदारांच्या घरी हर्ष आणि नेत्राच्या लग्नाची गडबड सुरू झाली. अवघ्या चार दिवसांवर लग्न येवून ठेपले आहे. आता पाहुयात पुढे..

"अरे चला आवरले की नाही तुमचे? उशीर होतोय हॉलवर पोहोचायला. उगीच टाईमपास करत बसू नका बरं, तिकडे जाऊन पुढची तयारी पण करायची आहे. पाच मिनिटाच्या आत आपापले सामान घेऊन हॉलमध्ये या." आजीने मोठ्याने सर्वांना आवाज दिला.

आजीच्या हुकूमावरुन पुढच्या पाच मिनिटात सगळेचजण खाली जमा झाले.

"भाऊजी एक गाडी नेत्राच्या घरी पाठवायची होती त्यांना घ्यायला. काय झाले तिचे?" नयना ताईंनी विचारले.

"हो वहिनी मगाशीच तिकडे पाठवलीये एक गाडी." महेशराव उत्तरले.

"वहिनी...तुम्ही बाकी कामाची काळजी नका करू, तुम्ही बायका तुमचे आवरुन आधी गाडीत बसून घ्या बरं. बाहेर चला अगोदर म्हणजे आपोआप आम्ही पण निघतो." गमतीच्या सुरात महेशराव बोलले.

"हो! पण आधी तुझी बायको कुठे अडकली ते बघ. आधी तिला पुढे घालून गाडीत बसव." आजीने लेकाला बरोबर टोमणा मारला.

आजीच्या बोलण्यावर सगळेच हसायला लागले. तेवढयात निलम काकी बाहेर आली. तिला पाहून सर्वांनी अचानक हसणे थांबवले.

'इथे आपल्यावरच काहीतरी जोक झाला असणार!' हे आता निलम काकीला कळून चुकले होते. परंतु, आता ती काही बोलणार तोच महेश काकांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न सुरु केला.

"हे घ्या! आली निलम. पुरे झाल्या आता गप्पा. आधी निघा बरं सगळे बाहेर. इथेच असा टाईमपास करत बसलो तर रात्री तुम्हा बायकांच्या मेहंदी प्रोग्रामला आणखी उशीर व्हायचा. मग पुन्हा जागरण झाले की आम्हा पुरुषांवर चिडचिड करायला तुम्ही बायका मोकळ्या." निलमकडे हळूच एक कटाक्ष टाकत महेशराव बोलले.

"कळतात बरं का टोमणे! पण आता मला वेळ नाही तुमच्याशी वाद घालायला." एवढे बोलून निलम काकी सर्वांच्या आधी बाहेर गाडीत जाऊन बसली.

"अगं हर्षु! एक खूप महत्त्वाची गोष्ट विसरली...किचनमध्ये मेहंदीच्या कोनांचा बॉक्स आहे बघ, तेव्हढा घेऊन ये पटकन्, पळ. भाऊजी दोनच मिनिट थांबा." नयना ताई म्हणाल्या.

"काय आई...तू पण ना!" हातपाय आपटतच हर्षिता जाऊन बॉक्स घेवून आली.

"मेहंदीच्या कार्यक्रमा दिवशी मेहंदीच घरी विसरा. अवघड आहे तुम्हा बायकांचं. आधीच एवढा वेळ घेता आवरायला आणि तरीही काही ना काहीतरी विसरताच. अजूनही काही विसरालात का पुन्हा एकदा पाहून घ्या वहिनी." हसतच महेशराव बोलले.

"सगळं घेतलंय ओ भाऊजी पण तरीही काहीतरी विसरलंय असंच राहून राहून वाटतंय." नयना ताई म्हणाल्या.

"बरं आता चुकून काही राहिले असेल तर राहू द्या. वेळ पडलीच तर येईल मी पुन्हा. तसंही कुठे जास्त लांब आहे हॉल! येता येईल पुन्हा. पण आता आधी निघा बरं सगळे. नाहीतर उशीर झाला म्हणून दादा माझ्यावरच ओरडेल. म्हणेल 'एक काम सांगितलं तर तेही वेळेत पूर्ण करता येत नाही.' तुमच्यामुळे मलाच त्याची बोलणी खावी लागतील." भितीच्या सुरात महेशराव म्हणाले.

"त्यात काय नवीन आहे मग? तसंही रोज बायकोची बोलणी खातोच ना! कधीतरी मोठ्या भावाची बोलणी खाल्ली तर मग फरक कुठे पडतो?" सवयीप्रमाणे आजीने टोमणा मारलाच.
टोमणे देण्यात घरात आजीचा हात मात्र कोणीही धरु शकत नव्हते.

"आई...ही वेळ आहे का आता टोमणे मारत बसण्याची? मीच जातो बाहेर, त्याशिवाय तुम्ही घराबाहेर पडणार नाहीत." रागातच महेशराव बोलले नि ते बाहेर गाडीत जाऊन बसले.

आता क्षणाचाही विलंब न लावता महेश काकांच्या पाठोपाठ सगळेच बाहेर पडले आणि गुपचूप जाऊन गाडीत बसले. पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात सर्वजण हॉलवर पोहोचले.

सजवलेला हॉल, सगळीकडे दरवळणारा फुलांचा आणि अत्तराचा सुगंध तसेच मेहंदी आणि संगीत कार्यक्रमासाठी केलेली सजावट...हे सर्व पाहून सर्वचजण अगदी खुश झाले. इनामदारांच्या घरातील सध्याच्या तिसऱ्या पिढीतील हे पहिलेच लग्न होते. त्यामुळे सगळ्यांचा आनंद चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत होता.

"वाव...दादा खूप लकी आहेस यार तू. कसले भारी डेकोरेशन केले आहे हे! बाबा माझ्या लग्नात पण असंच करुयात आपण, चालेल? उत्साहाच्या भरात राज पटकन् बोलून गेला.

राजच्या बोलण्यावर सगळेच हसायला लागले.

"पाहा हा भावी नवरदेव आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे." आजोबा म्हणाले.

"तू लाख म्हणशील रे असंच हवंय, पण तुझ्या आईला थोडीच ना असं चालणार आहे! हर्षसाठी एखादी गोष्ट केली की त्याच्याही कितीतरी पटीने महाग गोष्ट ती तुझ्यासाठी खरेदी करते. हे विसरलास की काय? प्रत्येक वेळी काहीतरी स्पेशल आणि युनिक हवं असतं तिला. म्हणूनच तिने तिला परदेशात शिकायला पाठवले. आता तुझ्यासाठी बायकोच कोणत्या देशातून मागवते ती काय माहिती!" आजी एकदम स्पष्टपणे बोलली.

"आजी... त्याने ऑलरेडी शोधून ठेवलीये." हर्षने आता राजची खेचायला सुरुवात केली.

"गप रे दादा...काहीही काय? माझ्यात एवढी हिम्मत नाही बाबा. असे काही केले तर आई मला हाकलून देईल घरातून." राज बोलला.

"ह्याबाबतीत अगदी बापावरच गेलायेस तू. फक्त तो त्याच्या बायकोला घाबरतो आणि तू तुझ्या आईला. माझा लेक जर तेव्हा मला घाबरला असता तर आज त्याच्यावर अशी बायकोला घाबरण्याची वेळ आलीच नसती." महेश रावांकडे एक कटाक्ष टाकत आजी मुद्दाम बोलली.

"हा दादा आलो रे! तुमचं चालू द्या मी जातो." दादाने बोलवल्याचे कारण सांगून महेश रावांनी तिथून पळ काढला.

त्यांच्या या कृतीवर सगळेच हसायला लागले.

तेवढयात नेत्रा आणि तिची फॅमिली तिथे हजर झाली. राज खूपच उत्सुक होता त्याच्या होणाऱ्या वहिनीला भेटण्यासाठी.

एक एक करत सगळे गाडीतून खाली उतरले. नेत्रा, तिचा भाऊ आदित्य, नेत्राची आई, तिचे मामा-मामी आणि त्यांची दोन मुलं...त्या दिवशी एवढीच काय ती नवरीकडची मंडळी आली होती. बाकीचे पाहुणे लग्नाच्या दिवशी येणार होते. तसेही नवऱ्या मुलीकडचे पाहुणे कमीच होते. नेत्राच्या बाबांचे मित्र आणि तिच्या सख्ख्या आजोळचे काही लोक तसेच नेत्राने जोडलेली तिच्या जिवाभावाची काही मंडळी. एवढाच काय तो तिचा गोतावळा. त्यातही इतर पाहुणे लग्न मुहूर्तावर हजर होणार होते.

"दादा तुझी चॉईस एकदम भारी आहे बरं का. छान आहे नेत्रा वहिनी, दिसायला अगदी तिच्या नावाप्रमाणेच गोड. बरं आमची ओळख करून देशील की नाही?" राज बोलला.

"हो देणार की भावा." हर्ष उत्तरला.

सगळ्यांना असे एकत्रितपणे समोर पाहून नेत्राचा आनंद द्विगुणित झाला. हर्षिताने तर होणाऱ्या वहिनीची अगदी गळाभेट घेतली.

"हाय नेत्रा खूप गोड दिसतीयेस." हर्षिता म्हणाली.

"ओ वकिलीन बाई, आता माझ्या बायकोला एकेरी नावाने नाही हाक मारायची, मला अजिबात आवडणार नाही ते...वहिनी म्हण तिला, समजलं." हर्ष थोडा भाव खात बोलला.

"हो का मिस्टर हर्षवर्धन इनामदार! पण अजून लग्न झालं नाही तुमचं...समजलं! आणि त्यातही वहिनी म्हणायचं की नेत्रा ते आम्ही आमचं पाहून घेऊ. तुला आताच सांगून ठवतिये, तू आमच्या दोघींमध्ये अजिबात पडायचे नाही. वरना इसका अंजाम बहुत बुरा होगा." थोडी नौटंकी मूडमध्ये नेत्रा बोलली.

"चल गं...तुला इथे कोणी घाबरत नाही." सवयीप्रमाणे हर्ष हर्षितासोबत मुद्दाम उलटच बोलला.

"झालं यांचं पुन्हा सुरू. आम्ही जातो आत, तुमचं भांडून झालं की मग तुम्हीपण या. पण लवकर आत या. उगीच टाईमपास करत बसू नका. मेहंदीची तयारी पण करायची आहे. पुढच्या अर्ध्या तासात आवरुन रेडी व्हायचं आहे." नयना ताईंनी सगळ्यांना तंबी दिली आणि सगळी मोठी मंडळी आत निघून गेली.

"बरं नेत्रा, हा राज...राजवर्धन इनामदार. म्हणजेच महेश काका आणि निलम काकीचा मुलगा. हा परदेशात शिकायला असतो आणि राज...ही नेत्रा, तुझी होणारी वहिनी." हर्षने नेत्राची आणि राजची ओळख करुन दिली.

"अरे राज, एक मिनिट अजून एक महत्त्वाची व्यक्ती राहिली, हा आदित्य...नेत्राचा लहान भाऊ." हर्ष म्हणाला

"हाय आदित्य, चला आपल्या गँगमध्ये आता आणखी दोन मेंबर वाढले म्हणायचं." हसतच राज बोलला.

"ये....इस बात पर एक सेल्फी तो बनती है. चलो गाईज पटापट पोज द्या सगळ्यांनी." मोबाईल समोर धरत हर्षिता मोठयाने ओरडली.

सगळ्यांनी मिळून एक छानसा सेल्फी काढला. फोटो काढताना नकळतपणे हर्षने नेत्राच्या गळ्यात हात टाकला. तशी तिच्या हृदयाची धडधड वाढली.

"चला आता पटकन्, आतून फर्मान यायच्या आत आपल्याला आत जायला हवं." राज बोलला.

नेत्राची नजर मात्र हर्षवरच खिळली होती. आत जाता जाता हर्षने सर्वांच्या नकळत नेत्राला डोळा मारला आणि हसतच तो राजच्या गळ्यात हात घालून पुढे निघून गेला.

नेत्रा मात्र लाजून अगदी गोरीमोरी झाली.

'बापरे! भलताच रोमँटिक आहे हा.' मनातच नेत्रा पुटपुटली. हर्षचे हे रूप आज ती पहिल्यांदाच पाहत होती. पण तिलाही त्याचे हे असे वागणे मनापासून आवडत होते. लाजेची लाली तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती.

क्रमशः

हर्ष आणि नेत्राच्या विवाह सोहळ्यातील आणखी बऱ्याच गमतीजमती पाहुयात पुढील भागात.